13 December 2019

News Flash

‘त्या’ची खंबीर साथ..

शिक्षणाबरोबरच दैनंदिन जीवनात करावी लागणारी कामं ती आनंदाने करत करत होती.

प्रतिनिधिक छायाचित्र

प्राजक्ता ढेकळे

‘‘तिची इच्छा आहे ना? मग झालं तर.  आणि शहरात शिकणाऱ्या समद्यांच्या ओळखीचीच समदी असत्यात असं थोडीच असतं.’’ ‘त्याचं’ बोलणं ऐकून तिला हायसं वाटलं. आज पहिल्यांदा कुठल्यातरी पुरुष माणसाने कुणाशी तुलना न करता तिचं महत्त्व सांगितलं.गावाच्या वेशीवर लागलेल्या सत्कार समारंभाच्या फलकाकडे बघताना मागच्या आठ-दहा वर्षांचा काळ फ्लॅशबॅकप्रमाणे तिच्या डोळ्यापुढे सरकू लागला..

तिन्हीसाजेच्या वेळी घरात स्वैपाकासाठी म्हणून ती मोठय़ा तुंब्याच्या कुऱ्हाडीने लाकडाच्या चिपळ्या  करत होती. आडव्या लाकडावर दुसरं एक उभं लाकूड मोडून नेम धरून एका ठोक्यात उभं ठेवलेल्या लाकडाचे दोन तुकडे केले. तिन्हीसांजा होत आल्यामुळे माणसं रानामाळातनं घरी येत व्हती. हिचं आपलं काम सुरूच होतं. रस्त्याने जाणारा वयाने ज्येष्ठ पुरुष म्हणाला, ‘‘काय पोरगी हाय. गडय़ावाणी लाकडी फोडती. एका घावात दोन तुकडं करती. खरं तर पोरगा असता तर बरं झालं असतं.’’ एवढं बोलत बोलत तो पुरुष रस्त्याने मार्गक्रमण करता झाला. तिथं पहिल्यांदा तिला ‘कितीही केलस तरी तू मुलगी आहेस,’ याची जाणीव झाली. मात्र त्याकडे जास्त लक्ष न देता ती आपल्या कामाला लागली.

दिवसामागून दिवस सरत होते. घरातील, बाहेरील पुरुषांच्या विचारांची, वर्तनाची ओळख तिला होत होती. शिक्षणाबरोबरच दैनंदिन जीवनात करावी लागणारी कामं ती आनंदाने करत करत होती. विहिरीत उतरून पाणी आणण्यापासून ते गोठय़ातील बलांना गाडीला जुंपून मळ्यात नेण्यापर्यंतची लौकिक अर्थाने पुरुषाने करावयाची कामं ती अगदी सहज करत होती. त्यात तिलाही काही गैर वाटत नव्हतं. जमतंय म्हणून करतेय. एवढंच काय ते तिचं म्हणणं.. मात्र तिला ही कामं करताना बघणाऱ्या आजूबाजूच्या अनेक पुरुषांना मात्र तिचं कौतुक वाटायचं. असं एके दिवशी गुरांसाठी म्हणून रानातनं मक्याचा आणि गवताचा एकत्र असा भलामोठा भारा डोक्यावर घेऊन घरी आली. तेव्हा घरात गप्पा मारत बसलेल्यांपैकी कोणी तरी तरी म्हणालं, ‘पोरगी एखाद्या धिप्पाड पोरालादेखील लाजवंल असं काम करती.’ तिला हे नवीन नव्हतं. तिचं आपलं काम सुरूच होतं. कामाबरोबरच शिक्षणही व्यवस्थित सुरू होतं. महाविद्यालयात शिकत असतानादेखील अगदी एनसीसीपासून ते वक्तृत्व स्पर्धापर्यंत अनेक गोष्टींमध्ये ती हिरिरीने सहभागी होत होती. असंच एकदा मानाच्या समजल्या जाणाऱ्या वक्र्तृत्व स्पर्धेत पहिले बक्षीस जिंकून ती घरी आली तेव्हा कोणी तरी म्हणाले, ‘‘पोर लय गुणाची हाय, सगळं काम कसं गडय़ावानी करती. कशातच मागं सरणार नाय.. एवढा पोरगा असता तर आता-बापाच्या हाताला आला असता.’’ कौतुकाबरोबर या गोष्टी तिला नेहमीच्याच झाल्या होत्या. ती आता पदवीचं शिक्षण पूर्ण झाल्यावर पुढील शिक्षणासाठी पुण्याला जाण्याच्या विचारात होती.

