पण संस्थेने आपले गिर्यारोहण इथेच न थांबवता पुढेही चालू ठेवले आणि यातूनच २१ मार्च रोजी संस्था पुन्हा नव्या मोहिमेवर बाहेर पडत आहे- ‘ल्होत्से- एव्हरेस्ट’!
माऊंट ल्होत्से आणि एव्हरेस्ट, जगातली ही दोन सर्वोच्च शिखरे. एक क्रमांक एकचे तर दुसरे क्रमांक चारचे. अशा या दोन उत्तुंग शिखरांचा ‘गिरिप्रेमी’ने एकाच वेळी ध्यास घेतला आहे.
खरेतर गेल्याच वर्षी ‘एव्हरेस्ट’सारखे घवघवीत यश मिळवल्यावर सामान्यपणे पुढील काही वर्षे हारतुरे आणि सत्कार सोहळय़ात मश्गूल होता आले असते. पण ‘गिरिप्रेमी’ने ‘एव्हरेस्ट’च्या यशाचे हे भांडवल यासाठी न वापरता पुढील मोहिमेची ताकद म्हणून कामाला आणण्याचे ठरवले आणि एक नवा संकल्प सोडला.
जगात ८००० मीटरपेक्षा जास्त उंचीची १४ हिमशिखरे आहेत. ज्यांना गिर्यारोहणाच्या भाषेत ‘एट-थाऊजंडर्स’ असे म्हणतात. ही सर्वच्या सर्व १४ शिखर माथ्यांना स्पर्श करणारे आज जगात हाताच्या बोटांवर मोजता येतील एवढेच गिर्यारोहक आहेत. भारतात तर आजमितीस असा एकही गिर्यारोहक नाही. या १४ शिखरांनाच साद घालण्याचा विडा ‘गिरिप्रेमी’ने उचलला आहे. यातीलच एव्हरेस्टनंतरचे पुढचे पाऊल- ‘ल्होत्से’!
एव्हरेस्ट आणि ल्होत्से ही एकाच रांगेतील दोन शिखरे, यातील एव्हरेस्टविषयी तशी साऱ्यांनाच माहिती आहे. पण त्या सर्वोच्च शिखराला खेटूनच धाकटय़ा भावाप्रमाणे उभ्या असलेल्या ल्होत्सेविषयी गिर्यारोहणविश्वालाही फारशी माहिती नाही.
जगातील चार क्रमांकाचे हे सर्वोच्च शिखर! एव्हरेस्ट, के-२, कांचनजंगा आणि ल्होत्से अशी ही स्वर्गीय स्थळांची क्रमवारी. यातील ल्होत्सेची उंची आहे तब्बल २७९७० फूट! नेपाळ आणि तिबेटच्या सीमेवर असलेल्या या शिखराचा समावेश जगातील १० अवघड शिखरांमध्ये होतो.
ल्होत्से शिखर सर करण्यासाठी जगभरातून आजवर अनेक प्रयत्न झाले. पण यातील बहुतेकांच्या पदरी अपयशच आले. १९५६ साली पहिल्यांदाच हे शिखर गाठणाऱ्या स्वीस मोहिमेनंतरही फारच थोडय़ांचे पाय या शिखराने आपल्या माथ्याजवळ पोहोचू दिले आहेत.
या शिखरावर जाण्यासाठी दोन प्रमुख मार्ग आहेत. ज्यापैकी एक दक्षिण कडय़ावरून तर दुसरा उत्तर-पश्चिम धारेवरून माथ्याकडे सरकतो. यातील कुठल्याही मार्गे गेलो तरी शेवटच्या टप्प्यातली चढण ही खडी, ७० ते ८० अंश कोनात आहे. अरुंद धारेच्या या मार्गावर शिखराकडून वेगाने येणाऱ्या लहानमोठय़ा दगडांचा, बर्फाच्या तुकडय़ांचा मारा सहन करावा लागतो. या साऱ्यामुळेच ‘ल्होत्से’ची वाट बिकट झाली आहे. तो चटकन कुणाला आपल्याजवळ येऊ देत नाही. दारामधून त्याने अनेक मी मी म्हणणाऱ्या गिर्यारोहकांना परत पाठवले आहे. तर काही गिर्यारोहकांची इहलोकीची यात्राच त्याच्या मांडीवर संपुष्टात आली आहे.
अशा या ल्होत्से आणि त्यापाठोपाठ त्याच्या शेजारच्या एव्हरेस्ट शिखरावर ‘गिरिप्रेमी’कडून यंदा चढाई केली जात आहे. या दोन सर्वोच्च शिखरांवर एकाच वेळी चढाई करणारी ही पहिली भारतीय नागरी मोहीम आहे. हेही या मोहिमेचे वैशिष्टय़ आहे.
या मोहिमेत उमेश झिरपे यांच्या नेतृत्वाखाली आनंद माळी, टेकराज अधिकारी, भूषण हर्षे, गणेश मोरे, आशिष माने आणि अजित ताटे हे गिर्यारोहक सहभागी होत आहेत. यंदाचे वर्ष हे माऊंट एव्हरेस्टवरील पहिल्या यशस्वी चढाईचे हीरकमहोत्सवी वर्ष आहे. ‘गिरिप्रेमी’ची यंदाची मोहीम त्या स्मृतींचे खरेखुरे अभीष्टचिंतन करणारी ठरेल आणि यातूनच आपल्याकडील गिर्यारोहणविश्वही अधिक लोकाभिमुख होईल! ‘गिरिप्रेमी’च्या या मोहिमेस शुभेच्छांसह!!
‘गिरिप्रेमी’ची मोहीम

*  ल्होत्से शिखराची उंची ८५१६ मीटर किंवा २७९४०फूट. जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर.

*  हे शिखर सर करण्यासाठी १९५५ मध्ये पहिला प्रयत्न झाला. तर पुढच्याच वर्षी १९५६ साली स्वीस गिर्यारोहकांकडून या शिखरावर पहिली यशस्वी चढाई झाली.

*  ल्होत्से आणि एव्हरेस्ट या दोन शिखरांसाठी एकाच वेळी चढाई करणारी ही पहिली भारतीय नागरी मोहीम.

*  ‘एव्हरेस्ट’साठी ‘गिरिप्रेमी’ची सलग दुसऱ्या वर्षी मोहीम. २०१२ मध्ये शिखर सर करण्यात थोडक्यात अपयश आलेल्या गिर्यारोहकांचा यंदाच्या मोहिमेत समावेश.

*  उमेश झिरपे यांच्या नेतृत्वाखाली सहा सदस्यांचा मोहिमेत सहभाग.

* मोहिमेसाठी एकूण ९० लाख रुपयांचा खर्च. उद्योग क्षेत्राकडून या निधीची उभारणी.

*  ल्होत्से शिखराच्या ‘नॉर्थ-वेस्ट’ बाजूने चढाई होणार. यातील शेवटच्या टप्प्यातील दोन हजार फुटांची चढाई ७० अंश कोनात आहे.  

*   ल्होत्से शिखर सर केल्यावर एव्हरेस्टच्या दिशेने चढाई केली जाणार.

*  मोहिमेस भारतीय हवामान विभाग, डीआरडीओ, डीपास, जिप्सी टेन्ट्स संस्थांकडून विशेष साहाय्य.