04 July 2020

News Flash

रेशीमगोफ

‘काय ही सलग पोरींची पिलावळ, आता ‘वंशाला’ दिवा हवाच!’ ‘बघा आता हिला पोरं होणार नाहीत, आणायची का एखादी दुसरेपणावर?’

‘काय ही सलग पोरींची पिलावळ, आता ‘वंशाला’ दिवा हवाच!’ ‘बघा आता हिला पोरं होणार नाहीत, आणायची का एखादी दुसरेपणावर?’

आडनिडे वय असल्यामुळे या बोलण्याचा नीट अर्थही समजायचा नाही. पण असले काही तरी त्या कोवळ्या वयात सतत कानावर पडायचे. गावगाडय़ामध्ये अजूनही ‘ती’ तशी दुय्यमच असल्यामुळे असेल कदाचित पण ‘तिचे’ जगणे त्याच्या जगण्याहून खूपच वेगळे होते. तेव्हाही! आणि आजही! तेव्हाच ‘तो’ कुणीतरी माझ्यापासून वेगळा असल्याचे जाणवायला लागले. सुरुवातीला तर कळायचेच नाही त्याच्यात आणि माझ्यात इतके वेगळे असे नेमके काय आहे? माझ्यापेक्षा खरच ‘ग्रेट’ आहे का तो? वरचढ आहे का? तो असा श्रेष्ठ असतोच का?

त्यानंतर स्पर्शाचे अर्थ समजण्याचे, अर्थ लावण्याचे वय आले. चांगला स्पर्श-वाईट स्पर्श, चांगली नजर-वाईट नजर हे सारे समजायला, उमजायला लागले. नकळत एक भिंतच उभी केली दोघांमध्ये त्या एका टप्प्यावर! भिंतीच्या पल्याड ‘त्याला’ ठेवले आणि स्वत:ला एका अदृश्य भिंतीच्या अल्याड! एक अदृश्य आणि अटळ चढाओढ लढण्यातच बराच काळ गेला. खूप उशिरा आणि विचारांमध्ये थोडे स्थैर्य आल्यावर एक एक गोष्ट समजायला लागली. काही नकोशी आवरणं आपसूकच गळून पडली आणि उमजून आले दोघांचे असे वेगळे जग आखून जगता येत नाही आणि माणूसच म्हणून जगायचे तर ही भिंत पाडायलाच हवी.

जगण्याचे ताणेबाणे कळायला लागल्यावर एक जाणीव नक्की झाली चुकार, अनपेक्षित, कातर किंवा कसोटीच्या प्रसंगात दोघांचेही लहान मूलच होते. मग ‘तो’ काय आणि ‘ती’ काय? सावरायला आणि खंबीरपणे उभे राहायला; तो ‘पुरुष’ आहे आणि मी ‘स्त्री’! ही असली एका अवयवाभोवती फिरणारी ‘थिअरी’ एकदमच कुचकामी आहे. कोणत्याही क्षेत्रात घट्ट उभे राहण्यासाठी, जगण्यासाठी, एकूणच सगळ्या जीवनप्रवासात आणि प्रवाहातही ‘आम्ही दोघे’ (कोणत्याही नात्याने एकत्र असणारे डोळस तो आणि ती) सोबत असणे हेच अत्यावश्यक, अपरिहार्य आणि काळाच्या कसोटीवर टिकणारे शाश्वत सौंदर्य आहे.

‘तो’ आणि ‘मी’ एकमेकांना असे स्वच्छ दिसल्याशिवाय पुढचा प्रवासच अशक्य आहे हे लक्षात आल्यावर ‘तो’ इतक्या प्रकारे भेटायला, बोलायला आणि समजायला लागला की, त्याच्या असण्याचे माझ्या जीवनातील सारेच संदर्भ अतूट आहेत हे उमगले. तो ‘सखा’ निरनिराळ्या रूपांत भेटत राहतो आणि त्याचे असणे मी वेगवेगळ्या रूपांत आणि नात्यात साजरे करत राहते. ज्यांच्याशी मी माझ्या जन्मापूर्वीच जोडली गेली आहे. एक अदृश्य नाळ त्यांच्याशी त्या एका क्षणापासूनच आहे. माझ्या आयुष्यातील ते ‘पहिले सखा’ आहेत, हे जाणवायलाच वयाचा एक टप्पा यावा लागला. वेळ पडली तर आता सल्ला घेण्याएवढं शहाणपण जमवलंय आपल्या पोरीने असा भाबडा विश्वास त्यांनाही वाटत असतोच. हळव्या क्षणांमध्ये आता आपणच त्यांच्या हक्काचा विसावा आहोत हे नकळत आपल्याला जेव्हा जाणवते, तेव्हा बाबा आपले मित्र होतात खरे, पण प्रसंगी आपणही त्यांच्या ‘आई’सारखेच वागतो त्यांच्याशी! तेही अगदी आपल्याच नकळत!

