25 October 2020

News Flash

सफर हिरवाईची…

माथ्यावरच्या तांबूस मातीत उमलणारा नवनिर्मिताचा हुंकार कोंबाकोंबातून ऐकू येत होता.

ढगात हरवलेला सह्य़ाद्री, डोंगरमाथ्यांवरून ओघळणारे अनंत लहान-मोठे जलप्रवाह, झाडांवरून टपटपणारे असंख्य थेंब मनातल्या संवेदनशील भावना तरारून उठवत होतं. माथ्यावरच्या तांबूस मातीत उमलणारा नवनिर्मिताचा हुंकार कोंबाकोंबातून ऐकू येत होता.
ऐन मध्यरात्री नाशिकची वेस ओलांडून कल्याण-मुंबई हायवेने सुटलो. सुरुवातीचा गाडीतला कलकलाट हळूहळू शांत होत गेला. पनवेल-पेणपर्यंत पोहोचेपर्यंत पेंगणारे चेहरे निद्रेच्या हवाली झाले. पुढे कुठे तरी ड्रायव्हरला सुस्ती आली तेव्हा एका धाब्यावर अर्धा तास डुलकी काढून आम्ही भल्या सकाळी साडेआठच्या सुमारास महाड गाठलं. महाडचा सह्य़मित्र राजेश बुटाला आमची वाट बघतच होता. त्याला बरोबर घेत नऊला पोलादपूरकडे निघालो. तासाभराच्या प्रवासानंतर भरणे गावात चहा/ नाश्ता हाणला. तिथून डावीकडे वडगावकडे टर्न मारला नि एकेरी पण वळणावळणाचा रस्ता सुरू झाला. येथूनच खऱ्या अर्थाने सृष्टिसौंदर्याला सुरुवात झाली. तशी पावसाने या वर्षी अनपेक्षित दडी मारली नि आसमंतात उदासी पसरली. पण या कोकणच्या परिसरात तुरळक का असेना पावसाची झिमझिम सुरू असेल, त्यामुळेच हिरवाईचा बहर चौफेर फुललेला. गाडीचा वेग वळणांमुळे हळू झालेला. रमणीय निसर्ग न्याहाळताना डोळे सुखावत होते. डावीकडे दूरवर एकाच डोंगरधारेवर उभे ठाकलेले कोकणचे राखणदार रसाळ-सुमार व महिपतगड हिरवाईची चादर लपेटून मोठय़ा दिमाखात उभे होते. वर्षांरंभी या त्रिकुटाची मोहीम फत्ते केलेली. त्या वेळच्या आठवणी जाग्या झाल्या. त्याच वेळी महिपतगडाच्या तटावरून या परिसराचं कुतूहल मनात घर करून राहिलं होतं. आज त्याच भागात मन रमत चाललेल. आता जगबुडी नदीची सोबत सुरू झालेली.
वडगावला पोहोचायला सव्वाअकरा झाले. प्लॅनिंगप्रमाणे तीन तास उशिराने नियोजन चाललेलं. पावणेबाराला वडगावचा निरोप घेतला. गाडी वडगावहून कुडपणकडे पाठवून दिली. गरजेच्या वस्तू बरोबर घेतल्या, बाकीच्या गाडीतचं ठेवल्या. पायीच कुडपणची वाट धरली. वडगाव ते कुडपण हा साधारण पाच तासांचा ट्रेक. त्यामुळे सुरुवातीलाच टॉप गिअरमध्ये चाल सुरू झाली. परिसर तर सुखावणारा. भातखाचरांची हिरवाई तरारून उठलेली. शेतांच्या बांधावरून तर कुठे तुरळक जंगलातून मळलेली वाट. जगबुडी ही भयंकर नावाची नदी जशी सोबतीला आली तशी चाल हळुवार झाली. सृष्टिसौंदर्याने कात टाकायला सुरुवात केली. सर्वाचेच कॅमेरे सॅकमधून कधीच बाहेर आले होते. (त्यात मोबाइल कॅमेराही आलाच.. त्यामुळे सेल्फीचा धूमधडाका सुरू झाला.) अप्रतिम हिरव्या लॅण्डस्केपचाही. डावीकडे अप्रतिम डोंगररांग नि पायथ्याशी हिरव्या झाडांची गर्दी. जगबुडी नदीच्या काठावरून वाट चाललेली. तिचं ते झुळझुळणं मनाला मोहरून टाकणार होतं. एका ठिकाणी तिला क्रॉस करावं लागलं.
