भटकणाऱ्यांच्या जगात लडाख नावाला एक वेगळे स्थान आहे. निव्वळ भटकणाऱ्यांसाठी, निसर्ग दर्शनासाठी, छायाचित्रणासाठी, गिर्यारोहणासाठी, सायकल-दुचाकीवरील साहसासाठी अशा विविध मोहिमा आता लडाखच्या वाटेने जाऊ लागल्या आहेत. लडाखकडे धावणाऱ्या या पावलांसाठीच या भूमीची, प्रदेशाची, निसर्ग-पर्यावरणाची, इथल्या इतिहास-संस्कृतीची सर्वागीण ओळख करून देणारे एक पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे – ‘भटकंती लेह लडाखची अल्पपरिचित हिमालयाची’!
पुण्याच्या स्नेहल प्रकाशन संस्थेने प्रकाशित केलेल्या आणि प्र. के. घाणेकर यांनी लिहिलेल्या या पुस्तकात अवघे लडाख सामावलेले आहे. हिमालय आणि काराकोरम पर्वतरांगा जिथे एकमेकांना मिळतात तिथे वसलेला हा प्रदेश! साधारण तीन ते साडेतीन हजार मीटर उंची आणि भोवतीने सर्वत्र हिमपर्वतरांगा. अशा या प्रदेशातील इतिहास, भूगोल, निसर्ग, पर्यावरण, साहस, संस्कृती, समाज आणि लोकजीवन असे सारे काही या पुस्तकात सामावले आहे. इथल्या भू-प्रदेशापासूनच या पुस्तकाची सुरुवात होते. मग यात लडाखी माणूस, घरे समजातात. इथले पर्वत, त्यावरचा निसर्ग, त्यातील वैशिष्टय़पूर्ण वनस्पती, सफरचंदाची झाडे, आयरिस-बिस्टोर्टाची फुले, रॅवेन-ब्लॅक बिल्ड मॅगपाय सारखे पक्षी, याक-लडाखी शेळ्या-उंट-किमांग आणि हिमबिबळय़ा सारखे प्राणी ..या साऱ्यांची माहिती, लडाखशी असलेले नाते या पुस्तकात सापडते. या प्रदेशातील धर्ममठ, बौद्ध धर्मकेंद्रे, स्तूप जसे भेटतात तसेच त्यातून झिरपणारी संस्कृतीही या पुस्तकातूनच उलगडते.
साहसवीरांसाठी तर हा प्रदेश नंदनवनच आहे. लडाखभोवतीची हिमशिखरे, सर्वोच्च स्तोक कांगरीच्या मोहिमा, त्यावरील पहिले मराठी पाऊल, सिंधू नदी आणि तिच्यातील व्हाइट वॉटर रिव्हर राफ्टिंग, सायकल मोहिमा, लडाखमधील निसर्गवाटा असे भटकंतीचे अनेक मार्ग इथे उघड होतात. या वाटांवरची असंख्य गुपितेही घाणेकरांनी सांगितली आहेत.
या प्रदेशातील लेह, कारगील, रोहतांग, लाहोल, स्पिती, नुब्रा खोरे, झान्स्कर खोरे, चोग्लमसार, सिंधुघाट, पँगाँग, शक्तीक्षेत्र द्रास, केलाँग, पांगी खोरे, अल्ची अशा अनेक थांब्यांवरील लडाखच्या अद्भुत जगाचे दर्शन या पुस्तकातून घडते. या प्रदेशाचे हवामान, जीवनमान, खाद्यसंस्कृती, दळणवळण, प्रवास सुविधा, भटकंतीसाठी योग्य काळ, त्यातली सावधानता, काही पथ्ये देखील घाणेकर याच पानांमधून आपल्याला सांगतात. एकूणच लडाख न पाहिलेल्यांसाठी खुणावणारे, जाणाऱ्यांसाठी मार्गदर्शक आणि जाऊन आलेल्यांसाठी नव्या वाटा दाखवणारे असे हे पुस्तक. लडाखच्या वाटेवर जाणाऱ्या प्रत्येक पावलांचा जणू हा सोबतीच आहे.
(‘भटकंती लेह लडाखची अल्पपरिचित हिमालयाची’, स्नेहल प्रकाशन, संपर्क : ०२०-२४४५०१७८)