24 November 2017

News Flash

दुर्ग इतिहासाला जोडणारी पालखी

चिमाजी आप्पांनी १७३९ साली किल्ले वसईची मोहीम विजयी केली आणि शतकानुशतके पोर्तुगीजांच्या जुलमी राजवटीखाली

संकेत सातोपे - sanket.satope@expressindia.com | Updated: January 23, 2013 12:51 PM

चिमाजी आप्पांनी १७३९ साली किल्ले वसईची मोहीम विजयी केली आणि शतकानुशतके पोर्तुगीजांच्या जुलमी राजवटीखाली खितपत पडलेल्या ठाणे- वसईकरांनी मोकळा श्वास घेतला़  या मोहिमेदरम्यान वसई आणि परिसरात चिमाजींनी अनेक देवळे बांधली़  या काळात बांधण्यात आलेली अनेक मंदिरे जशी आजही या परिसरात दिमाखाने उभी आहेत, अनेक धार्मिक परंपराही कालौघातून मार्गक्रमणा करीत अविरतपणे सुरू आहेत़  या पैकीच एक वसई किल्ला ते केळवे जंजिरा अशी मार्गक्रमणा करणारी ‘वज्रेश्वरी देवी’ची पालखी!
नुकत्याच पार पडलेल्या या पालखी सोहळ्याच्या आयोजनाचा मान या वर्षी वसईतील उमेळे गावाला देण्यात आला होता़   गावातील महिला- मुले, बाल- वृद्ध असे सगळेच नऊवारी- सदरे- भगवे फेटे अशा मराठमोळ्या पोषाखात या सोहळ्यात सहभागी झाले होत़े  फटाक्यांची आतषबाजी, ढोलचा गजर अशा वातावरणात सुमारे सात तास पालखीची मिरवणूक उमेळे गावात चालली़  आपल्या गावाच्या इतिहास जोपसनेचे कार्य आपण करतो आहोत़  या एकाच भावनेने आबालवृद्ध भारवलेले होता़
उमेळे गावातील ग्रामस्थांनी पालखीसोबत टाळ- मृदंगांच्या साथीने गायलेली पारंपरिक भजने आणि नालासोपाऱ्यातील ‘वीर शिवबा’ संस्थेने चित्त थरारक प्रात्यक्षिकेही सादर केली.  तलवार-भाला-दांडपट्टे-लाठीकाठी अशा पारंपरिक युद्ध प्रकारांनी वीर शिवबाच्या शिलेदारांनी उपस्थितांची मनं जिंकून घेतली़  
चिमाजी आप्पांच्या वसई मोहिमेत उमेळे गावातील शिलेदारांचे मोठे योगदान आह़े  प्रत्यक्ष रणसंग्राम आणि हेरगिरी या दोन्ही गोष्टींत उमेळे गावच्या वीरांनी वसई मोहिमेत भाग घेतल्याचे स्पष्ट उल्लेख अनेक ऐतिहासिक कागदपत्रांतून सापडतात़  त्यामुळेच पालखीचा मान उमेळेला देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे ‘किल्ले वसई मोहीम’चे प्रमुख आणि इतिहास अभ्यासक श्रीदत्त राऊत यांनी सांगितल़े  वसई जिंकल्यानंतर वसईच्या किल्ल्यातील वज्रेश्वरी देवीचे मंदिर ते केळवे जंजिरा असा वार्षिक पालखी उत्सव सुरू करण्यात आला़  १७३९ साली सुरू करण्यात आलेला हा उत्सव सुमारे शंभर वष्रे अबाधितपणे मोठय़ा प्रमाणावर सुरू राहिला़  परंतु, ब्रिटिशांच्या काळात भारतीय समाजामध्ये आलेल्या सार्वत्रिक मरगळीत हा उत्सवही क्षीण झाला होता़  पुढे श्रीदत्तने किल्ले वसई मोहीम सुरू करून वसईच्या पारंपरिक, धार्मिक आणि ऐतिहासिक पुनरुत्थानाला हात घातला़  त्यामुळे २००३ नंतर पुन्हा या पालखी सोहळ्यात चैतन्य भरू लागल़े  आता वसई आणि केळवे अशा दोन टप्प्यात सलग दोन दिवस हा पालखी सोहळा साजरा करण्यात येतो़  दोन्ही ठिकाणच्या गावांना अथवा संस्थेला आलटून- पालटून पालखीचा मान देण्यात येतो़  त्यामुळे दोन्ही ठिकाणच्या ग्रामस्थांसाठी वर्षांतले हे दोन दिवस निखळ पारंपरिक आणि ऐतिहासिक अनुभव देणारे असतात़     

First Published on January 23, 2013 12:51 pm

Web Title: history of fort connecting to palanquin
टॅग Fort,Trek It