दोन वर्षांपूर्वी रामलिंग पठार या ट्रेकला गेलो होतो. त्या वेळी लिंगाण्याचे पहिले दर्शन झाले. त्याचे ते अभेद्य, उत्तुंग आणि अजोड रूप पाहून त्याचवेळी त्यावर जावे असे वाटले होते. ‘सह्य़ाद्री ट्रेकर्स’मुळे हा योग नुकताच जुळून आला आणि माझ्यासारख्या शाळकरी मुलीलाही लिंगाण्याच्या माथ्याचा स्पर्श अनुभवता आला.
खरेतर लहान असल्यापासूनच मला अशी डोंगरदऱ्या भटकण्याची आवड आहे. पुण्यातील ‘गिरिप्रेमी’ संस्थेच्या ‘आव्हान’ उपक्रमातून ही आवड अधिक चांगल्यारितीने जोपासली गेली. यामुळे सह्य़ाद्रीतील अनेक गडकोट, गिरिशिखरांवर भ्रमंती झाली. प्रस्तरारोहण, गिर्यारोहण शिक्षण-प्रशिक्षणाचे काही धडेही मिळाले. या साऱ्या शिदोरीवरच लिंगाण्याची ही साहसी वाट पकडली.
या मोहिमेवर ‘सह्य़ाद्री ट्रेकर्स’चे १८ जण निघाले होते. या चढाईत माझ्याच वयाचा ओम काकडेदेखील होता. लिंगाणा हा रायगडाचा खडा पहारेकरी. सरळसोट कडा असलेल्या या दुर्गशिखराच्या केवळ दर्शनानेच घाम फुटायला होते. निमुळता होत गेलेल्या या शिखराच्या चारही अंगाना केवळ उभा कातळ. या कातळातच प्रस्तरारोहण तंत्राच्या सहाय्याने हा गड सर करायचा.
गिर्यारोहणाचा दोर, हर्नेस, डिसेंडर, कॅराबिनर्स, सुरक्षा दोरी (सेफ्टि स्लिंग), पाठीवर सॅक आणि डोक्यावर हेल्मेट असा जामानिमा घेत आम्ही चढाईला सुरुवात केली. लिंगाण्याच्या या चढाईत मजा आणि भीती दोन्ही वाटत होती. अर्धी चढाई केल्यावर आम्हाला एक गुहा लागली. या गुहेतून आतापर्यंतची चढाई आणि खालची दरी दोन्हीही दिसत होते. या गुहेत आम्ही न्याहारी घेतली. तिथल्या टाक्यांतील थंडगार पाणी पित पुन्हा उर्वरित चढाईला सुरुवात केली. यानंतर प्रस्तरारोहणाची विविध तंत्रे वापरत बरोबर तीन तासांनी आम्ही लिंगाण्याचा माथा गाठला. मोठय़ा गिर्यारोहकांच्या जोडीने आपणही लिंगाण्याचे हे शिखर सर केल्याचा मला खूप आनंद झाला. माथ्यावर पोहोचताच जोरदार वाऱ्याने आमचे स्वागत केले. या भल्यामोठय़ा उंचीवरून मग सह्य़ाद्रीतील पर्वत खुणावू लागले. खोल दऱ्या भीती दाखवू लागल्या. या डोंगररांगांवर राजगड, तोरणा, कोकणदिवा अशी दूरदूरची दुर्गशिखरे दिसत होती. रायगड तर अगदी पुढय़ातच उभा होता. त्याच्या माथ्यावरील जगदीश्वर मंदिर, नगारखाना, टकमक टोक आदी जागा इथून अगदी स्पष्ट दिसत होत्या. या साऱ्यांनाच साक्षीला ठेवत आम्ही शिवरायांच्या जयजयकाराच्या घोषणा दिल्या आणि पुन्हा उतरू लागलो.