27 May 2020

News Flash

अजिंक्यतारा

सातारा शहरात शिरताच अजिंक्यतारा लक्ष वेधू लागतो. यापूर्वी पाहिलेल्या व्यक्तीला पुन्हा प्रेमाने आणि नवख्यांना ओढीने तो बोलावू लागतो. त्याच्या या प्रेमात अडकले, की इथे पुन्हा-पुन्हा

| April 16, 2015 07:52 am

सातारा शहरात शिरताच अजिंक्यतारा लक्ष वेधू लागतो. यापूर्वी पाहिलेल्या व्यक्तीला पुन्हा प्रेमाने आणि नवख्यांना ओढीने तो बोलावू लागतो. त्याच्या या प्रेमात अडकले, की इथे पुन्हा-पुन्हा यावेसे वाटते.

पुणे म्हटले की, सिंहगड, कोल्हापूर म्हटले, की पन्हाळा जसा आठवतो तसेच सातारा म्हटले, की त्यालाच खेटून असलेला अजिंक्यताराही डोळय़ांपुढे येतो. काही स्थळ-वास्तूंचे भोवतीच्या शहराबरोबर घट्ट नातेसंबंध तयार झालेले असतात त्यातलाच हा प्रकार! खरेच आहे हे, साताऱ्यात शिरलो की, सर्वात आधी त्याला खेटून उभा असलेल्या या अजिंक्यताऱ्यावरच लक्ष जाते. या शहराचा हा जणू पाठीराखा! सातारच्या राजगादीची ही राजधानी, छत्रपती भोसल्यांची कर्मभूमी!
समुद्रसपाटीपासून हजारएक मीटर उंचीवर हा गिरिदुर्ग! एका उंच डोंगरावर उभ्या कातळावर! याच्या डोंगरउतारालगत वन विभागाने चांगली झाडी जोपासली आहे. सकाळी-संध्याकाळी या झाडीतच मोर बागडताना दिसतात. या वनझाडीतूनच एक पक्की सडक गडाच्या महादरवाजात येते. तशा गावातूनही काही वाटा वर या महादरवाजात येऊन मिळतात.
पूर्व-पश्चिम असलेल्या या गडाच्या उत्तर अंगाला पश्चिमेकडे तोंड करून महादरवाजा! दुर्ग स्थापत्यातील हे एक कलात्मक रूप! उजव्या हाताला कातळ, तर डाव्या हाताला दरी, या मधल्या जागेत एका बुरुजाला सोबत घेत हा महादरवाजा उभा आहे. भक्कम बांधणी आणि डोक्यावरील त्या पाकळय़ांच्या (चर्या) रचनेने तो सजलेला! दरवाजाच्या माथ्यावर दोन्ही अंगास पायाखाली हत्ती घेऊन ते शरभ बसलेले. हा शरभ एक काल्पनिक पशू! त्यांच्या पायाखाली दाखवलेले हत्ती म्हणजे शक्तीचे प्रतीक! एकप्रकारे या शरभाकरवी आतमध्ये राहणारी सत्ता सांगते, की शक्ती-सामर्थ्यांला आम्ही अंकित केले आहे. तिच्यावर विजय मिळवला आहे.
मुख्य दरवाजास कमानींचे पाच पदर! यातील सर्वात वरच्या कमानीत मध्यभागी कीर्तिमुख, तर बाजूच्या अंगावर विष्णुदेवता गरुड आणि शक्तीदेवता हनुमान! याच कमानीवर दोन्ही बाजूस प्रत्येकी सहा अशी डझनभर कमळेही! सर्वात आतील कमानीवर मध्यभागी गणेशाला विराजमान केलेले. गडकोटांवरील ही शिल्पे खरेतर स्वतंत्र अभ्यासाचाच विषय!
रेखीव रचना आणि त्यावरील शिल्पांकनामुळे अजिंक्यताऱ्याचा हा दरवाजा खूपच सुंदर दिसतो. पण याहीपेक्षा एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे याचा आजही शाबूत असलेला लाकडी दरवाजा. या दरवाजाला एक छोटासा दिंडी दरवाजाही आहे. मान लवून या दिंडी दरवाजातून आत शिरताना जणू या मराठय़ांच्या गादीला मुजरा करायचा आणि गडात प्रवेशकर्ते व्हायचे.
