News Flash

निसर्गसुंदर, समृद्ध कॅनडा

माझी एक मैत्रीण मला सतत तिच्याकडे टोरान्टोमध्ये येण्यासाठी आग्रह करीत असे.

हिरवागार, समृद्ध असा कॅनडा फिरताना डोळ्याचे पारणे फिटते. हा देश पाहण्यासारखा आहे, इथली आतिथ्यशील माणसे अनुभवण्यासारखी आहेत. विलक्षण रौद्रसुंदर, स्वप्नवत अशा नायगाराबद्दल तर काय सांगावं?

अमेरिकेच्या आजपर्यंत मी बऱ्याच वाऱ्या केल्या; परंतु कॅनडाची सरहद्द मात्र नुसती भोज्जाला शिवून यावी तशी आले. तेसुद्धा ‘नायगारा’ हे जगातले विलक्षण सुंदर, नैसर्गिक स्वप्न पाहाण्यासाठी. त्याच वेळी ठरवले होते की, पुन्हा कॅनडा हा संपूर्ण देश पाहायला यायचे आणि नायगारा फॉल्स तर परत एकदा डोळे भरून मनसोक्त पाहायचा.

माझी एक मैत्रीण मला सतत तिच्याकडे टोरान्टोमध्ये येण्यासाठी आग्रह करीत असे. पण तो योग या वेळेला आला. मी आणि माझा मुलगा सनफ्रान्सिस्कोहून थेट ओटावाला म्हणजे कॅनडाच्या राजधानीच्या शहरात जाऊन पोहोचलो. तिथे मुलाच्या मित्राच्या सासुरवाडीचे  अगत्याचे आमंत्रण असल्याने अगदी घरगुती जिव्हाळ्याने राहिलो. या मित्राचे सासरे भारतीयच; परंतु १९६६ पासून कॅनडात आहेत. ते  भारतातून शास्त्रज्ञ म्हणून तिथे गेले आणि तिकडेच स्थायिक झाले.

त्यांच्या घरासमोर कारने पोहोचलो तेव्हा वाटले कोकणातल्या एखाद्या संपन्न गावीच आलोय. कारण अंगण छोटेसे. त्यात मेपलच्या झाडाला बांधलेला पार, बाजूने विविध वृक्ष, चार पायऱ्या चढून गेल्यावर बंद दाराच्या आड व्हरांडा असावा तशी छोटी खोली. नंतर प्रशस्त स्वयंपाकघर अर्थात आधुनिक पद्धतीचे. आणि मागे चक्क हिरव्यागार   झाडाझुडपांनी वेढलेल्या परसात जास्वंदीची फुले. मित्राच्या सासूबाई प्रेमळ, मायाळू चेहऱ्याच्या. नातीला जवळ घेऊन कुरवाळीत असलेल्या, फक्त शर्टपँटमधल्या. सर्व कुटुंबीयांनी मोठे छान स्वागत केले, जणू काही पूर्वापार ओळख असावी. इथली घरे प्रचंड मोठी असतात हे नंतर लक्षात आले. तळघरात १००/१५० माणसे मावतील एवढा सुसज्ज हॉल. मध्ये स्वयंपाकघर म्हणजे किचन- डायनिंग हॉल वगैरे आणि वर पाच-सहा मोठय़ा खोल्या. इथे घरकाम करायला नोकरमाणसे मिळणे दुरापास्त असल्याने त्यांना स्वत:लाच सर्व घरकामे करावी लागतात. पण सगळे घर कसे सुसज्ज, छान!