शेतजमिनी मागे पडल्या. नदीच्या तीरावरून जंगलवाट सुरू झाली. समोर दिसणारा डोंगर चढायचा, मग कुडपणची दिशा स्पष्ट होईल, याचा अंदाज आला. आता मात्र हवेची झुळूकही महाग झालेली. कोकणातला दमटपणा जाणवू लागला नि पोटात कावळ्यांची ओरड सुरू झाली. पण जेवणासाठी मनाजोगी जागा काही मिळेना. जो-तो आपल्या पद्धतीने जागा शोधू लागला. जगबुडीचं मोठं पात्रही मागेचं संपलं. शेवटी ज्या स्रोतातून जगबुडी नदी पुढे वाहत जाते, त्याच घळीत जेवणावळ बसली. अस्ताव्यस्त दगडांवर सर्व भिडू स्थानापन्न झाले नि खळाळणाऱ्या प्रवाहात मी पाय सोडून लंच सुरू केलं. वा! क्या बात है..! इतक्या वर्षांतल्या भटकंतीत पहिल्यांदाच असा अनोखा योग जुळून आलेला. भारीच वाटत होतं राव! एकमेकांचा डबा शेअर करत नि गप्पा मारत निवांत जेवणावळ चाललेली. वरून झाडांची नैसर्गिक महिरप सजलेली. कुठेशी पक्ष्याची शीळ कानात कुजबुजणारी.
जेवणं आटोपली. पंधरा मिनिटांची वामकुक्षी जाहीर झाली. तिथंच जागेवर लुडकलो. कानात फक्त ते खळखळणं गुंजू लागलं नि निद्रा स्थिरावली. एका डुलकीनं ताजेतवाने झालो नि पुन्हा घळी मार्गाने निघालो. आता मात्र अगदी छातीवर येणारी चढाई सुरू झाली. याअगोदर तीन ते साडेतीन तास तशी साधारण चाल होती. पावलं हळू पण दमदारपणाने पडू लागली. तसा जेवणामुळे जरा जडपणा आलेला. तरी हळूहळू वेग वाढू लागला. दाट जंगल. हवा नाही. जमिनीला सूर्यकिरणंही महाग झालेली. झाडांचा इतका दाटपणा जमलेला. कुठे ओपन टू स्काय व्हायचं तेव्हा कळायचं आपण किती उंचावर आलोत. अन्यथा फक्त खाली बघून हळुवार पाऊल टाकत राहायचं. एखाद्या ठिकाणी थंड हवा सुख द्यायची. तासाभराच्या खडय़ा चढाईनंतर माथ्यावरच्या एका टप्प्यावर आलो नि सर्वानाचं हायसं वाटलं. गार वारा सुखावू लागला नि चौफेरचं विहंगमही.
पुढच्या टप्प्यावर पोहोचताच दूरवर उत्तर-पूर्वेला भीमाची काठी नि हजार फुटी धबधबा बघताच आनंदाने सीमा गाठली. अवाढव्य अशा त्या डोंगरकडय़ाला गावकऱ्यांनी ‘भीमाची काठी’ असं साजेसं नाव दिलेलं. तिसऱ्या प्रहरेचा बिगूल वाजला नि सूर्याजीराव पश्चिमेकडे कलंडू लागले. त्यांची तेजाची धार मात्र कमी होऊ लागली नि फोटोग्राफीसाठीचा हवा तो गोल्डन लाइट प्रकाशमान होऊ लागला. हिरवाईचा गालिचा नि आसमंतात निळाई सोस. मोठं कलात्मक दृश्य सजू लागलं. नि ते टिपण्यासाठी कॅमेरा अधीर होऊ लागला. मनसोक्त छायाचित्रांचा ढीग जमू लागला नि पावलं हळुवार पुढे निघाली. आता जीवघेणी चढाई संपलेली. वडगाव सोडून जवळपास साडेचार तास होत आलेले.
