आंतरराष्ट्रीय स्तरावरील गाजलेले गिर्यारोहण माहितीपटाचे दिग्दर्शक डेव्हिड ब्रेशर्स, गिर्यारोहण विषयक दर्जेदार पुस्तकांचे लेखक जिम पेरीन आणि अल्पाईन पद्धतीच्या गिर्यारोहणात जगभरात नावलौकिक कमावलेले गिर्यारोहण प्रशिक्षक माकरे प्रेझेलाय् अशा तीन वेगवेगळ्या दिग्गज गिर्यारोहकांचे अनुभव एकाच कार्यक्रमात ऐकण्याचा योग मुंबईत १५ व १६ जानेवारी रोजी डोंगरवेडय़ांना लाभणार आहे. हिमालयन क्लबच्या वार्षिक कार्यक्रमासाठी जागतिक कीर्तीचे हे गिर्यारोहक भारतात येणार असून येथील गिर्यारोहकांशी संवाद साधणार आहेत.
‘गार्डियन’सारख्या आंतरराष्ट्रीय दैनिकात गिर्यारोहणावर लेखन करणाऱ्या गिर्यारोहक जिम पेरीन यांच्या ‘शिप्टन अँड टिलमन’ या पुस्तकाला हिमालयन क्लबतर्फे दिला जाणारा ‘केकू नवरोजी’ पुरस्कार यावर्षी देण्यात येणार आहे. जिम यांनी आजवर गिर्यारोहणाच्या लिखाणाच्या निमित्ताने प्रचंड भटकंती केली आहे. त्यांच्या पुरस्कारप्राप्त पुस्तकाच्या संकल्पनेवर ते आपल्या सादरीकरणातून प्रकाश टाकतील. माकरे प्रेझलाय् यांनी आजवर हिमालय, काराकोरम पर्वतराजीसह जगभरात अल्पाईन पद्धतीच्या आरोहणात अनेक विक्रम केले आहेत. कांचनगंगा, नीळकंठ पश्चिम बाजू, चोयू, के-७ अशा अवघड शिखरांवर त्यांनी यशस्वी आरोहण केले आहे.
त्याचबरोबर ते गिर्यारोहकांचे एक उत्तम शिक्षक देखील आहेत. आपल्या सादरीकरणात ते त्यांच्या आरोहणाचे अनुभव तर मांडतीलच, पण त्याचबरोबर तरुण गिर्यारोहकांची शाळाही घेणार आहेत. अमेरिकेतील डेव्हिड ब्रेशर्स हे गिर्यारोहक तर आहेतच, पण त्याचबरोबर त्यांनी गिर्यारोहणावरील अनेक माहितीपट बनविले आहेत. आजवर दोनवेळा एव्हरेस्ट शिखर सर करणारे डेव्हिड हे एव्हरेस्टच्या माथ्यावरुन एव्हरेस्टचे थेट प्रत्यक्ष चित्रीकरण प्रक्षेपित करणारे पहिले कॅमेरामन आहेत. नॅशनल जिऑग्राफीवर दर्जेदार माहितीपट सादर करणाऱ्या डेव्हिड यांनी ‘सेव्हन इयर्स इन तिबेट’ आणि ‘क्लिफ हँगर’ सारख्या चित्रपटांसाठी देखील काम केले आहे.
आपल्या सादरीकरणात ते हिमालयात गिर्यारोहणावरील माहितीपट, चित्रपट बनविण्याचे आपले अनुभव मांडतील. ज्येष्ठ गिर्यारोहक व लेखक हरिश कपाडिया हे भारत – बर्मा सीमेवरील आजवर फारशा लिहिल्या-बोलल्या न गेलेल्या विषयावर, तेथील डोंगरवाटांबद्दल सादरीकरण करणार आहेत.
या दीड दिवसाच्या कार्यक्रमात दिव्येष मुनी, प्रदीप साहू यांची सादरीकरणंदेखील होणार आहेत. दिनांक १५ व १६ फेब्रुवारी रोजी एअर इंडिया सभागृहात हा कार्यक्रम होणार असून कार्यक्रमासाठी पूर्वनोंदणी आवश्यक आहे. हिमालयन क्लब संपर्क -०२२ २४९१२८२९