कोल्हापुरातील भटकंतीच्या वाटा शोधू लागलो की, पश्चिम घाटावरचा गगनगड हा डोंगर भटक्यांना कायम खुणावतो. अंगावर येणारा भूगोल, इतिहासाच्या पाऊलखुणा, भोवतीचा निसर्ग असे खूप काही दाखवणारी ही भटकंती. पावसाळय़ात तर या वाटेला आणखी धुमारे फुटतात.

प्राचीन काळापासून वाहतूक व दळणवळणासाठी घाटांना अतिशय महत्त्व आहे. इतिहासकाळीच या घाटवाटांवर लक्ष ठेवण्यासाठी व गरजेच्या वेळी तो घाटमार्ग रोखून धरण्यासाठी जागोजागी किल्ले बांधले गेले. कोल्हापूर जिल्ह्य़ाच्या पश्चिमेच्या टोकावर गगनगडाची निर्मिती याच कारणातून करण्यात आली.
सह्य़ाद्रीच्या धारेतून पुढे आलेल्या एका डोंगरावर हा गगनगड वसला आहे. समुद्रसपाटीपासून याची उंची आहे ६९१ मीटर. गगनबावडा हे गडाच्या पायथ्याचे गाव. कोल्हापूरपासून हे अंतर आहे ५५ किलोमीटर. हे गाव तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. येथे पडणाऱ्या तुफान पावसामुळे येथील सर्व परिसर सदासर्वकाळ हिरवागार असतो, पण इतके निसर्गरम्य वातावरण असूनही या गावाचा पर्यटनाच्या दृष्टीने म्हणावा तितका विकास झालेला नाही.
बसस्थानकावरून गावात प्रवेश करताच सुरुवातीला दोन बाजूस दोन रस्ते फुटतात. त्यातील एक रस्ता करुळ घाटाकडे, तर एक रस्ता भुईबावडा घाटाकडे जातो. या दोन घाटांमधील मध्यबिंदू म्हणजे गगनगड होय. या दोन्ही घाटांवर लक्ष ठेवण्यासाठीच त्याची निर्मिती झालेली.
गावातूनच गगनगडाच्या पायथ्यापर्यंत डांबरी रस्ता आहे. अध्र्या तासात आपण गडपायथ्याच्या वाहनतळावर पोहोचतो. गडावरील गगनगिरी महाराजांच्या मठामुळे नेहमी भक्तांची वर्दळ असते. पायऱ्याच्या वाटेने गडचढाईस सुरुवात करायची. वळणावळणाच्या वाटेने वर गेल्यावर गडाचा अलीकडे नव्याने केलेला दरवाजा लागतो. हा दरवाजा रात्री ९ ते पहाटे ५ पर्यंत बंद असतो. त्यामुळे साहजिकच रात्रीच्या वेळेत गडावर जाता येत नाही.
या प्रवेशद्वारातून गडावर प्रवेश केल्यावर डाव्या बाजूस लेणी आहेत. ही लेणी म्हणजे गडाच्या प्राचीनतेचे प्रतीकच आहे, पण सध्या या लेण्याचे मंदिरात रूपांतर करण्यात आले आहे. येथे येणाऱ्या पर्यटकांना बऱ्याचदा गगनगिरी महाराजांच्या नावावरून या गडास ‘गगनगड’ हे नाव पडले असे वाटते, पण गडाचे हे नाव प्राचीन आहे. या गडाची निर्मिती भोजराजाच्या काळात झाली आहे.
गडाच्या मधल्या टप्प्यावर गगनगिरी महाराजांचे मंदिर आणि अन्य इमारती आहेत. या ओलांडत थोडेसे पुढे गेलो की, इतिहासकाळातील गगनगड सुरू होतो. गडाच्या मधल्या टप्प्यावर आलो की, एक मोठे पठार लागते. या पठारावर आलो की, भन्नाट वारा आपले स्वागत करतो. यापुढे गडाच्या बालेकिल्ल्याची चढण सुरू होते.
बालेकिल्ल्याच्या खालच्या अंगास एक छोटी टेकडी असून त्यावर छोटेखानी महादेव मंदिर आहे. या महादेवाचे दर्शन घेत बालेकिल्ल्याच्या चढाईस भिडायचे. जुन्या पायऱ्यांच्या वाटेने वर येतानाच दरवाजाचे अवशेष दिसतात. वर गहिनीनाथांचे मंदिर आहे. स्थानिक लोक या गैबीला गहिनीनाथ म्हणून ओळखतात. यावरून हे मंदिर गहिनीनाथाचे असावे असे वाटते. बालेकिल्ल्याच्या माथ्यावर फिरताना राजवाडा-शिबंदीच्या घरांचे अवशेष, ढालकाठीच्या निशाणाची जागा, छोटा तलाव आणि तटबंदीचे अवशेष दिसतात. या अवशेषांना पाहतानाच गडाच्या इतिहासात शिरायला होते. शिलाहार राजवंशातील कीर्तिसंपन्न राजा महामंडलेश्वर विक्रमादित्य राजा भोज (दुसरा) याने दक्षिण महाराष्ट्रात जे पंधरा किल्ले निर्माण केले. त्यातील एक किल्ला म्हणजे हा गगनगड होय. पुढे सिंधणदेव यादवाने भोज राजाचा १२०९ मध्ये पराभव केला. पुढे बहामनी राजवटीचे तुकडे झाल्यावर याचा ताबा आदिलशहाकडे गेला. इ. स. १६६० मध्ये शिवरायांनी हा किल्ला विजापूरकरांकडून जिंकून घेतला. पुढे हुकूमतपन्हा रामचंद्र पंत अमात्य यांच्या स्वामीनिष्ठेवर प्रसन्न होऊन छत्रपती राजाराम महाराजांनी गगनगड किल्ला व गगनबावडय़ाची जहागिरी त्यांना बहाल केली. पुढे १८४४ च्या गडक ऱ्यांच्या बंडानंतर इंग्रजांनी तोफांचा मारा करून गगनगडाची बरीच पाडापाडी केली. त्यानंतर गडावरची सर्व वस्ती खाली गगनबावडा गावात राहू लागली.
गगनगडाचा हा इतिहासावरचे लक्ष भवतालचा निसर्ग हटवतो. बालेकिल्ल्याच्या या सर्वोच्च माथ्यावरून आजूबाजूचा प्रदेश फारच सुंदर दिसतो. तळकोकणातील सुंदर दृश्य दिसतात. हे सारे पाहात बसावसे वाटते. पावसाळय़ात तर याला उधाण येते. हिरवाईच्या विविध छटा या डोंगरावरून वाहात असतात. गगनबावडय़ाचे हे रूप पाहण्यासाठी दरवेळी या दिवसात एक चक्कर माराविशी वाटते.

Loksatta sanvidhanbhan Constitution Struggle for equality
संविधानभान: समतेसाठी संघर्षयात्रा
Sujay Vikhe Patil, terror-mongers,
दहशत माजविणाऱ्यांना चोख उत्तर द्या – डॉ. सुजय विखे पाटील
Gadchiroli, Police, Foil, Naxal Plot, near chattisgarh border, Seized Arms, Materials, maharashtra, marathi news,
गडचिरोली : नक्षल्यांचा घातपाताचा डाव उधळला; छत्तीसगड सीमेवरील तळ उध्वस्त
(11 goats died in attack by stray dogs in Jalgaon )
जळगावात मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात ११ बकर्‍या मृत्युमुखी