* ट्रेक डायरी
‘गिर्यारोहण’ या शब्दाचे चालणे आणि उंची या दोन शब्दांशी सर्वात जवळचे नाते आहे. सतत वरवर जाणाऱ्या उंचीचा, त्या उंचीवरील शिखराचा ध्यास, वेध घेणे हेच या खेळातील मुख्य आकर्षण असते. पण अनेकदा ही उंचीच या खेळातील आव्हान, अडथळा ठरते. जिवावरही बेतते. अशा अतिउंचीवरील गिर्यारोहणात काय धोके, आव्हाने दडलेली आहेत. त्याचे व्यवस्थापन कसे करायचे, त्याला तोंड कसे द्यायचे, उपाययोजना या साऱ्यांवर पुण्यात १७ फेब्रुवारी रोजी एक कार्यशाळा आयोजित केलेली आहे.
पुण्यातील गिरिप्रेमी, गिरिकुजन, गिरिदर्शन, युवाशक्ती आदी गिर्यारोहण क्षेत्रातील संस्था आणि संरक्षण विभागाच्या ‘डीआरडीओ’ संस्थेच्या सहकार्याने ही कार्यशाळा आयोजित केली आहे. या कार्यशाळेत ‘डीआरडीओ’ च्या ‘डीआयपीएएस’ (डिफेन्स इन्स्टिटय़ूट ऑफ फिजिओलॉजी अ‍ॅन्ड अलायड सायन्स) विभागाच्या आधिकारी कर्नल हिमाश्री मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळेत त्या अतिउंचीवरील गिर्यारोहण, तिथले वातावरण, त्याचे शरीरावर होणारे परिणाम, अतिउंचीवरील आजार, त्यावरील उपाययोजना-काळजी याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. ही कार्यशाळा १७ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता पुण्यातील भांडारकर रस्त्यावरील पीवायसी हिंदू जिमखाना संस्थेच्या सभागृहात आयोजित केली आहे. या कार्यशाळेतील सहभागासाठी पूर्वनोंदणी आवश्यक असून यासाठी ‘गिरिप्रेमी’ संस्थेच्या निरंजन पळसुले (९८५०५१४३८०) किंवा भूपेंद्र हर्षे (९८५०३५१५१८) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
केनिया सफारी
‘निसर्ग सोबती’तर्फे  येत्या २० ते २८ जुलै दरम्यान केनिया सफारीचे आयोजन करण्यात आले आहे. यात साम्बुरू, नैवाशा, नकरू आणि मसाई मारा आदी ठिकाणांना भेटी दिल्या जाणार आहेत. बिबटय़ा हिप्पो, जिराफ, ठिपकेवाला तरस, हत्ती आदी सस्तन प्राण्यांच्या प्रजाती, २०० हून अधिक पक्षी पाहण्याची संधी या जंगल सफारीमध्ये मिळणार आहे. संपर्क – ९९३०५६१६६७, ९८१९३३०२२२
जिम कॉर्बेट व्याघ्र प्रकल्प
उत्तराखंडमधील हिमालयाच्या पायथ्याशी स्थित असलेल्या जिम कॉर्बेट व्याग्र प्रकल्प निसर्गप्रेमींसाठी नंदनवन आहे. या अरण्याला १९३५ सालीच संरक्षित अरण्याचा दर्जा देण्यात आला. पुढे १९७३ साली भारतातील पहिला व्याघ्र प्रकल्प देखील याच जंगलात साकारला.  १३१८ चौरस किलोमीटर एवढे प्रचंड क्षेत्रफळ असलेल्या या जंगलात वाघ, हत्ती, बिबळे, अस्वल पाहण्यास मिळतात. पक्षीनिरीक्षकांसाठी हे अरण्य तर स्वर्गच आहे. ५८० पेक्षाही अधिक जातीचे पक्षी येथे आढळतात. अशा या जिम कॉर्बेट व्याघ्र प्रकल्पामध्ये १९ ते २४ मेच्या दरम्यान ‘निसर्ग भ्रमंती’च्या वतीने जंगल सफारीचे आयोजन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी अभय जोशी (९९३०५६१६६७, ६८) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

गिर्यारोहक पॅट मॉरो, बर्नाडेट मॅक्डोनल्ड भेटीला!
