News Flash

दोन चाकांवरचे जग!

सोकार (१५२८० फूट) ते तागलांगला (१७५८२ फूट) हा सर्वात अवघड टप्पा! त्यात वातावरण बिघडलेल़े वाट तर आधीच बिकट आणि त्यात सतत कोसळणाऱ्या दरडींमुळे अधिकच

| February 5, 2014 09:39 am

मनाली ते खारदुंगला मोहीम
सोकार (१५२८० फूट) ते तागलांगला (१७५८२ फूट) हा सर्वात अवघड टप्पा! त्यात वातावरण बिघडलेल़े  वाट तर आधीच बिकट आणि त्यात सतत कोसळणाऱ्या दरडींमुळे अधिकच धोकादायक बनलेली़  आयोजक म्हणाले, सर्वानी सायकली ‘मदत गाडी’त ठेवू या आणि हा टप्पा पार करू या़  आमच्यातल्या काही जणांनी ते मान्य केलेही़  परंतु, आव्हानांची उपजतच आवड असलेल्या आम्ही सात जणांनी मात्र अगदी आभाळ कोसळले तरी शेवटपर्यंत सायकलवरूनच प्रवास पूर्ण करण्याचा निर्धार केला होता़  ११ जुलैच्या पहाटे हा खडतर टप्पा ओलांडण्यासाठीचा प्रवास सुरू केला़  इथला रस्ता म्हणजे गाडी जाऊ शकेल असा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा उंच रस्ता़  अतिशय खडकाळ-रेताड़  कित्येकदा तर पॅडल मारल्यावर चाक जागच्या जागी फिरायच़े  दर दहाव्या मिनिटाला घशाला कोरड पडायची़  त्यात विरळ होत चाललेल्या प्राणवायूमुळे लगेच थकवाही जाणवायचा़  तरीही तागलांगला सायकलनेच गाठायचेच, असा निर्धार कायम होता़  वाटेत भेटणारे गावकरी ‘जुले जुले’(नमस्कार) म्हणून आमचा उत्साह वाढवत होत़े  अखेर तो क्षण आलाच.. बर्फाच्छादित पर्वतरांगा, वर निळसर छटा सोडणारे निरभ्र आभाळ आणि या हिमकुशीत वसलेली ती लहानशी गावं, असा विलोभनीय देखावा दिसला आणि वाटलं सार्थक झालं सगळय़ा श्रमाचं!
फिटनेससाठी म्हणून मी सायकलिंगकडे वळलो. नवनवे मित्र मिळाले. या छंदातून हळूहळू या विषयातीलही वेगवेगळे पैलू समजू लागले आणि आमच्या मोहिमा सुरू झाल्या. सिंहगड, पाचगणी, लवासा, बापदेव घाट, मुळशी, ताह्मिणी घाट अशा नवनव्या वाटा आणि त्यावरचे आमचे हे दोन चाकांवरचे जग धावू लागले. यातूनच पुढे मग एका मोठय़ा मोहिमेचा घाट घातला गेला- ‘मनाली-लेह-खारदुंगला टॉप सायकलिंग
एक्स्पिडिशन’! सराव झाला, शारीरिक-मानसिक क्षमता वाढवल्या आणि या साऱ्या शिदोरीवर आम्ही २ जुलैला मनालीत पोहोचलो़
मनाली! हिरवेगार डोंगर, रंगीबेरंगी फुले, थंड हवा, दूरदूरवर दिसणाऱ्या बर्फाच्छादित पर्वतरांगा, निळय़ाशार नद्या आणि सफरचंदांच्या बागा..मनालीचे हे स्वागतच नवा उत्साह-जोश देणारे होते. दोन दिवस आम्ही मनालीतच राहून तिथल्या वातावरणाशी जुळवून घेतल़े  ४ जुलैच्या सकाळी मोहिमेचे मुख्य संचालक हेमराज यांनी आमच्या पंधरा जणांच्या चमूला निरोपाचा ध्वज दाखवला़  
आयुष्यातील एका थरारक प्रवासाला सुरुवात झाली. ६,७२६ फुटांवरून सुरू झालेला हा प्रवास पहिल्या दिवशी दुपारी दीड वाजेपर्यंत सलग सायकलिंग करून ४१ किमीचे अंतर कापल्यानंतर ११ हजार २० फुटांवरील मऱ्ही गावाशी जाऊन थांबला़  येथे ठोकलेल्या तंबूंमागचा लहानसा धबधबा धुक्याची चादर काहीशी विरळ झाल्यावर आम्हाला पाहायला मिळाला़  पहिला टप्पा सर केल्याच्या आनंदातच रात्री झोपी गेलो़
