जगातल्या विविध प्रकारच्या फळाफुलांच्या, मसाल्यांच्या झाडांचं नुसतं दर्शनच फ्लॉरिडा गार्डनमध्ये होत नाही, तर सोबतच्या गाईडकडून त्यांची माहितीही मिळते. झाडाला हात लावता येत नाही, पण खाली पडलेली फळं चाखताही येतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मायामीहून अर्धा तास साउथ-वेस्टच्या दिशेने ड्राइव्ह केलं, की तुम्ही होमेस्टेडला पोचता. परिसरात झालेला बदल जाणवायला लागतो. हिरवाई वाढलेली दिसते. काँक्रीटची जंगलं कमी झाल्यासारखी वाटतात. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना भाज्यांचे मळे, फळबागा डोळ्यांना गारवा देतात. फ्रूट आणि स्पाइस पार्क या निसर्गरम्य परिसरात चपखल बसणारा असाच आहे. अमेरिकेतला हा एकमेव बोटॅनिकल फ्रूट आणि स्पाइस पार्क.

मेरी हेन्लीनच्या डोक्यातला विचार, डोळ्यांतलं स्वप्न आणि अथक प्रयत्न यांचं फलित म्हणजे ३५ एकर व्याप्तीचा हा अमेरिकेतला एकमेव स्पाइस पार्क. पार्कचं मोठंच्या मोठं नाव आहे ‘प्रेस्टन बी.बर्ड अ‍ॅण्ड मेरी हेन्लीन फ्रूट अ‍ॅण्ड स्पाइस पार्क’. मेरी हेन्लीन तिच्या वयाच्या सातव्या वर्षी, १९१० साली साउथ फ्लॉरिडामध्ये राहायला आली. झाडांची, बागकामाची आवड तिला लहानपणापासूनच होती. साउथ फ्लॉरिडाच्या सुपीक जमिनीत, आणि सौम्य हवामानात फुलबागा आणि फळबागा फुलवायला लोकांना प्रोत्साहित करावं, अमेरिकेला साउथ फ्लॉरिडाबद्दल जास्ती कळावं असं तिला कळकळीने वाटत होतं. प्रेस्टन बी. बर्डनी या काउंटी कमिशनरच्या मदतीने मेरीने १९४४ साली आपलं स्पाइस पार्कचं स्वप्न प्रत्यक्षात उतरवलं. पार्क अर्थातच सरकारच्या मालकीचा आहे. मेरी निवृत्त होईपर्यंत पार्कची मुख्य अधिकारी राहिली. पार्कमधली किती तरी झाडं मेरीच्या स्वत:च्या नर्सरीतून आलेली आहेत. आशिया, आफ्रिका, साउथ अमेरिका, ऑस्ट्रेलिया.. सगळीकडून मसाल्याच्या पदार्थाची झाडं मागविली गेली. ती साउथ फ्लॉरिडाच्या मातीत उत्तम रुजली आणि बहरली. आज पार्कमध्ये फळांच्या, भाज्यांच्या आणि मसाल्याच्या पदार्थाच्या अगणित जाती आहेत. बांबू, केळी आणि आंब्याच्या विविध जातींचा साठा इतक्या मोठय़ा संख्येने क्वचितच कुठे पाहायला मिळेल. वर्षांला साधारणपणे ४० हजार लोक या पार्कला भेट देतात.

