जव्हारचा परिसर हा निसर्गसौंदर्याने नटलेला भाग आहे. या भागातच गर्द झाडीत दडलेला भूपतगड
हे भटक्यांसाठी एक खास आडवाटेवरचे स्थळ!

ठाणे जिल्हा म्हणजे वैविध्यतेने समृद्ध अशा गडकोटांची खाणच. केळवे – माहीम सारख्या निसर्गरम्य सागरी किल्ल्यांपासून ते अशेरी, कोहोज, तांदूळवाडीसारख्या बलदंड आणि राकट गिरिदुर्गापर्यंत अनेक सुंदर किल्ले जिल्ह्याच्या नकाशावर आहेत. जव्हार हे तर एक नितांत सुंदर ठिकाण. हे ‘हिल स्टेशन’ असलं तरी इथल्या मुकणे राजवाडय़ामुळे जव्हारला एक ऐतिहासिक वारसाही लाभलेला आहे. याच जव्हारपासून फक्त १६ किलोमीटरवर एक दुर्गम गिरिदुर्ग वसला आहे. त्याचं नाव भूपतगड! जव्हारला भेट देणाऱ्या अनेकांना या गावाच्या इतक्या जवळ एक किल्ला आहे याची कल्पनादेखील नसल्याने भूपतगड ट्रेकर्सच्या नकाशावरून तसा काहीसा बाजूलाच राहतो.
भूपतगडाला भेट देण्यासाठी आपल्याला प्रथम जव्हार गाठावे लागते. जव्हारला जाण्यासाठी अनेक मार्ग असून त्यातील प्रचलित दोन मार्ग. एक म्हणजे कल्याण -कसारा – विहीगाव – मोखाडामाग्रे तर दुसरा ठाणे जिल्ह्यातून कल्याण – भिवंडी – वाडा – विक्रमगड – जव्हार असा धावणारा. हा साधारण शंभर किलोमीटरचा प्रवास हिरव्यागार सौंदर्यामुळे आणि वाटेवरील कोकणी पाडय़ांच्या सान्निध्यामुळे अतिशय सुखावह ठरतो. जव्हारवरून चोथ्याचा पाडा, केळीचा पाडा, पवारपाडा अशी छोटी आदिवासी गावे पार करत आपण १६ किलोमीटरवरील झाप गावात येऊन दाखल व्हायचं. जव्हारहून झापला दर तासाभराने एसटीची देखील व्यवस्था आहे. भूपतगडाचे वैशिष्टय़ म्हणजे याच्या अगदी जवळ जाईपर्यंत इथे किल्ला असल्याचे जाणवत नाही. जव्हार परिसरातील डोंगररचना अतिशय क्लिष्ट आहेत. ठळकपणे दाखवता येईल असा आकार इथल्या एकाही डोंगराला नाही. त्यामुळे झापवरून आपण भूपतगडाच्या पायथ्याला वसलेल्या चिंचपाडय़ाची दिशा विचारायची आणि किल्ल्याकडे कूच करायचं. चिंचपाडय़ाहून भूपतगडाच्या पहिल्या पठारापर्यंत जीप जाईल असा कच्चा रस्ता तयार झाला असून इथे एक झेंडा लावलेला आहे. झेंडय़ाच्या शेजारी पाषाणात कोरलेली पावले आहेत. स्थानिक ग्रामस्थ याला ‘सीतेची पावले’ म्हणतात! एखादा बुजुर्ग यातून भूपतगडाची नाळ थेट रामायणाशी जोडून मोकळा होतो. ‘सीतेची पावले’ असलेल्या या पठारावरून गर्द झाडीने भरलेला भूपतगड दिसतो. त्याच्या माथ्याच्या दिशेने सरकलेली ठसठशीत पायवाटही नजरेत भरते आणि आपली मार्गक्रमणा सुरू होते.
