शिवनेरी, रायगड, राजगड, सिंहगड हे सामान्यांना परिचित असे गडकोट! पण त्याच वेळी हडसर, चावंड, जीवधन अशी नावे घेतली तर हे गड आहेत, असे सांगूनही अनेकांचा विश्वास बसत नाही. असे असंख्य गडकोट आपल्या सह्य़ाद्रीत विखुरलेले आहेत. यातलाच हा हडसर जुन्नरपासून १२ किलोमीटरवर! जुन्नरजवळ साकारलेल्या माणिकडोह धरणावरून नाणेघाटाच्या दिशेने अंजनावळे, घाटघर गावाकडे एक रस्ता जातो. या रस्त्यावरच हडसर गावाच्या डोक्यावर हा अनगड किल्ला आहे. इथे येण्यासाठी स्वत:चे वाहन नाही तर अंजनावळेकडे जाणाऱ्या एस.टी. बस सोयीच्या. फक्त हडसर केला तर एक दिवस आणि जर त्याला नाणेघाट, शिवनेरीची जोड दिली तर या डोंगरदऱ्यांमध्ये एखाद्या मुक्कामाची तयारी ठेवून या मोहिमेला निघावे.
खरेतर या वाटेवर जुन्नरपासूनच आपल्याभोवती डोंगरांचा विळखा घट्ट होऊ लागतो. मार्गातील माणिकडोह धरण ओलांडले, की एका बाजूला धरणाचे निळेशार पाणी आणि दुसऱ्या बाजूला उंच डोंगररांगा यामधून होणारा हा प्रवास वेगळय़ाच जगात घेऊन जातो. या प्रत्येक डोंगरांबद्दल खरेतर कौतुक आणि गूढरम्यताही! त्यांच्या या भूगोलावर तर आमचा इतिहास रचला गेलेला आहे. वाटेवरच्या छोटय़ा वाडय़ावस्त्यांमध्येच हडसर गावचा थांबा येतो आणि पायउतार व्हावे लागते. बस गेली की, त्यानंतर शांत होणाऱ्या धुळीतून हडसर उत्तुंग कडय़ाचे रूप घेत पुढय़ात उभा राहतो!
हडसर, उंची तब्बल ४६८७ फूट! त्याच्या या दर्शनामुळे सुरुवातीला तो अवघड, अशक्यच वाटू लागतो. यामुळेच की काय त्याला आणखी एक नाव पर्वतगड! सर्व बाजूने तुटलेले कडे पाहून सुरुवातीला गोंधळायलाच होते. पण मग आपल्या चेहऱ्यावरचा हाच गोंधळ पाहून तिथला एखादा खेडूत आपली वाट सोपी करून सांगतो. या गडाला खेटूनच एक वाटोळा डोंगर आहे. या दोन डोंगरांच्या दरम्यानच्या घळीतून एक लपलेली वाट गडावर जाते. दगड-गोटे आणि झाडोऱ्याने भरलेली ही वाट परीक्षाच पाहते. पण या साऱ्या अडचणी आणि शेवटचे छोटेसे प्रस्तरारोहण करत या दोन डोंगरांदरम्यानची खिंड गाठली की, आपण हडसरच्या मुख्य मार्गाला येऊन मिळतो.
खरेतर हडसरची मुख्य वाट या त्याच्या शेजारच्या डोंगराला वळसा घालतच वर चढते. हा शेजारचा डोंगरदेखील हडसरचाच एक भाग आहे. या डोंगरात खोदलेल्या पाण्याच्या टाक्या याचाच एक भाग आहे. या छोटय़ा डोंगराचा आकारही अगदी कुणीतरी तासल्याप्रमाणे सरळ-गुळगुळीत. एखाद्या वाटोळा बिनीचा बुरुज वाटावा असा. या डोंगराला वळसा घेत उत्तर दिशेस आलो, की गडावर जाणारा पायऱ्यांचा राजमार्ग दिसतो.
