परदेशपर्यटन करू इच्छिणाऱ्यांचं थायलंड हे त्यातल्या त्यात स्वस्त आणि मस्त असं अगदी आवडतं ठिकाण. पण तिथे जाणारे पर्यटनाच्या नेमक्या कोणत्या कल्पना डोक्यात घेऊन जातात?

मी एका खासगी यात्रा कंपनीसोबत थायलंडला निघालो होतो. थाय एअरच्या विमानात आमचा २३ जणांचा ग्रुप एकत्रच होता. साधारण तीन तासांत बँकॉक आले. आंतरराष्ट्रीय विमानात मिळणाऱ्या मद्यसेवेच्या परिणामी एका ग्रुपमधल्या मद्यधुंद माणसांचे विमान लॅण्डिंगनंतरही हवेतच होते. तुलनेत आमची परिस्थिती मस्त होती. ऑन अरायव्हल व्हिसा काढताना ‘त्या’ ग्रुपमधले एक काका सरळ उभेपण राहू शकत नव्हते आणि बायकोच्या साहाय्याने सगळ्या औपचारिकता पार पाडत होते.

stealing liquor, liquor Kalyan,
कल्याण : महागड्या मद्याच्या बाटल्यांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री
life of fish, fish in river, fish danger,
नदी, तलावातील माशांचे आयुष्य का धोक्यात आलंय? काय आहे नवं संशोधन?
Tipeshwar Sanctuary
VIDEO : टिपेश्वर अभयारण्यात वाघच नाही, तर रानकुत्र्यांसह ‘या’ वन्यप्राण्यांना पर्यटकांची पसंती
(11 goats died in attack by stray dogs in Jalgaon )
जळगावात मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात ११ बकर्‍या मृत्युमुखी

मी या अपरिचित गोतावळ्यात पुढच्या चार दिवसांकरता कंपनी शोधत होतो आणि सकाळच्या नाष्टय़ाच्या ठिकाणी मला दोन जण भेटलेच. त्यांच्या बोलण्यात आलं की या टूरच्या आधी त्यांची उझबेकिस्तान वारी झाली होती. सिल्क रूटविषयी मला अत्यंत कुतूहल असल्यामुळे मी आपोआपच त्या दोघांकडे ओढला गेलो. सिल्क रूटविषयी त्यांच्याशी आणखी बोलता येईल म्हणून मी बसमध्ये त्यांच्या जवळ जाऊन बसलो, पण गाडी सुटताच दोघेही ठार झोपले. आमचा पहिला थांबा एका झूसदृश ठिकाणी होता. एका छोटय़ाशा ठिकाणी अनेक वाघ मुक्त संचार करत होते आणि एका इमारतीच्या काचेच्या भिंतीतून आम्ही हे दृश्य न्याहाळणे अपेक्षित असावे. या अगोदर (वाघ न बघताच) जंगलांमध्ये पायी फिरलेलो असल्यामुळे मला यात फार कौतुक नव्हते, उलट तिथे भारतीय चहा मिळाल्यामुळे मी खूश होतो आणि यापुढे थाय पद्धतीचे खाणे मिळेल, अशी अपेक्षा होती.

थायलंडचे समुद्रकिनारे, जंगलं इत्यादी विषयी मी बराच ऐकून होतो आणि अशाच एका स्थळी म्हणजे पट्टायाला तीन दिवस राहायचा बेत होता. पट्टायामध्ये पोहोचताच एका भारतीय खानावळीत नेण्यात आले. तिथे मी माझ्या (संभाव्य) मित्रांसोबत बोलणे साधलेच. रोटी-सब्जी चघळत हळूच उझबेकिस्तानचा विषय काढला. हे कोल्हापूरचे मावळे नुकतेच मध्य आशियामध्ये सहा दिवस जाऊन आलेले आणि चक्क त्या विषयी बोलायला पण उत्सुक दिसले.