फ्लॉरिडामध्ये जून महिन्यापासून सप्टेंबपर्यंत हरिकेन म्हणजे चक्री वादळांचा सीझन. कधी वादळं जवळून जातात, कधी सरळ सरळ फ्लॉरिडामध्येच घुसतात. १९९२ मध्ये हरिकेन अ‍ॅण्डर्य़ूनी साउथ फ्लॉरिडाला चांगलाच दणका दिला. होमस्टेडला टार्गेट केलं. स्पाइस पार्कला अतोनात नुकसान पोचलं. ७५० मोठे वृक्ष उन्मळून पडले. छोटी लावलेली रोपं, पाइप लाइन्स, कुंपण, ऑफिसची जुनी बिल्डिंग, सगळंच होत्याचं नव्हतं झालं. पार्कच्या मॅनेजरने- ख्रिस रोलिन्सनी पडलेल्या झाडांपैकी २५० झाडं पुन्हा उभी केली. हरिकेन कतरिना २००५ मध्ये पार्कला नुकसान करून गेलं. ३० झाडं मेली आणि १५० झाडं पडली, जी परत उभी करता आली. दोन हजारहून जास्त झाडं पार्कमध्ये अजूनही फुलत, फळत आहेत. रोलिन्सने मग पार्कमधली रचना बदलली. एथनोबोटॅनिकल दृष्टिकोन वापरला. म्हणजे पार्कमधली झाडं आता आपल्या देशबांधवांजवळ रहातात. साउथ अमेरिका, आफ्रिका, एशिया, ऑस्ट्रेलिया, पॅसिफिक रीजन असं ग्रुपिंग केलं.

पण पार्कमधल्या स्रिटस ट्रीजचं- मुख्यत्वे लिंबू, मोसंबी, संत्री, ग्रेप फ्रूटचं वास्तव्य बरेच वेळा डळमळीत असतं. मोसंबी (ऑरेंज) हे फ्लॉरिडाचं कॅश क्रॉप आहे. कँकर या मोसंब्यांवर पडणाऱ्या रोगापासून मोसंब्याचं पीक वाचवायला सरकारी बागा त्यांच्या जवळच्या परिसरातली सगळी स्रिटस फ्रूट्सची झाडं नष्ट करतात. पार्कमधल्या लिंबू, संत्री, मोसंबी, ग्रेप फ्रूट, या स्रिटस फ्रूटच्या झाडांना या सरकारी फतव्याचा दणका अधेमधे बसत असतो. दोन वर्षांपूर्वी पार्कमधली १२६ प्रकारची स्रिटस झाडं काढून टाकली गेली. येणाऱ्या सगळ्या अडचणींना धीराने तोंड देत पार्क मात्र बहरतो आहे.

सदा हरित असणारा पार्क वेगवेगळ्या सीझनमध्ये वेगवेगळं रूप दाखवतो. माझी ट्रिप फेब्रुवारीमध्ये झाली. सकाळी अकराच्या सुमाराला मी, माझी मैत्रीण, आणि व्हीलचेअरमध्ये बसलेली आई अशा तिघी जणी पार्कच्या पार्किंग लॉटमध्ये येऊन पोहोचलो. पार्कच्या ऑफिसची छोटी कौलारू बिल्डिंग नेहमीच गजबजलेली असते. प्रत्येकी आठ डॉलर्सचं (मोठय़ा माणसांचं) तिकीट काढलं, की तुम्हाला सबंध दिवस पार्कमध्ये मुक्त संचार करता येतो. ऑफिसात पार्कमध्ये पिकणाऱ्या फळांचे तुकडे मोठय़ा ट्रेमध्ये टेस्ट करायला ठेवलेले असतात. इथे मध, जॅम, बी-बियाणांची पाकिटं, वेगवेगळी फ्रूट कॅण्डी, पार्कचं चित्रं असलेले टी शर्ट्स, बागांविषयीची पुस्तकं असं बरंच काही विकायलाही असतं. तुम्हाला सूचना देण्यात येतात- ‘खाली पडलेली फळं खुशाल खा. झाडावरची फळं तोडू नका. खात्री नसेल, तर पडलेली फळं खाण्यापूर्वी कर्मचाऱ्यांना विचारा.’ वॉकिंग मॅप दिला जातो. पार्कमध्ये फिरणाऱ्या लोकांवर लक्ष ठेवायचं काम करणं इथे जरुरीचं नसतं. जगाच्या पाठीवरून वेगवेगळ्या देशांमधून आलेले सगळेच लोक अमेरिकेतली शिस्त, नियम काटेकोरपणे पाळतात. झाडांवरच्या फुला-फळांना कोणीही हात लावताना दिसत नाही.