तसा गडावर येण्यासाठी आणखी एक मार्ग आहे, पण तो थोडासा आव्हान झेलणाऱ्यांसाठीचा. दक्षिणेकडील ऐन कडय़ात स्थानिक गावक ऱ्यांनी लोखंडी मेखा ठोकत आणि खोबण्यांचा आधार देत एक कडय़ातली वाट तयार केली आहे. गवतकाडी आणि देवदर्शनासाठी वरखाली करणारे गावकरी या वाटेने दहा-वीस मिनिटात गडावर ये-जा करतात. ज्याची तयारी आहे अशांनी माहीतगाराच्या बरोबरीने एकदा या वाटेचाही अनुभव घ्यावा. ऐन कडय़ातून हे चढणे आणि चढताना वाटेत दिसणारी एक खोदीव गुहा पाहणे हे या वाटेवरचे आकर्षण! असो. आपण पहिल्या दोनपैकी कुठल्याही एका वाटेने गडाकडे घेऊन जाणाऱ्या खिंडीत यावे. हडसर, राजूर भागातील गावकरी या खिंडीतून पलीकडील मढ या बाजाराच्या गावी ये-जा करत असतात. दुर्गम भागातील रस्ते, पाऊलवाटा या अशाच डोंगरातून धावतात. या भागातील लोकांना आजही मुंबईला कसे जाता असे विचारले तर ते या डोंगररानातून नाणेघाटमार्गे उतरत कल्याण कसे गाठतो याचा प्रवास ऐकवतील.
खिंडीतील गडाचा राजमार्ग ऐन कडय़ात खोदलेला आहे. पण आज त्याची वाट लागली आहे. गडाच्या या वाटा दुर्गम करण्याचे पहिले श्रेय जाते इंग्रजांना. ते त्यांच्या राज्य वाचवण्याच्या भूमिकेतून, तर दुसरे श्रेय जाते ते आमच्याच माय-बाप सरकारला; ते त्यांचेच ‘स्वराज्य’ विस्मरणात घालवण्याच्या पराक्रमातून!
हडसरचा हा मार्ग आज जरी दुर्गम झालेला असला तरी गडाच्या प्रवेशद्वारात हजर झालो की, त्याचे हे कातळरूपच सौंदर्य बनून पुढय़ात येते. मूळच्या कातळातच पायऱ्या खोदून तयार केलेला मार्ग, त्याला अंगच्या कातळाचेच पुन्हा कठडे, पुढे या कातळात खोदून काढलेली दोन अत्यंत रेखीव प्रवेशद्वारे, त्यावरच्या त्याच्या त्या लयबद्ध कमानी, भोवतीचे बुरुज, आतमधील चौकीदारांच्या खोल्या ऊर्फ  अलंगा ..खोदकामातील ही सारी कला पाहताना एखाद्या लेण्यातून फिरल्याचाच भास होऊ लागतो.
या मार्गातील पहिल्या दरवाज्यानंतर दुसऱ्याकडे जातानाच्या वळणावर लगतच्या कठडय़ावर एक कोरीव दगड आहे. त्यावर केलेले नक्षीकाम पाहता हे शिल्प नक्कीच काहीतरी विशेष असावे असे वाटते.
महाराष्ट्रातील दुर्गसंपदेचा अभ्यास करायचे ठरवले तर हडसरच्या या प्रवेशद्वारांची दखल घ्यावीच लागेल. कोणी केले हे सारे! त्याचे उत्तर शोधण्यासाठी तब्बल दोन हजार वर्षे मागे, सातवाहनांच्या काळात जावे लागेल. हडसर ही त्यांचीच निर्मिती.
सातवाहनांची बाजारपेठ जुन्नर, तर या बाजारपेठेसाठी या राजवटीतच नाणेघाट या व्यापारी मार्गाची निर्मिती करण्यात आली. या व्यापारी मार्गाच्या संरक्षणासाठीच जीवधन, चावंड, हडसर, शिवनेरी या किल्ल्यांची निर्मिती करण्यात आली.
