|| मनश्री पाठक

एरव्ही माझ्यासोबत बाहेरचं काहीबाही हादडणारे मित्र आता अचानक आमच्या रोजच्या जेवणाचं काय याची चिंता करायला लागले.. ज्यांनी बॅचलर असताना माझ्यासोबतच जेवणावेळी बाहेरचे वडापाव हाणले त्यांना आता मात्र बाहेर खातांना, ‘काय मग आज स्वयंपाक नाही वाटतं?’ असा प्रश्न पडतो..

एकदाचे ते १२.२९ झाले, सनई-चौघडे वाजले, ‘वाजवा रे वाजवा’ म्हणत सगळ्यांनी अक्षता उधळल्या.. आम्ही एकमेकांच्या गळ्यात हार टाकून हुश्श करेपर्यंत मंडळी पंगतीत बसली.. मग सुरू झाली ती शुभेच्छुकांची गर्दी, सेल्फी, हशा, टाळ्या आणि त्यासोबत ‘हं मग पाठकबाई, आता खरी मजाय तुमची’ अशी वाक्यं.. राजा राणीच्या खुर्चीवर बसून मी सकाळी सप्तपदीत दिलेली वचनं आठवत होते. भटजींच्या हो ला हो म्हणत मी चक्क नवऱ्याची अन्नपूर्णा होण्याचं, तो चिडला तरी कधीही उलट न चिडण्याचं, सदैव हसतमुख गृहिणी होण्याचं वचन दिलं होतं. लग्नात तसं मला आईवडिलांपासून दूर जाण्याचं फार टेन्शन आलं नव्हतं, टेन्शन आलं ते मला लग्नानंतर लग्न झालेल्या बाईसारखं वागायला जमेल की नाही याचं. मी मनाला समजावत होते ती आधीची सप्तपदी जा विसरून शेवटच्या फेऱ्यात म्हटलंय ना सखा सप्तपदी भव.. मग झालं तर..

या सगळ्याला आता वर्ष उलटतंय.. पण, गेल्या एका वर्षांत मला लग्नानंतर काही पुरुष नव्यानं भेटले त्यात माझा जुना मित्र असलेला नवराही होताच. लग्नानंतर नवरा, सखा, सप्तपदीच्या वचनाप्रमाणेच वागतोय हे बघून बरं वाटत होतं, पण अधून मधून काही खडे टोचत होते. लग्नानंतर बायका बदलतात, त्या आणखीनच ‘बायकी’ होतात हे मी ऐकून, बघून होते, पण, आता लग्नानंतर पुरुषही कसा बदलतो हे आता अनुभवायचं होतं..

गेल्या एका वर्षांत मला जे पुरुष भेटले त्यांची ही गोष्ट. तसे लग्नानंतर भेटलेले हे पुरुष मला काही नवे नाहीत. तेच जुने मित्र, जुने नातेवाईक आणि आजुबाजूला असणारे जुने पुरुष. पण, माझं लग्न झालं तसं यांच्यात माझ्याशी वागता-बोलताना सूक्ष्म बदल व्हायला लागले. तसे हे बदलही फार नवे नाहीत. कुणी त्याची फारशी दखलही घेत नाही, पण लग्नानंतर नव्यानं भेटलेल्या जुन्याच पुरुषांनी मला अस्वस्थ केलंय.

