भोरच्या दक्षिण च्या चार गोष्टीही कळतात. अनेक ढोरवाटांमधून वाट काढत आपण अध्र्या एक तासात गडमाथ्याच्या कडय़ाखाली येऊन ठेपतो. या कडय़ाखालीच पूर्वेकडच्या सोंडेवर काही घरांचे अवशेष, एक सुकलेले तळे आणि एक बुजलेला दरवाजा आहे. गडाचा हा पहिला दरवाजा. खरेतर गडाच्या माचीतही पूर्वी काही तटबंदी, एखादा दरवाजा असावा, पण आज तिथे तसे काहीही दिसत नाही.
वाट पुढे निघते, खरेतर कातळालाच भिडते. प्रत्येक गडाचे स्वत:चे असे काहीतरी वैशिष्टय़ असते. केंजळगडाचा कातळातील मार्ग ही त्याची खास ओळख! शंभर एक मीटर उंचीचा कातळ, सरळ रेषेत तासून काढलेला. या कातळातच ५४ पायऱ्यांचा खोदीव मार्ग तयार केला आहे. यातील एकेक पायरी चढताना धाप लागायला होते. सारा मार्ग चढत जाईपर्यंत ओझी घेतलेली शरीरे तर पार घायाळ होतात.
अंगावर येणारी, पाय थकवणारी रचना मुद्दामहून केलेली. कारण ती शत्रूसाठी आहे. या अशा वाटा चढता-चढताच त्याला दम लागायला व्हावे, हा त्यामागचा हेतू. एकीकडे अंगावर येणारा कडा तर दुसरीकडे खोल दरी. शत्रूवर जरब बसविणारी ही दोन्ही भूरुपे! यामुळे शत्रूचे आक्रमण तर दूरच, पण बचाव करतानाही त्यांची धांदल उडत असावी. पालीजवळचा सरसगड, नाशिकजवळचा हरिहर आणि पनवेलजवळच्या कलावंतीण किल्ल्यावर चढणारे मार्गही असेच अंगावर येणारे खोदीव! किल्ले स्थापत्त्यातील हे एकेक विशेष! आमच्या दुर्गाभोवतीचे हे असे एकेक विषय उलगडू लागले, की मग दुर्गदर्शनाला आणखी धुमारे फुटतात.
हा कातळमार्ग संपला की आपण गडाच्या दुसऱ्या दरवाजात येऊन पोहोचतो. खरे तर दरवाजाच्या जागी! दोन बुरुजांनी युक्त अशा या दरवाजाने केव्हाच मान टाकली आहे. गडाच्या या दोन दरवाजांपैकी एकाचा इतिहासात ‘घलई’ किंवा ‘घळी दरवाजा’ असा उल्लेख आला आहे.
या पडलेल्या दुसऱ्या दरवाज्यातून आत प्रवेश केला की सर्वत्र माजलेले गवतच दिसते; मग या गवतातून माना वर काढणारे अवशेष हुडकत दुर्गदर्शन सुरू होते.
गडाला तटबंदी तशी फारशी नाही, पण आहे ती अद्याप टिकलेली. या तटालगत फिरतानाच दक्षिणेकडे एक खोदीव तळे आहे. या तळय़ातील नितळ, स्वच्छ पाणी पाहून एवढा वेळ मृत वाटणारे ढिगारे एकदम जिंवत वाटू लागतात. पाण्याचा एक स्पर्श या अवशेषांमध्ये प्राण भरतो.
गडाच्या मध्यभागी गडदेवता केंजळाईचे उद्ध्वस्त मंदिर आहे. या मंदिराच्या उत्तरेला तटालगत गडावरची एकमेव उभी असलेली वास्तू दिसते, दारूगोळ्याचे कोठार! दगडी चिऱ्यांमध्ये भिंतीचे बांधकाम तर विटांमध्ये छत साकारलेले. सारी इमारत आजही उभी, पण गवतात दडलेली. याशिवाय शिबंदीची घरटी, सुकलेली तळी आणि एका मोठय़ा वाडय़ाचे जोतेही या गवतातच दिसते. गवतातून वाट काढत चाललेला हा सारा प्रवास मात्र काळजीपूर्वक करावा लागतो.  
