11समुद्रकिनारा आणि निसर्गरम्य डोंगर यांची सांगड भटक्यांच्या पावलांना कायमच सुखावते. अलिबागच्या रहाळात असाच एक निसर्गरम्य डोंगर सामान्य पर्यटकांपासून ते डोंगरदरीत भटकणाऱ्यांपर्यंत साऱ्यांना साद घालत असतो. कनकेश्वर नावाच्या याच डोंगरवाटेवर आजची भ्रमंती!
अलिबाग! पर्यटक, निसर्ग भटक्यांची आवडती जागा. अलिबागच्या अष्टागर परिसरात जसा शांत-नितळ समुद्रकिनारा आणि निसर्गसुंदर खेडी आहेत, त्याचप्रमाणे या देखाव्यात एक-दोन ठिकाणी डोंगरझाडीचे उंचवटेही आहेत. यातल्याच एका डोंगररांगेत अलिबाग अष्टागरचे दैवत दडले आहे- कनकेश्वर.
अलिबागहून रेवसकडे जी वाट जाते या वाटेलगतच कनकेश्वरचा डोंगर. इथे यायचे असेल तर रेवस रस्त्यावरील मापगाव फाटय़ावरून आत वळावे. हे मापगाव कनकेश्वर डोंगराच्या पायथ्याचे गाव. अलिबागहून मापगावपर्यंतचे अंतर १३ किलोमीटर. या गावातूनच कनकेश्वराकडे जाणारा पायरी मार्ग आहे. तसे या गिरिस्थानी जाण्यासाठी डोंगराच्या चारही बाजूंनी मार्ग आहेत. कुठल्याही बाजूने गेलो तरी डोंगर चढून जावे लागते. पण त्यातही मापगावकडील हा मार्ग सोपा आणि वाहता आहे. गाव संपले की लगेचच हा कनकेश्वराचा डोंगर सुरू होतो. याच्या पायथ्यापासूनच थळच्या ‘आरसीएफ’ कारखान्याचा खासगी रेल्वेमार्ग जातो. आपल्याला एक क्षण उगीचच वाटते, ‘कोकण रेल्वे’ इथे कुठे आली!
कनकेश्वर डोंगराची उंची ३८४ मीटर. सात-आठशे पायऱ्यांचा हा मार्ग. सुरुवातीची चढण अंगावर येणारी, पण पुढे थोडय़ाच वेळात सुरू होणारी झाडी हा सारा त्रास घालवत एका वेगळय़ाच विश्वात घेऊन जाते. आंबा, साग, सावर, हिरडा, बेहडा, जांभूळ, पांगारा आणि अशीच कितीतरी झाडे. पुन्हा त्या जोडीने सर्वत्र करवंदीची दाट जाळी. हे असे अचानक जंगल पाहिल्यावर आपण कोकणात आहोत, की सह्याद्रीच्या ऐन घाटमाथ्यावर हा प्रश्न पडतो. वृक्षांची ही शीतल छाया आणि जोडीला नीरव शांतता आणि त्यातून कानी येणारे विविध पक्ष्यांचे कुजन, याने या वाटेवर हरवायला होते.
दुतर्फा झाडीतून ही पायऱ्यांची वाट जात असते. मग त्यावरच गोसावींची समाधी, नागोबाचा टप्पा, जांभळीचा टेप, गायमांड, राऊताचे बोडण, पालेश्वर मंदिर असे एकेक निसर्गथांबे अनेक कथा-आख्यायिका घेऊन येतात. या प्रत्येक थांब्यावर देवस्थानच्या वतीने आणि उर्वरित अंतर दिल्याने आपले चढाईचे गणितही सुटत असते.
कनकेश्वर हे आंग्य्रांचे कुलदैवत! आंग्य्रांनी त्यासाठी पायथ्याचे सागाव नावाचे खेडे या देवस्थानला दत्तक म्हणून दिले. मापगावकडून कनकेश्वरकडे जाणारी ही निसर्गवाट इसवी सन १७६४ मध्ये सरदार राघोजी आंग्रे यांचे दिवाण गोविंद रेवादास यांनी तयार केली. या वाटेवरील एका पायरीवर उजव्या पावलाचा एक ठसा आहे. त्याला ‘देवाची पायरी’ म्हणतात. आंग्य्रांच्या दिवाणांचे हे पुण्यकर्म पाहून जणू देवानेही या मार्गावर आपले पाऊल उमटवले, अशी या पायरीमागची श्रद्धा! कथा काहीही असो, पण यामुळे या निसर्गवाटेला चैतन्य प्राप्त होते. गाईच्या मूर्तीचा गायमांड, फुलांऐवजी झाडांचा पाला वाहिला जाणारा पालेश्वर, त्याच्या शेजारचेच ते कलात्मक ब्रह्मकुंड असे हे एकेक स्थळ पाहात तासा-दोन तासात आपण कनकेश्वराच्या दारी येऊन ठेपतो.
