04 December 2020

News Flash

बाप नावाचा माणूस

‘प्रियंका रमेश पाटील’. यातील हे जे माझ्या नावामागचं ‘रमेश’ आहे ते माझं ब्रह्मांड.

आज रिक्षात बघितलं त्याला. दोन मिनिटांपूर्वी रिक्षावाल्यानं त्याच्याशेजारी पुढं बसवलं म्हणून रिक्षावाल्याशी हुज्जत घालून दुसऱ्या रिक्षात बसलेला. तेवढय़ात अनायसे एकच जण आहे म्हणून आम्ही तिघी पण त्याच रिक्षात बसलो तेव्हा आम्हाला गर्दी होऊ नये म्हणून स्वत:हून पुढं, रिक्षावाल्याजवळ जाऊन बसलेला. पुढं बसताना त्यानं जी एक नजर आमच्यावर फेकली ‘ती’ नजर मला माझं ब्रह्मांड दाखवून गेली.

‘प्रियंका रमेश पाटील’. यातील हे जे माझ्या नावामागचं ‘रमेश’ आहे ते माझं ब्रह्मांड. यशोदेला बालकृष्णाच्या इवल्या मुखात दिसलेलं ब्रह्मांडाचं वर्णन ज्या खुबीनं केलं, त्याहूनही महान वाटणारं ब्रह्मांड. त्या रिक्षात बसलेल्या त्या क्षणापूर्वीचा माज खर्रकन उतरून मायेचा, वात्सल्याचा साज चेहऱ्यावर चढवलेला ‘बाप’. नुकताच पोरीला होस्टेलवर सोडून आला असावा कारण पोरीला सोडताना बाप जितका हळवा, केविलवाणा होतो तेवढा फक्त तिच्या पाठवणीलाच होऊ शकतो. त्याच्या लेकीच्या विरहानं डोळ्यात आख्खा प्रशांत महासागर ‘पुरुष’ या इवल्याशा शब्दाचा बांध घालून थोपविला होता. पण त्याने ‘बाप’ होऊन फेकलेल्या नजरेतला ओलावा मला माझ्या बापाच्या आठवणीत भिजवून गेला. पटकन बस पकडून घरी जावसं वाटलं. गेल्या गेल्या घट्ट मिठी मारून रडावसं आणि त्यांनाही रडवावसं वाटलं. डोळ्यातल्या अरबी समुद्रासह मनातला हिंदी महासागर रिक्त करावासा वाटला.

फक्त जन्म दिला म्हणून तुम्ही माझे जन्मदाते नाहीत. फक्त पालनपोषण केलं म्हणून, सांभाळलं म्हणून पालक नाहीत. उलट तुम्ही मला सांभाळलंच नाही. तुम्ही मला घडवलंत. कुंभार कसं आतून मायेचा हात आणि वरून थापटून घडवतो तसं घडवलं नाही. तुम्ही घडवलंत मला, कोंबडी जशी पंख फुटू पाहणाऱ्या पिलांना जिथं हवं तिथं, जसं हवं तसं पळू देते आणि लांबूनच देखरेख करते ना? अगदी तस्सं. तुम्ही दुरूनच लक्ष ठेवता आणि घारीप्रमाणं अचानक येणारी संकटं आमच्याही नकळत परतवून लावता. चुकतोय दिसू लागलं की, हलकीच आम्हाला भास वाटावी इतकी अलगद टोच मारून वळवता.

पप्पा, तुम्हाला आरसा कसा असतो माहीतेय? आणि तो समोरच्याच्या सोयीनुसार आरशाला अ‍ॅडजेस्ट करणारा टेकू? तुम्ही तो टेकू आहात. माझं प्रतिबिंब तुम्ही मला नाही दाखवत पण ते प्रतिबिंब, माझी औकात दाखवणाऱ्या परिस्थितीच्या आरशाला सावरत माझ्या सोयीनुसार टेकू देता. मला तो आरसा दिसतो पण टेकू नाहीच दिसत. पण तिथं तो असतो.

ममा, आज्जी नेहमी म्हणतात, ‘‘बापावर गेलीय.’’ जाणारच ना, लहानपणापासून तुम्हालाच फॉलो करत आलेय. दुकानात येणारी प्रत्येक मुलगी तुमच्यासाठी गंगी असायची आणि मुलगा गंगाराम. येणाऱ्या प्रत्येक तरुणाला तुम्ही, ‘काय म्हणतोस दोस्ता?’ अशी हाक द्यायचात. समवयस्काला तर बसवून घ्यायचात. येणारा प्रत्येक बुजुर्ग तुमच्याकडून कशाच्याही खरेदीबरोबर भाजलेल्या सुपारीच्या खांडक्याची देवाणघेवाण केल्याशिवाय गेल्याचं मी तरी पाहिलं नाही. प्रत्येक गिऱ्हाईकाला त्याचा समवयस्क होऊन बोलण्याची आणि प्रत्येक वस्तूवर एक स्माईल फ्री देण्याची पद्धत लाजवाब होती. आज लोक मला विचारतात, ‘‘सगळ्यांशी मैत्री कशी होते गं तुझी?’’

मी फक्त हसते. पण त्याचवेळी मी तुमच्या या देणगीनं ऋणात जाते. रस्त्यावरून जाताना कुठे काटा दिसला की गाडी थांबवून तुम्ही तो बाजूला करता. लहानपणी आम्ही चिडायचो पण यावर तुमचं उत्तर, ‘‘आपल्याला दिसला तर दूर करावा. मागच्याला नाही दिसला, शाळेच्या एखाद्या लेकराची सायकल पंक्चर झाली तर?’’ हे असं सांगताना तुम्हाला तुमची शाळेतून यायला उशीर झालेली लेकरं आणि तोवर टांगणीला लागलेला जीव दिसायचा हे आज कळतंय. मग मी ही रस्त्यावरचा काटा आपोआपच दूर करू लागले. कुठं तरी वाट पाहणाऱ्या बापाचा टांगलेला जीव भांडय़ात पाडण्यासाठी.

