पावसाळा सुरू झाला, की निसर्गात सर्वत्र रानफुलांची दुनिया फुलते. जागोजागी फुललेल्या या रंगांच्या दुनियेवर मग ‘उडती फुले’ म्हणजेच फुलपाखरेही पिंगा घालू लागतात. या अशाच उडत्या फुलांपैकी हे एक ब्ल्यू टायगर! वाघाप्रमाणे याच्या पंखावर ठिपके असतात. या ठिपक्यांचा रंग निळा असल्याने या फुलपाखराला ‘ब्ल्यू टायगर’ म्हणतात. ही फुलपाखरे फुलांवर बसताना पंख मिटून बसतात. मैदानी आणि डोंगराळ अशा दोन्हीही भागांत आढळणाऱ्या या फुलपाखरांचे छायाचित्रण एक कसोटीचे ठरते.

ट्रेक इट

ाकाधकीच्या, स्पर्धेच्या या युगात विश्रांतीचे, विरंगुळय़ाचे, आनंद देणारे चार क्षण आता साऱ्यांनाच
आवश्यक झाले आहेत. दोन दिवस कुठेतरी जावे आणि भटकून रिफ्रेश व्हावे ही आता अनेकांची दैनंदिनी
बनली आहे. यातूनच मग सहल, ट्रीप, टूर, आऊटिंग, विकएन्डपासून ते ट्रेकिंग, गिर्यारोहणापर्यंत अशा
वेगवेगळय़ा नावांखाली भटकण्याची एक मोठी संस्कृती समाजात रुजू लागली आहे. भटकंतीच्या या वाटा, त्यावरचे सौंदर्यानुभव, गमतीजमती आणि थ्रिल घेऊन येणारी ‘ट्रेक इट’ आता आपल्याला दर गुरुवारी भेटणार आहे. ही पुरवणी आपल्याला कशी वाटते हे आम्हाला जरूर कळवा. तसेच नवीन स्थळांची माहिती, ट्रेकचा अनुभव, हटके छायाचित्र, आपल्या अनुभवांवर आधारित संक्षिप्त स्वरुपातील ब्लॉग लिहून आपण सहभागी होऊ शकता.
संपर्कासाठी – ‘ट्रेक-इट’साठी , लोकसत्ता, ‘एक्स्प्रेस हाऊस’, प्लॉट क्र. १२०५/२/६, शिरोळे पथ, शिवाजीनगर, पुणे – ४११००५. Email -abhijit.belhekar@expressindia.com