कुमशेतच्या ठाकरवाडीतून उजव्या हाताला वळलं की एक ऐसपैस वाट आजोबाच्या दिशेने जाते. कुमशेतवरून गुहेरीच्या दाराने, पाथराघाटाने आणि सीतेच्या पाळण्यापासून कोकणात उतरता येते. आम्ही गुहेरीच्या दाराने जाणार होतो. पाच वाजता गुहेरीच्या माथ्यावर पोचलो आणि खाली दूरवर डेहेणे गावाकडे जाणारा रस्ता दिसला. सातपर्यंत खाली उतरून साडेआठपर्यत आसनगाव. घाटमाथ्यावरून कोकणात उतरणाऱ्या वाटा थोडय़ाफार फरकाने सारख्याच असल्या तरी ही वाट फारशी वापरात नसल्यामुळे थोडी अवघड आहे! अवाढव्य बोल्डर अनियमित उंचीचे सपाट, टोकदार दगड, अरुंद घळ, आणि काही चढ-उतार. एकच वाट असल्यामुळे चुकण्याची शक्यता नव्हती. आमच्या डाव्या हाताला आजोबा डोंगराचा कडा आणि सरळ खाली उतरत गेलेली सोंड, उजव्या हाताला तसाच दुसऱ्या डोंगराचा कडा व त्याला लागून असलेली सोंड. अंधार पडायच्या आत ती सोंड ओलांडली तर अजून थोडा वेळ उजेड मिळाला असता. परंतु, सव्वासहाच्या सुमारास आपण अंधार पडेपर्यंत पूर्ण खाली जाऊ  शकणार नाही, असं लक्षात आलं.
पूर्ण अंधार पडता पडता १०-१५ फुटांच्या एका थेट उतारापाशी येऊन अडकलो. एके ठिकाणी डाव्या काठावर काहीशी बुजलेली एक वाट कारवीत शिरलेली होती. ती शोधायला काही मित्र तिकडे गेले. मी मात्र नाळेमध्येच थांबलो. हवीहवीशी शांतता होती तिथे! समोर, जिथून उतरत आलो ती नाळेची वाट, तिच्या दोन्ही बाजूला पार खालपर्यंत गेलेले डोंगर, त्यावर कारवीचं रान, अंधारात चिडीचूप झालेलं जंगल, काळी झाडं, आकाशात झगमगणाऱ्या चांदण्या, पूर्ण उगवलेली चंद्रकोर, त्या प्रकाशात चमकणारे नाळेमधले ओबडधोबड खडक, मागच्या बाजूला काळोखात हरवलेली गावाची वाट आणि हे सर्व शांतपणे समजून घ्यायचा प्रयत्न करणारा मी!  आता सापडलेल्या वाटेने प्रयत्न करणे हा पर्याय होता. नाहीतर, पुन्हा होतो तिथे येऊन मुक्कामाची तयारी करणे हा पर्याय होता. ती जागा मुक्कामाला तशी बरी होती. ही वाट अजिबात मळलेली नव्हती. खडा उतार, घसारा, गच्च कारवी, पायात अडकणारी मुळं-झुडुपं, पावलांमुळे सळसळत वाजणारा पाचोळा आणि केवळ टॉर्चच्या प्रकाशात दिसणारं जंगल! मला तर बाजूच्या नाळेतल्या झाडीतूनही सळसळ ऐकू येत होती. इथे कुठेही बिबटय़ाला दर्शनसुद्धा द्यायची बुद्धी होऊ  नये असं फार वाटत होतं. तासाभराने अखेर कुठेतरी अगदी खऱ्या वाटेला लागलो आणि अखेर डोंगराच्या कुशीतून उघडय़ावर आलो. आता डावीकडे आजोबाला वळसा घालून अजून दोन एक किमी सपाटीवरून चालायचे होते, गुडघ्यांचे हाल थांबले होते. रतनवाडी सोडल्यानंतर तब्बल चौदा तासांनी आम्ही ‘डेस्टीनेशन’ला पोचलो होतो.
(संपूर्ण ब्लॉगपोस्ट वाचण्यासाठी -http://anandyatra.blogspot.in/2012/02/
blog-post_02.html))