माझी प्रश्नावली तयार होतीच. पण परिस्थिती फारच निराशाजनक निघाली. माझ्या नवीनच झालेल्या या मित्रांना सिल्क रूट, शास्त्र इत्यादीविषयी काहीच गम्य नव्हते. त्यांची उझबेक वारी झाली होती ती भलत्याच गोष्टीसाठी. इतकं दूर जायचं कारण त्या दोघांनीही बिनधास्त सांगून टाकलं, ‘तुमच्या मुंबईमध्ये रशियन मुलींसोबत वेळ घालवणे महाग आहे. कोल्हापूरमधून आम्ही दहा-बाराजण उझबेकिस्तानला फक्त गेलो, कारण तिथे जरा स्वस्त पडतं.’ आजपर्यंत घडलेली प्रत्येक आंतरराष्ट्रीय सहल या कारणास्तवच केल्याचंही त्यांनी सांगून टाकलं! आणि वर हेही स्पष्ट केलं की ही थायलंड टूरही अपवाद नाही!

पट्टाया थायलंडच्या दक्षिणी तटावर वसलेले आहे आणि व्हिएतनाम युद्धामुळे या गावाला त्याची नवीन ओळख सापडली आहे. थायलंड हा अमेरिकेचा मित्र आणि तो या युद्धात अमेरिकेला जाहीररीत्या मदत करत होता. आमच्या गाईडच्या सांगण्यानुसार या सामंजस्यामुळे पट्टाया हे दमलेल्या अमेरिकी सैन्यास आरामाचे ठिकाण म्हणून निर्माण झाले आणि थायलंडच्या पूरक सेक्स रेशोचा फायदा या गावाच्या समृद्धीस कारणीभूत ठरला. युद्ध संपल्यावर अमेरिकी सैन्य निघून गेले. पण नकळत पट्टायाला आपली ओळख सापडली होती. साधारण गेल्या दोन दशकांत भारतीय मावळ्यांना याची अनुभूती झाली आहे. आणि ‘थायलंड पॅकेजेस’चा भडिमार सुरू झाला आहे.

आपल्याला भारतीयांना थायलंडविषयी भरपूर आपुलकी आहे आणि ती प्रवास कंपन्यांच्या जाहिरातींवरून स्पष्ट होते. थायलंडला जाणाऱ्या प्रवाशांमध्ये भारतीय प्रवाशांचा नंबर सहावा आहे आणि २०१४ मध्ये ९.४० लाख भारतीय पर्यटक थायलंडला गेल्याचे नोंदवले गेले असून, ही आकडेवारी २०१५ मध्ये १०.५० लाख वर जाण्याची शक्यता आहे. मजेची गोष्ट अशी की, थायलंडमध्ये गेली दोन वर्षे राजकीयदृष्टय़ा परिस्थिती पर्यटनास फारशी पूरक नाही.

माझ्याकरता ही टूर जवळजवळ मोफत होती, कारण मी कोणाचे तरी प्रतिनिधित्व करत होतो. मला तिथे इतर बरेच भारतीय दिसत होते. पुढचे चार दिवस अशा विविध कंपन्यांच्या सहलींसोबत आमचादेखील ग्रुप फिरत होता. सगळ्यांचे कार्यक्रम सारखेच असावेत बहुधा. काही नवविवाहित मंडळी परदेशात मधुचंद्र साजरा करण्याच्या हट्टापायी तिथे होती, तर काही पालकांना त्यांच्या कुटुंबाला परदेशी वारी करण्याच्या ध्यासाने तिथे आणले होते. थायलंडची ट्रीप हे अशांसाठी खरेच स्वस्त समीकरण आहे आणि बरेच वेळा काही भारतीय पर्यायांपेक्षा स्वस्तही. भारतात कुठे तरी जाण्यापेक्षा आपल्या पासपोर्टवरील थायलंडच्या व्हिसाचा शिक्का भारतीय प्रवाशांना अधिक आकर्षक वाटत असतो. अर्थात थायलंडमध्ये मला भारतीय नागरिक वगळता, मलेशिया आणि दक्षिण कोरियासारख्या उभरत्या अर्थव्यवस्थांमधले देखील लोक विशेष करून तरुण वर्ग दिसला.

