उन्हाच्या झळा भाजू लागल्या, की पावले सावलीच्या शोधात धावू लागतात. झाडा-वेलींच्या, राई-जंगलाचा आधार वाटू लागतो. जुन्नरजवळ अशीच एक हिरवाई गेल्या दीड-पावणे दोनशे वर्षांपासून सामान्य पर्यटकांपासून ते वनस्पती अभ्यासकांपर्यंत अनेकांना सावली देत आहे, नाव गिब्सन पार्क उर्फ हिवरे वनोद्यान!
ही गोष्ट आहे १८२५ मधील, डॉ. अलेक्झांडर गिब्सन नावाचे एक गोरे अधिकारी ईस्ट इंडिया कंपनीबरोबर एक वैद्यकीय अधिकारी म्हणून भारतात आले होते. त्यांना वनस्पतींच्या अभ्यासात विशेष रुची होती. त्यांची ही आवड व जिज्ञासा पाहून कंपनीने त्या वेळी त्यांची पुण्याजवळ दापोडी येथील वनस्पती उद्यानात अधीक्षक म्हणून नेमणूक केली. या दरम्यानच डॉ. गिब्सन यांनी भारतातील वनस्पतींचा अभ्यास सुरू केला. त्यातून त्यांना अनेक प्रजाती दुर्मिळ होत असल्याचे लक्षात आले. तेव्हा अशा या दुर्मिळ वनस्पतींचे जतन, लागवड, अभ्यासासाठी वनोद्यानाची कल्पना पुढे आली आणि हिवरे वनोद्यानाचा जन्म झाला. १८४० मधील ही घटना. त्यातून तयार झाले भारतातील पहिले संरक्षित वनोद्यान आणि डॉ. गिब्सन ठरले या उद्यानाचेच नव्हे तर भारताचे पहिले वनसंरक्षक!
अष्टविनायक यात्रेतील ओझरला जाण्यासाठी पुणे-नाशिक रस्त्यावरील नारायणगावमधून एक रस्ता जातो. या रस्त्यावरच हिवरे गावच्या हद्दीत हे वनोद्यान आहे. आजूबाजूच्या माळरानाच्या पाश्र्वभूमीवर ही हिरवाई लगेचच लक्ष वेधून घेते.
साधारण अर्धा-एक चौरस किलोमीटर आकारातली ही वनराई! खरे तर मानवनिर्मित छोटेस जंगलच! वड, पिंपळ, ऐन, आसाणा, बेहडा, बिबा, हिरडा, पळस, बेल, कवठ, बकुळ, लिंब, गुलमोहोर, बहावा, खैर, अंजन, जांभूळ, आंबा, तमालपत्र, रक्तरोहिडा, कैलासपती, मोरवा अशी शेकडो ऐकलेली-न ऐकलेली झाडे-झुडपे-वेली इथे गेली कित्येक वर्षे सुखाने नांदत आहेत. या उद्यानात शिरलो, की हे वनवैभवच भोवती दाटी करते.
साधारण १८४० च्या सुमारास डॉ. गिब्सन इथे आले. वनस्पती उद्यानासाठी त्यांनी कुकडी नदी काठचा हा भाग निवडला आणि देशी-विदेशी अशा शेकडो वनस्पतींची लागवड, जोपासना सुरू केली. त्यांच्या काळात लावलेली जुनी महागोनी, वडाची अशी अनेक झाडे आजही इथे उभी आहेत.
या उद्यानात फिरण्यासाठी छोटय़ा-छोटय़ा वाटा तयार केलेल्या आहेत. या वाटांवरून फिरू लागलो, की भोवतालचे वृक्ष त्यांचा इतिहास सांगू लागतात. एकेक झाड दोन-तीन पिढय़ा जुने, वडाच्या पारंब्या जमिनीत शिरून त्यांचीही आता मोठाली खोडे बनलेली आहेत. बहुतेक झाडांच्या फांद्या एकमेकांत घुसून त्यांचे एक मोठे छतच तयार झालेले आहे. यामुळे ऐन उन्हाळ्यात गेले, तरी इथे शीतल-सावलीचाच स्पर्श होतो.
डॉ. गिब्सन यांनी सेवाकाळात आणि निवृत्तीनंतर असे तब्बल २७ वर्षे इथे वनस्पती संशोधन केले. या काळातील वास्तव्यासाठी त्यांनी इथे एक विश्रामगृह देखील बांधले. या काळात अनेक वृक्षांची लागवड, जतन आणि अभ्यास त्यांनी केला. माहिती संकलित केली. वनस्पतींच्या रेखाकृती-चित्रकृती रेखाटल्या. त्यांनी रेखाटलेली ही वनस्पती चित्रे आजही एडनबर्ग येथील ‘रॉयल बॉटॅनिकल गार्डन’ मध्ये जतन करून ठेवलेली आहे.
