|| संहिता अदिती जोशी

‘‘आता तुझ्याशी बोलताना जपून बोललं पाहिजे. तूसुद्धा माझ्याविरोधात केस ठोकलीस तर?’’

in Relationships Your self-esteem is in your hands
नातेसंबंध : आपला आत्मसन्मान आपल्या हाती!
Loksatta chaturang Think rationally disbelief restless
इतिश्री: भावनेवर तर्कशुद्ध मात!
kirit somaiya
“…म्हणून काही तडजोडी केल्या”, किरीट सोमय्यांचं वक्तव्य चर्चेत; म्हणाले, “आता मविआ सरकार असतं तर…”
What do you do when someone is choking in front of you
तुमच्यासमोर श्वास गुदमरल्याने एखादी व्यक्ती तडफडत असेल तर तुम्ही काय कराल? डॉक्टरांनी सांगितले हे महत्वाचे उपाय

‘‘कशाबद्दल? ‘मी टू’ छापाची?’’

‘‘..’’

‘‘७ ७ आहेस तू, अलेक्स! बोलणं निराळं, इतर काही करणं निराळं. महत्त्वाचं आणि दुसरं, आपण एका कंपनीत नोकरी करत नाही. तू माझा बॉस तर नाहीसच. तू माझं काही वाकडं करू शकत नाहीस. ‘मी टू’ म्हणून तक्रार करणाऱ्या बहुतेक स्त्रिया उच्चस्थानावरच्या पुरुषांबद्दल तक्रार करत आहेत.’’

‘‘ते ठीक, पण तुझ्याशी फोनवर बोलत असताना स्कॉट पलीकडे नको ते चाळे करत असेल तर?’’

‘‘..तर तो गाढव आहे! दिसायला सुंदर, ढिगानं पदव्या, लठ्ठ पगार, लोकांशी नीट बोलता-वागता येतं, तरीही माझ्याशी फोनवर बोलताना त्याचा उजवा हात कामात असेल, तर मला त्याची कीव येईल, पण खरं तर मला काय त्याचं!’’

दुपारी डबा खात होते; एकीकडे नियतकालिकाचं वाचन सुरू होतं. आजूबाजूला चेहऱ्यानं मला आणि मी त्यांना ओळखते ते मुलगे, पुरुष होते. ते एकाच वर्गात होते. त्यांच्या वर्गात एकही मुलगी नव्हती. सहा महिन्यांपूर्वी त्याच इमारतीत, तोच कोर्स मी पूर्ण केला होता. त्यांच्या गप्पांकडे दुर्लक्ष करत, मी वाचायचा प्रयत्न करत होते.

‘‘आपल्या वर्गाला ‘ब्रोहोर्ट’ (कोहोर्ट म्हणजे विशिष्ट कारणामुळे बांधला गेलेला समूह) म्हणणं मला मान्य नाही. ‘ब्रो’ असणं ही मिरवण्यासारखी गोष्ट आहे, असं मला वाटत नाही.’’ एक जण म्हणाला.

आता डोकं वर काढून, ‘यूं की, ये कौन बोला’ हे बघण्याशिवाय पर्याय नव्हता. हा तर अमेरिकेत राहून दक्षिण इंग्लंडच्या हेलात बोलणारा मुलगा! ‘‘तुझ्याशी सहमती न दर्शवणं म्हणजे मी माझ्याच पायावर धोंडा मारणं; पण तरीही यावरून तुला छळायला काय मज्जा येईल, असा विचार केल्याशिवाय मला राहवत नाही. मी संहिता, आणि तू?’’

‘‘माझं नाव ली.’’

हा संवाद घडून काही महिने उलटले; त्याचा कोर्स पूर्ण झाला आणि लगेच त्याला नोकरी मिळाली.

‘‘त्यांनी तुला नोकरी दिली म्हणून ठीक. एरवी या कंपनीत, ऑस्टिनात एकही स्त्री नसणं ही लज्जास्पद गोष्ट आहे.’’