एका उतारावरून खाली येत जगबुडीचा प्रवाह आडवा आला. काठाने तटावर आलो नि आश्चर्याचं अद्भुत दृश्य समोर उभं ठाकलेलं. हजारेक फूट खोल दरीत समोरच्या कडय़ावरून, भीमाच्या काठीच्या साक्षीने धबधब्याने स्वत:ला बिनधास्तपणाने झोकून दिलं होतं. सांधन दरीची क्षणात आठवण झाली. आम्ही उभे होतो तेथून हजार एक फूट उंचीवरून खळखळत कोसळणाऱ्या फेसाळत्या पाण्याचा प्रवाह मोठय़ा हिमतीने खाली ‘जायन्टस्विंग’सारखा झोकून देत होता. तो खळखळाट आणि ते धबधबणं मोठं कुतूहलाचं, थरार निर्माण करणारं होतं. दोन हजार फुटी प्रपात समोरासमोर कोसळत होते, जणू एकमेकांना आव्हान देत. व्हॅली क्रॉसिंगसाठी याहून सुंदर थरारक जागा ती कोणती?
मावळतीच्या तांबूस रंगछटा मोठय़ा खुबीने त्या झुळुझुळु प्रवाहात मिसळत होत्या. मोठे धुंद करणारे ते क्षण, ती वेळ, ते अलौकिक निसर्गदृश्य! किती म्हणून साठवावं. कॅमेऱ्यात टिपावं. काही सीमाच नाही. निसर्गाचं बेभान रूप पाहायला स्थलकाल यावं लागतं हेच खरं..! तिन्हीसांजेची वर्दी आली नि जड पावलं तेथून निघाली. पण हे निघणंचं मोठं कठीण होतं. वेळेचं भानं राखत त्या नैसर्गिक बहुरूपी मायाजालामधून आम्ही बाहेर आलो. काही वेळातचं चक्क सडक लागली नि कुडपण आलंच असं जाणवू लागलं. अध्र्या तासात टार रोडने चालत कुडपण गाठलं. आमची गाडी ठरल्याप्रमाणे वडगावहून येथे येऊन पोहोचलेली. उंबरठय़ावरच एका घरात राजेशनी आपला डेरा टाकलेला. याआधीही तो बऱ्याच वेळा येऊन गेल्यामुळे त्या हक्काच्या घरी राहणं, जेवणं, चहा-नाश्त्याची विनासायास सोय झालेली.
तसं वाटाडय़ा संतोषचं घर त्यामुळे घरासारखाचं मोकळेपणा होता. चहा घेऊन सर्वच अंघोळीला पळाले. कैवल्याच्या प्रकाशात ते डुबणं नि अंघोळीचं सुख कुठल्या शब्दात वर्णावं? सर्वानी मनसोक्त अंघोळीचा आनंद लुटला. थकवा जाऊन पुन्हा सर्व ताजेतवाने झाले. परतीला अंधार झालेला. जेवणाला वेळ आहे, तोपर्यंत मंदिरात भटकून येऊ म्हणून आम्ही सारेच तिकडे निघालो.. स्पीकर्सवर मोठय़ा कर्कश आवाजात भजनाची कॅसेट लावलेली. तेथून हाकेच्या अंतरावरील मंदिर मात्र स्वच्छ नि टापटीप.. तीन काळ्याशार काळभैरव व इतर मूर्ती. सारं वातावरण मुग्ध करणारं. काही वेळ मंदिरातचं निवांत बसलो. थोडा गप्पांचा फड रंगेपर्यंत रात्रीचं जेवण तयार झाल्याचा राजेशचा बुलावा आला. तांदळाची भाकरी, भाजी, पापड, लोणचं, आमटी-भात. झक्कास गरमागरम मेनू. लज्जतदार जेवून तृप्त झालो. थोडी शतपावली केली. थोडय़ा चढावरच्या टप्प्यावर जाऊन रेंज शोधत काहींनी मोबाइलवरून घरी खुशाली कळवली. घरी पोहोचलो, पथाऱ्या पसरल्या, अगदी नऊच्या सुमारासच, काही कळायच्या आत सर्व गुडूप झाले..
