वरंध घाटाचा परिसर हा डोंगरभटक्यांना सतत खुणावणारा. अनेक गडकोट, घाटवाटा, कडे, सुळके, दाट वनराई, नद्या, धबधबे यांनी हा परिसर संपन्न आहे. या दुर्गम दरीत समर्थाची शिवथरघळही दडलेली आहे.

‘गिरीकंदरी सुंदर वन ।

Traffic restrictions in Muktidham Kalaram Mandir area on the occasion of Ram Navami
रामनवमीनिमित्त मुक्तीधाम, काळाराम मंदिर परिसरात वाहतुकीवर निर्बंध
Tadoba Tigress, K Mark, Cubs Captured, Camera Quenching , Thirst in Summer Heat, tadoba sanctuary, vidarbh tiger, video of tiger, video of cub, viral video, wild life, marathi news,
video: तहानेने व्याकुळलेली वाघीण तिच्या बछड्यासह थेट तलावावर
(11 goats died in attack by stray dogs in Jalgaon )
जळगावात मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात ११ बकर्‍या मृत्युमुखी
Leopard in Vasai Fort area fear among citizens
वसई किल्ला परिसरात बिबट्याचा वावर… नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण; वनविभागाकडून शोध सुरू

सुंदर वाहती जीवन ।

त्यामध्ये सुंदर भवन ।

रघुनाथाचे ।।’

वरंध घाटातील शिवथरघळीचे समर्थ रामदासांनी करून ठेवलेले हे वर्णन. तसे वर्षांतील सहाही ऋतू आणि बाराही महिने ‘सुंदरवन’ असणाऱ्या या स्थळाचे खरे सौंदर्य उमलते ते मात्र वर्षां ऋतूत! हा वरंध घाट, त्या भोवतीच्या उंच – खोल डोंगरदऱ्या आणि शिवथरघळीच्या परिसरावर ढगांची ही माया बरसू लागली, की या साऱ्या सुंदरवनाचे ‘आनंदवन’ होते आणि मग या चिंब भिजल्या निसर्गात सारेच न्हाऊन निघतात!पुण्याहून भोरमार्गे महाडकडे गेलेल्या राज्यमार्गावर हा वरंध घाट आणि वरंध घाटाच्या समोरच्या डोंगरकुशीत, गर्द झाडीत समर्थाची शिवथरघळ. पुण्याहून हे अंतर १३४ तर मुंबईहून २०० किलोमीटर. हा वरंध घाट उतरू लागतानाच वाटेत माझेरी गावातून शिवथरघळीकडे यायला रस्ता आहे. वाटेत पारमाची, कुंभे शिवथर, कसबे शिवथर, अंबे शिवथर या गावांना स्पर्श करत आपण घळीपर्यंत पोहोचतो. याशिवाय महाड रस्त्यावरील बारसगावहूनही एक पक्की सडक घळीपर्यंत येते. घळीकडे यायला ही झाली सरळ धोपट वाट. पण या दुर्गम घळीकडे याशिवाय अन्यही काही डोंगरवाटा उतरतात. यातली पहिली वाट वरंध घाटातीलच कावळय़ा किल्ल्यावरून काळ नदीच्या खोऱ्यात उतरते. घाटाच्या प्रारंभी शिरगाव किंवा द्वारमंडप येथे उतरत खुटय़ाच्या वाटेनेही घळीत पोहोचता येते. देशावरून कोकणात अनेक घाटवाटा ये-जा करतात. यातील गोप्या घाटाची वाट तर अगदी घळीजवळ उतरते. राजगड, भुतोंडे, वेळवंडी नदी, कुंबळय़ाचा डोंगर मार्गे या गोप्या घाटातून या घळीजवळ कसबे शिवथरमध्ये आपण उतरतो. आंबेनळी, सुपेनाळीच्या घाटवाटाही या घळीच्या परिसरात दाखल होतात. पण हा सारा डोंगरदरीतला खेळ. अवघड वाटा, छातीवरचे चढ, तीव्र उतार, निसरडय़ा वाटा, कपारीतले रस्ते आणि दाट जंगल या साऱ्यांमधून मार्ग काढण्याची हिम्मत ज्यांच्या मनात आणि पायात आहे त्यांनीच इकडे वळावे. अन्य जणांसाठी आपली पारमाचीची वाट स्वागताला हजर असते.यातल्या कुठल्याही वाटेने या काळ नदीच्या खोऱ्यात उतरलो तरी भोवतीचे अंगावर येणारे डोंगर-कडे, त्यावरचे गच्च रान जिवाची धडकी भरवते. कावळा, खुट्टा, शिवथरचे डोंगर उंच-उंच होत आभाळात घुसलेले असतात. त्यांचे कडे, सुळके, आकार गूढ वाटतात. इथली हिरवाई, शांतता, सावली मन प्रसन्न करते. पक्ष्यांचे कूजन सारी वाट चैतन्याची करून टाकते. कधी रात्री या वाटेवरून चालत निघालो, तर आकाशीचे चांदणे आणि भूलोकीचे काजवे सारा मार्ग प्रकाशाचा करून टाकतात.पावसाळय़ात तर या साऱ्या भवतालालाच जाग आलेली असते. अभेद्य-ताशीव डोंगर-कडे ओले-हळवे झालेले असतात. त्यावरून असंख्य निर्झर वाहू लागतात. ढगांच्या अनेक लाटा या डोंगरांशी झटत असतात. इकडे सारी सृष्टी हिरवाईने नटलेली असते. त्यावर ती श्रावणाची उन्हे मधेच चकाकत असतात. या प्रकाशल्या हिरवाईवर मग शेकडो रानफुले उमलून डुलू लागतात. सारेच दृश्य सुंदर. मनाला प्रसन्न करणारे, चैतन्य बहाल करणारे असते. वर्षां ऋतूचे हे देणे स्वीकारतच घळीकडे निघायचे.वाटेत कडय़ा-कपारीतून असंख्य निर्झर ओहोळ बनून वाहत असतात. या साऱ्या जलधारा पुन्हा काळ नदीला येऊन मिळतात. मग ती देखील फुसांडत वाहू लागते. शिवथर घळीजवळ आलो, की ही खळाळणारी नदी, तिच्या काठची हिरवी वनराई आणि या वनराईत दडलेला हा सुंदरमठ समोर येतो. पण मंदिर पाहू जावे तो जवळ जाईपर्यंत दिसत नाही. पण एक प्रपात मात्र कानी येतो.