आमच्या टूरचा कार्यक्रम एकदम मुंबईच्या लोकलसारखा खच्चून भरलेला. दिवसभर साइटसीइंग आणि संध्याकाळपासून मोकळा वेळ. आमची राहण्याची सोय पट्टायामधील वॉकिंग स्ट्रीट, या रेड लाइट एरियाच्या अतिशय जवळ होती आणि अर्थातच त्यासाठी आयोजनकर्त्यांला पैकीच्या पैकी मार्क होते. कारण रात्रीची जेवणं आटपून बहुतांश पुरुष आपापल्या प्रिय गोष्टींकडे वळत.

वॉकिंग स्ट्रीट ही पट्टायाची ओळख असल्यामुळे मी तिथे फिरायला गेलो. सुरुवातीला जरा घाबरतच गेलो, कॅमेरा न घेता. पण त्या अरुंद गल्लीतल्या हवेतील मोकळीक पाहून बरे वाटले. दोन्ही बाजूस स्ट्रीप क्लब होते आणि प्रत्येक आस्थापनाबाहेर एक छोटीशी खिडकी ज्यात एखाद-दोन मुली नाचत असायच्या. काही पबदेखील होते जिथे लाइव्ह म्युझिक चालायचे. एक-दोन ठिकाणी मला पुरुष देह विक्रेत्यांची जागा पण बघितल्याची आठवतेय. पुढे मी नियमित, अगदी कॅमेरा घेऊन भटकू लागलो आणि विरोधाभास म्हणजे सकाळी सातच्या सुमारासची वॉकिंग स्ट्रीटची वेगळी शांतता पण अनुभवली.

रात्रीच्या अशा फेरफटक्यांमुळे नित्यनेमाने सकाळी निघायला उशीर होणे नियमित होते आणि बाकी दिवसभर धावाधाव. यात आपल्याकडे मांडव्यापासून मालवणपर्यंत चालतात असे बरेच समुद्री खेळ झाले. घरची आठवण नको यायला म्हणून जिथे जाऊ  तिथे भारतीय खानावळीत भोजन कार्यक्रम नक्की असे. सकाळचा नाश्तादेखील मुंबईसारखाच चहा, पुरी-भाजी, इडली-डोसा आणि पोहे पण! स्थानिक पाककलेला आमच्या कार्यक्रमात स्थान नव्हते. त्याबद्दल नापसंती व्यक्त केल्यानंतर, टूर मॅनेजर म्हणे ‘इथले जेवण तुम्हाला जमणार नाही सर. तुम्ही एकटेच नाराज आहात.’ स्वाभाविकच, पर्यटनात स्थानिक रेड लाइट एरिया पलीकडील गोष्टींना वाव असतो, हे त्या बिचाऱ्याला काही ‘कर्तृत्ववान’ भारतीय पुरुष पर्यटकांमुळे ठाऊकच नाही!

एकेदिवशी आम्हाला नजीकच्याच एका बेटावर नेण्यात आले आणि चक्क दोन तास मोकळीक दिली गेली. काही लोक बीचवर बीयर पीत रिलॅक्स झाले, तर मी जवळच्या एका डोंगरावर छोटासा ट्रेक केला. वर एक मॉनेस्ट्री होती आणि तेथील बौद्ध भिख्खू खाली चालू असलेल्या गोष्टींपासून एकदम अनभिज्ञ होते. हवेत भरपूर आद्र्रता होती आणि मी साध्या तीस मिनिटांच्या चढाईनंतर घामाघूम झालेलो. ते पाहताच, त्यांनी पाणी आणि लिचीसारखी स्थानिक फळे, काही आंब्याच्या फोडी आणि क्रीम सॅण्डविच दिले. आम्ही भरपूर प्रयत्न करूनदेखील भाषेअभावी फारसा संवाद असा साधू नाही शकलो, पण ती काही मिनिटं मी थायलंडमध्ये घालवलेले सगळ्यात सुंदर क्षण होते.