विश्वातील सर्व खंडातील सर्वोच्च शिखरे सर करणारा कॅनडाचा गिर्यारोहक पॅट मॉरो आणि ‘फ्रीडम क्लायंबर्स’ या गाजलेल्या पुस्तकाच्या लेखिका बर्नाडेट मॅक्डोनल्ड आपल्या भेटीला येत आहे. निमित्त आहे हिमालयन क्लबच्या वार्षिक संमेलनाचे!
पॅट मॉरो यांनी आतापर्यंत उत्तर अमेरिकेतील मॅक् किनले, दक्षिण अमेरिकेतील अकोन्कागुआ, आशियातील माउंट एव्हरेस्ट, युरोपातील एल्ब्रुस, आफ्रिकेतील किलीमांजारो, अन्टार्टिकामधील विन्सन मॅसिफ, ऑस्ट्रेलियातील कारस्टेन्झ पिरॅमिड आणि इंडोनेशियातील पुंकाक जाया ही महत्त्वाची शिखरे सर केली आहेत. याव्यतिरिक्तही त्यांनी अन्य शिखरांवरही चढाया केल्या आहेत. गिर्यारोहणातील त्यांच्या या कामगिरीबद्दल त्यांना १९८७ मध्ये ‘ऑर्डर ऑफ कॅनडा’चे सभासदत्व देऊन सन्मानित करण्यात आले आहे. आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही गिर्यारोहण मोहिमा कशा आखाव्यात, यशस्वी कराव्यात. याविषयी ते या कार्यक्रमात दृकश्राव्य माध्यमातून बोलणार आहेत.
बर्नाडेट मॅक्डोनल्ड या एक  पोलंडमधील प्रसिद्ध गिर्यारोहक लेखिका आहेत. ‘फ्रीडम क्लायंबर्स’ या त्यांच्या पुस्तकात त्यांनी पोलंडमधील गिर्यारोहण क्षेत्रातील कामगिरीचा आढावा घेतला आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर सामाजिक, आर्थिक परिस्थिती बदललेली असतानाही या देशातील गिर्यारोहकांनी हे क्षेत्र ज्या पद्धतीने जिवंत, यशस्वी ठेवले, जगात आपला दबदबा निर्माण केला; त्याचाच प्रवास मॅक्डोनल्ड यांनी आपल्या पुस्तकात मांडलेला आहे. पोलीश मोहिमा, त्यातील नवनवी आव्हाने, ज्याची पुढे जगाने घेतलेली दखल या साऱ्यांची नोंद या पुस्तकात घेतली आहे. पोलीश गिर्यारोहणातील हा थरार मॅक्डोनल्ड या कार्यक्रमात दृकश्राव्य पद्धतीने मांडणार आहेत.
या दोन विदेशी गिर्यारोहकांच्या जोडीनेच या संमेलनात हरिश कपाडिया, अनिंद्य मुखर्जी, पी. सी. साहू, कर्नल अनिल गोथ, दिव्येश मुनी आणि स्टिफन आल्टर हे अन्य गिर्यारोहकही विविध विषयांवर सादरीकरण करणार आहेत.
हे संमेलन नरिमन पॉइंट येथील एअर इंडिया सभागृहात येत्या १६, १७ फेब्रुवारी रोजी आयोजित केले आहे. अधिक माहिती आणि नावनोंदणीसाठी ०२२-२४९१२८२९ किंवा ६६६.ँ्रें’ं८ंल्लू’४ु.१ॠ या संकेतस्थळावर संपर्क साधावा, असे क्लबचे सचिव राजन महाजन यांनी कळविले आहे.