तसे आपण दोघे एकमेकांना अनोळखीच. दररोजच्या धावपळीत कुठल्या तरी वाटेवर कधी अपेक्षित तर बऱ्याचदा अनपेक्षित भेट व्हायची आपली. तू माझ्या नेहमी अवतीभवती असतोस. कधी चुकून माझ्या दृष्टिक्षेपात अगदी थोडय़ाच काळासाठी विसावलेल्या धूमकेतूसारखा, कधी माझ्या पापण्यांची हालचाल होण्याआधी गुडूप झालेल्या उल्केसारखा. कधी माझा प्रवास सुखकर करणारा वाहनचालक म्हणून, कधी माझ्यासोबत प्रवास करणारा त्रयस्थ सहप्रवासी म्हणून, तर कधी माझाच रस्ता ओलांडणारा एक वाटसरू म्हणून.

पण तू कुणासारखा आहेस माहितीय? मी फाऊंटनला पहिल्यांदा गेले होते तेव्हा तिथे मला दिसलेल्या त्या पुस्तकासारखा. अगदी सुरुवातीला जेव्हा गेले होते ना त्या जुन्या पुस्तकांच्या गुहेत, तेव्हा धुळीने माखलेल्या त्या मुखपृष्ठाला पाहून यात काही असणार नाही असा निष्कर्ष काढून मोकळे झालेले मी. विक्रेत्याने ती धूळ पुसली तेव्हा आत दडलेल्या त्या सुंदर चित्राला किती तरी वेळ पाहत राहिले मी. तू तसाच आहेस अगदी. निर्मळ, स्वच्छ; पण तरीही माझ्या आणि माझ्यासारख्या अनेकींच्या पूर्वग्रहामुळे आमच्या संशयी नजरांना सामोरे जाणारा. त्या पूर्वग्रहदूषित नजरा पावला पावलाला झेलणारा, पण तरी आपला चांगुलपणा मुळीच न सोडणारा. तसा तुझा हा चांगुलपणा बऱ्याचदा दुर्लक्षितच राहतो आणि कधी तरी एखादी छोटीशी गोष्ट घडते आणि तुझे तू असणे आणि ते वेगळेपण प्रकर्षांने जाणवायला लागते.

मध्यरात्रीची वेळ. एकटी मुलगी. सामसूम रस्ता. बंद पडलेली गाडी. तिथूनच जाणारी काही मुलं आणि त्यांची या मुलीवर पडलेली नजर. आता ही कल्पना केल्यानंतर पुढे काही तरी भयाण होणार हे आपल्या मनाने ठरवूनही टाकले असेल ना! पण जर काही विपरीत न घडता या उलटच घडले तर? त्या मुलांनी त्या मुलीला एक संधी म्हणून न पाहता तिला मदत देऊ केली, तिनेही विश्वासाने त्यांची मदत स्वीकारली आणि त्यांनीसुद्धा तिचा विश्वास सार्थ ठरवत तिला सुखरूप घरी पोहोचवले तर.. जगात आणि देशात घडणाऱ्या अनेक घटनांमुळे कुणालाही तिचं घरी सुरक्षित पोहोचणं अशक्यच वाटलं असेल नाही? अगदी अशक्य म्हणायचं नसेल तर महाकठीण वगैरे तरी नक्कीच वाटलं असेल. हे कितीही खरं असलं तरी मला मात्र त्या मुलांचा विचार करताना ‘तू’ आठवत होतास. अनेकींना त्या मुलींचा विचार करताना आलेल्या अनेक कडू आठवणी आठवत असतील पण मला मात्र तिच्यात दिसणारं माझं आणि त्या मुलांत दिसणारं तुझं प्रतिबिंब खुणावत होतं. अनेकांचा जगातल्या माणुसकीवरचा आणि सुरक्षित जीवनावरचा विश्वास डळमळला असेल, पण माझा आणखी पक्का होत होता आणि याचं सगळं श्रेय अर्थातच तुझं. सतत दडपणाच्या छायेखाली जगत असतानाही एका मुलीच्या निर्भय आणि सुरक्षित जीवनाची कल्पना करण्याचे धाडस मी फक्त तुझ्यामुळेच करू शकले रे. मध्यरात्री एकटी घरी परतत असताना वाटेत गाडी बंद पडल्यावर तिथून जाणाऱ्या मुलांकडून पुढचा मागचा कसलाही विचार न करता, मनात शंकेला तसूभरही जागा न ठेवता, मदत मागणारी, त्या मुलांवर विश्वास ठेवणारी ‘ती’ आणि तिने दाखवलेल्या विश्वासाला सार्थ ठरवणारी ‘ती मुले’ रेखाटायची स्फूर्ती तू भेटला नसतास तर कधीच मिळाली नसती मला.