रम्य स्थान अती। तपोवन शांती।।
वसे डोंगर माथ्यावरती। श्री क्षेत्र कनकेश्वर।।
दुतर्फा असलेल्या गर्द झाडीच्या कमानीतून कनकेश्वराचे हे अचानक दर्शन घडते. भोवतालच्या झाडीत हे प्राचीन कोरीव क्षेत्र तेवढेच शांतपणे पहुडलेले असते. गच्च रानात एखाद्या मोकळय़ा जागी कुणाचे लक्ष नाही असे पाहात नाचणारा भरजरी मोर जसा अचानक दिसावा किंवा हिरव्यागर्द पाकळय़ांच्या मांदियाळीतून रातोरात एखादे कमळाचे फूल जसे उमलून यावे, त्याप्रमाणे कनकेश्वराचे हे सौंदर्य पुढय़ात साकारते.
गर्द राईत बुडालेला डोंगर आणि त्याच्या माथ्यावर हे रम्य, शांत स्थळ! पाण्याने भरलेली एक विस्तीर्ण पुष्करणी (हिला स्थानिक भाषेत पोखरण म्हणतात. ३१.०९ मीटर या पुष्करणीचा व्यास) आणि तिच्या पश्चिम काठावर हे प्राचीन कोरीव शिवालय. पहिला बराच वेळ हा भवतालचा निसर्ग आणि मंदिराचे कोरीव सौंदर्य पाहण्यात बुडतो.
पश्चिमाभिमुख असे हे मंदिर अकराव्या शतकातील. सभामंडप, अंतराळ, गर्भगृह आणि नागर पद्धतीचे शिखर अशी याची रचना. यातील बदल केलेला सभामंडप सोडला तर अन्य सर्व भाग मूळचा. तारकाकृती विन्यास असलेल्या या मंदिराची रचना त्याच्या त्या असंख्य कोनांच्या-घडय़ांच्या भिंतींमध्ये गुंतवून टाकते. जमिनीपासून निघणारे हे कोन थेट शिखरापर्यंत सरळ रेषेत जातात. एकूण २८ कोन, त्या प्रत्येक घडीदरम्यानच शिल्पकाम उठवलेले. यात वानरांच्या माळा आहेत. हत्तीच्या जोडय़ा आहेत. ध्यानस्थ योग्यांच्या प्रतिमा आहेत. या साऱ्या देखाव्यात जागोजागी कलात्मक देवडय़ा कोरल्या असून, त्यामध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश, गायत्री, सावित्री, सरस्वती, भैरव, तांडवनृत्यमग्न शंकर, गणेश, कृष्ण आदी देवतांची शिल्पे विसावली आहेत. पायापासून शिखरापर्यंत केलेल्या या शिल्पांकनामध्येच हे शिखर चढणारी एक मानवी आकृतीही कोरली आहे. हे शिल्प अवश्य पाहावे. ते तयार करतानाच मूळच्या दगडातून त्याच्या पायाभोवती एक वाळा कोरला आहे. सुटा, हलता असलेला हा वाळा जणुकाही ते शिल्प तयार झाल्यावर त्याच्या पायातच कुणीतरी घातल्यासारखा वाटतो. कलाकाराचे हे कसब थक्क करून सोडते.