हिवऱ्याशी नाते जुळलेल्या गिब्सन यांचे निधनही अखेर इथेच या वृक्षांच्या सावलीत १८ जानेवारी १८६७ मध्ये झाले. त्यांच्या पत्नीने उद्यानातच त्यांचे स्मारक उभारले. हे स्मारक आणि गिब्सन यांचे विश्रामगृह, या दोन्ही वास्तू आजही या उद्यानात दिसतात.
हिवरे उद्यानाच्या निर्मितीनंतर बरोबर शंभर वर्षांनी मे १९४० मध्ये हे उद्यान गिब्सनचे स्मारक म्हणून घोषित करण्यात आले. तसेच या वेळी इथल्या वृक्षवेलींचे सर्वेक्षणही करण्यात आले. ज्यातून जी धक्कादायक माहिती बाहेर आली, त्याने अनेक देशी-विदेशी वनस्पती अभ्यासकांची पावले हिवऱ्याकडे वळू लागली. भारतातील वनस्पतींवर संशोधन करणाऱ्या बर्कील या युरोपियन अभ्यासकाने तर बराच काळ इथे मुक्काम ठोकला होता.
विविध वनस्पती प्रजातींच्या या अनमोल ठेव्यास स्वातंत्र्यानंतर मात्र उतरती कळा लागली. या संग्रहात भर पडण्याऐवजी त्याची चोरटी तोड सुरू झाली. याबाबत भारतीय वनस्पती सर्वेक्षण विभागाचे एक अधिकारी श्री. वसवडा यांनी १९५८ मध्ये एक लेख लिहीत याविषयी खंत व्यक्त केली होती. दरम्यान, ही दुर्दशा कमी होती म्हणून की काय पुढील दशकभरात इथे येडगाव धरण साकारले आणि या धरणाने या वनोद्यानाचा एक मोठा भाग गिळंकृत केला. शेकडो वर्षे परिश्रमपूर्वक तयार केलेल्या या वनस्पती संग्रहाला जलसमाधी मिळाली. या वेळी पुण्याच्या विज्ञानवर्धिनी संस्थेने या विरोधात आवाज उठविण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचे प्रयत्न अपुरे पडले. त्यांनी त्या वेळी केलेल्या सर्वेक्षणात या उद्यानात तब्बल साडेचारशे प्रजातींच्या वनस्पती असल्याची नोंद करून ठेवली आहे.
या धरणनिर्मितीनंतर जो भाग वाचला आहे, त्यावर सध्याचे हिवरे वनोद्यान आहे. गिब्सन यांनी लावलेले मूळचे वृक्ष आणि त्यानंतर वनखात्याने प्रयत्नपूर्वक जपलेल्या- लावलेल्या वृक्षराजीमुळे ही वनराई पुन्हा हिरवी गर्द झाली आहे. दीडशे वर्षांच्या वृक्षांबरोबरच इथे नव्याने लावलेले गुलमोहोर, बहाव्याच्या झाडा-फुलांनी या हिरवाईला सौंदर्य प्राप्त करून दिले आहे. वनविभागातर्फे नुकतेच डॉ. गिब्सन यांच्या विश्रामगृहास ‘वारसा वास्तू’चा दर्जा बहाल केला आहे. या विश्रामगृहात लवकरच डॉ. गिब्सन यांनी काढलेल्या वनस्पतींच्या चित्रांच्या प्रतिकृतींचे प्रदर्शन मांडले जाणार आहे.
झाडा-वेलींच्या या अनोख्या दुनियेतून फिरू लागलो, की कुणा एका गोऱ्या वृक्षप्रेमीची ही कर्तृत्व गाथा स्तिमित करून सोडते. डॉ. गिब्सन यांच्या या कर्तृत्वाविषयी १९ व्या शतकातील ‘फ्लोरा ऑफ देश’ या पुस्तकात चार ओळी लिहिलेल्या आहेत, त्या अशा- `Dr. Gibson’s Park at Hiwre looks like an oasis in the midest of a dry semidesert hills and low woodland savannah’
इथे आल्यावर अन्यत्र सगळीकडे रूक्ष माळरान दिसते. या पाश्र्वभूमीवर कुकडीच्या काठावरची गिब्सनची ही हिरवाई पाहिली, की कौतुकाच्या या चार ओळी आजही सार्थ वाटतात.