सातवाहन, यादव यांचे राज्य गडावर नांदले. पण त्यानंतर पारतंत्र्यात विस्मरणात गेलेला हा गड एकदम चर्चेत आला तो थेट इसवी सन १६३७ मध्ये. ज्या पाच किल्लयांच्या मदतीने शहाजीराजांनी स्वराज्य स्थापनेचा प्रयत्न केला, त्यामध्ये या हडसरचा समावेश होता. शिवकाळाबद्दल हा गड फारसा बोलत नाही. पण जयराम पिंडे यांच्या ‘पर्णालपर्वतग्रहणाख्यानम्’ या संस्कृत काव्यग्रंथातील पहिल्या अध्यायातील ३७व्या श्लोकात हडसरचा उल्लेख येतो. तो असा-
तथैव चामुण्डगिरी हरिश्चंद्रस्तथैव च।
महिषोप्यड्सरस्तावद गृहीतावतिसंगरात्।। ३७।।
चामुण्डगिरी (चावंड), हरिश्चंद्रगड, महिषगड (?) आणि हडसर हे किल्ले शिवाजीमहाराजांनी जिंकून घेतल्याचा हा उल्लेख आहे. बहुधा गडाचे ‘पर्वतगड’ हे नामकरणही याच काळात झालेले असावे. कृष्णाजी अनंत सभासद त्यांच्या बखरीमध्ये या गडाचा उल्लेख पर्वतगड असाच करतात. मुघलांच्या नोंदीत या गडाचा उल्लेख ‘हरसूल’ असा येतो. पेशवाईत मात्र हा गड मराठय़ांकडेच असल्याच्या स्पष्ट नोंदी आहेत. अगदी तो शेवटच्या मराठे-इंग्रज युद्धापर्यंत त्यांच्याकडेच होता. इसवी सन १८१८ च्या या युध्दावेळी मेजर एल्ड्रिजने जुन्नर जिंकल्यावर जुन्नरचा किल्लेदार हडसरवर आश्रयाला आला होता. मग इंग्रजांच्या एका तुकडीने या गडाला वेढा घातला आणि २५ एप्रिल १८१८ रोजी या गडाचा हा इतिहासकाळ संपुष्टात आला.
गडाचा हा सारा इतिहास आठवतच आतमध्ये शिरावे. आत शिरताच जमिनीलगत खोदलेले टाके दिसते. याच्या काठावर एक छोटेसे शिवलिंग कोरलेले आहे. पावसाळय़ात टाक्यातून उतू जाणारे पाणी या शिवलिंगावर सतत अभिषेक करत असते.
आत शिरताच सुरुवातीला सर्वत्र फक्त माजलेले गवतच दिसते. या गवतामधूनच हिंडताना मग किल्लेदाराचा वाडा, शिबंदीची घरटी, मंदिरे, पाण्याची तळी असे एकेक दिसू लागते. त्रिकोणी आकाराच्या या गडाला सर्व बाजूने तुटलेले कडे असल्याने तटबंदीची गरज केवळ पश्चिमेकडे होती, ती पूर्ण केलेली आहे. या पश्चिम अंगानेच गड हिंडू लागलो की, अगदी सर्वप्रथम कडय़ालगत जमिनीच्या पोटात खोदलेला एक मार्ग दिसतो. वळण घेत गेलेला हा मार्ग एका चौकात येतो. याच्या पुढय़ात तीन लेण्या खोदलेल्या आहेत. या प्रत्येक लेणीत आतमध्ये पुन्हा काही खोल्या खोदलेल्या आहेत. पण या प्रत्येक दालनाचे दरवाजे मात्र छोटेसे चौकोनी आकाराचे ठेवलेले आहेत. तसेच या खोल्याही आतमध्ये खोलवर खोदलेल्या आहेत. याअर्थी ही रचना राहण्यासाठी नसून बहुधा धान्य कोठारांसाठी असावी.
पण सध्यातरी या लेण्यांत काळोखच भरून राहिलेला आहे. या अंधारात ती कोठारे पाहण्याचा प्रयत्न केला असता त्या कातळावरून सरडय़ाच्या आकारातील मोठाल्या पाली फिरताना दिसल्या आणि एकक्षण अंगावर काटाच उमटला.
इथेच एक गोष्ट सांगून टाकाविशी वाटते. या अशा अनगड गडांवरून फिरताना चित्त सतत सावध असू द्यावे. या प्रवासात अनेकदा सरपटणाऱ्या अनाहूत मित्रांची गाठभेट होण्याचा धोका असतो. तेव्हा डोंगरदऱ्यातून हिंडण्याची हौस ज्यांना जोपासायची आहे, त्यांनी एकतर अशा सरपटणाऱ्या प्राण्यांची माहिती, यातही किमान विषारी सापांची ओळख करून घेणे महत्त्वाचे. न होवो, पण वाईट प्रसंग उद्भवलाच तर किमान प्रथमोपचार तरी माहित असायला हवा. अन्यथा, केवळ भावनेवर चालणारे गिरिभ्रमण अनेकदा स्वत: बरोबर अन्य सहकाऱ्यांनाही अडचणीत आणू शकते.