मला त्याच कंपनीकडून नोकरीची ऑफर आल्यावर मी त्याच्याशी बोलत होते; आहे ती नोकरी सोडून ही नोकरी धरण्याबद्दल मत बनवण्याआधी तिथल्या वातावरणाचा अंदाज घेणं सुरू होतं; त्याची ही प्रतिक्रिया.

शैक्षणिक पार्श्वभूमीपासून, अन्न वाया न घालवणं; आणि घरी मांजर पाळण्यापासून ते डावे-उदारमतवादी विचार अशा अनेक कारणांमुळे आमची मैत्री होणं साहजिकच होतं.

लीच्या वर्गातल्या काही तरुण मुलांनीही याच कंपनीत नोकरी धरली. ‘‘ली तिथे आहे म्हणून आम्ही हो म्हटलं.’’ ली नसताना आम्ही त्याच्याबद्दल बोलत होतो.

याच कंपनीत इतर कुठल्याशा फाजील संवादात, ‘‘तिथे जाण्याएवढे आचरट आणि मूर्ख तुम्ही पोरं दिसत नाहीत.’’ (मूळ उल्लेख – यू गाईज् ) असं एकानं म्हटलं. त्यावर मी उत्तर दिलं, ‘‘ही पोरं नाहीतच आचरट आणि मूर्ख; पण मी आहे.’’

त्यावर कंपनीच्या दुसऱ्या ऑफिसात काम करणाऱ्या मुलीनं दात काढले.

ली, एक कॉमन मित्र आणि मी एकत्र जेवत होतो.

‘‘या रविवारी, मी आयुष्यात प्रथमच समलिंगी लग्नासाठी जाणार आहे. बायकोचा चुलतभाऊ. त्याच्या नातेवाईकांपैकी फक्त आम्ही दोघंच जाणार आहोत.’’ ली म्हणाला. मला जरा आश्चर्यच वाटलं. साधारण वर्षभरापूर्वी एका भारतीय समलैंगिक मित्रानं अमेरिकेत लग्न केलं; त्याचे आई-वडील मराठी मध्यमवर्गीय, वयस्कर लोक. ते दोघंही हौसेनं लग्नात नाचले होते.

‘‘गे मुलामुळे समाजात आपली प्रतिष्ठा जाईल असं त्याच्या वडिलांना वाटतं. शिवाय गे पुरुषामुळे स्ट्रेट पुरुषांना वाटणारी भीती निराळीच!’’ लीनं स्पष्टीकरण दिलं.

मी दोन्ही मित्रांकडे बघितलं. ‘‘तुम्ही दोघं स्ट्रेट पुरुष आहात.. असं माझं गृहीतक. मी स्त्री आहे, पण मला नाही तुमची भीती वाटत! यात तुम्हाला तुमचा अपमान वाटत नाही ना?’’

दोघंही समजून उमजून हसले.

आमच्या कंपनीत, मी जे काम करते तशाच नोकरीसाठी मुलाखत देणाऱ्या एका अनोळखी मुलीनं मला एका बिझनेस वेबसाईटवर गाठलं. मुलाखतीची प्रक्रिया, आमची कंपनी, याबद्दल तिला प्रश्न होते. माझ्यापरीनं तिला उत्तरं दिली. शेवटी तिला म्हटलं, ‘‘नोकरी शोधासाठी शुभेच्छा. तंत्रज्ञान क्षेत्रात आणखी मुली/स्त्रिया बघायला आवडेल.’’ तिनं उत्तर दिलं, ‘‘मी टू.’’

हल्ली फोनवर, जीमेल, काही वेबसाईटस् अशा संवादांसाठी एकोळी उत्तरं सुचवतात. मशीन लर्निग, डेटा सायन्स वगैरे शब्द तुमच्या कानांवर पडले असतील. हा त्याचाच आविष्कार.