दुसऱ्या दिवशीचा टप्पा होता सिसू गावाचा मऱ्हीपासून ५४ किमी अंतरावर आणि सपाटीपासून १०,३६२ फूट उंचीवर! म्हणजे काहीसे खाली उतरायचे होत़े  पण यातील गंमत अशी की या टप्प्यावर मध्यभागी रोहतांगची खिंड होती. उंची १३ हजार ५४ फूट़  म्हणजे आधी वर चढायचे आणि मग खाली उतरायचे असा हा प्रवास होता़  त्यात आता हिरवी झाडे मागे पडून पूर्ण बर्फाच्छादित प्रदेश सुरू झाला होता़  रस्ते सायकलसाठी अत्यंत प्रतिकूल बनलेले. भुसभुशीत माती, चिखल आणि बर्फ. अशा या सगळय़ा दिव्यातूनही आम्ही नियोजित वेळी म्हणजे दुपारी दीड वाजताच सिसू गाठल़े  वाटेत बर्फात खेळणाऱ्या पर्यटकांना पाहून छायाचित्रे काढण्याचा मोह आम्हालाही आवरला नाही़  यानंतर जिस्पा, झिंग झिंग बार, बारालाछा ला, बॅ्रण्डीनुल्ला, सर्चू, गाटालुप्स, पांग, मोरे प्लेन्स, सोकार, तागलांगला, लाटो, लेह असे टप्पे १२ जुलैपर्यंत दरदिवशी याच वेगाने आणि क्रमाने पार केल़े  मध्ये कधी प्रचंड हिमशिखरे दिसत होती, तर कधी मनोहर धबधब़े  कधी चंद्रभागा नदीचा संगम मनाला भुरळ घालत होता, तर कधी जंगली गाढवांचे कळप दिसत होते, तर कधी झेबॅक म्हणजे जंगली बकऱ्यांच़े  कधी खडतर रस्ते ‘चक्राक्रांत’ करावे लागत होते, तर कधी हिमनद्यांतील गुडघाभर पाण्यातून सायकली खांद्यावर घेऊन प्रवास करावा लागत होता़  कधी भव्य बौद्ध प्रार्थनास्थळे, कधी प्राचीन भारतीय संस्कृती ज्या सिंधूकाठी वसली. तिचे पवित्र दर्शन, तर कधी सैन्याच्या छावणीतील शस्त्र आणि १९६२ आणि ७१च्या युद्धांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन, अशा एक ना अनेक गोष्टी पाहात, अनुभवत हे टप्पे आम्ही पार केले होत़े
आता वेळ होती लेह ते खारदुंगला हा शेवटचा टप्पा पार करण्याची. १२ जुलैच्या रात्री आम्ही लेहला तंबूत होतो़  लेह आहे ११ हजार ५६२ फुटांवर आणि खारदुंगला १८ हजार ३८० फुटांवऱ  हा सरळ चढ होता. वाहने जाणारा हा सर्वात उंचीवरचा रस्ता!
४२ किलोमीटरचे हे अंतर, आम्हाला सायकलवरच पार करायचे होत़े  १३ जुलैला पहाटे पाच वाजता आम्ही प्रस्थान केल़े  उंचीमुळे विरळ झालेल्या प्राणवायूची कमतरता जाणवत होती़  प्रत्येक पॅडल मारताना कस लागत होता़  त्यातही शेवटचे चार-पाच किमीचे अंतर तर काही केल्या जोर लावताच येत नव्हता़  पण ‘एक धक्का और.. एक धक्का और..’ असे म्हणत म्हणत एकदाचे खारदुंगवर पाऊल ठेवल़े आणि अचंबित झालो़  सृष्टीचे ते निखळ सौंदर्य पाहून प्रवासातील सारे कष्ट, श्रम, थकवा कुठल्या कुठे पळाला़. वाटलं, हाच तो क्षण, याचसाठी केला होता हा सारा अट्टहास!
या आठ दिवसांच्या काळात या डोंगरदऱ्यांतील सुमारे ५७५ किमीचा प्रवास आम्ही सायकलवरून केला होता़  या ‘आम्ही’मध्ये ‘बियाँड वाइल्ड’चे मिहिर महाजन आणि ‘सायमोर’चे अनिकेत महाशब्दे, अनिल उच्छल, राजेंद्र इनामदार, कॅ. पवन करमळकर, मोनीष दवे, मुकुल इनामदार, सुरेश सोनावणे, शरद गोरे, राकेश पाटे, करण भल्ला, माधव हुंडेकर, मनाली भिडे, तनुश्री दत्ता आणि जयदेव पागे यांचा समावेश होता़  त्याबरोबरच मोहिमेदरम्यान साथ करणारे गौतम आणि गंगाराम सर आणि त्यांच्यासोबतचे इतर मदतगार यांच्या पाठिंब्यामुळेच ही अवघड मोहीम यशस्वी होऊ शकली़  याच मंडळींमुळे गेली चार महिने पुण्यातील रस्तोरस्ती नियमित- हेतुपुरस्सर केलेला ‘सायकलिंग’चा अभ्यास सार्थकी लागला, असे म्हणता येईल़
   
  

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 5, 2014 9:39 am

Web Title: cycling manali to khardung la
Next Stories
1 ‘सॅक’च्या पोतडीतून
2 लिंगाणा प्रदक्षिणा
3 ट्रेक डायरी: बांधवगड दर्शन
Just Now!
X