गिरीचे मस्तकी गंगा।

तेथुनी चालिली बळे ।

धबाबा लोटल्या धारा ।

धबाबा तोय आदळे ।।

गर्जतो मेघ तो सिंधू ।

ध्वनिकल्लोळ उठीला ।

कडय़ासी आदळे धारा ।

वात आवर्त होतसे ।।

तुषार उठती रेणू । दुसरे रज माजले ।

वात मिश्रीत ते रेणू ।

सीत मिश्रीत धुकटे ।।

कर्दमू निवडेना तो ।

मनासी साकडे पडे ।

विशाल लोटली धारा ।

ती खाली रम्य विवरे ।

समर्थाची शिवथरघळ दिसण्यापूर्वीच त्यांची ही ‘प्रतापरुपी गंगा’च आपले लक्ष वेधून घेते. महादेवाच्या दारात जसा नंदी, नदीला जसा घाट, बैठय़ा घरापुढे जसे वृंदावन, तसा या घळीच्या पुढय़ात पडणारा हा धबधबा! स्वर्गलोकीची गंगा होत कोसळणाऱ्या या जलधारेमुळे या विवरालाही एखाद्या कळशीदार मंदिराचे सौंदर्य बहाल झाले आहे.वृक्ष-वेली, डोंगर-पर्वत, निर्झर-नदी, पशू- पक्षी या साऱ्यांच्या सहवासात ही शिवथरघळ. शांतता, सावली आणि प्रसन्नता इथे सतत मुक्कामाला. यामुळे समर्थानीच या जागेला ‘सुंदरमठ’ ही उपमा दिली. चाळीस मीटर लांब, पंचवीस मीटर रुंद आणि जेमतेम पुरुषभर उंची असलेली ही घळ. खाली वाकतच तिचे आतील दर्शन घ्यावे लागते. मधेमधे त्या डोंगराचेच काही खांब सोडलेले. याच गूढ गुहेत समर्थानी दासबोध आकारास आणला. त्यांचे हे विचार या गूढरम्य गुहेत अगोदर उमटले आणि मग त्यांचे परमशिष्य कल्याणस्वामी यांनी ते उतरवून काढत चिरंजीव केले. गुरु-शिष्यातील हा प्रसंग मूर्तिरुपाने या पवित्रस्थळी कायम केला आहे. या घळीत समर्थाचे जवळपास दहा वर्षे वास्तव्य होते. या घळीची स्थळरचना पाहिली तर रायगड, राजगड, तोरणा, प्रतापगड आदी स्वराज्यातील महत्त्वाचा भाग त्या भोवती येतो. त्यामुळे शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेच्या कामी या समर्थाघरची नक्कीच मदत झाली असणार! घळीच्या जवळच डोंगरमाथ्यावर चंद्रराव मोरे यांच्या वाडय़ाचे अवशेषही दिसतात. अशी ही शिवथरघळ समर्थाच्या मागे पुन्हा काळाच्या उदरात दडली गेली होती. पण मग धुळय़ाचे शंकर श्रीकृष्ण देव यांनी प्रयत्नपूर्वक १९३० च्या सुमारास ती प्रकाशात आणली. त्यानंतर इथली व्यवस्था पाहणाऱ्या सुंदरमठ सेवा समितीने आता प्रयत्नपूर्वक पुन्हा या स्थळाचे सुंदरवन केले आहे. या समितीच्या वतीने पांथस्थांची राहण्याची सोय होते. त्यांच्यातर्फेच इथे दासबोध अभ्यासवर्ग, मुलांसाठी संस्कार शिबिरांसारखे उपक्रम राबवले जातात.शिवरायांचे सह्याद्रीच्या अंगाखांद्यावरील गडकोट जसे दुर्गम, तसेच समर्थाच्या या जागोजागीच्या गुहा. अवघड-अनगड जागा आणि निर्जन स्थळं. निसर्गाचे सान्निध्य आणि इतिहासाचा सहवास इथे विश्रांती घेतो आहे. ही विवरे आजही गूढ वाटतात. इथला वारा काही सांगू पाहतो. इथली शांतता समाधीचे भाव देते. इथला सहवास सामर्थ्यांचे -राष्ट्रकार्याचे बळ पुरवतो!समर्थानी या स्थळाचा उल्लेख ‘सुंदरमठ’ असा केला आहे. इथे सर्वप्रथम येणाऱ्या शंकर देवांनीही त्या वेळी लिहिलेल्या एका लेखात या ठिकाणास ‘पृथ्वीवरचा स्वर्ग’ म्हटले आहे. तुम्ही इथे आलात, स्वच्छ मन आणि शुद्ध विचारांनी वावरलात, तर तुमचे मत असेच होईल आणि समर्थाच्या ‘आनंदवनभुवनी’ची अनुभूती तुम्हालाही घेता येईल!

अभिजित बेल्हेकर
abhijit.belhekar@expressindia.com