दिवसातून तीन वेळा ट्रॅमची टूर असते. त्याच्या वेळाही सांगितल्या जातात. पार्कमध्ये सगळीकडे कॉन्क्रीटच्या पायवाटा आहेत. थोडय़ा थोडय़ा अंतरावर पिकनिक टेबल्स आहेत. पार्कमध्ये रेस्टॉरंटही आहे. त्यात बरेच खाद्यपदार्थ बागेतली फळं, भाज्या वापरून केलेले असतात.

प्रवेशाच्या जवळ उजव्या हाताला कॉन्क्रीटच्या हौदांमध्ये अब्र्ज (अब्र्ज म्हणा, हब्र्ज म्हणा, नावात काय आहे? त्यांचे गुण विशेष बदलतात थोडेच?) आणि काही फळभाज्यांची लागवड केलेली आहे. विडय़ाच्या पानांचा वेल (नागवेल), ओव्याची पानं, आलं, लसूण, तुळस, पुदिना, वेलदोडा यांच्या एकापेक्षा अनेक जाती, पर्पल पानकोबी, नवलकोल, रताळी, बीन्स, टोमॅटो अशा फळभाज्या आणि कंद अशा आपल्या परिचयाच्या, पण अमेरिकन्सना बहुतेक वेळा अनोळखी असणाऱ्या मसाल्यांची/ भाज्यांची रोपं गुण्यागोविंदाने नांदताना दिसली. उतार वयाची रूथ सगळ्या अर्ब्सची माहिती देत होती. आम्हाला काही नवीन माहिती कळली नाही, मात्र रूथ माहिती अगदी बरोबर देत होती.

अर्ब्स गार्डनच्या जवळ एका हौदात फुललेली वेगवेगळ्या रंगाची कमळं, कारंजे सुखद धक्का देतात. जवळ असलेली चिक्कू, स्टार-फ्रूट, बोरी, जांभूळ अशी झाडं पाहिली. दोन मोठे चिक्कू खाली पडले होते, ते उचलले. मग पिकनिक टेबलाशी बसून घरून आणलेल्या लंचचा समाचार घेऊन आम्ही ट्रॅम राईडकरता थांबलेल्या घोळक्यात सामील झालो. ट्रॅम म्हणजे टप असलेली, दारं नसलेली, जीपच्या उंचीची छोटी बस. आमचा दहा-बारा जणांचा घोळका आणि ड्रायव्हर आणि गाईड असे दोन्ही भूमिका पार पाडणारी डॉना.

ट्रॅमची ट्रिप जितकी आनंददायी तितकीच ज्ञानवृद्धी करणारी आहे. डॉनाने जवळच्याच सरकारी शाळेतल्या मुलांनी बांधलेली छोटी शेड दाखवली. त्यात बरीच केळी ठेवलेली दिसली. निरनिराळ्या केळ्यांच्या जातींची ओळख करून देत तिने छोटे छोटे केळ्यांचे तुकडे सर्वाना वाटले. एक केळ्याचं कमी उंचीचं झाड होतं, त्याला तांबूस रंगाची केळी येतात. केळी आकाशाकडे तोंड केलेली असतात. ही खायला नसून फक्त डेकोरेशनला वापरतात. पुढे गेल्यावर मोरपिसी रंगाचा अननसही पाहिला. तोही खाण्यासाठी नसतो.

जरा पुढे गेल्यावर डॉनाने ‘बे रम’चं पान वासाला दिलं. पान नुसतंच नाकाजवळ नेलं, तर वास येत नाही, मात्र जरा चुरगळलं की सुगंध येतो. कॅरेबिअन आयलंड्समध्ये ही झाडं प्रामुख्याने असतात. या पानांचा उपयोग जेवणात आणि परफ्यूम्समध्ये करतात. पॉल मिशेल शांपूमध्येही करतात असं डॉना म्हणाली.