आयुष्यात वेगवेगळ्या वळणावर वेगवेगळ्या रूपात भेटलेला तू कायम स्मरणात आहेस माझ्या. अंधेरीच्या एमआयडीसी भागात रात्रीच्या वेळी मला बस स्टॉपची वाट दाखवणारा तो रिक्षावाला म्हणजे तूच तर होतास! दिसायला अगदी मवाली दिसणारा तो माणूस मला केवढी मदत करून गेला. माझ्या पूर्वग्रहामुळे एक वेळ रिक्षातून वेळ पडली तर उडी मारायचाही विचार आणि तयारी केलेल्या मला, आपल्या चांगुलपणाने लाज आणणारा ‘तो’ कायम लक्षात आहे माझ्या. या अशा कितीतरी अगणित रूपात भेटत राहतोस तू मला.

पुढे कधी तरी एमआयडीसी जवळच्याच कामगार वस्तीत मुलींचा कमी आणि फक्त कामगारांचाच वावर असणाऱ्या भागात काही तात्काळ कारणांमुळे मेटल कटर शोधत फिरणाऱ्या मला आपले जेवण अर्धवट सोडून, जेवणाच्या वेळात बंद असणारे वर्कशॉप उघडून, तेथील कामगारांना सांगून, काम करवून घेणारे तिथेच भेटलेले ते चाचा आणि त्यांच्या सांगण्यावरून आणि मी एकटी आहे हे पाहून माझा वेळ जाऊ नये यासाठी जेवण थांबवून काम करायला तयार झालेले ते सगळे कामगारसुद्धा आठवतात मला.

इथेही त्यांच्या चांगुलपणावर विश्वास ठेवायला तयार नसणारी आणि त्यांनी मला आत घालून दिलेल्या खुर्चीवर बसायला नकार देणारी मी आणि माझी मानसिकता समजून घेऊन बाहेरच माझ्या बसण्याची व्यवस्था करणारे ते चाचा लख्ख लक्षात आहेत माझ्या.

नुकतीच फिरायला लागले होते मी मुंबईमध्ये एकटी. दादरला रवींद्र नाटय़मंदिरला कसल्याशा कार्यक्रमाला गेलेले. परतेपर्यंत साधारण साडेआठ होऊन गेलेले. तिथल्या गल्लीत रस्ता हरवले आणि मग थोडी घाबरले. शेजारून जाणाऱ्या काकूंना रस्ता विचारला तरी थोडेसे भांबावलेच होते. तेवढय़ात कुणीतरी पाठून येऊन ‘‘स्टेशनला जायचंय का?’’ अशी चौकशी केली. मी ‘‘हो’’ म्हणाले खरे पण अचानक आलेल्या त्या प्रश्नाला आणि तो विचारणाऱ्या त्या माणसाला पाहून भीतीच वाटली प्रथमदर्शी. कुणीतरी गावकडला वाटावा असा एक माणूस होता तो. ‘‘ताई मी पण तिकडेच जातोय. चला.’’ असे सांगत तो मला ‘प्लाझा’पर्यंत घेऊन आला. तिथून पुढे जाता येईल का की सोडू स्टेशनला अशी आस्थेने चौकशी केली त्याने. ‘‘मी पण नवीन आहे मुंबईमध्ये. इथे हरवले की होणारी चलबिचल समजते मला पण.’’ हे त्याचे जातानाचे शब्द कायम लक्षात राहतील माझ्या. ‘प्लाझा’ पाहिले की आजही मला तो दिवस आठवतो.

रात्री उशिरा प्रोजेक्टचं काम करून निघताना, बसने प्रवास करत असताना, स्टेशनचा स्टॉप आल्यावर ‘‘नीट जा पोरी, उशीर झालाय,’’ असे सांगणारे कंडक्टर काका आणि बस नसली की त्याच निर्मनुष्य इंडस्ट्रियल एरियामधून रिक्षा करून येताना वेळेत स्टेशनला पोहोचवणारे, सिग्नलवरच्या तृतीयपंथीयांच्या वेशातील पुरुषांना मला त्रास देऊ न देणारे, त्यांना हटकणारे आणि मला त्यांचे सत्य सांगून पुढे काळजी कशी घ्यायची हे सगळे समजावून सांगणारे, कधी अशाच मोकळ्या गप्पा करणारे, कधी ‘‘इथून लवकर निघत चला, एरिया सुनसान आहे’’ असे कळकळीने सांगणारे ते सगळे रिक्षावाले आठवतात मला.

