03 August 2020

News Flash

पाण्याखालचं जग अनुभवताना…

ट्रेनिंगनंतर स्कुबा डायव्हिंगचा प्लान ठरला होता.

पाण्यात हलकी होऊन मी उडत होते. डोळ्यात किती आणि काय काय साठवावं ते समजत नव्हतं. शांत पाण्याचा उबदार स्पर्श. हाच का तो ज्याच्या लाटा आपल्याला घाबरवत असतात? वरून रुद्रावतार असलेला हा समुद्र खोलवर किती शांत!

‘दिनांक १६ आणि १७ जानेवारी या दोन तारखा तुम्ही राखून ठेवा’ असं ऑफिसमधून डिसेंबरच्या पहिल्या आठवडय़ात सांगण्यात आलं आणि नंतर एक आठवडा आधी सहलीचा अजेंडा आला. त्यामध्ये ट्रेनिंगनंतर स्कुबा डायव्हिंगचा प्लान ठरला होता. एका नामांकित संस्थेतर्फे आमची राहण्याची सोय केली होती. तिथे पोहचल्यावर प्रथम स्वीिमग पूलध्ये ट्रेिनग आणि नंतर रात्री कॉकटेल डिनर. दुसऱ्या दिवशी सकाळी १७ तारखेला स्कुबा डायव्हिंग आणि नंतर परतीचा प्रवास. एकंदर कार्यक्रम पाहता वाटलं की दोन दिवसांतला अर्धाअधिक वेळ प्रवासातच जाणार, मग काय मज्जा? याआधी कधीच स्कुबा डायव्हिंग या शब्दाव्यतिरिक्त याबाबतीत काहीच माहीत नव्हतं. माझ्या सहकारी मित्रांनी थोडीफार माहिती सांगितली त्यावरून असं लक्षात आलं की समुद्राच्या आत जायचं असतं. छातीत धडकीच भरली! समुद्राच्या आत? डोळ्यांसमोर त्या फेसाळणाऱ्या लाटा आणि हात वर करून गटांगळ्या खाणारी मी असे चित्र उभे राहिलं. एकदा वाटलं जाऊच नये. जाऊन उगाच शोभा नको. नाही जमलं तर सगळे काय म्हणतील? नंतर विचार केला, ते आधी ट्रेिनग देणार आहेत ना? जाऊ तर खरं. नाहीच जमलं तर सुमुद्रकिनारा, आजूबाजूच्या परिसराचा आस्वाद घेऊ. दोन दिवस इथल्या धकाधकीतून तरी बाहेर पडू. प्रथम सहलीचं टेन्शन आलं होतं.

45-lp-under-waterशेवटी एकदाचं निघालो. भारतीय रेल्वेच्या नियमानुसार एक तास कुडाळला उशिराच पोहोचली. आम्ही तारकर्लीला बसने निघालो. साधारणपणे तासभर वेळ लागणार होता. कोकण म्हणजे लालमातीचे नागमोडी रस्ते आणि आजूबाजूला हिरवीगार झाडी. हे मनातलं चित्र पार पुसून गेलं!  नाही म्हणायला शहरीकरणाचं वारं चांगलंच लागलं होतं. आजूबाजूला सिमेंटची घरे, हिरवीगार झाडी व काळेभोर नागमोडी डांबरी रस्ते. या नागमोडी वळणांवरून बसचालक अत्यंत शिताफीने बस घेऊन जात होता. बसमधून बाहेर पाहिलं तर सर्वत्र उंच माडांच्या रांगा, पोफळीच्या बागा आणि खोल दऱ्या!  हिरव्या रंगाच्या अनेक छटा मनाला मोहवीत होत्या. नववधूच्या हिरवाकंच चुडय़ासारखा! शिशिरऋतूच्या आगमनाने पिवळसर रंगाची छटा पसरलेली दिसत होती. मधूनच पोपटी रंगाची धावपळ दिसत होती. एक मात्र खरं डोळ्यांत मावत नव्हता इतका लांब तो हिरवा पट्टा होता. हवेत खूप थंडी नव्हती, पण उकडतही नव्हतं. होता फक्त हवाहवासा वाटणारा उबदारपणा! इतक्यात तारकर्लीची पाटी दिसली. पर्यटकांना आकर्षति करणाऱ्या हॉटेल्सची रांगच रांग होती. मधूनच एखादं नारळाच्या झावळ्यांनी शाकारलेलं कौलारू घर दिसत होतं. आत कुठेतरी जाणवत होतं की कोकण बदलतंय. शहरीकरणाच्या विळख्यात अडकत चाललंय. पण निसर्ग तोच!  तेवढय़ात आम्ही पोहोचलोच. समुद्राच्या किनाऱ्यावर उभी असलेली ती वास्तू. उतरताच फेसाळणाऱ्या समुद्राच्या लाटांचा तो लयबद्ध आवाज कानी पडला आणि आमचा प्रवासाचा शीण कुठल्या कुठे पळून गेला. आम्ही फ्रेश होऊन बसतोय तोच आमच्या सेवेला थंडगार कोकम सरबत आलं. प्यायल्यावर कळलं, उगाच नाही त्याला अमृत म्हणत. पृथ्वीवरचा स्वर्गच जणू! त्यानंतर लाल माठाची भाजी, पोळ्या, पातळ खिचडी आणि सोलकढी. व्वा! काय जेवणाचा बेत होता! सोलकढीची चव जिभेवर रेंगाळत राहावी म्हणून पाणी देखील प्यालं नाही.