ही कोठारे पाहात गडाच्या मध्यावर आलो की एक मोठे तळे दिसते. या तळय़ाच्या काठावरच एक अनामिक स्मारक संशोधनाच्या प्रतीक्षेत उभे आहे.
पावसाळय़ात आले, की सारा गड हिरवाईने माखून जातो. श्रावण-भाद्रपदापर्यंत त्यावर सर्वत्र सोनकीच्या फुलांची नक्षी उमटते. तेरडा, सोनकी, पंदांच्या या फुलांनी तळय़ांचे काठ सुंदर होतात. उन-पाऊस-ढगांच्या खेळात ही रानफुले पुन्हा पुन्हा नवी होत सृष्टीला चैतन्य बहाल करत असतात.
तळय़ाच्या काठावरच पुढे काही अंतरावरच महादेवाचे एक मंदिर आहे. गडावर मुक्कामाची वेळ आली तर हे मंदिर सोईचे पडते. महादेवाच्या या राऊळी आपल्या आधी गणेश, हनुमान आणि विष्णुभक्त गरुडही मुक्कामाला असतात. या तिन्ही देवतांच्या रेखीव मूर्ती पाहण्यासारख्या आहेत.
या हिरवाईतूनच चिखलमातीची एक वाट गडाच्या पूर्व टोकापर्यंत जाते. या टोकावर बांधलेला एक बुरुज निष्ठेने या दिशेचे संरक्षण करत असतो.
महादेव मंदिराला लागूनच गवताने भरलेली एक छोटी टेकडी आहे. निलगिरीचीही असंख्य झाडे आहेत. आमच्या सुमार वृक्षारोपणाची ही तऱ्हा! कधी निलगिरी, नाही तर कधी केवळ साग; अशी एकाच पद्धतीची झाडे लावायची आणि डोके न वापरता काम केल्याचा आव आणायचा. ही टेकडी म्हणजे गडाचा बालेकिल्ला! पण स्थानिक देवतांचे शेंदूर लावलेले चार दगड वगळता बालेकिल्ला म्हणावा अशा कुठल्याही खाणाखुणा इथे नाहीत. नाही म्हणायला बालेकिल्ल्याची चौफेर फिरणारी नजर या उंच माथ्याला आहे. यातूनच मग केवळ हडसर नाही, तर सारा जुन्नर प्रांत नजरेच्या टापूत येतो. उंच-सखल डोंगर-दऱ्यांचा भाग, पिंपळगाव जोगे-माणिकडोहचे निळेशार जलाशय, अनेक छोटी-मोठी खेडी, त्यांच्याकडे धावणारे रस्ते हे सारे मनाचा गुंता वाढवत जातात. या साऱ्यांमध्ये शिवनेरी, चावंड, जीवधन, निमगिरी, हाटकेश्वरची गिरिशिखरे ठळकपणे दिसतात आणि नकळतपणे त्यावेळच्या स्वराज्याची आखणी मनात सुरू होते. या एका दर्शनातूनही राष्ट्रप्रेमाची भावना मनी फडफडू लागते. मग याच जाणिवेपाशी इंग्रजांनी गडकोटांच्या तोडलेल्या वाटांचे उत्तरही सापडते. पण तरीही एक प्रश्न तसाच उरतो की, मग इंग्रजांना असलेली ही राष्ट्रप्रेमाची जाणीव आमच्या मायबाप सरकारच्या ठायी का नाही?
abhijit.belhekar@expressindia.com

stealing liquor, liquor Kalyan,
कल्याण : महागड्या मद्याच्या बाटल्यांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री
AAP MP Sanjay Singh
“केजरीवालांचा तुरुंगात छळ होतोय”, आप खासदार संजय सिंहांचा आरोप; म्हणाले, “त्यांच्या पत्नीलाही…”
Kolhapur Police arrest gang selling fake notes
बनावट नोटांची छपाई, विक्री करणारी टोळी कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात; म्होरक्याचे नेत्यांशी लागेबांधे असल्याची चर्चा
Tipeshwar Sanctuary
VIDEO : टिपेश्वर अभयारण्यात वाघच नाही, तर रानकुत्र्यांसह ‘या’ वन्यप्राण्यांना पर्यटकांची पसंती