त्या वेबसाईटनं मला उत्तर सुचवलं, ‘‘सॉरी.’’ ‘मी टू’चा एवढा धसका त्या वेबसाईटनं घेतला असेल असं मला वाटलं नव्हतं. त्याही पुढे  ‘मी टू’चे विनोद असे माझ्या तोंडावरच आणि एवढय़ा चटकन होतील असंही मला वाटलं नव्हतं. यातल्या विनोदाची मात्रा कमी होती म्हणून का काय, मी मूळ अभ्यास क्षेत्र बदलून आता याच विषयात काम करायला सुरुवात केली आहे.

(त्या वेबसाईटला मी स्त्री असल्याचं आपण होऊन सांगितलेलं नाही; पण माझा फोटो आणि माझं बोलणं वाचून त्यांना ते समजलेलं आहे; याची पावती मिळाली.)

माझ्या शैक्षणिक पार्श्वभूमीमुळे मी गेली बरीच र्वष फक्त लिनक्स वापरत्ये; विंडोज आणि मॅकशी संबंध नाही. हल्ली बऱ्याच कंपन्यांनी क्लाऊड कंप्युटिंग वापरायला सुरुवात केलेली आहे. त्यात बहुतेकदा लिनक्स वापरलं जातं. मैत्र, सहकर्मचारी त्यात चाचपडत असतात; मी काही डेमो द्यायला सुरुवात केली आणि भराभर कमांड्स टाइप करत गेले की हे लोक आश्चर्यचकित होतात. ते ठीकच.

एका मित्रानं मला म्हटलं, ‘‘मलाही रिमोट मशीनवर लिनक्स वापरायचं आहे. मदत करशील का?’’

नाही म्हणण्याचा सवालच नव्हता. फोनवर मी त्याला शिकवणार असं सुचवलं. एकीकडे घरातली बिनडोक कामं उरकून टाकता येतील, असं माझ्या डोक्यात होतं.

‘‘तू तुझा लॅपटॉप उघड ना.. माझी स्क्रीन तुला दाखवतो, म्हणजे काय हवंय ते तुला थेट दाखवता येईल.’’

‘‘तू आधी तोंडी तर सांग, तुला काय हवंय. मला ते सहज आठवलं नाही तर गुगल आहेच.’’

त्यानं हट्टच धरला. मला वाद घालायचा कंटाळा आला. लॅपटॉप उघडला. चारेक मिनिटं वाट बघितल्यावर त्याची स्क्रीन दिसायला लागली. त्या संगणकाच्या इंटरनेटचे आत जाण्याचे दरवाजे उघडे होते, बाहेर येण्याचे बंद होते. अभिमन्यू! संगणकशास्त्रातल्या पदवीशिवाय ते मला समजलं.

‘‘या विषयातली पदवी कोणाकडे आहे; कोणी कोणावर अविश्वास दाखवला पाहिजे’’, हे प्रश्न मी विचारले नाही. राजकीय भूमिका म्हणून विचारायला हवे होते का? राजकीय भूमिका आणि मैत्री या गोष्टी निराळ्या काढता येतात का?

तसाच अनुभव ऑफिसात. अगदी ताजा.

‘‘हे स्क्रिप्ट चाललं का नाही, हे कसं समजणार?’’ मला एकानं विचारलं.

‘‘मी सांगते ती कमांड वापर; तुझं काम झालंय का नाही, हे लगेच समजेल.’’

‘‘पण त्यात स्टार (*) नाही का वापरावा लागणार?’’

‘‘नाही, हे वेगळं. तुझा बहुतेक दुसऱ्या कमांडमध्ये आणि यात गोंधळ होतोय.’’

तरीही त्यानं स्टार टाकला; कमांड चालली नाही; लिनक्सनं पुढय़ात ‘एरर मेसेज’ टाकला. मग त्यानं माझं ऐकलं.

त्याच संध्याकाळी, ‘ऑफिसात वावर-वापराचे नियम’ या प्रकारांवरून चाबरटपणा सुरू होता.

