पर्वतराज हिमालय म्हणजेच नगाधिराजाच्या या रांगेत आकाशाशी स्पर्धा करणारी अगणित हिमशिखरे दडलेली आहेत. ही सारीच हिमशिखरे मानवजातीला सतत आव्हान देणारी! यातीलच पीर पंजाल पर्वतरांगेतील क्षितिधर व फ्रेंडशिप या १७,५०० फूट उंचीवरील हिमशिखरांची मोहीम आम्ही गिरिमित्र प्रतिष्ठानच्या सात शिलेदारांनी नुकतीच यशस्वी रीत्या पूर्ण केली.
मी स्वत: मंगेश कोयंडे, आल्हाद करंबेळकर, बबन कुडतरकर, संदीप भिसे, रूपेश पालवे, प्रमोद गावकर आणि जयदीप भोईर अशा या सात गिर्यारोहकांची ही साहसकथा! एकाच वेळी दोन हिमशिखरांची चढाई हे या मोहिमेचे वैशिष्टय़. यासाठी आवश्यक ती शारीरिक, मानसिक तयारी करत आम्ही बरोबर १८ सप्टेंबर रोजी मनालीतून या मोहिमेस सुरुवात केली.
हिमालयातील दोन शिखरे, एकाच रांगेतील. पण त्यांच्या वाटा निराळय़ा, त्यातील आव्हाने निराळी. यातील पहिले ध्येय्य होते शिखर क्षितिधर, उंची १७,३६८ फूट!
सुरुवातीचे पदभ्रमण सुरू झाले. आमचा पहिला मुक्काम होता बकरताज! १०,५०० फूट उंच असणाऱ्या या आमच्या पहिल्या मुक्कामाच्या कॅम्पला त्याच दिवशी पोहोचलो. पुढच्या दिवशी बियासकुंड मुक्कामतळापर्यंत ‘लोडफेरी’ केली. ‘लोडफेरी’ म्हणजे पुढील मुक्कामस्थळी लागणाऱ्या वस्तू पोहोचवणे. या अशा फेरीतून अतिउंचीवरील प्रतिकूल हवामानानुसार जुळवून (अॅक्लमटायझेशन) घेणे शक्य होते. पुढे २० सप्टेंबर रोजी क्षितिधर शिखराचा ‘कॅम्प १’ ची ‘लोडफेरी’ केली. हा ‘कॅम्प-१’ तब्बल १५,५०० फूट उंचीवर होता. त्याच दिवशी आम्ही ‘लोडफेरी’ करून परत बियासकुंड मुक्कामी आलो. पुढच्याच दिवशी आम्ही आमचा मुक्काम ‘कॅम्प १’ला हलवला. या वाटेवर असणाऱ्या खडय़ा चढाईमुळे आमची चांगलीच दमछाक झाली.
२२ सप्टेंबरच्या पहाटे आम्ही क्षितिधर शिखर चढाईला सुरुवात केली. अंधारात पायवाट तुडवत होतो. सकाळी ६ वाजता सर्वानी बर्फात चालण्यासाठीचे वैशिष्टय़पूर्ण बूट आणि त्यावरील ‘क्राम्पोन’ (पोलादी खिळय़ांची पट्टी) चढवले.
मजल-दरमजल करत सकाळी ८ वाजता बर्फाच्या कातळभिंतीजवळ येऊन पोहोचलो. खूप दमछाक झाली होती. हिमालयातील पहिलाच अनुभव असल्यामुळे अक्षरश: कसरत करावी लागत होती. पण आतापर्यंत स्वच्छ असलेले हवामान अचानक ढगाळ झाले. ‘स्नो फॉल’ला सुरुवात झाली. थंडीचा कडाका वाढला. या साऱ्या आव्हानाला तोंड देत आम्ही बरोबर सकाळी पावणेअकरा वाजता माथ्यावर पोहोचलो. क्षितिधर शिखर सर झाले होते. मोहिमेतील सर्व सदस्यांच्या चेहऱ्यावरचा आनंदात गगनात मावत नव्हता. पहिल्याच प्रयत्नात सहय़ाद्रीतील या मावळय़ांनी १७,३६८ फूट (५,२९४ मीटर) उंचीचे शिखर सर केले होते. शिखरावर तिरंगा, भगवा ध्वज फडकावला. राष्ट्रगीत म्हटले, छायाचित्रे काढली आणि बदललेल्या निसर्गाशी सामना करत परतीला लागलो.
सायंकाळी पावणेचापर्यंत आम्ही ‘कॅम्प १’वर पोहोचलो. दोन शिखरांपैकी पहिले सर झाल्याने सगळय़ांमध्ये जोश निर्माण झाला होता. उद्या दुसऱ्या फ्रेन्डशिप शिखराची मोहीम उघडायची होती. त्याची स्वप्ने घेतच सगळे झोपी गेले.
२३ सप्टेंबर! क्षितिधर शिखराचा ‘कॅम्प १’ सकाळी ९ वाजता सोडला. २४ सप्टेंबरला फ्रेन्डशिप शिखरासाठी १३,००० फुटांवर आम्ही ‘कॅम्प १’ उभारला. कॅम्प उभारल्यानंतर थोडय़ा वेळातच जोरदार पावसाला सुरुवात झाली आणि सगळे वातावरण खराब झाले. आता सगळय़ाच गिरिमित्रांमध्ये टेन्शन यायला सुरुवात झाली. उद्याच्या मोहिमेबाबत साऱ्यांनाच चिंता वाटू लागली. पण सुदैवाने रात्री सारे वातावरण साफ झाले आणि आम्ही पुन्हा एकदा नवीन जोश व उमेद घेऊन २५ सप्टेंबरला पहाटे २ वाजता बाहेर पडलो. वाटेत असणाऱ्या ‘मोरेन’चे मोठमोठे दगड पायाखाली तुडवत आम्ही पुढे पुढे सरकत होतो. खराब वातावरणामुळे हवेमध्ये प्रचंड गारठा होता. पण आता मागे वळायचे नाही हा साऱ्यांनीच निश्चय केला होता. पहाट झाली आणि शिखर उजळू लागले. त्या प्रकाशाबरोबर आमची पावलेही भरभर उचलू लागली. वाटेत अकराळ-विकराळ हिमभेगा भय दाखवू लागल्या. या हिमभेगा, वरून होणारी हिमवृष्टी आणि खराब हवामान या साऱ्यांशी तोंड देत बरोबर सकाळी ११ च्या सुमारास आम्ही ‘फ्रेंडशिप’चा माथा गाठला.
पहिल्याच प्रयत्नात सहय़ाद्रीतील या मावळय़ांनी दुसरे १७,३५२ फूट- ५,२८९ मीटर उंचीचे फ्रेंडशिप शिखर सर केले. शिखरावर तिरंगा, भगवा एकापाठोपाठ फडकले. राष्ट्रगीत, महाराष्ट्रगीताचे गायन झाले. शिवरायांच्या जयघोषाने हिमालयातील सारी शिखरे दुमदुमून गेली. आठवणींसाठी छायाचित्रे काढली आणि आम्ही परतीला लागलो.
एकाच मोहिमेत हिमालयातील दोन शिखरे सर करण्याचा पराक्रम सह्य़ाद्रीच्या मावळय़ांनी, ‘गिरिमित्र’च्या शिलेदारांनी केला होता. पराक्रमाच्या या आनंदातच आमची परतीची वाट आणखी सुखद बनली.