रामप्रहरी मंदिरातला भला मोठा स्पीकर कुणाच्या तरी आवाजातलं भजन ओरडू लागला नि सुखाची झोप अनुभवणाऱ्या मनाला जाग आली. खूपच अयोग्य प्रथा वाटली ही. इतक्या मोठय़ा आवाजाने पक्षी, प्राणी कसे वास्तव्य करणार? इतर जीवसृष्टीवर त्याचा अप्रत्यक्ष वाईट परिणाम होत असणार. पण सांगणार कोण..? आम्ही सांगू शकतो का? तर नाही. आम्ही तर याहूनही दोषी आहोत. डीजे, ढोल, कर्कश हॉर्न वाजवून मजा लुटणारे आम्ही. असो.. स्वाहा म्हणत गुमान सकाळचे सोपस्कार आवरले. पावसाळी वातावरण, पण बरसायचं नाव नाही. गरमागरम चहा-पोहे हाणले. वाटाडय़ा संतोषची बिदागी देऊन बरोबर साडेसातच्या कुडपणचा निरोप घेतला. ड्रायव्हरला गाडी घेऊन प्रतापगडाकडे यायला सांगितलं. कुडपणला मागे टाकत थेट चढाईला भिडलो.
पहिला टप्पा गाठेपर्यंत आभाळ फाडून सूर्याजीराव ऐटीत प्रकाशमान झालेले. कोवळ्या किरणांनी सारा आसमंत उत्तेजित झालेला. प्रसन्नतेचं शिंपण पायघडय़ांवर लोळण घेत होतं. लुसलुशीत हिरव्या तृणांचा गालिचा नि त्यावर निश्चिंत पहुडलेलं कोवळसं ऊन. मंतरलेला आसमंत बेभान करणारा. पावसाळ्यातला हिरवा रंगच वेड लावणारा असतो. दवाचं शिंपण ल्यालेला तो मखमली हिरवा गालिचा. ती हिरवाईनं सजलेली वसुंधरा एखाद्या नववधूसारखी उजळून निघाली होती. वर वर पावलं पुढे पडू लागली तशी हिमालयातल्या आठवणींनी गर्दी केली. भारतातलं सर्वोच्च शिखर कांचनजुंगाचा बेसकॅम्प ट्रेक दोन वर्षांपूर्वीच केलेला. तिथल्या चढाईचा मेळ येथे अगदी जुळणारा.