दरवाजाची आतील बाजू पहाऱ्याच्या देवडय़ांनी सज्ज! सध्या तिथे कोणी नाही, पण या त्याच्या जोत्यावर काही शिल्पांची हालचाल जाणवते. ढाल-तलवार घेतलेला मावळा, युद्ध करणारे वीर (यांना कोणी वाली-सुग्रीव असेही म्हणतात.), स्त्री-पुरुषाची जोडी, कुणी खांद्यावरून कावड वाहणारा, कुणी गवताचा भारा वाहणारी-ताक घुसळणारी स्त्री, हातावर पोपट घेतलेली शुकसारिका, मोर-बदकांच्या जोडय़ा आणि अधे-मधे उमललेली अष्टदळी कमळे अशा अनेक शिल्पांनी ही सारी देवडी जिवंत केली आहे.
पहिल्या दरवाजानंतर लगेचच दुसरा दरवाजा. हा बहुधा पहिल्यापेक्षा जुना. यानंतर एक वळण घेत खऱ्या अर्थाने आपण गडावर दाखल होतो. समोरच्या भागातच सदरेची पडलेली इमारत, आता तिच्यावर ध्वजस्तंभ उभारला आहे. या परिसरात एक व्यायामशाळा, मारुती मंदिर आणि गडाच्या बांधकामावेळी तयार केलेली चुन्याची घाणीदेखील आहे. याच्यापुढे पश्चिमेकडे माचीसारखा गडाचा एक चिंचोळा भाग गेलेला आहे.
अजिंक्यताऱ्यावरची बहुसंख्य बांधकामे ही गडाच्या मध्यात आहे. उंची नसली तरी गडाचा हा बालेकिल्ला. आकाशवाणी, दूरदर्शन आणि पोलीस विभागांच्या मनोऱ्यामुळे हा भाग सुरुवातीपासूनच लक्ष वेधून घेत असतो. एक पक्की वाट या बालेकिल्ल्यात घेऊन येते.
एका पडक्या कमानीतूनच आत शिरलो की, या बालेकिल्ल्यातील राजवाडा दिसतो. चिरेबंदी, आज त्याचे छत जरी कोसळलेले असले तरी उर्वरित बांधकामावरून त्याचा बाज लक्षात येतो. या वाडय़ाशेजारीच महादेवाचे एक मंदिरही आहे. भोवतीने पुन्हा घरांचे अवशेष दिसतात. यामध्ये तेला-तुपाचे दोन रांजणही दडलेले आहेत. गडाच्या मध्यभागातील वास्तूंच्या गर्दीतून एक वाट पूर्वेकडे मंगळाईच्या बुरुजावर निघते. वाटेत जागोजागी चाफा, पळस, सावर अशी मोठाली झाडे दिसतात. वसंतऋतूचे बोट धरून आलो तर या साऱ्याच वृक्षांना बहराचा कैफ चढलेला असतो. तशी एरवीही ही वनसृष्टी आणि तिच्या आधाराने बागडणारे पक्षिगण हा अवशेषांचा भवताल जिवंत ठेवून असतात.
गडदेवता मंगळाईचे मंदिर पूर्वेकडील ऐन बुरुजाशेजारी. यापुढे पूर्व तटालगत दारूगोळय़ाचे एक कोठार आहे. याच्या अलीकडेच एक मोठा तलाव आणि विहीर आहे. हे सारे पाहात गडाच्या दक्षिण तटावर आलो, की गडात शिरणारा दुसरा प्रवेशमार्ग त्याच्या दोन दरवाजांसह दिसतो. पुढे निघावे तो लगेच आणखी एक तळे महादेवाच्या राऊळाची सोबत घेऊन पाण्याने भरलेले असते. साधारणपणे तासा-दोन तासांत आपण हा सारा भाग पाहात पुन्हा दरवाजात येतो. या साऱ्या प्रवासात गडाच्या मध्यभागी असलेला तो मनोरा मात्र आपल्यावर कायम लक्ष ठेवून असतो. इतिहासात अडकलेल्या मनाला तो पुन:पुन्हा वर्तमानात घेऊन येत असतो. पण इतिहासाचे हे भूत मानेवरून हटत नाही आणि मग अजिंक्यताऱ्याचा शोध सुरू होतो.