मुंबईच्या कोणत्या तरी अनोळखी भागात जाताना अगदी परत येताना कसे यायचे, टॅक्सी कुठून करायची, चालायचे कुठून ही सगळी माहिती पुरवणारे टॅक्सीवाले काका पण लक्षात आहेत माझ्या.

अगदी त्या दिवशी इरॉसकडे रस्ता क्रॉस करताना सुटाबुटात माझ्या शेजारी उभे असणारे, मला स्वत:हून रस्ता क्रॉस करून देऊन पुन्हा मागे आपल्या वाटेने निघून गेलेले ते आजोबा आणि एकदा स्टेशनवर मैत्रिणीसोबत डबा खायचा कंटाळा आलाय असे बोलताना ऐकून मला जेवणाचे महत्त्व सांगणारे शेजारी उभे असणारे पोलीस काका पण आठवतात मला.

देशातील स्त्रियांची सुरक्षितता, त्यांच्यावर होणारे अत्याचार हे मोठे सत्य आपण जगत आहोत आणि हे कुणीही सुज्ञ नाकारू शकत नाही. सुरक्षिततेचा इतका मोठा प्रश्न सगळ्यांना भेडसावत असताना काळजी घेणं केव्हाही योग्यच. आणि त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सतर्क राहणं मान्य. पण या सगळ्याचा तुला होणारा त्रास लपलेला नाही माझ्यापासून. तो सतत जाणवत राहतो मला ही.

तरुणापासून आजोबांपर्यंत तू वेगवेगळ्या रूपात भेटत राहतोस. वेगवेगळ्या निमित्ताने माझं जगणं सुखकर करतोस. हे जग माझ्यासाठी सुंदर करतोस पण त्या बदल्यात प्रत्येक वेळी मी मात्र ठाम असते माझ्या पूर्वग्रहदूषित संशयी विचारांवर. सगळे पुरुष सारखेच असे म्हणत मी तुलाही त्या दुसऱ्या पुरुषांबरोबर तोलत राहते. त्या सगळ्यांमध्ये मी विसरते की खरंच तुझीही बहीण, मैत्रीण, मुलगी, बायको आणि आई असेलच की. माझ्या बाबांसारखा तूही आपल्या या नात्यांवर भरभरून प्रेम करणारा असशील. कोण म्हणतं केवळ स्त्रियांना वाईट नजरा झेलाव्या लागतात. पवित्र हेतूने व निर्मळ मनाने पुढे सरसावणाऱ्या तुला सहन कराव्या लागणाऱ्या त्या संशयी नजरा तरी दुसरं काय आहे?

मी आणि माझ्यासारख्या अनेक जणी तुला बऱ्याचदा कुठलाही विचार न करता आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करतो. असं सगळं असतानाही तू मात्र तसाच असतोस. मला पूर्वग्रह, बाह्य़रूप, राहणीमान यापलीकडे जाऊन माणसातला माणूस पाहायला शिकवत राहतोस. आजच्या या जगात प्रत्येक गोष्टीवर शंका घेणाऱ्या मला मनमोकळा विश्वास ठेवण्याचे धैर्य देतोस. जगातल्या चांगुलपणावर विश्वास ठेवायला भाग पाडतोस आणि जगाकडे बघण्याचा एक सकारात्मक दृष्टिकोन देतोस.

आजच्या काळात पदोपदी तुझी भेट दुर्मीळ आहे, पण अशक्य नाहीय हे मात्र नक्की. आणि ही दुर्मीळ गोष्ट अनुभवण्याची संधी मिळणारी मी खूप भाग्यवान. ज्या दिवशी हे भाग्य प्रत्येक मुलीला लाभेल आणि तिच्या भोवतालच्या प्रत्येक पुरुषात तिला तू भेटशील तो दिवस अविस्मरणीय असेल आणि मी त्या दिवसाची मनापासून वाट पाहतेय हे ही तितकेच खरे.

– रुचिरा सावंत

ruchirasawant48@gmail.com

chaturang@expressindia.com