06 March 2021

News Flash

‘कोयने’ची निळाई

कधी स्वित्झर्लंडला गेलात का हो? मग युरोपियन लेक डेस्टीनेशन माहितीच असेल ना? चहूबाजूंनी हिरवाईने नटलेले सुंदर छोटे-मोठे तलाव, स्वच्छ नितळ पाणी, डोकावून पाहिलं तर अगदी

| June 25, 2014 08:46 am

कधी स्वित्झर्लंडला गेलात का हो? मग युरोपियन लेक डेस्टीनेशन माहितीच असेल ना? चहूबाजूंनी हिरवाईने नटलेले सुंदर छोटे-मोठे तलाव, स्वच्छ नितळ पाणी, डोकावून पाहिलं तर अगदी मासे काय खाताहेत, हेदेखील स्पष्ट दिसावं! अशा तलावामध्ये बोटीतून मस्तपैकी एक लांब फेरफटका मारायला मिळाला तर! त्यासाठी तुम्हाला स्वित्झर्लंडला जायची काय गरज, मीपण नव्हतो गेलो. कारण असेच एक लेक डेस्टीनेशन आपल्या सह्य़ाद्रीतच वसले आहे. कोयना धरणाचा अथांग जलसाठा म्हणजेच आपलं महाराष्ट्रीयन लेक डेस्टीनेशन !
सातारा शहरातून उजव्या बाजूला वळलो की निसर्गाने आपल्यासमोर काय वाढून ठेवले असेल याची कल्पना नसते. पावसाळ्यात निसर्गाची मुक्तहस्ते उधळण पाहायची असेल तर येथे एक वेळ भेट द्यायलाच हवी. कास पठाराकडे जाणारा डोंगरी भिंतीवरील गुळगुळीत डांबरी रस्ता, साद घालणाऱ्या सह्य़रांगा, दोन्ही बाजूंना जांभुळपुरा आणि कन्हेर धरणाचं फ्रेममध्ये जीव ओतणारं पाणी, आजूबाजूचा कुंद गारवा आणि निसर्गरम्य कास
तलाव पहिल्याच भेटीत प्रेमात पाडतो. पाठीराखा अजिंक्यतारा काही काळ साथ करतो. हा निसर्ग जगतच, वेडाच्या भरात आपण येऊन धडकतो ते टेटली या छोटाशा गावात. असाच गेल्यावर्षी पावसाळा संपता संपता मी येथे धडकलो. मनसोक्त फोटोग्राफीची इच्छा बाळगली होती, पण पावसाचा मुक्काम वाढला होता. रात्री वरूण राजाकडे छोटंसं गाऱ्हाणं टाकलं ‘‘बाबा रे, उद्या थोडीफार उघडीप दे!’’
पण पहाटेच्या गाढ साखरझोपेत तो दणकून बरसला. सगळा नूरच पालटला. पटापट आवरलं. वाफाळलेला चहा घेऊन कोयनेच्या काठावर बसलो. बामणोली गावात वनविभागाची परवानगी घेतली, बोट आली आणि सुरू झाला कोयनेच्या अथांग जलसागरातून किल्ले  वासोटय़ाचा अविस्मरणीय प्रवास! आता येथून पुढे दीड तास नो त्रास! पायाला त्रास न देता मनसोक्त अनुभवता येणारी निळाई. हिरवाईने नटलेला भन्नाट निसर्गराजा. बोट निघाली आणि अंगात उत्साह संचारल्यासारखं झालं. फोटोवेडय़ांना हा अँगल की तो असं होऊन गेलं. निसर्गवेडा शांतपणे इथली प्रत्येक फ्रेम डोळ्यात साठवण्याचा प्रयत्न करीत होता. दोन्ही बाजूनी घनदाट, हिरवीगार जंगलं आणि पाऊस नसेल तर पाण्यात पडणारे वृक्षवल्लीचं प्रतिबिंब म्हणजे एक विलक्षण सुखप्राप्तीच! आणि मला विचारालं तर या सुखप्राप्तीसाठी मी वासोटय़ाला असंख्य वेळा येऊ  शकतो, आताही बहुदा माझी सहावी वेळ असेल.
प्रत्येक वेळी काहीतरी नवीन अनुभव येत गेले. या प्रतिबिंबाची नवनवीन फ्रेम डोळ्यात साठवत गेलो. पण यावेळेस वरूण राजाच्या अवकृपेने मनासारखी फ्रेम काही गवसेना. बोटीचा अर्धा प्रवास सरताना, उजव्या बाजूला कोयनेचा पाट आत घुसलेला आढळतो. इथे कोयनेला कांदाटी येऊन मिळते. येथून आपण सरळ गेलं की चकदेव, पर्वत, महिमंडणगड डोंगरसखे भेटतात. आपला प्रवास वासोटय़ाकडे सुरू असतो. थोडय़ाच वेळात किल्ले वासोटा महापराक्रमी राजासारखं आपलं प्रतिबिंब जलाशयात न्याहाळत बसलेला दिसतो. हेच त्याचं होणारं पहिले दर्शन. इथेच बोटीचा प्रवास सार्थक झाल्यासारखा वाटतो. संपूर्ण ब्लॉगपोस्ट वाचण्यासाठी – http://trekventure. blogspot.in / 2014/02/Vasota-Nageshwar.html
    
    

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 25, 2014 8:46 am

Web Title: koyna dam
टॅग : Koyna Dam
Next Stories
1 राजमाची! बोरघाटाचा रक्षक
2 इथेच टाका तंबू !
3 ट्रेक डायरी: पावनखिंड – विशाळगड पदभ्रमण
Just Now!
X