इथून हा माथा फक्त वीस मिनिटांच्या अंतरावर. या वाटेवरची किर्र शांतता अनुभवण्यासारखी आहे. इथल्या नि:शब्दतेलाही एक आवाज असल्याचा भास होऊन जातो. वीस मिनिटांच्या थंडगार चालीनंतर भूपतगडाच्या पडलेल्या तटबंदीतून आपला गडमाथ्यावर प्रवेश होतो. किल्ल्याच्या माथ्यावर पाऊल ठेवलं, की उजवीकडे जाणारी पायवाट पकडायची. उजवीकडे लगेचच आपल्याला किल्ल्याच्या भग्न दरवाजाचे अवशेष आणि त्यातून किल्ल्याच्या माथ्याकडे येणाऱ्या पायऱ्या दृष्टीस पडतात. हा किल्ल्याचा मुख्य प्रवेशमार्ग असून सध्या तो पडलेल्या अवस्थेत आहे. आपण फुटलेल्या तटबंदीतून गडावर प्रवेश केल्याने हा मूळ मार्ग बघून किल्ल्याच्या फेरीला निघायचं. या पायवाटेने पुढे गेल्यावर लगेचच समोर गडावरील मारुतीचे ठाणे दिसते. मारुतीचे मंदिर बघून पुढे गेल्यावर गडाच्या बालेकिल्ल्याची वाट आपल्याला दिसते. गडाच्या या सर्वोच्च माथ्याला चारही बाजूंनी तटबंदी असून त्याचा एक बुरुज आजही सुस्थितीत उभा आहे. गडाच्या या बुरुजावर स्थानिकांनी झेंडा उभारलेला असून त्या संपूर्ण तटबंदीला स्थानिक ग्रामस्थांनी राजवाडा असे नाव बहाल केले आहे. आपण या राजवाडय़ाच्या विरुद्ध दिशेला म्हणजे उत्तरेकडे बाहेर पडलो, की उजवीकडे झाडीत एक छोटीशी विहीर व त्याच्या प्रवेशासाठी असलेली कमान दिसते. सध्या ही विहीर झाडांनी भरलेली असून त्यात उतरता येत नाही. भूपतगडाच्या या उत्तरेकडील बाजूस एक बुरुज सोडल्यास कोणतेही अवशेष नाहीत.
भूपतगडाचे वैशिष्टय़ म्हणजे त्याचे भौगोलिक स्थान! त्र्यंबक ते जव्हार या प्राचीन व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी भूपतगडाची निर्मिती करण्यात आली. भूपतला येण्यासाठी ठाणे जिल्ह्यातीलच कुर्लोट गावामाग्रेही वाट आहे. मात्र ही वाट खडी चढाईची आहे. भूपतगडाची दक्षिण ही बाजू त्याचा पाणीसाठा सांभाळणारी. या बाजूच्या पठारावर जोडटाक्यांचा एक समूह असून पाणी अडवण्यासाठी त्याला िभतही बांधलेली दिसते. या टाक्यांच्या खालच्याच बाजूला एक तलाव असून त्याच्या काठावरही आपल्याला पाणी अडवण्यासाठी िभतीची रचना केलेली दिसते. सध्या मात्र या तलावाचे पाणी पिण्यायोग्य नसून टाकीसमूहातील एकाच टाक्याचे पाणी पिण्यायोग्य आहे. भूपतच्या दक्षिण कडय़ावर तुरळक तटबंदी सोडल्यास कोणतेही अवशेष नाहीत. मात्र इथून गडाचा विस्तार चटकन नजरेत भरतो. हवा स्वच्छ असेल तर भूपतगडाच्या माथ्यावरून उत्तरेकडे त्र्यंबक रांग सहज दृष्टीस पडते. सरत्या पावसाळ्यात या भूपतगडाचं आणि आजूबाजूच्या आसमंताचं रूप देखणे असते. सोनकीच्या फुलांनी सजलेलं भूपतचं पठार आणि त्याच्या माथ्यावरून दिसणारा िपजल नदीच्या खोऱ्याचा विस्तीर्ण मुलुख, सूर्यमाळचे पठार, खोडाळ्याचा प्रदेश हा भाग म्हणजे डोळ्यांसाठी जणू पर्वणीच वाटतो. हे सारे पाहात एक आडवाटेवरचा सुरेख किल्ला पाहिल्याचं समाधान उराशी बाळगून भूपतगडाचा निरोप घ्यायचा.

ambadichi bhaji recipe in marathi bhaji recipe in marathi
गावाकडील पारंपरिक पोटली पद्धतीची चविष्ट अंबाडीची भाजी; ही घ्या सोपी मराठी रेसिपी
Construction of 121 artificial reefs on Konkan coast for fish conservation
मत्स्यसंवर्धनासाठी कोकण किनारपट्टीवर १२१ कृत्रिम भित्तिकांची उभारणी
Unseasonal rain Washim
वाशिममध्ये अवकाळी पाऊस, गारपीट; हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने बळीराजा हवालदिल
Unseasonal rain Buldhana district
बुलढाणा जिल्ह्यावर निसर्ग कोपला! गारपीटसह अवकाळीचे थैमान; रब्बी पिकांची प्रचंड हानी