लग्नं ठरलं त्यावेळी नवऱ्याचं अभिनंदन करताना आमच्या इतर मित्रांचा स्वर बऱ्यापैकी सहानुभूतीचाच होता. एरव्ही माझ्यासोबत बाहेरचं काहीबाही हादडणारे मित्र आता अचानक आमच्या रोजच्या जेवणाचं काय याची चिंता करायला लागले. मला मात्र कणीक आणि त्यातलं पाणी यांच्या कायम व्यस्त होणाऱ्या प्रमाणाचं टेन्शन यायला लागलं. कधी कुणाला साध्या हॉटेलमध्ये जेवताना सापडलो तर ‘अरे अजूनपण बाहेरचंच का’ हे शब्द बोचायला लागले. मला एक कळेना आजपर्यंत माझ्यात काही पाककौशल्य आहे की नाही याविषयी काहीच न पडलेले हे पुरुष लग्नानंतर माझ्या घरातल्या किचनची अचानक एवढी का काळजी करायला लागले. ज्यांनी बॅचलर असताना माझ्यासोबतच जेवणावेळी बाहेरचे वडापाव हाणले त्यांना आता मात्र बाहेर खातांना, ‘काय मग आज स्वयंपाक नाही वाटतं?’ असा प्रश्न पडतो. माझी तर आता पक्की खात्री झालीय, घराबाहेर राहणारे, रोज मेसमधल्या जेवणाला कंटाळलेले निम्म्याहून जास्त मुलं लग्नानंतर जेवणाचा प्रश्न सुटेल म्हणून चटकन लग्नाला ‘हो’ म्हणत असावेत. त्यांचंही बरोबरच आहे. लग्नानंतर मिळणारी घराची ऊब हवीहवीशी वाटणारच. या उबेसाठी ते मेसमधल्या डब्यासारखाच स्वयंपाक येणारी मुलगी घरी आणत नाहीत हे नक्की. किमान चांगला स्वयंपाक जमणे ही अपेक्षा त्यांच्या सुप्त अपेक्षांपैकीच एक असतेच.

एरव्ही मी एकटी फिरले, रात्री घरी एकटी थांबले, एकटी सिनेमाला गेले, एकटीनं पिझ्झा खाल्ला, कुठे पैसे उडवले तर कुणाला काही प्रश्न पडायचे नाहीत. आता मात्र पडतात. ‘नवऱ्याला टाकून एकटीनंच काय फिरतेस’ हे प्रश्न काही कारण नसताना मध्ये मध्ये येतात. आतापर्यंत मी कशीही अगदी कशीही गबाळी राहिले तरी ज्यांना फरक पडायचा नाही त्यांना आता पडतोय. ‘जरा लग्न झाल्यासारखं दिस की’ म्हणजे नेमकं कसं दिसू हे कळत नाही. ‘वाटत नाही हो तुमचं लग्नं झालंय’ हा डायलॉग जितक्या बायकांनी मला टाकलाय तितकाच पुरुषांनीही टाकलाय.

लग्न हे इतरांना वाटण्यासाठी आणि दिसण्यासाठी असतं की माझं मला वाटलं तरी पुरेसं असतं हे अजून मला कळलेलं नाहीय. माझी नोकरी धावपळीची, वेळकाळ नसणारी, त्यामुळे आता अशी नोकरी आणि घर कसं सांभाळणार तू असे प्रश्न पडलेले डझनभर नातेवाईक भेटले. बायकांनाच ही विशेष काळजी असते, असं मला वाटत होतं, पण ते चूक होतं.. कारण एका मुलाखतीत नोकरी आणि घर दोन्ही सांभाळणं खरंच तुम्हाला जमेल का, मग भविष्यातलं फॅमिली प्लॅनिंग नोकरीच्या आड येईल का असे प्रश्न नोकरीदात्या पुरुषांकडूनच विचारले गेलेत. तेव्हा माझं लग्न झालंय म्हणजे मी अपंग झाली, असं नाहीये हे ओरडून सांगावंसं वाटलं. हे झाले बाहेरच्या पुरुषांचे पॅटर्न.

घरातला महत्त्वाचा पुरुष म्हणजे नवरा. हा लग्नानंतर बदलतो का आणि कसा बदलतो यावर माझं अगदी बारीक लक्ष होतं. उत्सुकताही होतीच. दोघंही बॅचलर संस्कृतीत वाढलेलो त्यामुळे सुरुवातीला जरा जड जाणारच होतं, मग हळूहळू साथी हाथ बढाना म्हणत सुरुवात झालीच. नवऱ्याला करता येणारा खिचडी हा एकमेव पदार्थ मी जवळपास रोज नव्या चवीच्या पदार्थासारखा चाखला. त्यानंही माझे अनेक प्रयोग खिलाडूपणे स्वीकारले. पण, दोघांच्या प्रयोगांपैकी ‘पुरोगामी पुरुषाचे घरगुती प्रयोग’ म्हणून घरी आलेल्या पाहुण्यांनी नवऱ्याच्याच पाठीवर शाबासकीची थाप दिली. बाकी, एरव्ही घरात भांडी घासणारा नवरा घरी कुणी वडीलधारी मंडळी आली की हातात झाडू घ्यायला जरा बिचकतोच. आता पाहुण्यांसमोर भांडी घासायची तर नवऱ्याला ‘होय, मी आहे जोरू का गुलाम’ हे मान्य करावंच लागतं..