आजूबाजूचे अमेरिकन प्रवासी फणस, आंबे, बोरी, चिंच, जांभूळ अशासारख्या फळ-झाडांना बघून नवल करत होते. आम्ही फारसं लक्ष देत नव्हतो. अतिपरिचयात अवज्ञा, दुसरं काय. ऊस, बेरीज खात, आजूबाजूचं निरीक्षण करताना वेळ छान चालला होता.

‘हे आफ्रिकेतलं प्रसिद्ध ‘ट्री ऑफ लाईफ’- डॉना म्हणाली, आणि बघितलं, तर एक महाकाय वृक्ष रस्त्याच्या कडेला उभा होता. आफ्रिकेत त्याला ‘बोबॉब’ म्हणतात. झाडाची पानं, फुलं, मोठाली फळं सगळं खाता येतंच, पण इतर अनेक उपयोगांबरोबर या झाडाचं खोड पोखरून त्याच्यात छान खोल्या करता येतात. मीटिंग प्लेस, लग्नाचा हॉल, बीअर बार म्हणून त्यांचा उपयोग आफ्रिकेत होतो. या झाडाच्या खोडामध्ये पाण्याचा साठा असतोच, पण दुष्काळात याच्या ढोलीचा हौदासारखा उपयोग करून त्यात पाणी साठवूनही ठेवतात. ३० मीटर उंच वाढू शकणाऱ्या या झाडाच्या बुंध्याचा घेर दहा- अकरा मीटर सहज असू शकतो. माणसांना, पशू-पक्ष्यांना अन्न, पाणी, उदरनिर्वाहाचं साधन, निवारा, असं सगळं पुरविणाऱ्या या झाडाला ट्री ऑफ लाईफ हे नाव योग्यच आहे.

डॉनाने ट्रॅम थांबवून मिरॅकल बेरीजचं झाड दाखविलं. या बेरीजची खासियत म्हणजे त्या खाल्ल्या, की तोंडात गोडसर चव मागे राहते. या बेरीजचा उपयोग केमोथेरपी घेणाऱ्या रुग्णांना होतो. त्यांच्या तोंडाची चव गेलेली असल्यामुळे त्यांना कुठलंही अन्न चविष्ट लागत नाही. काहीही खाण्यापूर्वी एखादी बेरी खाल्ली, तर त्यांना थोडंसं जेवण चवीने जेवता येतं. या बेरींचा उपयोग करून काही औषधांच्या कंपन्यांनी बाजारात नवीन औषधंही आणली आहेत- इति डॉना. बांबूचं वन, कॉफी, काजू, पपया, बकुळी, नागचाफा, चिंच, जायफळ अशी झाडं मागे टाकीत ट्रॅम कासवाच्या गतीने चालली होती. झाडं नीट न्याहाळता येत होती, डॉना प्रवाशांना प्रश्न विचारायला संधी आणि वेळ देत होती, स्वत:वर विनोद करून सगळ्यांना हसवीतही होती. पार्क सरकारी असल्याने झाडं विकायची परवानगी नव्हती, पण जवळच्या काही नर्सरीजमध्ये पार्कमधली काही झाडं विकत घेता येणं शक्य असल्याचं तिने सांगितलं. काहीं झाडांची कलमं पार्कमध्ये मिळू शकतात.

आंब्याची लोकप्रियता अमेरिकेत हळूहळू वाढते आहे, तरी बहुतेकांना अजूनही आंबा हे खायला फारच ‘मेसी’ फळ वाटतं. ‘सॉसेज ट्री’ची फळं लांब सॉसेजेससारखी दिसतात. फळं कच्ची खायची नसतात. विषारी असतात. वाळवून, भाजून खाण्याचा सल्ला दिला जातो. स्किन केअर प्रॉडक्ट्समध्ये त्यांचा वापर होतो. या झाडाच्या लाकडापासून वल्ही उत्तम बनतात. केळ्यांच्या ८० जाती, आंब्याच्या १६० जाती, द्राक्षांच्या ४० आणि बांबूच्या ७० जाती पार्कमध्ये आहेत. जाम, आइस्क्रीम बीन्स या फळांची झाडंही आहेत.

