30 March 2020

News Flash

‘कात्रज ते सिंहगड’ : रात्रीचे गिरिभ्रमण!

ट्रेकिंगच्या विश्वात काही स्थळांभोवतीच्या वाटा या रात्री उमलतात. पुण्यातील कात्रज ते सिंहगड ही वाट अशीच, भटक्यांच्या पावलांना जागवणारी.

| April 9, 2015 12:11 pm

ट्रेकिंगच्या विश्वात काही स्थळांभोवतीच्या वाटा या रात्री उमलतात. पुण्यातील कात्रज ते सिंहगड ही वाट अशीच, भटक्यांच्या पावलांना जागवणारी. पौर्णिमेचा चंद्र गाठून या वाटेवर नित्य ये-जा करणारे अनेक भटके आहेत. या कात्रज-सिंहगड वाटेवरचेच हे रात्रीचे भ्रमण..
मी आत्तापर्यंत पन्हाळा ते विशाळगड हरिश्चंद्रगड, रायगड प्रदक्षिणा, राजगड प्रदक्षिणा असे काही ट्रेक केले आहेत. परंतु रात्रीचे गिर्यारोहण किंवा चालणे झाले नव्हते. याच दरम्यान शिवशौर्य संस्थेच्या ‘कात्रज ते सिंहगड नाईट ट्रेक’चे समजले आणि जाण्याचे ठरवले. रात्रीचे चालणे आणि रस्त्यात एकही गाव नसल्यामुळे भरपूर पाणी, टॉर्च, हेड टार्च, नीकॅप, इलेक्ट्रॉल, ग्लुकोज अशी जय्यत तयारी करून आम्ही या डोंगरवाटेवर निघालो.
दुपारी १२ वाजता आम्ही एकंदर चोवीसजणांनी मुंबई सोडली. पुढे पुणे, नाशिक, अलिबागहून आलेले आणखी वीसजण आमच्यात सामील झाले. आम्ही जुन्या पुणे-सातारा रस्त्याने कात्रजचा जुना बोगदा जिथे संपतो तिथे उतरलो. इथूनच या ट्रेकला सुरुवात होते. डोंगरधारेवरची ही वाट. झाडीतली. यामध्ये एकंदर तेरा टेकडय़ा आम्हाला चढायच्या-उतरावयाच्या होत्या. तर यातील चौदावी टेकडी ही प्रत्यक्ष सिंहगड डोंगर होती.
आम्ही पहिली टेकडी चढून पठारावर आलो तेव्हा आमच्या नेत्याने सांगितले की, कोणाला परत फिरावयाचे तर आताच परत जा खाली बस उभी आहे. नंतर पुढे काही पर्याय नाही, पण जसे सिंहगडावर स्वारी करून गेल्यावर सूर्याजी मालुसरे म्हणाले होते, ‘सर्व दोर कापले आहेत. तेव्हा आता उडी मारून किंवा लढून मरा!’ तसेच आम्हाला वाटले. पण आमच्यातील कुणीही माघारी न फिरता या तंगडतोड ट्रेकवर आपली पावले टाकली.
त्यादिवशी फाल्गुन शुद्ध प्रतिपदा असल्यामुळे चांदणे छान पडले होते, पण फाल्गुनातील रात्र असल्यामुळे चांदोबामामा उशिरा वर येणार होता. दाट काळोख.. अंगाला गार वारा झोंबू लागला. चालायला सुरुवात केली. एखादी टेकडी चढणे सोपे होते परंतु उतरणे खूपच कठीण जात होते. कारण उतारावरील माती सल व कोरडी असल्यामुळे पाय रोवून उभे राहणेही शक्य होत नव्हते. त्यामुळे चक्क घसरगुंडी करून उतरायला सुरुवात केली. आमच्या लहानपणी काही घसरगुंडी वगरे खेळळी नव्हते. हा आनंद आता या वयात घेतला.
टेकडी उतरल्यावर मध्ये पठारासारखा भाग येई तेथे जरा वेग वाढे. परत पुढची चढण आली की तो मंदावे. आम्ही हेडटॉर्च लावले असल्यामुळे दोन्ही हात रिकामे होते त्यामुळे टेकडी चढताना व उतरताना हाताने आधार घेणे सोपे जात होते. होता होईतो दहा वाजता चांदोबा दिसू लागला व त्याच्या प्रकाशामुळे आम्ही टॉर्च बंद करून टेकडीच्या पठारावर चालू लागलो. गार वारा होता पण चालून एवढा घाम आला होता की थंडपणा जाणवत नव्हता. चालता चालता पाच टेकडय़ा पार केल्या तेव्हा रात्रीचे साडेबारा वाजले होते आता थोडा वेळा थांबायचे ठरले. बरोबर आणलेला डबा इथेच खाल्ला.
साधारण पंधरा ते वीस मिनिटे विश्रांती घेतल्यावर पुन्हा पुढच्या चढाईला सुरुवात केली. जास्त वेळ थांबलो असतो तर रात्रीच्या गार वाऱ्यात सर्वानाच झोप लागली असती म्हणून लगेचच चालणे जरुरी होते. मजल दरमजल करीत पहाटे साडेतीनपर्यंत अकरा टेकडय़ा पार करून झाल्या होता. आता फक्त तीन उरल्या होत्या. परंतु त्याच टेकडय़ा उंच व दमछाक करणाऱ्या होत्या. त्यात उतारावरील माती सल असल्यामुळे उभे राहून उतरणे शक्य नव्हते. त्यामुळे आमच्यापकी बहुतेकजणांनी घसरगुंडीचा मार्ग पत्करला. असे करत करत तेरावी टेकडी पार केली आणि आम्ही सिंहगडाच्या पक्क्य़ा वाटेला येऊन मिळालो.
आता गडावर जाण्यासाठी डोंगरातून वा गाडी रस्त्याने असे दोन मार्ग होते. पण डोंगर चढायचे त्राण कुणामध्येही उरलेले नसल्यामुळे बहुतेकांनी गाडी रस्त्याने जाण्याचा धोपट मार्ग पसंत केला. अखेरची ही मजल-दरमजल करत गड माथ्यावर पोहोचलो. आता पहाट उजाडली होती. बरोबर सकाळचे साडेसहा वाजले आणि आम्ही साऱ्यांनीच शिवाजी महाराजांचा जय जयकार करत सिंहगडावर पाऊल टाकले. सिंहगडाच्या या दरवाजातून मागे पाहताना रात्रभराचा तो सारा मार्ग आणि त्यावरील थरार डोळय़ांपुढे चमकून गेला.
वसंत सहस्रबुद्धे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 9, 2015 12:11 pm

Web Title: katraj to sinhagad night trek
Next Stories
1 विराण वैराटगड
2 राजगडाची सुवेळा!
3 ट्रेक डायरी : ताडोबा जंगल सफारी
Just Now!
X