तिथून आम्ही सगळे ट्रेिनग हॉलला गेलो. आमची प्राथमिक माहिती एका फॉर्मवर भरून घेतली. कोणताही गंभीर आजार नसल्याचं लिहून घेतलं व नंतर आम्हाला स्कुबा डायव्हिंगची चित्रफीत दाखवली.  समुद्राच्या पोटात काय काय दडलंय? समुद्रात गेल्यावर काय करायचं? काय काळजी घ्यायची?  स्कुबा डायव्हिंग म्हणजे काय? एका वेगळ्या दुनियेची ओळख करून दिली. एक वेगळंच दडपण जाणवलं. आम्हाला ग्रुपमध्ये ट्रेिनग देण्याच ठरलं. पहिला ग्रुप आम्हा महिलांचा. आम्हाला स्वीिमग कॉस्च्युम दिला गेला. इतके तोकडे आणि अंगाला घट्ट बसणारे कपडे आयुष्यात प्रथमच घातले होते म्हणून सर्वासमोर यायची लाजही वाटत होती; पण बरोबरचे सहकारीही तसेच आहेत हे बघून लाजेने पळ काढला. आम्हा प्रत्येकाबरोबर एक एक ट्रेनर होता. पाण्याखाली उतरण्याआधी प्रत्येकाच्या कंबरेला वजन बांधलं गेलं. कुणाला चार किलो तर कुणाला सहा किलो. त्यावर ऑक्सिजन सिलेंडर असलेला गाझेट विथ एअर  प्रेशर रेग्युलेटर चढवला. पाण्यात उतरताच एक शिरशिरी आली. तोंडाने श्वास घेण्याकरता जो रेग्युलेटर दिला होता तो जबडय़ात घट्ट धरून ठेवायचा आणि तोंडाने हळूहळू श्वास घ्यायचा. पाण्यातलं दिसण्याकरता गॉगल दिला. त्याबरोबर नाक बंद झालं. फक्त तोंडानेच श्वास घेणं सुरू केलं. तोंडात दोन्ही जबडय़ात रेग्युलेटर घट्ट धरून ठेवायचा व मधूनच दाबून त्यातील पाणी बाहेर काढायचं. तेव्हा समजलं नाक, कान आणि तोंड हे एकमेकांना किती धरून असतात ते. सर्वप्रथम आम्हाला पाण्याखाली गुडघ्यावर बसायला सांगितलं. मला वाटलं मला बसताच येणार नाही. मी चक्क १५ मिनिटे बसले. पाण्याखाली आपण खूपच हलके होतो. पहिली परीक्षा पास! आता दुसरी. ती म्हणजे मी पाण्यात असताना तोंडातलं रेग्युलेटर निघाला व पाणी तोंडात गेलं तर काय करायचं? प्रात्यक्षिक करून दाखवायचं. पाण्याखाली जायचं रेग्युलेटर काढायचा. पाणी अपोआपच तोंडात जातं. मग डाव्या बाजूने मांडीपर्यंत झुकून बोिव्लग करत ते रेग्युलेटर खांद्यावर आणायचं आणि उजव्या हाताने ते तोंडात घालायाचे. हे करताना तोंडाने हळू हळू बुडबुडे सोडत जायचं, श्वास रोखायचा नाही. हे सर्व काही सेकंदात. एकदा पाणी गेलं तोंडात वाटलं सोडावं सगळं पण ट्रेनर काही केल्या सोडत नव्हता. तो बराच सांभाळून घेत होता. आता तिसरी परीक्षा. गॉगलमध्ये पाणी गेलं तर ते कसं काढायचं. त्याने मुद्दाम पाणी घातलं. दोन्ही डोळ्यांच्या भुवईवर अंगठय़ाने दाबून चेहरा वर करायचा व नाकाने पाणी बाहेर सोडायचं. दोन वेळा प्रयत्न केल्यावर तेही जमलं!  या तिन्ही परीक्षा पास झाल्याशिवाय समुद्रात जाता येणार नव्हतं. उत्साह वाढला होता. कुडकुडत तर होतंच. आता सगळ्या खुणा शिकवल्या. अंगठा वर केला की वर जायचं, खाली केला की खाली जायचं. बरं वाटत नाही हे सांगताना तळहात आडवा धरून हलवायचा, मानेवर आडवा हात फिरवला की हातघाईची परिस्थिती आहे आणि सुंदरचं चिन्ह म्हणजे ऑल इज वेल. तोंड बंद असणार म्हणून ही चिन्हांची भाषा! वेगळ्या जगाची वेगळीच भाषा! सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाण्यात गेल्यावर कानावर प्रचंड दाब येतो आणि डोकं दुखू लागतं. म्हणून हा दाब इक्वलाईज करायचा म्हणजे नाक दाबायचं, तोंड बंड ठेवायचं आणि कानातून हवा सोडायची हे दरदोन मिनिटांनी करायचं.