केंजळगडाच्या मधोमध त्याची पूर्व आणि पश्चिम अशी विभागणी करणाऱ्या एका भिंतीचे अवशेष आहेत. माणदेशीच्या महिमानगडावरही अशी रचना आहे. या अशा भिंतीची योजना कळत नाही. गडाचा हा सारा भाग पिंजून काढत असतानाच त्याच्या दक्षिण व उत्तर भागात दगडी रिंगणासह उभे असलेले चुन्याच्या घाणीचे चाक  दिसते. या घाणीतूनच गडावरची बांधकामे झाली.
मोहनगड, खेळजा अशी नावे असलेल्या केंजळगडाला फारसा इतिहास नाही. शिलाहार राजा भोजने निर्माण केलेल्या अनेक किल्ल्यांपैकी हा एक! गडाभोवती असलेल्या काही खोदीव गुहा त्याच्या या प्राचीनत्वाचेच दाखले देतात. यानंतर निजामशाही, आदिलशाहीचा या गडावर अंमल होता. त्यांचेही उल्लेख इतिहासात येतात. पुढे हा गड स्वराज्यात कधी दाखल झाला याचा तपशील मिळत नसला तरी तो बहुधा शेजारच्या रोहिडय़ाबरोबरच आलेला असावा. या गडाचे केंजळगडशिवाय मोहनगड हे नावही महाराजांनीच दिलेले असावे. पुढे इसवी सन १६७४ मध्ये हा किल्ला छत्रपती शिवरायांनी पुन्हा एकदा जिंकल्याचा उल्लेख मिळतो. यानंतर औरंगजेबाचा काही काळ वगळता इसवी सन १८१८ पर्यंत हा केंजळगड मराठय़ांकडेच होता. या शेवटच्या काळात इथे आलेल्या माऊंट स्टुअर्ट एलफिन्स्टन या इंग्रज अधिकाऱ्याने या गडाविषयी एक वाक्य नोंदवून ठेवले आहे, ते असे,

‘..जर हा किल्ला दृढनिश्चयाने लढवला तर जिंकणे अशक्य आहे!’
हा निश्चयच मराठय़ांनी त्या शेवटच्या लढाईत दाखवला आणि ब्रिटिशांना अनेक दिवस झुंजवले. अखेर २६ मार्च १८१८ रोजी जनरल प्रिझलरने केंजळगडाची ही झुंज थांबवली. गड ब्रिटिशांकडे गेला तो पुढे स्वातंत्र्य मिळेपर्यंत!
या गडावरून घडणारे भूगोलाचे दर्शनही चार क्षण खिळवून ठेवणारे आहे. उत्तरेकडे रोहिडा, पूर्वेकडे पांडवगड, मांढरदेव, दक्षिणेस पाचगणीचे टेबललँड, महाबळेश्वरची गिरिशिखरे, कमळगड आणि पश्चिमेकडे ऐसपैस पसरलेले रायरेश्वरचे पठार असे डोंगर-दऱ्यांचे खेळ थक्क करून सोडतात. या डोंगररांगांमधून धोमचे पाणी अडले आहे. धरणाचे हे चमचमते पाणी, एकामागे एक उलगडणाऱ्या डोंगररांगाच्या पाश्र्वभूमीवर संध्याकाळचे मावळतीचे गहिरे रंग उतरतात आणि मग त्या अवशेषांमध्येही समाधी लागून जाते.
स्थळकाळच्या या आठवणी साठवत गड उतरावा. माचीतल्या केंजळाईच्या मंदिरात मुक्काम लावावा. रात्रीच्या त्या मिट्ट काळोखाला छेदणारी आणि थंडीत मायेची ऊब देणारी चूल पेटवावी. चुलीच्या त्या फडफडणाऱ्या प्रकाशातच दिवसभराच्या भटकंतीचे एकेक पदर आठवावेत आणि रायरेश्वराचे उद्याचे बेतही ठरवावेत!