तसा विचार ही तिने घरात बोलून दखवला. तुला जमेल का एवढय़ा मोठय़ा शहरात? पोरीची जात हाय. कुणीच वळखीच नसणार यासारख्या अनेक प्रश्नांची सरबत्ती सुरू असताना घरातील कर्ता पुरुष म्हणाला, ‘‘तिची इच्छा आहे ना? मग झालं तर. बाकीच्या गोष्टीचं बघता येईल. आणि शहरात शिकणाऱ्या समद्यांच्या ओळखीचीच समदी असत्यात असं थोडीच असतं.’’ ते बोलणं ऐकून तिला हायसं वाटलं. आज पहिल्यांदा कुठल्यातरी पुरुष माणसाने कुणाशी तुलना न करता तिचं महत्त्व सांगितलं. पुण्याला जायची तयारी सुरू झाली. लागणाऱ्या सामानाची भराभरी करून घरातल्यांचा निरोप घेऊन ती निघाली. पहिल्यांदा सोडायला म्हणून घरातला कर्ता पुरुष म्हणून बरोबर आला. गावातल्या एसटीत बसल्यापासून ते पुण्यात पोहचेपर्यंत त्याने पुण्यात गेल्यावर काय करायचं, काय नाही करायचं या सगळ्याची माहिती देण्याबरोबरच कसं वागायचं, या उपदेशाचं चार डोसही पाजले. पुण्यात पोचवून माघारी निघताना मात्र त्याचे डोळे डबडबले होते. ‘‘जातो,’’ म्हणत तो मागे वळून न बघताच निघून गेला. इकडे पुण्यात तिचंही शिक्षण सुरू झालं. पदव्युत्तर शिक्षणाबरोबरच स्पर्धापरीक्षेच्या अभ्यासात तिने स्वत:ला झोकून दिलं. दोन्ही अभ्यासाचा मेळ साधताना तिची कसरत होत होती पण.. तरीही ती मात्र जोर लावत होती. दिवसामागून दिवस जात होते. पुण्यात आता ती चांगलीच रुळू लागली होती. अभ्यासाचाही जम बसत होता. मात्र घरातील कर्ता पुरुष सोडून इतरांच्याकडून आता लग्नासाठी घाई केली जात होती. ‘तिच्या बरोबरीच्या पोरींना आता पोरं झाली. हिचं लगीन कवा करणार?’, ‘लग्नाचं आता बघितलं पाहिजे,’ असे डायलॉग तिला तिला ऐकायला मिळत होते. तिला मात्र ‘बहुत गुजरी थोडी बाकी रही, अब क्यों ताल बेताल करे,’ असे वाटत होते. चालू असलेल्या अभ्यासाचा जोर तिने अजून वाढवला. या सगळ्या घडामोडीत तो घरातील कर्ता पुरुष मात्र कायम तिला मदत करत राहिला.

असेच काही महिने गेल्यानंतर तिने स्पर्धापरीक्षेच्या माध्यमातून दिलेल्या कोणत्या तरी अधिकारी पदाचा निकाल आला. धाकधूक करत तिने एकत्र अभ्यास करणाऱ्या मित्र-मत्रिणींच्या बरोबर हा निकाल बघितला. अंतिम निवड झालेल्या यादीत तिचं नाव होतं. शेवटी तिची अधिकारी म्हणून निवड झाली होती. पदवीच्या शिक्षणाबरोबर आयुष्याला कलाटणी देणाऱ्या क्षेत्रात तिच्या करिअरला सुरुवात झाली होती. मित्र -मत्रिणींनी जल्लोषाला सुरुवात केली. तिला तर आनंदाने काही सुचतच नव्हतं. घरातील त्या पुरुषाने टाकलेला विश्वास आज सार्थ ठरला होता. जमलेले अनेक जण अभिनंदन करत होते. या सगळ्या आनंदी उत्साहाच्या वातावरणातून थोडं बाजूला येत तिने घरी फोन लावला. घरातल्यांना तिची अधिकारी म्हणून निवड झाल्याचं सांगितलं. पलीकडून फोनवर बोलणाऱ्याचा आवाजावरून ‘त्याचा’ कंठ दाटून आल्याचे जाणवत होते. आवंढा गिळत तिकडून शुभेच्छा दिल्या गेल्या. लवकर गावाला ये असं म्हणत, त्यांनी फोन ठेवला. आयुष्याच्या महत्त्वाच्या टप्प्यावर खंबीरपणे तो मागे उभा राहत गेल्यामुळे ती करत असलेल्या कष्टाला यश मिळत गेले. निकालानंतर काही दिवसांनी पुन्हा घरच्यांचा फोन आला, ‘तू कधी घरी येणार आहेस, गावात तुझी मिरवणूक काढायची आहे. गावकऱ्यांनी मोठा सत्काराचा कार्यक्रमदेखील ठेवला आहे. त्यामुळं तू ये लवकर,’ असं सांगितलं गेलं.. ती गावी आली होती..

.. तेवढय़ात कुणी तरी हाक मारली अन् काही वेळासाठी जुन्या आठवणींचा पट तिथेच थांबला. अन् मला वेशीवर घ्यायला आलेल्या त्या कर्त्यां पुरुषाच्या डोळ्यात वेगळाच आत्मविश्वास दिसला. पाठीवर शाबासकीची थाप टाकत त्याने, ‘मिळवलस गडय़ा..’ असं म्हणत पिशव्या उचलल्या आणि तो चालू लागला..

prajaktadhekale1@gmail.com

chaturang@expressindia.com

First Published on June 30, 2018 1:01 am

Web Title: inspirational success story of woman india inspirational women successful woman story
Just Now!
X