31-lp-canada

पृथ्वीवरील वीस टक्के गोडे पाणी हे एकटय़ा कॅनडात आहे. अर्थात या देशाचे क्षेत्रफळही प्रचंड आहे. रस्त्याच्या दुतर्फा सर्वत्र क्षितिजापर्यंत पसरलेली हिरवीगार, स्वच्छ सुंदर शेते तिथली समृद्धी दर्शवितात. मात्र इथे वर्षांचे जवळजवळ सहा महिने सातत्याने बर्फ पडत असतो. दिवस लहान असतात, त्यामुळे या काळात लोकजीवन कष्टाचे असते. परंतु म्हणूनच की काय इथली माणसे सहनशील आणि शांत आहेत. शंभरहून अधिक काळ इथे या भूमीवर युद्ध झालेले नाही. त्यापूर्वी सत्तेसाठीच्या लढाया होत होत्या, युद्ध नाही. सर्व प्रकारचे लोक इथे गुण्यागोविंदाने नांदतात. आपापल्या संस्कृतीप्रमाणे सण, उत्सव, समारंभ साजरे करतात. माझ्या मैत्रिणीच्या मुलाच्या लग्नात घोडय़ावरून नवरा मुलगा, पुढे लेझीम पथक, गाण्याच्या तालावर नाचणारे वऱ्हाडी असे लग्नाच्या हॉलपर्यंत साग्रसंगीत झाले.

इथे सुरक्षिततेचा विशेष असा काच नाही. अटोवा राजधानीच्या पार्लमेंटमध्ये तुम्ही सहजपणे जाऊ शकता. कॅनडाच्या आर्मी, नेव्ही, एअरफोर्सच्या प्रमुखपदी एक शीख व्यक्ती आहे. हे ऐकून अर्थातच आपली मान अभिमानाने उंचावते. ओटावा हे राजधानीचे शहर असूनसुद्धा टोरान्टो या व्यापारी व औद्योगिक शहराहून लहान आहे. आपल्या दिल्ली आणि मुंबईसारखा हा प्रकार आहे, असं म्हणता येईल. एका प्रचंड मोठय़ा, खोल अशा तलावातून बसने लाटा कापीत निघालो होतो. आम्ही पाण्यात आणि ओटावा शहर बाजूला. ते असे किनाऱ्या-किनाऱ्याने पाहाणे हा सुखद अनुभव आहे. इतर पाश्चात्त्य शहरांप्रमाणेच स्वच्छ, सुंदर देखण्या उंचच टॉवर्सचे हे शहर आहे.

टॉरान्टो शहराचे नाव आपण पुष्कळदा ऐकले, वाचलेले असते. हे औद्योगिक व व्यापारी शहर असल्याने इथे बऱ्यापैकी वर्दळ आहे. इथे भरपूर  भारतीय लोक दिसतात. टोरान्टोमधले महाराष्ट्र मंडळही जोरात आहे. ही मंडळी एकत्र येऊन खूप मराठी कार्यक्रम, उत्सव साजरे करतात. इथे ‘लेक ओन्टारियो’मध्ये आम्ही बोटिंग केले. स्वच्छ पाणी, अधूनमधून दाटीवाटीने उभे असलेले मोठे मोठे वृक्ष. त्यांचे पाण्यात पडलेले विलोभनीय प्रतिबिंब. विविधरंगी फुलझाडे.. या सगळ्याबरोबर गार वारा अंगावर घेताना सुखद वाटत होते. पांढरे शुभ्र सी-गल्स आकाशातून उडताना मध्येच पाण्यावर लॅण्ड होत होते. जणू काही छोटी विमानेच!

32-lp-canada

टोरान्टोला माझ्या मैत्रिणीकडे गेलो. वीस वर्षांनी झालेल्या या भेटीचा आनंद अगदी मिठी मारून आम्ही दोघींनी साजरा केला. उंच उंच वृक्षांच्या जंगलात तिचे ‘ब्रॉम्पटन’ हे उपनगर वसविलेले आहे. सुंदर, देखणे बंगले, मागे मोठय़ा फुलांनी बहरलेल्या बागा- परंतु सर्वत्र स्वच्छ सुविहित असे हे ठिकाण. मैत्रिणीने घर दाखविले. केवढा मोठा प्रचंड हॉल, तसेच स्वयंपाकघर. खाली तळघरसुद्धा सजविलेले. तिथे २०० माणसे मावू शकतात. त्यामुळे विविध प्रकारचे खूप कार्यक्रम आम्ही करतो, असे ती सांगत होती. जेवणात पुरणपोळीचा बेत होता, त्यामुळे आणखीनच मजा आली. मुलाचा मित्र ‘स्वीट चपाती’ म्हणून मिटक्या मारीत पुरणपोळी खात होता.