अजिंक्यताऱ्याचे मूळ नाव सातारा! गडाला असलेले हे नावच पुढे त्याच्या पायथ्याच्या वस्तीला मिळाले. पन्हाळय़ाचा शिलाहार राजा भोज दुसरा याने ११९०च्या सुमारास हा गड बांधला. पुढे मग मुस्लीम कालखंडात हा गड आदिलशाही, निजामशाही असे मालक बदलत राहिला. या काळात मुख्यत्वे गडाचा उपयोग राजकीय कैद्यांसाठीचा तुरुंग म्हणूनच झाला. ज्यामध्ये इसवी सन १५८०मध्ये अली आदिलशहाची बेगम चाँदबिबीही या गडावर काहीकाळ कैदेत होती.
पुढे छत्रपती शिवरायांच्या झंजावातात ७ जुलै १६७३ मध्ये हा गड स्वराज्यात आला. १ डिसेंबर १६७५ ते २५ जानेवारी १६७६ या दरम्यान स्वत: राजे विश्रांतीसाठी या गडावर मुक्कामी होते. त्यांच्या निधनानंतर औरंगजेबाची वावटळ या महाराष्ट्रात अवतरली. तिचे सावट या गडाभोवतीही वेढले गेले. त्यावेळी छत्रपती राजाराम महाराजांनी त्यांची राजधानी नुकतीच पन्हाळगडावरून अजिंक्यताऱ्यावर हलविली होती. ..सन १६९९ मधील डिसेंबरचा तो महिना. औरंगजेबाचे एकेक मातब्बर सरदार तरबियातखान, रहुल्लाखान, मुनिमखान, मीर आतिश, मन्सूरखान, खुदाबंदाखान आणि प्रत्यक्ष औरंगजेबाचा मुलगा शहजादे मुहम्मद आजम गडाला वेढा घालून बसले होते. खुद्द औरंगजेब करंज मुक्कामी राहून या सर्वावर देखरेख करत होता. ..तोफांचे मोर्चे लागले, दमदमे उभे राहिले, तोफा गरजू लागल्या! शत्रू अजिंक्यताऱ्याचा गळा आवळू पाहात होता आणि आतमधील मूठभर मावळे किल्लेदार प्रयागजी प्रभूंच्या नेतृत्वाखाली त्यांना रोखून होते. दगडगोटय़ांनी झुंजत होते.
औरंगजेबाचा एक सरदार १३ डिसेंबर १६९९ रोजी एका पत्रात कळवतो, ‘आमच्याकडे सैन्य आहे, तोफा आहेत, आमचे मोर्चे गडापर्यंत पोहोचू पाहात आहेत, पण किल्ल्यातून होणाऱ्या दगडांच्या वर्षांवापुढे आम्हाला पुढे सरकता येत नाही’
..रात्री-अपरात्री मराठे बाहेर येत आणि औरंगजेबाच्या वेढय़ात घुसून हल्ले करत, त्यांची रसद लांबवत. वेळ, दिवस जात होता तसे गडातील मूठभर मावळय़ांपेक्षा वेढा घालून बसलेली ही मुघल सेनाच जेरीस आली होती. काही दिवसांत गड मिळवू पाहणाऱ्या औरंगजेबाला काही महिने झाले तरी गडापर्यंत पोहोचणेही जमेना. शेवटी वैतागून त्याचा मुलगा शहजादा आजमने एक शक्कल लढविली. गडाच्या पोटात तटाखाली दोन सुरुंग पेरले. ते उडाले की तटाला खिंडार पडेल आणि मग पाठोपाठ तयार मुघल सेना गडात घुसेल! १३ एप्रिल १७०० हा तो दिवस उजाडला. खुद्द औरंगजेबही आपल्या मुलाचा हा पराक्रम पाहण्यासाठी गडाखाली वाजत-गाजत आला. दुसरीकडे मराठेही कुतूहलापोटी तटावर जमा झाले. इशारा झाला आणि पहिला स्फोट घडला. तटाची भिंत कोसळून अनेक मराठे त्यात अडकले, जखमी झाले. खुद्द किल्लेदार प्रयागजी प्रभूही यात होते. या स्फोटानंतर मुघलांची तयार सेना लगेचच पुढे सरकली, पण तेवढय़ात दुसऱ्या सुरुंगाचाही स्फोट झाला आणि त्यावेळी तटाबरोबर सारा कडाच खाली आला. तब्बल दोन हजार मुघल या दरडीखाली गाडले गेले. यातला एक दगड तर खुद्द औरंगजेबाजवळ येऊन पडला. होत्याचे नव्हते झाले. गड तर मिळाला नाहीच, पण स्वत:चेच हसे झाले. सातारा शहराच्या माची भागात पडलेला हा भलामोठा दगड आजही या घटनेची साक्ष