आता तयारी स्वीिमग पूलमध्ये २५ फूट खाली जायची. मला पालथं  घातलं. पायात बदकाचे पाय चढवले आणि प्रेशर वाढवलं मी दोरीला पकडून हळूहळू खाली जाऊ लागले. प्रत्येक दोन मिनिटांनी खूण करत मी ट्रेनरला इक्वलाईज करत होते आणि अचानक तोंडात पाणी गेलं. मी हातघाईची खूण केली आणि त्याने मला वर आणलं. मी खूप थकले होते. वाटलं नाही जमणार, आता नाही जमलं तर उद्या समुद्रात जाता येणार नाही. ट्रेनर म्हणाला मॅडम, इतकं केलंत हेही जमेल, मी आहे ना, चला! मी परत प्रयत्न करायचं ठरवलं आणि यावेळी तो यशस्वी झाला. पुलाच्या तळाशी मी पोहोचले! माझे फोटो काढले. व्हिडिओ शूटिंग केलं. पूर्ण स्वीिमग पुलाला दोन राऊंड मारल्या आणि वर आले. पुलाजवळ माझे सहकारी उभे होते माझं स्वागत करायला. मी पहिली होते जी पुलाच्या तळाशी स्पर्श करून आलेले! मी भरून पावले. उद्या समुद्रात जाण्याचा मार्ग सुकर झाला! येस्स, आय डिड इट! त्या आनंदातच रूमवर आले. कपडे बदलून खाली आले. अंधार झाला होता. गरम गरम कॉफीचा घोट घेत शांतपणे समुद्राकडे पाहात बसले. त्या फेसाळणाऱ्या लाटा जमिनीला स्पर्श होताच तान्हं बाळ आईच्या कुशीत शिरल्यासारख्या शांत होत होत्या. या समुद्राच्या पोटात उद्या मी जाणार, मी त्यांना सांगत होते थांबा आता येतेच आणि पाहते काय काय दडवून ठेवलंय पोटात ते!

रात्री पार्टीनंतर रूमवर जाऊन झोपले. पहाटे कधीतरी जाग आली. मी समुद्रात गेले आणि माझ्या नाका-तोंडात पाणी गेलं आणि मी किंचाळत वर आले! बापरे! मी स्वत:लाच समजावलं. मनातली भीती स्वप्नात दिसली! मुलीनं दिलेला ‘यू कॅन डू इट. यू कॅन डू इट. अ‍ॅण्ड येस यू कॅन डू इट.’ हा मंत्र म्हणत झोपले. सकाळी सहा वाजता तयार होऊन खाली गेले. समुद्रकिनाऱ्यावर फेरफटका मारू लागले. किनाऱ्यावरील वाळूच्या मऊशार स्पर्शाने अंग मोहरून गेलं.

हळूहळू पाण्यात चालत राहिले. लाटांचा तो स्पर्श रोमांचित करत होता. शांत, धीरगंभीर सागराकडे एकटक मी पाहात होते. वरून शांत दिसणारा समुद्र खोलवरही असाच असेल का? देईल ना मला त्याच्या पोटात शिरायला? एवढय़ात वरून हाक आली. युद्धावर निघाल्यासारखी आमची लेडीज स्पेशल बॅच निघाली. आम्हाला हॉटेलवरून एका बोटीतून नेणार होते. समुद्रात एका लाकडी बोटीवर आम्हाला सोडणार होते व तिथून आम्ही समुद्रात खाली जाणार होतो. तो क्षण जवळ येत होता तशी हुरहूर वाढली होती. आम्ही बोटीत चढलो. बोट प्रथम करली नदीतून जात होती. नंतर ती जिथे अरबी समुदा्रला मिळते तिथे संगमावर एका क्षणासाठी बोट हळू झाली. पाठी वळून पाहिलं तर नदीचा तो शांत प्रवाह आणि एका बाजूला खवळलेला समुद्र! ती सागरात इतकी मिसळून जाते की तिची ती राहतच नाही. इतकं सोपं असतं का एकमेकांत मिसळणं? हा तर नदीचा सागरावरचा विश्वास म्हणूनच ती स्वत:ला अशी झोकून देते!