पुढची सकाळ एका मोठ्ठय़ा लॅण्डस्केप गार्डनमध्ये निघाली, पण नंतर एका सांस्कृतिक कार्यक्रमाकडे आम्ही वळलो. थायलंडमध्ये चौथ्या दिवशी का होईना, पण आम्हाला स्थानिक संस्कृतीचे दर्शन घडणारे खरेखुरे दर्शन घडणार असे वाटले. पण तिथे असलेल्या काही रंगीबेरंगी पोपटांमुळे सगळी मजा घालवली. आमचे बरोबरचे लोक प्रत्येकी १०० बाथ खर्चून त्या पक्ष्यांसोबत फोटो काढत बसले आणि अर्धा शो मिस झाला.

टूरची सांगता बँकॉकमध्ये झाली. सायंकाळी एका नदीवर बोट राइड झाली. बोटीवरही अर्थात भारतीय जेवणाव्यतिरिक्त पर्याय नव्हता. बोटीवरच एक मनोरंजनाचा शोपण होता. म्हटले आता तरी काही स्थानिक गोष्टी कानावर पडतील. पण एक मुलगी थाय लिपीमध्ये लिहिलेली हिंदी गाणी म्हणायला लागली. तोंडात ठेवलेली नोट सराईतपणे खेचताना त्या पोरीचा भारतीय संस्कृतीविषयी खोल अभ्यास दिसत होता. मध्य मुंबईतील एका पुढाऱ्याचे समर्थक तिच्या भोवती नाचत सगळ्यात जास्त एन्जॉय करत होते.

शेवटच्या दिवशी आम्हाला एका जंगल सफारीला नेण्यात आले. एका छोटय़ाशा जागेत, आपल्या वातानुकूलित बसमधून भिन्न प्रकारचे वाघ (बहुधा सुमात्रा आणि बंगाल या दोन प्रजातींचे), आफ्रिकेच्या साव्वानामध्ये दिसणारे जिराफ, झेब्रा इत्यादी बघता आले. त्यानंतर मुंबईपेक्षा भीषण अशा बँकॉकच्या ट्रॅफिकमध्ये अडकून शहराच्या मधोमध असलेल्या इलेक्ट्रॉनिक बाजारपेठेत गेलो. भले मोठे एलसीडी टीव्ही घेऊन बऱ्याच जणांची ट्रीप सार्थकी लागली.

या पाच दिवसांत प्रश्न बरेच पडले, उदाहरण द्यायचे तर नवश्रीमंतीमुळे आपण भारतीय भरपूर फिरत असू नक्की, पण आपल्याला पर्यटनाचा खरा अर्थ माहीत आहे का? आपल्याकडे फोफावत असलेले पर्यटनाचे धंदे सूट-बूट घालून समाजाची दिशाभूल करत आहेत का? सामान्य भारतीय पर्यटकाच्या अशा दयनीय अवस्थेस टूर कंपन्या जबाबदार आहेत, का आपली अनास्था? देशात इतकी चांगली ठिकाणे असताना पट्टायाला किंवा बँकॉकला जाणे किती योग्य? आपल्या पासपोर्टवर परदेश प्रवासाच्या शिक्क्याचा अट्टहास किती योग्य आहे? आपण परदेशी जाऊन भारताच्या विराट संस्कृतीचे अशा रीतीने ‘दर्शन’ घडवणे/ लक्तरे काढणे थांबवू शकतो का? प्रवासाने माणसाच्या विचारांच्या कक्षा रुंदावतात, दृष्टी समृद्ध होते, अवघड प्रसंगांना सामोरे जाण्याची सवय होते. पण अशा ‘पर्यटना’तून हे सारे साध्य होईल, असे वाटत नाही.

पण हे सगळे प्रश्न मलाच पडत असल्यामुळे, यातून उलगडलेली उत्तरे मी महत्त्वाची समजतो. या टूरमधून मला माझ्या आवडी चांगल्यारीत्या कळल्या. अशा पर्यटन कंपनीने काढलेल्या ट्रीपमध्ये मी रमत नाही आणि यापुढे अशा ट्रीपला जाणार नाही आणि म्हणूनच ट्रीपवरून आल्या आल्या काऊचसर्फिग या खऱ्या अर्थाने प्रवास जगणाऱ्यांकरता तयार केलेल्या संकेतस्थळावर मी खाते उघडले.
आशीष आगाशे – response.lokprabha@expressindia.com