‘युथ होस्टेल’च्या लडाख सायकल वारीसाठी नाव नोंदवले आणि अंगात जणू सायकलचे वारे शिरले. लगेचच भर पावसात ऐरोली ते वागळे इस्टेट असा घरापासून ऑफिसपर्यंत रोज पंचवीस किलोमीटर सायकल प्रवास सुरू झाला. सराव, अन्य तयारी झाली आणि विमानाने लेहला पोहोचलो.
लेहला पोहोचताच भूगोल, वातावरण सारे काही बदलले. मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचेपर्यंत श्वास किती महत्त्वाचा आहे हे कळायला लागले. हा पहिला दिवस विश्रांतीचा होता. दुसऱ्या दिवशी वातावरणाला जुळवून घेण्यासाठी जवळच्या एका उंच टेकडीवर स्तूप पाठवण्यासाठी जवळपास पाचशे पायऱ्या चढून गेलो. लडाखमध्ये ट्रेक करणे कठीण आहे हेही कळले. जगण्यासाठी पसा सर्वात महत्त्वाचा नसून ती जागा ‘ऑक्सिजन’ची असल्याचे इथे आले की नक्की कळते.
तिसऱ्या दिवशी सायकिलगच्या सरावासाठी बाहेर पडलो. लेह ते लामायुरू हा प्रवास. या वाटेत झंस्कार आणि सिंधू नदीमुळे आणि पाण्याच्या दोन रंगांचा विलक्षण संगम पाहायला मिळाला. चौथ्या दिवशी मुख्य मोहिमेला सुरुवात झाली. सुरुवातीचा प्रवास चंद्रावरून होता. डावीकडे चंद्र आणि उजवीकडेही चंद्र असताना मधून रस्त्यावरून वेगाने उतरण्यास सुरुवात केली. ‘मूनलँड’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या जागेवर अनेक छोटे छोटे डोंगर आहेत. उतारावर वेगाने उतरून क्षितिजाला स्पर्श करून आणि पुन्हा वळून वेगाने उतरून नदीकिनारी रस्त्यावर आलो. लांबून पाहिले तर ‘एम’ अक्षर दिसेल असे अनेक रस्ते होते. पाण्याच्या प्रवाहाला समांतर रस्त्याने जाताना एका बाजूला आधारासाठी एखादा डोंगर उभा होता. काहींचे शिखर खास सावली देण्यासाठी वाकलेले! काही डोंगर तर जणू लाद्यांचे अनेक तुकडे एकमेकांवर रचून बनवलेले. त्यांच्यात अनेक रूपे भासत होती.
अठरा कि.मी. अंतर उतारावर सहज उतरून गेलो. नदीकिनारी जेवून पुन्हा चढाईला सुरुवात केली. चढताना दमछाक होत असली, तरी घाम शरीरावर जमा होण्याआधीच निघून जात होता. ठरावीक वेळाने पाणी प्यावे लागत होते. थकवा कितीही अला तरी वाटेतील गावकऱ्यांचे ‘ज्यूल ज्यूल’ असे अभिवादन आणि भारतीय जवानांचे हास्य यांनी पुन्हा हुरूप येत होता. त्रेचाळीस कि.मी.चा प्रवास करून स्कुरबुचन गावी ‘जरदाळू’ने भरलेल्या एका झाडाशेजारी आम्ही तंबूत स्थिर झालो.
पाचव्या दिवशी स्कुरबुचन पासून ‘साकार-२’ पर्यंत असा प्रवास होता. लडाखच्या हवामानात उत्तीर्ण झालेले पक्षी सुरुवातीपासून दिसत होतेच. या पक्षी, प्राण्यांना कॅमेरात मात्र कैद करता येत नव्हते. पण ही कमी सुद्धा त्या डोंगरानीच पूर्ण केली. काही डोंगरांचा पृष्ठभाग हत्तीच्या कातडीसारखा जाड आणि अनेक सुरकुत्या असलेला राखाडी रंगाचा; तर काहींची पृष्ठभाग मगरीसारखा अणकुचीदार काटे असल्यासारखा दिसत होता. काही डोंगर कासवाप्रमाणे नदीत तोंड बुडवून प्रेक्षकांना पाठ दाखवत होते, तर काही सरडय़ांसारखे आकार असलेले डोंगर सूर्यप्रकाशानुसार रंग बदलत होते. गावातली लहान मुलं-मुली पसे, वही-पेन द्या असं लांबून ओरडायची. इथे प्रवास करणाऱ्यांनी छायाचित्रे घेताना ही सवय त्यांना लावून दिलेली आहे. ३८ कि.मी. प्रवासानंतर साकार-२ च्या नदीकिनारी ग्रामपंचायतीच्या शाळेत विश्रांती घेतली.
सहावा दिवस उजाडलाच तोच मुळी गडकोटांची आठवण करून देणारा. ‘साकार-२’ पासून तीन-चार कि.मी. अंतरावर चिक्तन या गावात टेकडीवरचा ‘चिक्तन खर’ हा किल्ला पाहताना महाराष्ट्राची आठवण झाली. किल्ल्याची बरीच पडझड झाली आहे. पण छोटे छोटे अनेक दगड रचून बनवलेली ही वास्तू लडाखसारख्या वातावरणात टिकून राहिली हेही एक आश्चर्यच. रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरवीगार शेते दिसू लागली. सायकल, बाइक किंवा कोणतेही चारचाकी वाहन जवानांच्या वाहनाला प्राधान्य देत होते, इतर वाहनांचीही काळजी घेत होते. एकही सिग्नल नसताना सगळं काही शिस्तीत आणि सुरळीत होतं. पसा पुढे करून सगळं ठीक होतं हा गरसमज आहे, हे इथे सहज समजत होतं. लष्करी छावण्या, त्यांच्यासाठीचे पूल यांची छायाचित्रे न घेण्याची जबाबदारी ओळखून पहाडारूपी जवानांना अभिवादन देत ‘हेनिसकोट’ गावी निसर्गरम्य परिसरातील बंगल्यात विसावलो. कुणीतरी आकाशात रांगोळीसाठी पांढरे ठिपके काढून ठेवले होते.
लडाखमध्येही असे अनेक ठिपके जोडूनच रस्ते तयार करण्याचे काम ‘बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन’ ने केले आहे. सुबक, सुंदर, स्वच्छ, टिकाऊ, सिमेंटचा एकच थर देऊन केलेले इथले रस्ते आमच्या सर्व कंत्राटदारांनी एकदा पाहावेत. कारण हेनिसकोट पासून ‘फोटू ला’ पर्यंतचा रस्ता पाहिला, तर त्यांना सलाम करावासा वाटतो. ‘फोटू ला’ म्हणजे श्रीनगर ते लेह दरम्यानची सर्वात उंचावरची िखड. ‘फोटू ला’ ते लामायुरू हा उतारावरचा प्रवास थकवा घालवतो. या प्रवासातच ‘सायकिलग’च्या या कष्टाचे सार्थक झाल्यासारखे वाटते.
निसर्ग हा सर्वोत्कृष्ट कलाकार आहे. त्याने बनवलेले वेगवेगळ्या रंगांचे डोंगर, फुलं, पाणी, पक्षी यांचे प्रदर्शन जिथे भरते ते भारतीय जवानांच्या सुरक्षेतले आणि ‘बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन’ जोडलेले कलादालन म्हणजे लडाख!