मंदिराचा हा बाह्य़ देखावा पाहून झाला की आत वळावे. नवा सभामंडप ओलांडत अंतराळात शिरावे तो प्राचीन कोरीव काम समोर नाचू लागते. अंतराळाचे आयताकृती छत विविध भौमितिक आकृत्यांनी सजवले आहे. या वर्तुळाकृती नक्षीच्या दोन्ही बाजूस हाती सर्प घेतलेल्या गंधर्वमूर्ती अवकाशी विहार करत असतात. गर्भगृहाचे प्रवेशद्वार तर या शिल्पकामाने निव्वळ जडवले आहे. द्वारपाल, गणेशपट्टी, द्वारशाखा असे बरेच काही. यातील द्वारशाखांमध्ये सर्वात आतील शाखेवर पुष्पमाला हाती घेतलेले गंधर्व, मधल्या शाखेवर वादकांचा मेळा, तर बाह्य़ शाखेवर देवप्रतिमा कोरल्या आहेत. दोन्ही बाजूस द्वारपाल उभे आहेत. त्याखाली पुन्हा देवप्रतिमा, चामरधारी सेवक. तळाशी मध्यभागी कीर्तिमुख, दोन्ही बाजूस व्याघ्रमुख. प्रवेशद्वाराच्या माथ्यावर पुष्पमाला, यक्षगंधर्वाचे दोन थर आणि त्यामध्ये गणेशपट्टी असा हा प्रवेशद्वाराचा देखावा आहे.
प्रवेशद्वाराचे हे सौंदर्य पाहात चार पायऱ्या उतरत आत जावे तो शिवलिंग आणि त्यावरील चांदीच्या मुखवटय़ात कनकेश्वर स्थापन झालेला दिसतो. चांदीचा तो मुखवटा दूर केला की, त्याखाली पाण्याने भरलेला एक खळगा दिसतो. हात घातला तर त्यात पाच उंचवटे लागतात. हाच तो पंचलिंग महादेव कनकेश्वर.
या साऱ्या परिसरात तशी मनुष्य-भाविकांची वर्दळ बेताचीच असल्याने भोवतालचा निसर्ग आणि शांतता यामध्ये इथे खराखुऱ्या दैवी सान्निध्याचा अनुभव येतो. मध्येच उमटणारा घंटेचा नाद त्या साऱ्या भवतालात चैतन्य निर्माण करत असतो. कनकेश्वराचे राऊळ पाहून माघारी फिरावे. या डोंगरावरून पश्चिमेचा देखावा पुढय़ात उभा असतो. अगदी रेवसच्या खाडीपासून ते अलिबागपर्यंतचा. दहा-पंधरा किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा, त्या अलीकडचा नारळी-पोफळीचा भाग साऱ्या अष्टागरचे सौंदर्य दाखवत असतो. कुलाबा आणि समोरचे खांदेरी-उंदेरीचे ते जलदुर्ग एखाद्या छोटय़ाशा ठिपक्याप्रमाणे भासतात. संध्याकाळ होत आली असेल तर या साऱ्या भागावर मावळतीचे रंग त्यांचा कैफ चढवू लागतात. कुठेतरी दूरवर समुद्राच्या क्षितिजालगत टेकलेले आकाश या समुद्रालाच समांतर होत आपल्यापर्यंत पोहोचते. आकाशीच्या रंगांचे प्रतिबिंब समुद्रावर उमटू लागते. खाली किनाऱ्यालगतची छोटी-छोटी गावे आणि दर्यावर गेलेली जहाजे चमचमू लागतात. मावळतीच्या या सोनेरी रंगात हा डोंगरही उजळून निघतो आणि यातच मग त्याच्या ‘कनक+ईश्वर’चा अर्थही उलगडतो.

 

Mumbai Coastal Road, Cracks Appear, Controversy Over Traffic Flow, Pedestrian Walkway, bmc, hajiali Pedestrian subway, Pedestrian subway flood in mumbai,
मुंबई : सागरी किनारा मार्गावरील मार्गिकांच्या संख्येवरून नवा वाद, आरोपाचे अधिकाऱ्यांकडून खंडन
vasai fort, compound fencing on vasai fort
वसई किल्ल्याभोवती संरक्षक जाळ्यांचे कुंपण, गैरप्रकार रोखण्यासाठी पुरातत्व विभागाच्या उपाययोजना
Traffic Causes Jam, continuous Holidays, Tourists Head, Lonavala, Mumbai Pune Expressway, marathi news,
सलग सुट्ट्यांमुळे द्रुतगती मार्गावर कोंडी, उन्हाळ्यामुळे मुंबईतील पर्यटक लोणावळ्यात दाखल
village maps
गाव नकाशे नसल्याने मच्छीमारांचे अस्तित्व धोक्यात, पंचवीस वर्षांपासून प्रतीक्षा

* अलिबागहून १३ किलोमीटरवर
* दाट झाडीने बहरलेला निसर्गरम्य डोंगर
* विविध प्रजातींच्या दुर्मिळ वनस्पतीचा आढळ
* पक्षी निरीक्षणासाठी चांगली जागा
* शांत, रम्य परिसर, प्राचीन मंदिर