04 August 2020

News Flash

तरंगत्या गावाची सफर!

‘सीएम रीप’ हे एक कंबोडियातलं एक छोटंसं, सुंदर-स्वच्छ शहर.

‘सीएम रीप’ हे एक कंबोडियातलं एक छोटंसं, सुंदर-स्वच्छ शहर. ज्याच्या कुशीत अंगकोरवट, अंगकोरथॉम, बायोन ही जगप्रसिद्ध प्राचिन मंदिरं विसावलेली आहेत. याच ‘सीएम रीप’च्या दक्षिणेला १५ किलोमीटरवर चाँग ख्नीस (Chong Khneas) नावाचे एक गाव आहे. हे गाव म्हणजे इथल्या ‘तोनले सॅप’ या जगातल्या सर्वात मोठय़ा गोडय़ा पाण्याच्या सरोवरातील एक तरंगते गाव! या तरंगत्या गावाला नुकतीच भेट देण्याची संधी मिळाली आणि पर्यटनाचा एक नवा आयामच सापडला.

‘तोनले सॅप’चा अर्थ आहे ग्रेट लेक! ‘तोनले’ म्हणजे मोठी नदी आणि ‘सॅप’ म्हणजे गोडं पाणी. स्थानिक लोक या सरोवराला गोडा समुद्र असेही म्हणतात. हे ‘तोनले सॅप’ आणि कंबोडियातील प्रसिद्ध ‘मेकाँग’ नदी एकमेकांशी संलग्न आहेत. कंबोडियातली अंगकोरवट, अंगकोरथॉम ही प्राचिन शहरं, कंबोडियाची संस्कृती, खानपान, जितकं वैशिष्टय़पूर्ण आहे तितकाच इथला हा ‘तोनले सॅप’ आणि मेकाँग नदी वैशिष्टय़पूर्ण आहे. अशा या सरोवरामध्ये चक्क तीन गावे ही तरंगती आहेत. कॉम्पाँग फल्यूक, कॉम्पाँग ख्लेंग आणि चाँग ख्नीस अशी त्यांची नावे. यातीलच चाँग ख्नीसच्या शोधार्थ आम्ही निघालो होतो.

छोटय़ा बोटीतून या सफरीवर निघताना मनात उत्सुकता शिगोशीग भरून राहिली होती आणि थोडय़ाच वेळात एक अनोखं, स्वप्नमयी जग हलकेच तरंगत-तरंगत सामोरं आलं! ख्मेर, व्हिएतनामी आणि मुस्लीम लोक तोनले सॅपच्या या तरंगत्या गावात वर्षांनुवर्षे राहात आहेत. बांबूच्या स्टील्टवर बांधलेली घरं! अंगणात पाणी, परसदारात पाणी!

घराघरातून पाळलेली कुत्री, मांजरं दिसत होती, पण जमिनीवर फिरणाऱ्या त्यांच्या जातभाईंसारखीच निवांत दिसत होती. काही घरांच्या अंगणात कोंबडय़ांची खुराडी होती. अर्थात तरंगखुराडी!

मुलं दफ्तर घेऊन छोटय़ा होडक्यातून शाळेला निघालेली होती. बायका बाजारहाटला बाहेर पडल्या होत्या. ही मुलं शाळेसाठी कुठपर्यंत जायची असे म्हणायला आणि समोरच शाळा दिसायला एकच गाठ पडली. शाळा चक्क पाण्यावर तरंगत होती. छोटय़ा मुलांना सोडायला आलेल्या आया, मुलांना  शाळेच्या धक्क्य़ावर उतरवत होत्या. सुखनैव चाललेलं होतं. मला गंमतच वाटली. या मुलांना चालायला येण्याआधी पोहायलाच येतं का काय? आणि खरच तसं असावं. घरांच्या अंगणात मुलं, मोठी माणसं डुबकत होती. आंघोळ चालली असावी. पकडापकडीचा खेळही पाण्यातच चाललेला! आता तरंगती दुकानंही दिसायला लागली. काय नव्हतं त्या तरंगत्या दुकानांतून? किराणा मालापासून खेळण्यापर्यंत, कपडय़ांपासून माशांपर्यंत- सब कुछ एकही छत के निचे! इतकेच नव्हे तर आमची बोटं इंधन भरायला तरंगत्या डिझेल पंपावर लागल्यावर मी जरा सरसावूनच बसले. काय काय नवलाई याची देही, याची डोळा पाहायला मिळणार कळेना!