सर्वच भिडू फोटोग्राफीत दंग होत चाललेले. तरी हळुवार चढाई करत. दूरवर ढगात हरवलेला सह्य़ाद्री, दऱ्याखोऱ्यांत डोंगरमाथ्यांवरून ओघळणारे अनंत लहान-मोठे जलप्रवाह, झाडांच्या पानांवरून टपटपणारे असंख्य थेंब मनातल्या संवेदनशील भावना तरारून उठवत होतं. माथ्यावरच्या तांबूस मातीत उमलणारा नवनिर्मिताचा हुंकार कोंबाकोंबातून ऐकू येत होता. चाल धिमी झालेली. हा सर्व मामला बघून राजेश बुटाला म्हणाला, अरे अशानं आपल्याला प्रतापगडावर पोहोचायला संध्याकाळ होईल. तरी भिडू आपले सुरूचं. चढाई मात्र दमछाक करणारी. तासाभरानंतर मोठय़ा उंचीवर येऊन ठेपलो नि पाऊसभरल्या ढगांनी रविराजाचं अनभिषिक्त साम्राज्य झाकोळून टाकलं. धुक्यानं वातावरणावर कमांड घेतली नि ते स्वच्छंद विहार करू लागले. अप्रतिम नजारा साकारू लागला. गारव्यामुळे हायसं वाटलं. आल्हाददायक वातावरणाने कात टाकली नि सर्व सहकारी ट्रेकचा नि फोटोग्राफीचाही मनमुराद आनंद घेऊ लागले. हिरवा डोंगरउतार. फेसाळत वाहणारं पाणी, ढगांतून झिरपत येणारा सूर्यप्रकाश, हिरव्या हजारो रंगछटांचा तो आविष्कार. सारा निसर्ग जणू बेभान झालेला. त्यात आम्हीही. राजेशने आता शिट्टी वाजवायला सुरुवात केली. मग पावलांनी वेग वाढवला. कुठे सरळ चाल. कुठे लहान टेकडीला वळसा, तर कुठे झाडांतून वळणावळणांची सुटलेली वाट. प्रतापगडाकडे जाणारी..! कुठे जीर्ण टुमदार घरं दिसली. काही फक्त गुरं-ढोरांच्या चारा-पाण्यासाठी, तर काही शेतीची निगा राखण्यासाठी, राहण्यासाठी तात्पुरती सीझनेबल.
एका लहानशा खिंडीतून एक वाट उजवीकडे ऐतिहासिक पार घाटाकडे उतरणारी. थोडय़ाच वेळात आम्ही सातारा जिल्ह्य़ाच्या सीमारेषेत घुसलो. म्हणजेच जावळीच्या खोऱ्यात. याआधी रायगड जिल्ह्याच्या सहवासात होतो. या ट्रेकची सुरुवात रत्नागिरी जिल्ह्य़ातनं झालेली. म्हणजे शासकीय अंगाने आम्हाला तीन ऐतिहासिक जिल्ह्य़ांचा सहवास लाभलेला. असा योग क्वचितच जुळून येतो. पण खरं सांगतो, आम्हा डोंगरभटक्यांना या जिल्ह्य़ांच्या सीमारेषांचं काहीही सोयरसुतक नसतं. आमच्यासाठी सह्य़ाद्री हा एकच.
धुंद करीत जाणारी धुक्याची दुलई तर कधी तिरकस सूर्यकिरणांची आगळीक, यामुळे प्रकाशाचा लपंडाव अजूनच खुलत चाललेला. विपिन, प्रशांत, डॉ. संतोष, दादा, पुण्याचे कुलकर्णी सर व मी असा सर्व डीएसएलआर कॅमेरेकरांचा गोतावळा जमलेला. तर इतरांकडे लहान कॅमेरे. त्यामुळे एकमेकांचे फोटो काढत ते दाखवत धमाल चाललेली. माथ्यावरील वाट बऱ्यापैकी सहज सोपी असल्यामुळे ट्रेकमधला बिनधास्तपणा जरा अजूनच बळावलेला. डावीकडे खाली प्रतापगडाकडे जाणारा गाडीमार्ग अन् आसपासचं घनगर्द जंगल इतिहासकालीन घटना समोर उभ्या करीत होतं. जावळीच्या खोऱ्याने शिवरायांना मोहीत करून टाकलं होतं. अफाट दऱ्याखोऱ्या, घनगर्द जंगल नि उत्तुंग माथे त्यामुळे शिवरायांच्या मनात इथे एक भक्कम किल्ला असावा अशी कल्पना तरळून गेली नि प्रतापगडाचा जन्म झाला. इथला भुलभूलैया जगातल्या कुठल्याही शत्रूला गोंधळून टाकणारा नि नामोहरम करणारा. त्याचमुळे प्रतापगड शेवटपर्यंत अजिंक्य राहिला. बलाढय़ अफजलखानाचा कोथळा काढण्याची अपार शक्ती याच जावळीच्या दऱ्याखोऱ्यांनी दिली असेल. सारा पट असा सरसर उलगडला की काही क्षण सारं विसरायला झालं. शिवरायांबरोबरच जीवा महाला, येसाजी कंक, बहिर्जी नाईक, शेलारमामा अशा निधडय़ा छातीच्या मर्द मराठय़ांचं स्मरण होत गेलं नि गलबलून आल्यासारखं झालं. काय निष्ठा होती स्वराज्याकामी! तोडचं नाही! आजही प्रतापगडावरील युद्धाचा विषय काढला तरी मुठी आपोआप आवळल्या जातात अन् विजयाचा उन्माद अंगात संचारतो.