तुम्हाला जशी जेवताना पेपर वाचायची, झोपताना पुस्तक वाचायची सवय आहे ना! त्यामुळे रूममेट्स माझ्यावर वैतागतात. माझ्या वाचनानं रूमची लाइट रात्रभर सुरू असते ना! तुम्हाला खरं सांगू पप्पा, मला ना तुमचा खूप राग आला होता जेव्हा तुम्ही रविवारच्या क्लासला एकटीलाच पाठवायचात, होस्टेलवर पहिल्याच दिवशी फक्त अ‍ॅडमिशन करून देऊन, ‘बाकीचं तुझं तू बघ.’ म्हणून निघून गेला होतात तेव्हा. आणि हो मला तेव्हाही राग यायचा जेव्हा मी सणासुदीला कॉलेज, टेस्ट मिस करून घरी यायचा हट्ट करायचे तेव्हा तुम्ही म्हणायचात, ‘‘सण काय दर वर्षीच असतात, आता शिकायचंय तर ते कर आधी. जर सणवारच करायचे असतील तर सगळंच गबाळं घेऊन ये. आयुष्यभर हेच करत बस.’’

आणि रागानं फोन ठेवायचात तुम्ही.

आज कळतंय, माझ्या कुठल्याही मैत्रिणीपेक्षा लवकर आणि सफाईदारपणे मी माझी सगळी कामं एकटी करू शकते. नव्या, अनोळखी व्यक्तीशी बोलताना, माझा मुद्दा सांगताना त-त-प-प होत नाही. आणि हेही कळतंय की, माझ्या आयुष्यातले प्राधान्यक्रम कसे ठरवायचे, मी आज निर्णय आणि त्याची जबाबदारी घेण्यास समर्थ आहे. याचा अर्थ तुम्ही मला एकटं टाकलंत असा होत नाही. स्वावलंबी बनवलंत आणि तुम्ही आहातच की सोबत. तुम्हाला माहितेय पप्पा, जेव्हा तुम्ही गोष्टीत स्वत:ला आमच्यासोबत गृहीत धरता तेव्हा किती आनंद होते ते! माझं पोट खूप दुखायला लागलेलं तेव्हा तुम्ही म्हणाला होतात, ‘‘थोडावेळ धीर धर, एकदा ऑपरेशन झालं की ‘आपण’ बरे होऊ.’’ आणि तेव्हाही जेव्हा नांदेडला कॉलेजमध्ये अ‍ॅडमिशन मिळत होती तेव्हा म्हणालात, ‘‘आपल्याला लांब पडेल ते. पाहायची का पुण्याची वाट?’’

‘‘नांदेडमध्ये असलेला विषय आपल्या सोयीचा तर आहे ना?’’

हे ‘आपण’, ‘आपल्याला’, ‘आपल्या’ शब्द आहेत ना यांनी मला पदोपदी जाणीव करून दिली की मी एकटी नाही. आमचा आनंद, दु:ख तुम्ही आमच्या नकळतही वाटून घेत होतात. सतत आम्हाला सोबत करत.

गाव, पाहुणे यांना सांभाळतच तुम्ही आम्हाला वाढवताय. सगळा गाव, पाहुणेरावळे जेव्हा सांगतात, ‘‘उजवा आता पोरीचं. सैराटनं गैराट झालंय वातावरण. जमाना नीट नाही.’’ तेव्हा, ‘‘हं बघतोय, पण असे ५६ सैराट आले तरी माझी लेकरं गैराट होणार नाहीत. सारासार विचार करतील,’’ असं सांगत असताना स्वत:वरचाच विश्वास दृढ करत असता. इकडं मला कसं वागायचं, हे करू नको, ते करू नको असे सल्ले न देता खात्री देता, ‘‘तू शिक. तुझ्या पायावर उभी करूनच पाठवणार मी. माझ्या लेकी! एका पैशासाठीही कुणासमोर हात पसरू नये. अगदी माझ्याही. बाकी सगळं तर समजतंयच बरं-वाईट तुला.’’ खूप नशीब लागतं हो असा बाप मिळायला. तुमच्या साथीनं आणि आशीर्वादानं नक्कीच तुम्हाला हवी असलेली ‘प्रियंकाचे वडील’ ही ओळख मिळेल पण ‘रमाभाऊची छकुली’ या ओळखीतच माझं आख्खं विश्व सामावलं आहे.

पप्पा, तुम्ही मला बाग लावायला, जगवायला शिकवलंत, पण बागेतल्या गुलाबासारखं कधीच वागवलं नाही. तुम्ही वाढवलंत शेतातून येताना पिण्यासाठी नेलेल्या किटलीतलं पाणी येता येता बांधावरच्या बाभळीला ओतावं तस्सं. आज कळतंय शेतकरी ते पाणी त्या बाभळीसाठीच उरवत असतो ते.

होस्टेलवरच्या वेटिंग रूममध्ये उभ्या असलेल्या हळव्या , बाहेर वाघ-सिंहाचं पण पोरींसाठी सशाचं काळीज घेऊन आलेला बाप बघितला की, वाटतं पळत येऊन तुम्हाला मिठी मारावी आणि सांगावं, ‘‘जगातले सगळेच बाप महान असतात, पण तुम्ही सगळ्यात महान आहात पप्पा.’’

प्रियंका पाटील

pppatilpriyanka@gmail.com

chaturang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2018 4:51 am

Web Title: kathakathan by priyanka patil
Just Now!
X