देत उभा आहे. पुढे गडावरील सामग्री संपताच नेहमीप्रमाणे मराठय़ांनी हा गड सोडून दिला आणि मग तो आपसूक औरंगजेबाच्या ताब्यात आला. इतके दिवस छळणारा हा किल्ला आहे तरी कसा म्हणून औरंगजेबाने स्वत: २४ एप्रिल १७०० रोजी हा किल्ला फिरून पाहिला आणि याच वेळी त्याचे नाव ठेवले ‘किले आजमतारा’! पण पुढे औरंगजेबाची पाठ फिरताच महाराणी ताराबाईच्या नेतृत्वाखाली मराठय़ांनी पुन्हा हा किल्लाजिंकून घेतला आणि याच वेळी आजमताऱ्याचे झाले ‘अजिंक्यतारा’! पुढे महाराणी ताराबाईंकडून छत्रपती संभाजीपुत्र शाहूंकडे गडाचा ताबा आला. या गडावरच मार्च १७०८ मध्ये त्यांचा राज्याभिषेक झाला आणि अजिंक्यताऱ्याला पुन्हा एकदा मराठय़ांच्या राजधानीचा मान मिळाला. या गडाच्या साक्षीने पुढे बाळाजी विश्वनाथ भट यांना पेशवाईची वस्त्रे मिळाली. मराठी साम्राज्याची ही राजधानी १८१८ पर्यंत तिचा हा मान राखून होती. पण त्या वर्षीच्या ११ फेब्रुवारी रोजी इंग्रजांनी मराठय़ांचा पराभव केला आणि अजिंक्यतारा पुन्हा गुलामीत गेला. यानंतर स्वातंत्र्याची पहाट उगवली ती थेट १५ ऑगस्ट १९४७ रोजी! असे या अजिंक्यताऱ्याने त्याच्या हजारएक वर्षांच्या आयुष्यात खूप काही पाहिले आणि सोसले. त्याच्या तटबुरुजांवरून गतकाळातील ही शान जशी दिसते तसेच पडक्या इमारतींमधून त्याने भोगलेले दु:खही पाझरते. शिवरायांचा पराक्रम त्याने पाहिला आणि त्यांचे आजारपणही सोसले, औरंगजेबाचा हल्ला त्याने जसा झेलला तसाच किल्लेदार प्रयागजी प्रभू याची चिवट झुंजही अनुभवली. छत्रपती शाहू महाराजांचा राज्याभिषेक पाहिला, मराठी साम्राज्याचे ऐश्वर्यही पाहिले आणि सातारची गादी खालसा करताना इंग्रजांनी आपल्याच धन्याचा केलेला अवमानही त्यानेच भोगला. सुख-दु:खाचे हे सारे प्रसंग त्याने आपल्या हृदयी जपून ठेवले आहेत. इथे आलो आणि त्याच्याशी हितगूज करू लागलो की, त्याची हीच सारी मनोगते उलगडू लागतात. साताऱ्याला अनेकदा आलो, पण प्रत्येक वेळी घरातल्या एखाद्याची विचारपूस करावी, ख्याली-खुशाली घ्यावी त्याप्रमाणे अजिंक्यताऱ्याच्या अंगणात येत राहिलो. कधी हा इतिहास आठवण्यासाठी, कधी इथला निसर्ग-झाडे-पाने-फुले अनुभवण्यासाठी, कधी इथले नाचरे मोर पाहण्यासाठी, कधी इथल्या तळय़ातील ‘स्पाँज’च्या अभ्यासासाठी.. निव्वळ भटकण्यासाठी, पश्चिमेकडून येणारा वारा पिण्यासाठी आणि मावळतीचा देखावा पाहण्यासाठीही! किती आणि कशा -कशासाठी म्हणून इथे येत राहिलो. पण अजिंक्यताऱ्याने कधीही निराश केले नाही. दरवेळी तो नवनवे काही दाखवत गेला. साताऱ्यात शिरता शिरताच तो बोलवायला लागतो आणि परत निघताना अगदी दारापर्यंत पोहोचवायला येतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 16, 2015 7:52 am

Web Title: ajinkyatara fort in nashik
टॅग Maharashtra,Nashik
Next Stories
1 उन्हाळय़ातील भटकंती
2 कोतवाली थाट!
3 ट्रेक डायरी: बांधवगड दर्शन
Just Now!
X