दूरवर एका मंदिराचा कळस दिसला नि पावलं झपाटय़ाने निघाली. उजवीकडे पार घाटाचं खोरं नि तिथलं विहंगम फारचं भारी दिसत होतं. आकाशातून शुभ्र ढगांचा पुंजका त्या खोऱ्यात उतरताना दिसला नि मोठं कुतूहल दाटलं.. काय ही निसर्गकला! चित्रकाराच्या कुंचल्यांना सोनेरी वर्ख लाभावा नि अलौकिक कॅनव्हास सजावा.! इतकं ते डोळ्यांना सुखावत होतं. स्वच्छ टुमदार मंदिरात पोहोचलो. सुरेख अंगण नि मंदिरातला हॉलही. तीन कातळमूर्ती सुरेख धाटणीच्या. मंदिर तसं हवेशीर होतं. तिथंचं बसकन मारली.. खाऊच्या पिशव्या बाहेर आल्या. दोन घास पोटात गेले. थंडगार पाणी पिण्यासाठी, तेही पुरेसं होतं. सर्व तसे रिलॅक्स मूडमध्ये. आल्हाददायक वातावरणाचा हा परिणाम. चार तास चालूनही सर्वच तेजतर्रार. अजून तासाभरात प्रतापगडी पोहोचणार.. स्वच्छ प्रकाश पसरलेला.. प्रसन्नचित्ताने पुढच्या वाटेल लागलो. सुंदर मंदिराने मन खरोखर प्रसन्न झालेलं.. या सह्य़ाद्रीच्या कुठल्याही दुर्गम आडवाटेवर मंदिरं हीच वाटसरूंची विश्रांतीची नि मुक्कामाची खास ठिकाणं.. अगदी प्राचीन काळापासून.. हल्ली त्याला जरा शहरी बाज चढू लागल्याचं लक्षात येतं.
शेवटचा टप्पा मात्र एकेरी वाटेचा नि जंगलासोबतचा. आता ऊन डोक्यावर आलेलं, तरी उंच झाडांमुळे सावलीचं छत्र मोठं सुखावणारं होतं. जावळीचं खोरं आज इतकं, तर साडेतीनशे वर्षांपूर्वीचं काय घनदाट नि भयानक असेल याची कल्पना येऊ लागली. पुन्हा ती जावळी. पुन्हा शिवराय. पुन्हा ते मावळे. पुन्हा तो मग्रूर चंद्रराव मोरे आणि तो कपटी बलदंड अफजल..! तो युद्धपट, ती युद्धनीती. आजही जगात सर्वश्रेष्ठ मानली जाते. अभ्यासली जाते. शिवकाळातली तीन युद्धं किंवा युद्धकौशल्यं जगात आजही सर्वोत्तम आहेत. पन्हाळ्यावरून सुटका व युद्ध, साल्हेरचा रणसंग्राम, अन् अफजलचा खातमा व युद्ध. या तीनही यशात शिवरायांची व साथीदारांची रणनीती व युद्धकौशल्य बिनतोड होतं. पराक्रमाची सीमा गाठणारं अन् स्वराज्यावर अपार निष्ठा असणारं होतं. म्हणून ते आजही अंगावर शहारं आणत नि डोळ्यांत पाणी.