थोडक्यात काय, माझं लग्न झालंय या गोष्टीची पदोपदी जाणीव करून देणं हे आपलं आद्य कर्तव्य मानणारे अनेकजण मला भेटले. त्यांचंही काही फार चुकत नाही. कारण, यातून त्यांचा लग्नाबाबतीतल्या छुप्या अपेक्षांचा अजेंडा डोकावत असतो. म्हणूनच, एखादा जवळचा मित्र मन मोकळं करताना म्हणतो, ‘‘बाकी सगळं ठीक आहे गं पण, लोन घ्यायचं म्हटलं तर बायको कमावती हवी आणि परत गावाकडे गेल्यावर सगळं जमवून घेणारी. आपल्या फिल्डमध्ये अशा मुली कुठून मिळणार. म्हणून करतोय कांदेपोहे.’’ एखाद्या चांगल्या मित्राची ही घुसमट मला बघवत नाही. कारण तो गोंधळलेला असतो. त्याला बायको हवीय, लोन शेअर करणारी पार्टनर हवीय, घर, चालीरीती सांभाळणारी केअरटेकर हवीय की आयुष्यभर पुरेल अशी मैत्रीण हवीय. त्याला सगळंच एका पॅकेजमध्येच हवं असतं. मग, तो धुंडाळतो मॅट्रीमोनिअल साइटस. शोधतो परफेक्ट मॅच. करतो निरीक्षण एखाद्या नव्या जोडप्याचं. आपल्याला अशी कधीही कुठेही फिरणारी, बिनधास्त, स्वयंपाक न येणारी बायको मिळाली तर नक्की जमेल ना आपल्याला या प्रश्नांनी हैराण होतो. खरंतर घरातल्या आई-आजीच्या आयुष्याकडे बघून यांनाही वाटतं आपण आपल्या बायकोच्या बाबतीत पुरोगामी व्हावं.. तसे ते आहेत असं सांगतात आणि स्वत:ला बजावतातही. पण, शंभर टक्के पुरोगामी होणं यांना परवडत नाही..

लग्नं ही गळ्यातली धोंड वाटावी असं त्यात मुळीच काही नाही. पण, लग्नानंतर चालताबोलता, उठताबसता खडय़ांसारखे टोचणारे, न बोलता डोळ्यांत दिसणारे प्रश्न कमी व्हायला हवेत. वर्षांनुवर्ष परंपरेच्या जोखडाखाली अडकलेल्या बायकांकडून येणारे असे प्रश्न खूप सहज स्वाभाविक असतात. फेसबुकवर वुमन्स डे, मदर्स डे साजरा करणारे पुरोगामी पुरुष जेव्हा असे प्रश्न विचारतात तेव्हा त्यांची कीव येते. त्या मॅट्रीमोनिअल साइटच्या जाहिरातीतला लग्नाळू पुरुष हा तर गोंधळलेला आहेच, पण माझ्या लग्नानंतर भेटलेल्या याच पुरुषाची अनंत गोंधळलेली रूपंही पहायला मिळतायेत. लग्नं झाल्यानंतर सगळ्याच बाबतीत स्त्री-पुरुषाचा पुनर्जन्म व्हायला हवा असं नाहीय. लग्नानंतर सवयी बदलायलाच हव्यात हा अट्टहासही चुकीचाच. लग्न म्हणजे मोठ्ठा बदल आणि त्या बदलातला मोठ्ठा वाटाही बाईच्याच आयुष्यातला, या समजुतीचं भूत मानगुटीवरून उतरायला हवं. तेव्हा लग्नानंतर भेटणारे सगळेचजण मनात कोणत्याच प्रश्नांची भेसळ नसलेले निर्मळ भासतील..