दुसरा ‘तो’ म्हणजे भाऊ, तो सहोदरच असायला हवा असे जरुरी नाही. एकदा त्या रेशीम गाठीने भाऊ म्हणून माझ्याशी तो बांधला गेला की, बाबांच्या नंतर माझ्या भावविश्वातला तो माझा सर्वात जवळचा, हक्काचा व विश्वासू मित्र. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असला तरी ‘तो आहे’, ही एक जाणीवच पुरेशी असते माझ्यासाठी.

ज्याच्यामुळे मला पहिल्यांदा मला ‘मी स्त्री’ असल्याची जाणीव होते. ज्याच्या एका नजरेनेच तो मला जवळ ओढतो आणि मीही त्याच्यासाठी कोणतेही दिव्य करायला तयार होते. ज्याच्यामुळे मला माझ्या स्त्रीत्वाची जाणीव होते, असा तो एक पुरुष. बाकी सारी नाती नंतर समाज आपल्याला देतो. पण निसर्गनियमाने जी आदिम अशी प्रेरणा त्याच्या माझ्यात असते, ती पहिल्यांदा ज्याच्यामुळे जागी होती, तो एका नजरेने घायाळ करणारा ‘प्रियकर’ आणि त्याच्यासाठी अक्षरश: वेडीपिशी होणारी ‘प्रेयसी’! जेव्हा असा प्रियकर आठवतो, तेव्हा संत सूरदासांची श्रीकृष्णासाठी लिहिलेली आणि प्रेमाच्या सुंदर नात्यासाठी चपखल अशी एक रचना नेहमी आठवतेच,

बाह छुडाके जात हो,  निबल समझ के मोही

हृदय से अब जावोगे, तब मर्द बखानु तोही

ज्याच्याशी मी स्वत:ला आयुष्यभरासाठी बांधून घेते; तो ‘माझा जोडीदार’!

त्याच्यातला सखा – सहचर  एखाद्या बेसावध क्षणी जाणवतो. जेव्हा त्याला मी काहीच न सांगता; न मागताही तो माझे स्वतंत्र अस्तित्व मानतो आणि जपतो! नकळत झोडपून काढणाऱ्या वादळवाऱ्यात असेल किंवा जगण्याच्या लढाईतला कोणताही आणीबाणीचा प्रसंग असेल. तो टणक संरक्षक कवच बनून उभा राहतो अगदी सगळे वार झेलण्यासाठी. त्याच्याशी लुटुपुटुची लढाई अगदी रोजचीच! पण त्याच्या बरोबरचा काही क्षणांचा अबोलाही मग युगासम वाटत राहतो. त्याच्या आश्वासक मिठीत मी स्वत:ला सोपवून दिले की, मी त्याच्यात विरघळलेली आहे इतकेच जाणवत राहते.

हो चांदनी जब तक रात,

देता है हर कोई साथ

तुम मगर अंधेरो में

ना छोडम्ना मेरा हाथ

हे गाणे अक्षरश: रोज जगत, वर्षांनुवर्षे त्याच्या सोबतीने कशी सरतात ते कळतही नाही. मग आयुष्याच्या एका टप्प्यावर आणखी एका ‘तो’ची भेट होते. जेव्हा तो पहिल्यांदा पोटात आहे याची जाणीव होते तेव्हा ‘तो मुलगा’ आहे की, ‘ती मुलगी’ याने मला तसा काही फरक पडतच नाही! एक जीव उदरात आहे; या जाणिवेनेच मी मोहरलेली असते. तो जेव्हा ‘माझा मुलगा’ म्हणून जन्म घेतो आणि त्याची इवलीशी बोटे माझ्या बोटांना घट्ट पकडतात तेव्हापासून मी त्याच्या डोळ्यांमध्ये संपूर्ण जग बघते. त्या क्षणापासूनच तो माझा ताबा घेतो. तोळामासाने वाढणारा जीव जेव्हा अचानक मोठेपणी एखाद्या दिवशी आठवणीने पॉकेटमनी साठवून छानशी साडी आणून देतो, तेव्हा त्याच्या सोबत जागून काढलेल्या रात्री आणि त्याची ती अंत पाहणारी आजारपणं एका क्षणात डोळ्यांसमोर तरळतात. तो मोठा झाला ही जाणीव जितकी आश्वस्त करणारी आहे, तितकीच ती कासावीसही करते. प्रत्येक नात्याप्रमाणे त्याच्या माझ्या नात्याला ही अत्यंत तलम पदर आहेत. त्यामुळेच त्याला कोणासोबतही वाटून घ्यायचे आहे; या भावनेने मी कधी उदास तर कधी हळवी होते. तो जेव्हा स्वतंत्र भरारी घेतो, तेव्हा त्याच्या यशाने सुखावते! तर कधी रिकाम्या घरटय़ामुळे होणारी जिवाची तडफड या दोन कडांवर मी सतत हिंदोळे घेत असते. इंदिराबाई संतांच्या ओळी अशा वेळी मनात हमखास रुंजी घालत राहतात,