या ट्रेकचा शेवट प्रतापडगडी व्हावा यासारखं दुसरं सुख नाही, आनंद नाही. आमची गाडी पार्किंगच्या ठिकाणी येऊन थांबलेली. एक वाजला होता. जेवण करून परतीला निघायचं असा निर्णय झाला. संजय कदम या युवकाच्या स्वच्छ हॉटेलमध्ये जेवणं झाली. परतीला गाडीत बसताना शेवटी त्या बुरुजाकडे नजर गेलीच. त्यावर फडफडणारा भगवा बघून ऊर भरून आला नि गाडी पोलादपूरकडे निघाली.

पहिली सौंदर्यदृष्टी कोणी दिली आपल्याला?
कुठल्या नेमक्या क्षणी ती प्राप्त झाली?
असं काय पाहिलं आपण त्या क्षणी?
उगवता मावळता सूर्य.. की पूर्ण चंद्र?
आसमंतात विहार करणारा पक्ष्यांचा थवा की
पावसाच्या कोसळणाऱ्या सरी, की बेधुंद कोसळणारा प्रपात..
झाडावर फुलणारी वा उमलणारी एखादी कळी, रानफूल की,
फुलांनी बहरलेलं झाड..
मग असं काहीसं घडलं की थेट मनाला भिडत ते..!
पायथ्यापासून ट्रेकला सुरुवात झाली की
खरं तर असंच काहीसं घडत जात.
नजर सुखावत जाते, संवेदना तरारून जातात,
मनात कालवाकालव सुरू होते.
विचारांची मती गुंग होत जाते,
मनाचा कॅनव्हास कोरा होत जातो.
पुन्हा नव्याने रंग भरायला सुरुवात होते,
सर्व विसरायला होतं,
मग योगसाधना सुरू होते,
माथा गाठेपर्यंत प्राणायामचा पहिला धडा गिरवला जातो..
मन चिंब भिजत, सुखाचा शोध लागतो,
आयुष्य उजळून निघायला सुरुवात होते,
डोंगर-दऱ्या भटकत असताना
अशा किती तरी आनंद-पर्वणीच्या आठवणी
मनाच्या वॉर्डरोबमध्ये सुखाने पहुडल्या आहेत.
वेदनांच्या क्षणी त्याच तर धीर देतात..
येतात अशा बाहेर एकामागोमाग..
मन हलकं करतात.
ओला किनारा हळुवार पुसतात.
निसर्गाशी मैत्रीचे रेशमी बंध असे घट्ट बांधले गेलेत.
एक एक रेशमी धागा प्रत्येक भटकंतीगत ओवला गेलाय.
आता एक बंधच तयार झालाय..! चिरंजीवी..!
हवेची झुळूक जेव्हा अंगाला स्पर्शून जाते ना त्या तटावर,
तेव्हा सर्वाग काटय़ांनी बहरून उठते!
सजगपणाला जाग येते तेव्हा..
हिरव्या अंगणात जेव्हा एखादं फुललेलं अल्पजीवी रानफूल नजरबंद होतं..
तेव्हा खरंच कुतूहलाच्या सीमा पार झालेल्या असतात..
त्याला माहीत असतं, आपण मावळतीला कोमेजणार..
तरी ते हवेच्या झोकात डुलत राहतं आनंदाने..
केवढा मोठा संदेश देतंय ते रानफूल..
आनंदी आयुष्याचं मर्म सांगतं जणू..! वा क्या बात है..!
त्या गडकिल्ल्यांच्या चराचरात
इतिहासातली किती तरी गुपित दडलेली जाणवतात,
एखाद्या बुरुजाला टेकून उभे राहा..
वा तटाचा टेकू घेऊन पहुडा.. कानी कुजबुज ऐकू येईल..
मग गडकिल्ले का भटकायचं..?
हे एक कोडं मात्र सुटलेलं असेल..
मग.. जगण्यातली अशी किती तरी कोडी सुटत जातील..
संजय अमृतकर – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 2, 2015 1:05 am

Web Title: sahyadri trekking
Next Stories
1 फुललेला राजगड
2 सह्यद्रीच्या कुशीतली भटकंती
3 सह्य़ाद्रीचा पुष्पोत्सव
Just Now!
X