‘‘‘लिनक्स’ वापरता आल्याशिवाय नोकरी मिळणार नाही, असा नियम आपल्या कंपनीनं केला पाहिजे.’’ मी जाहीर केलं. बाकीची बहुतेकशी पोरं समजून-उमजून हसली.

मायकल आणि मी ऑफिसात शेजारी-शेजारी बसतो. तो अबोल असण्याबद्दल मी त्याला थोडं चिडवलं होतं. मला नोकरीच्या सुरुवातीला बरेच छोटे प्रश्न असायचे, ते मी त्याला विचारले. त्यानं बरीच मदत केली. ‘तुझ्याकडून चिडवून घ्यायला आणि तुला मदत करायला मला नोकरी दिल्ये’, अशी त्यानं सुरुवात केली होती.

तीन दिवस तो आजारपणामुळे आला नव्हता. त्याची ख्यालीखुशाली विचारणारी ईमेल्स मी रोज पाठवली. चौथ्या दिवशी तो ऑफिसात आला.

‘‘अरे वा, बरं वाटलं तू परत आलेला बघून!’’

‘‘तुला बघून मलाही असंच म्हणता आलं असतं तर किती बरं झालं असतं!’’

‘‘आजारपणामुळे औषधं खात होतास का मेथचा ओव्हरडोस झाला होता?’’

‘‘घ्या आपापलं काय ते समजून!’’ मायकलनं डोळा मारला.

आता बारकंसारकं काही अडलं तर मायकलही मला प्रश्न विचारतो. विशेषत: लिनक्स आणि गणितासंदर्भात.

‘‘तू अनोळखी स्त्रियांशीही बोलताना बुजत नाहीस; स्टायलिश बूट वापरतोस. गे असशील असं मला वाटलं होतं.’’ मी अलेक्सला म्हटलं.

‘‘अगं, तुला पटणार नाही हे, पण स्त्रियासुद्धा माणूसच असतात.’’

आमची मैत्री फार सहजरीत्या का झाली, हे अशा वेळेस मला चटकन लक्षात येतं.

काही माणसांना इतरांवर सहज विश्वास ठेवता येतो; काहींना थोडा वेळ लागतो. ज्यांना वेळ लागतो, त्यातले काही ओळख होईस्तोवर अविश्वासही दर्शवत नाहीत. काही मात्र तितपत समजूतदार नसतात. ‘मला चार गोष्टी समजतात, यावर विश्वास नसेल तर मला विचारायला येऊ नकोस’, असं म्हणण्याची तयारी मी ठेवून असते.

अशी तयारी स्त्री असल्यामुळेच मला ठेवावी लागते का? तज्ज्ञांनी त्याचा संबंध पारंपरिक अपेक्षांशी लावला आहे. पारंपरिकरीत्या पुरुषी क्षेत्रात काम केल्यामुळे मला असा अनुभव अधिक प्रमाणात येत असेलही. ‘मी टू’ ही फारच गंभीर गोष्ट आहे; मोठय़ा आवाजासमोर या बारक्या गोष्टींना बाऊ समजलं जातं; म्हटलं, यू गाईज्, तर काय फरक पडतो, हे मी बरेचदा स्त्रियांकडूनही ऐकलं आहे.

जगासाठी मी ‘स्त्री’ असेन. माझ्यासाठी मी ‘मी’ आहे; आहार-निद्रा-भय-मैथुन या मूलभूत गरजांपलीकडे माझं जग बरंच विस्तारलेलं आहे. या जगातले लोक (मोजके अपवाद वगळता) स्त्री किंवा पुरुष नसतात. ते अलेक्स, ली, मायकल, जॉईस, आर्लीन, डेबी अशी निरनिराळी माणसं असतात. कधी आमची मैत्री असते; कधी निव्वळ परिचय असतो आणि बाकी बहुसंख्य व्यक्तींशी मला काही घेणं-देणं नसतं.

sanhita.joshi@gmail.com

chaturang@expressindia.com