लिपस्टिक ट्रीची छोटी हिरवी फळं डॉनाने प्रत्येकाला दिली. फळाच्या आत पुष्कळ लहान लहान (धन्याच्या आकाराच्या) बिया असतात. बी

चुरडली, की आतला सुंदर लाल रंग बोटं लाल करत होता. पाण्याने बोटं धुवेपर्यंत रंग जसाच्या तसा होता. अमेरिकेत खाण्याच्या पदार्थांमध्ये, लिपस्टिक्समध्ये वापरायला हा रंग अगदी सुरक्षित समजला जातो. अटेमोया (या झाडाची सीताफळासारखी दिसणारी फळं आईस्क्रीममध्ये घालतात. कधी कधी याला आईस्क्रीम फ्रूट ट्री असंही म्हणतात). पमेलो, लोंगन, लिची, कॅनिस्टेल (याला एग-फ्रूटही म्हणतात, कारण याच्या गराची चव अंडय़ातल्या बलकासारखी असते), कम्क्वाट आणि जुजुबे (बोरं) अशा विविध गुणांच्या आणि रूपाच्या फळझाडांची माहिती ऐकता ऐकता जगातल्या बहुतेक सगळ्या खंडांना दीड तासाची धावती भेट झाली.

शेवग्याच्या झाडाजवळ आलो, आणि डॉनाकडून कळलं की सध्या शेवग्याला फारच चांगले दिवस येऊ  घातलेत. त्याची पाणी शुद्धीकरणाची शक्ती, टय़ूमर, कॅन्सर, अल्सर, मधुमेह या आणि अजून बऱ्याच आजारांवरच्या औषधांमध्ये त्याचा उपयोग होतो.

आपल्या पातळ केसांचा उल्लेख करून डॉना म्हणाली, ‘‘याच्या बियांचा उपयोग केसांच्या वाढीला होतो असं ऐकलं आहे. थोडा रीसर्च बाकी आहे. लवकरात लवकर मार्केटमध्ये ते प्रॉडक्ट येऊ दे.’’ आम्ही सगळ्यांनी ‘आमेन’ म्हटलं. बरोबरच्या अमेरिकन व्हिजिटर्सना शेवग्याच्या शेंगा घालून करायच्या आमटीची रेसिपी सांगायचा मोह मी ट्राममधून उतरता उतरता आवरला.

पार्कमधे ग्रीन हाऊसही आहे. इथे काही मोठी झाडं (ज्यांना हवेमधले चढ-उतार सोसत नाहीत, अशी) बघता येतात.

पार्कमधला एक भाग तळं, कारंजी, आजूबाजूला झाडं अशा साऱ्यांनी विशेष रमणीय केला आहे. तळ्यामध्ये हंस पक्षी विहरत असतात. पुष्कळ लोक विवाहाकरता किंवा इतर छोटय़ा समारंभांकरता ही साईट निवडतात.

शनिवारी, रविवारी पार्कमध्ये वेगवेगळे शिक्षण वर्ग असतात- कलमं करणं, सीझनप्रमाणे लागवडी करणं, खतं, छाटणी शिकवणारे. बॉटनीचे विद्यार्थी बरेच वेळा स्टडी-ट्रिपकरता येतात. चायना, आफ्रिका, साउथ अमेरिका इथले अमेरिकेत स्थायिक झालेले लोक इथे येऊन आपापले विविध सण साजरे करतात. सगळ्यांना आनंद देत, कसलीही अपेक्षा न करता पार्कमधले वृक्ष, वेली, झुडपं, रोपं स्तब्ध उभी असतात- आपल्या फळा- फुलांनी, सुगंधाने सगळा परिसर रम्य करत…
शशिकला लेले – response.lokprabha@expressindia.com

मराठीतील सर्व ट्रॅव्हलॉग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Florida garden
First published on: 10-06-2016 at 01:03 IST