डोंगर भटक्यांच्या दुनियेत आनंद पाळंदे हे नाव एखाद्या गिरिदुर्गाप्रमाणे घेतले जाते. गेली अनेक वर्षे ते या डोंगरदऱ्यांचे आव्हान घेत सह्य़ाद्री फिरत आहेत. डोंगर यात्रांच्या त्यांच्या या अनुभवातूनच कधी १९८६ साली एका दुर्गसाहित्याने आकार घेतला होता. भटक्यांच्या पसंतीस आलेले हे साहित्य पुढे मात्र मिळेनासे झाले होते. अशाच या दुर्मिळ बनलेल्या दुर्गसाहित्याचा नवा चेहरा नुकताच प्रसिद्ध झाला आणि सह्य़ाद्रीच्या या वाटांना जणू पुन्हा नवे धुमारे फुटले. डोंगर दऱ्यांच्या प्रेमात, त्यांच्या विश्वात आपले पाय आणि डोळे अडकविणाऱ्या या पुस्तकाचे नाव काहीसे असेच ‘गिरिदुर्गाच्या पहाऱ्यातून’!
दीडशे पानांच्या या पुस्तकात सह्य़ाद्री आणि तिच्या लगतच्या पंचवीस आडवाटा आपल्या पुढय़ात उलगडत जातात. लोहगड विसापूरचे भ्रमण, अलिबागचा परिसर, कर्नाळ्याचा पक्षी डोंगर, कऱ्हेपठारीचा मल्हारगड, माणदेशीचे संतोष-वारुगड, चंदन-वंदनची दुर्गजोडी, कात्रज ते सिंहगड ट्रेक, भीमा ते इंद्रायणी दरम्यानचे गिरिभ्रमण, जावळीतील आडवाटा, सिद्धगडचा भवताल, कांगोरी-चंद्रगडाची वाट, कुकडीचे खोरे, हरिश्चंद्रगडाचा परिसर, भंडारदऱ्याचा भवताल, सातमाळ रांगेतील गडकोट, सिंहगड ते रायगड पदभ्रमण, मावळातील दऱ्या-खोऱ्या, अजिंठाची डोंगररांग, असा सह्य़ाद्रीच्या अंगाखांद्यालगचा मोठा भाग उलगडत जातो.
या प्रत्येक प्रकरणातून त्या त्या प्रदेशातील भूगोल-इतिहास तर आहेच, पण या आडवाटांवरील सौंदर्यस्थळेही पाळंदे यांनी सांगितली आहेत. दुर्ग, लेण्या, मंदिरे, जंगले, देवराया, नद्या, नाले अशी या भटकंतीची अनेक रूपे यातून पुढय़ात येतात. या माहितीला जागोजागी उपयुक्त नकाशे, स्थलदर्शक छायाचित्रांचीही जोड दिलेली आहे. भटकण्याची हौस असणाऱ्यांनी केवळ पायपीट करून भागत नाही. या श्रमाला अशी वाचनाची, बुद्धीची, शोधाची, ध्यासाची जोड दिली तर प्रत्येक डोंगर यात्रा आनंदी होते.
(गिरिदुर्गाच्या पहाऱ्यातून, उत्कर्ष प्रकाशन, संपर्क – ०२०-२५५३७९५८).