थाऊजंड आयलंड्स ही रम्य सफर आहे. पु.लं.च्या  ‘जावे त्यांच्या देशा’मध्ये याचे वर्णन वाचले होते. सेंट लॉरेन्स नदी आणि लेक ओन्टारिओ यांच्या अथांग पाण्यामध्ये ही छोटी-मोठी बेटे आहेत. यातल्या काही बेटांवर पूर्वापार राहणारे दर्यावर्दी आहेत. यांची साधीसुधी परंतु देखणी घरे इथे आहेत, तसेच धनिकांचे अत्याधुनिक पद्धतीने नटलेले मोठमोठे, सुंदर बंगले या ठिकाणाची शोभा वाढवितात. ही आयलंड्स कॅनडा आणि अमेरिका दोन्ही देशांच्या हद्दीवर पसरलेली आहेत. आपण बोटीने थाऊ जंड् आयलंड्समध्ये जवळजवळ पाच तासांची सफर करतो. एका ‘कॅसल’पाशी आपल्याला उतरवून बोट पुढे जाते. एक तासाचा वेळ दिलेला असतो. हा कॅसल अगदी  आपल्या ‘ताजमहाल’ची आठवण करून देणारा. ‘जॉर्ज बोल्ट’ नावाच्या अमेरिकेतल्या एका धनिकाने  आपल्या प्रिय पत्नीच्या प्रेमाखातर, तिच्या सौंदर्याचे प्रतीक म्हणून हा कॅसल (किल्ला) इथे पाण्यात उभारण्याचे ठरविले. मोठमोठय़ा आर्किटेक्टस्कडून त्याची डिझाइन्स मागविली व प्रचंड खर्च करून या बेटावर कॅसल बांधायला सुरुवात झाली. पण अर्धाअधिक कॅसल बांधून झाला आणि त्याची प्राणप्रिय पत्नी कसल्याशा आजाराने निधन पावली. तो त्या वेळी न्यूयॉर्कमध्ये राहात होता. या घटनेनंतर या कॅसलमध्ये त्याने कधीच पाऊल टाकले नाही. पुढे ७७ वर्षांनंतर एका अमेरिकन कंपनीने पूर्वीच्या डिझाईनप्रमाणे ती वास्तू पूर्ण केली. जॉर्ज बोल्ट, त्याची पत्नी लुईस व मुलांचे फोटो, त्यांच्या वस्तू इथे आणून सर्व आंतररचना केली आणि मग सरकारने ती वास्तू सर्वासाठी पाहण्यासाठी खुली केली.

‘अप्पर कॅनडा व्हिलेज’ हेसुद्धा असेच एक पूर्वस्मृती जतन केलेले विलोभनीय ठिकाण आहे. इ.स. १७६० मध्ये जी छोटी गावे कॅनडामध्ये स्वयंपूर्ण पद्धतीने जीवन जगत होती, त्यांचे प्रतििबब या व्हिलेजमध्ये पाहायला मिळते. मधल्या काळात पुरामुळे हे गाव पूर्ण विस्कळीत झाले होते. त्यामुळे लोक दुसरीकडे राहायला गेले. पुढे १९ व्या शतकाच्या सुरुवातीला हा प्रदेश पहिल्याबरहुकूम करून हे व्हिलेज वसविले गेले आहे. आता हे एक प्रदर्शनीय ठिकाण आहे. पूर्वीचे गाव इथे अगदी हुबेहूब उभे केले गेले आहे. म्हणजे तिथला पाणचक्कीवर काम करतानाचा माणूस पूर्वीच्या पद्धतीनेच लाकडाच्या फळ्या कापून दाखवितो. पिठाच्या चक्कीत पीठ दळणे, पोत्यात पीठ साठविणे, सर्वत्र पिठाचा दरवळ हे सगळं तसंच. मेंढय़ा चारणारा मेंढपाळ, जुन्या हत्यारांचा वापर करून टिनचे डबे, वस्तू तयार करणारा कारागीर (काम करताना नेम चुकल्याने त्याच्या बोटातून खरोखरच रक्त येत होते), पोस्ट मास्तरच्या घरात असलेले पोस्ट ऑफिस, घोडय़ांची बग्गी, जुन्या प्रकारच्या सुसज्ज टापटिपीच्या खाणावळी! एका खाणावळीत खरोखरच त्यावेळचे पदार्थ तयार करून विक्री करीत होते. त्याही वेळी कुठे आग लागल्यास सुरक्षितता म्हणून ‘फायर स्टेशन’ होते. शाळा, त्यावेळच्या उमरावांची घरे, त्यांचे टेलर्स, त्यांनी बनविलेले फॅशनचे कपडे घातलेली मॉडेल्स, एवढेच काय, त्यावेळच्या उमराव स्त्रियांचा सुंदर फ्रिलवाला पायघोळ गाऊन घालून एक स्त्री बागेतून हिंडत होती. मी तिचा फोटो काढल्यावर गोड हसून मला थँक यू म्हणून हात हलवून ती ऐटीत चालत पुढे निघून गेली. छोटय़ा थिएटरमध्ये लुटुपुटुचे नाटक, ग्राऊंडवर त्यावेळचे खेळ. खरोखरच न विसरता येण्यासारखे देखणे, रमणीय असे हे व्हिलेज होते. हे अप्पर कॅनडा व्हिलेज ओटावापासून जवळ आहे.