आमचा वाटाडय़ा वान्ना! हसरा आणि बडबडय़ा. त्याला प्रश्न विचारून विचारून भंडावले होतेच, पण काही वेळा त्यालाही इतकं काही एकदम सांगायचं असायचं की तो चेहऱ्यावरच्या भावातून, देहबोलीतून अधिक व्यक्त व्हायचा.त्याने एकीकडे बोट दाखवले. तिकडे बास्केटबॉलचा खेळ तरंगत्या कोर्टवर अगदी रंगात आला होता. कायद्याचे हात लांबपर्यंत पोहोचतात असं आपण सहजपणे म्हणून जातो, पण इथं साक्षात अनुभव आला. ‘तोनले सॅप’मध्ये एक पोलीस स्टेशनही तरंगतं होतं. मला पटलंच, कायद्याचे हात कुठेही पोहोचतात! कुठे लक्झरी बोट्स, रेस्टॉरंट्स तरंगत होती. कुठं पर्यटकांसाठी बोटींवर बार्बेक्यू चाललं होतं. अधूनमधून भली मोठी खऱ्याखुऱ्या कमळांची (वॉटरलीली नव्हे) शेतं नजरेला पडत होती.

दरवर्षी इथली मेकाँग नदी आणि ‘तोनले सॅप’ सरोवर करोडो रुपयांचा समुद्रखजिना कंबोडियाच्या पदरात रिता करते. जगातले सर्वात संपन्न असे इनलॅण्ड फिशिंग ग्राऊंड, म्हणजे तोनले सॅप! जवळजवळ २२० जातीचे मासे तोनले सॅप-मेकाँगमध्ये आहेत. ज्यामध्ये नष्ट होण्याच्या मार्गावर असलेला मेकाँग जाएंट कॅटफिशही (Henicorhynchus Siamensis) इथेच आढळतो. कंबोडियाचे मत्स्यप्रेम प्रचंड आहे. त्यांचे चलन रियालवरही ते झळकले आहे. रियाल हे एक छोटय़ा पण महत्त्वाच्या मासळीचेच नाव आहे.

या तरंगत्या गावातील लोकांचे जीवन मासेमारीशीच निगडित आहे. काही वेळा तर त्यांना नगद रकमेचीही गरज वाटत नाही. माशांच्या बदल्यात तांदूळ असा व्यवहारही चालतो. मासेमारी मोठय़ा प्रमाणावर, आधुनिक तंत्राने केली जातेच; पण अगदी घरांच्या बाहेर मासेमारीसाठी शंखाकृती बांबूच्या जाळ्या पाण्यात सोडून ठेवलेल्या असतात. काही वेळा फिशनेटमध्ये टोपले घालून ते पाण्यात बुडवून ठेवलेले असते. त्यात घरगुती वापरासाठीचे पकडलेले जिवंत मासे घालून ठेवलेले असतात. फ्रीजची गरजच नाही. असाच प्रकार मी लक्षद्वीपमध्येही पाहिला होता.

तोनले सॅपमधल्या तरंगत्या घरातल्या बायकांचे मासे खारवून ठेवणे, माशांच्या डोक्यांचे खत तयार करणे, चरबीचे तेल काढणे असे एक ना दोन व्यवसाय. सतत उद्योग चालू. अधूनमधून तोनले सॅपच्या पाण्यात पाय सोडून शिळोप्याच्या गप्पा!

‘तोनले सॅप’च्या अथांग पाण्यावर तरंगत एका ‘क्रोकोडाईल फार्म’वर पोहोचलो. पाण्यात तरंगणाऱ्या, पाण्यानेच भरलेल्या एका मोठय़ा हौदात या मगरी दाटीवाटीने आ वासून पसरल्या होत्या.

कंबोडियाचा केंद्रबिंदू ‘मेकाँग’च आहे. या लाडल्या मेकाँगची वर्तनशैली मात्र एकदम अजब आहे. जगातील सर्व नद्या या कायम एकाच दिशेने वाहात असतात, पण ‘मेकाँग’ ही एकमेवाद्वितीय अशी नदी याला अपवाद आहे. ही नदी मे-जूनपासून ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत आग्नेय दिशेकडून वायव्येकडे तर नोव्हेंबरनंतर ती वायव्येकडून आग्नेयेकडे असा उलटा प्रवास करते. नदीच्या मार्ग बदलीमुळे तिच्याशी संबंधित ‘तोनले सॅप’मध्येही बदल घडतात. पाण्यावर तरंगणारे हे गावही मग इकडून तिकडे वाहवते. सगळीच गंमत आहे, ऐकायला आणि पाहायलादेखील. पाण्यावर तरंगणारे हे सारे जगच स्वप्नील वाटतं. ‘तोनले सॅप’ आणि तिच्यावरील ही तरंगती गावे आज कंबोडियाची राष्ट्रीय संपत्ती आहेत. ‘युनेस्को’ने  त्यांना ‘बायोस्फीयर रिझव्‍‌र्ह’ म्हणून दर्जा बहाल केलाय. त्याची ही भटकंती निसर्ग पर्यटनाच्या अनोख्या जगात घेऊन जाते.

अ‍ॅड. सीमंतिनी नूलकर

seema_noolkar@yahoo.co.in

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 31, 2015 4:57 am

Web Title: article on cm rip village in cambodia
Next Stories
1 ट्रेक डायरी- पेंच सफारी
2 अष्टहजारी शिखर मोहीम!
3 ट्रेक डायरी: रणथंबोर टायगर सफारी
Just Now!
X