समुद्राच्या लाटांवर हेलकावे खात आम्ही आमच्या इष्ट स्थानी पोहचलो. आधीच एक बॅच अनुभव घेऊन तयार होती. त्यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह, आनंद पाहून मानवारचं ओझ उतरलं. स्वीिमगपूलपेक्षा सोपं आहे असं म्हटल्यावर तर अजूनही हलकं वाटलं. सगळे ट्रेनर आमची पाण्यात वाट पाहत होतं. प्रत्येक सहकाऱ्याबरोबर एक ट्रेनर असणार होता. परत कंबरेला सहा किलोचं वजन बांधलं. गाझेट चढवलं. बूट घातले व बदकाचे पाय लावले. मी सर्वप्रथम जावं असं ठरलं; जेणेकरून बाकीच्या महिला सहकाऱ्यांना स्फुरण मिळेल. शेवटच्या क्षणी सांगितलं बोटीच्या कडेवर बसायचं. डावा हात तोंडावरच्या मास्कवर धरायचा आणि उजवा हात पोटावर ठेवून पाठीवर स्वत:ला झोकून द्यायचं. बापरे! जमणार का? मन म्हणालं जमणार! नदी नाही का मिळाली समुद्राला? तिचा तो विश्वास! तोच विश्वास मनात ठेव. ट्रेनर आहे तो तुला काही होऊ देणार नाही. मी उडी मारली. ट्रेनर होताच. मी त्याचा पंजा घट्ट पकडला. मी ठीक आहे अशी खूण केली. त्याने मला पालथं घातलं. प्रेशर रेग्युलेट केलं. जबडा उघडायचा नाही. तोंडाने श्वास चालू ठेवायचा हे मनाने पक्कं ठरवलं. तोपर्यंत एक वेगळीच दुनिया दिसू लागली. पाण्यात हलकी होऊन मी उडत होतं. डोळ्यात किती आणि काय काय साठवावं ते समजत नव्हतं. शांत पाण्याचा उबदार स्पर्श. हाच का तो ज्याच्या लाटा आपल्याला घाबरवत असतात? वरून रुद्रावतार असलेला हा समुद्र खोलवर किती शांत!  पिवळ्या, करडय़ा, निळ्या रंगांचे विविध आकारांचे मासे माझ्या आजूबाजूने फिरत होते. आपल्याच नादात! आपल्याच लयीत!  मी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला, पण हातात आलेच नाहीत. एवढय़ात एक मोठा मासा सोनेरी खवलं असलेला आणि गुलाबी रंगाचं तोंड असलेला सुळकन् बाजूने गेला! त्याची लगबग पाहून मजाच वाटली. जसजसे खाली जात होत तसतसे पाण्याचा रंग बदलत होता. हिरवं, निळंशार पाणी! स्वच्छ!  पिवळे, चॉकलेटी कोरल्स! अवाढव्य! मोठाले िशपले!  एरवी समुद्रकिनाऱ्यावर असतात तसे नाही तर त्याहुनी मोठाले!  त्या शिंपल्यातले ते हळूहळू हलणारे जीव! किती पाहू आणि किती नको? वेगळ्या वेगळ्या आकारांची समुद्र फुलं, गोलाकार पानांच्या वनस्पती! पिवळे, हिरवे, शेवाळे! अलगत एका स्टारफिशला हात लावला. मी किती फूट खाली आले ते माहीत नव्हतं, पण पाण्याखालचं जग इतकं सुंदर, नितळ असेल अशी कल्पनाच नव्हती. जिथे पाहावं तिथे माशांची झुंबड. अगदी छोटय़ा माशांपासून ते मोठय़ा माशांपर्यंत अगदी लायनीत. कुणी कुणाला धक्का देत नव्हतं की कुणी अडखळत नव्हतं. ट्राफिक जॅम नाही! कुठून आली असेल त्यांच्यात इतकी शिस्त? जी आजही शिकून आपल्यात नाही! आपल्याला पाहायला जमिनीवरचा प्राणी आलाय याची साधी दखलही घेत नव्हते.

किती छान होतं ते विश्व! धन्य तो निसर्ग! सगळं डोळ्यात साठवत कधी वर आलो ते समजलंही नाही. एका वेगळ्या जगाची सफर करून आल्यासारखं. येस्स. आय डिड इट.  पाण्यातून वर आल्यावरही पाण्यातच असल्याचा भास होता.
डॉ. मनीषा फडके – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 24, 2016 1:03 am

Web Title: underwater world experience
Next Stories
1 द्वारशिल्प
2 एकमेवाद्वितीय फ्लॉरिडा गार्डन
3 स्वित्झर्लंडची सफर
Just Now!
X