33-lp-canada

सर्व बाजूंनी, सर्व दिशांनी, शक्य त्या सर्वप्रकारे नायगारा अनुभवला. खरोखरच सृष्टीचा चमत्कार आहे. एकूण पाच नद्यांच्या संगमातून तो तयार झालाय. या नद्या बर्फामुळे वरच्या अंगाला गोठून जातात तेव्हा हा भव्यदिव्य नायगाराही गोठून जातो. असे अनेक वर्षांतून एकदाच घडते, पण घडते. अठराव्या शतकात असे घडल्यावर परिसरातले लोक घाबरले. त्यांना हा नैसर्गिक प्रकोप वाटला. पण जेव्हा नायगारा परत उसळून धबाबा कोसळायला लागला तेव्हा लोकांच्या जिवात जीव आला. आता त्यामागचे कारण कळल्याने लोक पुन्हा तो पूर्ववत कोसळण्याची वाट पाहतात. स्वच्छ सूर्यप्रकाश  असेल तर नायगाराचे सौंदर्य काय वर्णावे? सूर्यकिरण पाण्यात परावर्तित झाल्यामुळे एकाच वेळी एकावर एक इंद्रधनुष्याच्या कमानी पाहताना डोळे दिपून जातात. बोटीमधून आपण त्याच्या गुहेत (हॉर्श शू) प्रवेश करतो तेव्हा सर्वत्र प्रचंड पाण्याचे तुषार, पाण्याचा रोरावणारा आवाज यामुळे अक्षरश: छातीत धडकी भरते. प्रचंड थंड पाण्याचा तो स्पर्श सर्वाग  थरारून टाकतो. रात्रीच्या वेळी अमेरिका व कॅनडा या दोन्ही देशांकडून आलटून-पालटून केलेली विविध रंगी लाइटस्ची उधळण मनाला मोहरून टाकते. नायगारा आणि अमेरिका-कॅनडा अशा दोन देशांना जोडणाऱ्या या प्रचंड नायगारावर बांधलेल्या पुलाला ‘रेनबो’ हे सार्थ नाव दिलं गेलं आहे.  आपण एवढय़ावरच थांबतो. पण दोराच्या साहाय्याने लोंबकळत जिवाच्या कराराने नायगारा पार करणारे काही महाभागही आहेत.

नायगाराचे मनसोक्त दर्शन घेतल्यानंतर सर्वार्थाने समृद्ध अशा या कॅनडाचा निरोप घेतला.
विजया एरंडे – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 9, 2016 1:02 am

Web Title: beautiful canada
Next Stories
1 डय़ुमेला बोतस्वाना
2 मोरोशीचा भैरवगड
3 दोन चाकांवरची स्वप्न सफर
Just Now!
X