‘दुर्गवीर प्रतिष्ठान’तर्फे नागोठण्याजवळील सूरगडावर नुकताच दसरा म्हणजे विजयोदुर्गोत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्ताने दुर्गप्रेमींनी सुरुवातीस गडाची साफसफाई केली. मंदिरांची, दरवाजांची स्वच्छता केली. गडावरील देवतांना स्नान घालून त्यांची पूजा करण्यात आली. यानंतर गडाला तोरणे बांधण्यात आली. फुलांच्या माळांनी गड सजवण्यात आला. भगवे झेंडे लावण्यात आले. रांगोळय़ा काढण्यात आल्या. संध्याकाळी शिवप्रतिमेचे पूजन झाल्यावर गडावर मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. रात्री सगळा गड मशालींच्या उजेडात आणि गडावरील मंदिरे पणत्यांच्या प्रकाशात उजळून  आली. दुर्गवीर प्रतिष्ठानच्या पुढील कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी संतोष हसूरकर (९८३३४५८१५१) यांच्याशी संपर्क साधावा.