शेवटी तुलाही नकळत

तुझ्या आभाळांत शिरलास

असीमावर लोभावलास

तेव्हाच उमजून आले;

काळजाभोवती वेढे देऊन राहणारा

हा रेशीमगोफ ‘त्या’ वेळच्याच सहजपणे

तोडून टाकायला हवा होता..

सर्वात महत्त्वाचे, काही अंशी दुर्लक्षित किंवा सतत हेटाळणी सहन करणारे असे ‘तो’ आणि माझे एक नाते! खऱ्या अर्थाने आणि नात्यानेही तो माझा ‘केवळ आणि केवळ मित्र’ असणेही तशी माझी एक जीवनावश्यक गरजच आहे. असतेच, असे मला वाटते. का? याचं नेमकं उत्तर देणं थोडं कठीण! पण कदाचित त्याच्या माझ्या शारीररचनेतला आणि शारीरक्रियांमधला मूलभूत फरकच आम्हाला एकमेकांची बलस्थाने आणि कमजोरी पाहायला, त्यावर मात करायला शिकवणारा एक मजबूत दुवा असतो. अगदी कुणीही कितीही फिल्मी डायलॉग मारला की, ‘एक लडका और एक लडकी कभी सिर्फ अच्छे दोस्त नहीं हो सकते!’ तेव्हा मान्य करूच की, एक लैंगिक अंत:प्रवाह असतोच या नात्यामध्ये ही! त्याला नाकारायचे का? उलट शरीर भिन्नतेच्या स्वीकारानंतर जेव्हा दोन व्यक्ती जाणीवपूर्वक अशी मैत्री जगत असतात तेव्हा ‘ती प्रगल्भ मैत्री’ दोघांच्या आयुष्याला वेगळं परिमाण आणि आयाम  देणारी नितांत सुंदर आवश्यक गोष्ट असू शकते. असायला हवी!

मी माझा विचार करत असताना ‘तो’ कोणत्या न कोणत्या रूपात आणि नात्यात असतोच माझ्यासोबत. त्यामुळे त्याला वगळून विचारांचे आवर्तन अपूर्णच! मग काही ओळी आपोआप सुचतात,

मी आणि तू

बीइंग वुमन..

सेलिब्रेटिंग वुमनहूड..

या आरोळ्या ऐकताना..

मला कुजबूज ऐकू येते

अ‍ॅडम अ‍ॅण्ड ईव्हची..

 

संभोग..

गर्भधारणा..

प्रसूती..

सगळे टप्पे

सारखेच

तुला आणि मला..

 

अस्तित्व

टिकविण्यासाठी

निसर्ग काही

वेगळे घडवतो

तुझ्यामाझ्यात

 

अताशा

जाणवते

पदोपदी..

पूर्ण माणूस होण्यासाठी

कधी मी तर कधी तू

त्याशिवाय पूर्णत्व नाहीच..

 

आहेच आपल्यात

वेगळेपण

हे मान्यच..

 

पण मला हेही मान्यच..

गरज पडताच

तू जागवतोस

तुझ्यातील

माझ्यासाठीच

आईपण..

अन्

तुझ्यासाठी.

कधी तरी

मीही आणते

बळेच..

बापाचं

उसनेपण..

 

हा प्रवास

असाच

पूर्ण होणार

सोबतीने..

 

तेव्हा

दोघे फक्त

‘माणूस’ म्हणून

राहू

 

अनादि

काळापासून..

अनंतापर्यंत..

सगळ्या नात्यात

सगळ्या रूपात

केवळ

सृजनसृष्टीचे

वेगळेपण जपत..

 

– डॉ. सोनाली वाळवेकर-शेटे

sonujanukevu@gmail.com

chaturang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 21, 2018 12:10 am

Web Title: kathakathan by sonali walvekar shete
Next Stories
1 इंद्रियांची वेल पसरत पसरत..
2 सुखाने भांडू आपण
3 निरभ्र नजरेने तुला पाहताना
Just Now!
X