माउंट एव्हरेस्ट, लोत्से आणि त्यापाठोपाठ माउंट मकालू! जगातील सर्वोच्च अशा पाचव्या क्रमांकाच्या या शिखरावर ‘गिरिप्रेमी’ संस्थेची नुकतीच मोहीम गेली होती. ८४८१ मीटर उंचीच्या या शिखराच्या अगदी जवळ पोचल्यावर काही तांत्रिक कारणांमुळे ही मोहीम सोडावी लागली. ‘मकालू’ने दिलेल्या याच हूलविषयी..

माउंट एव्हरेस्ट, लोत्से आणि त्यापाठोपाठ आता माउंट मकालू! सलग तिसऱ्या वर्षी आठ हजार मीटरपेक्षा उंच हिमशिखराचा वेध घेणारी मोहीम सुरू होती. ८४८१ मीटर उंचीच्या या शिखराचा माथा अगदी नजरेच्या टप्प्यात आला होता. केवळ दीडएकशे मीटर अंतर शिल्लक होते. आणि तोच जवळचा दोर संपला, कृत्रिम प्राणवायूचा साठाही संपत आला. त्याही अवस्थेत या गिर्यारोहकांनी चढाईचे प्रयत्न सुरू ठेवले. पण निसर्गाचे हे रौद्र आव्हान आणि अपुरी साधनसामुग्रीपुढे त्यांना माघार घ्यावी लागली. ..अगदी नजरेसमोर दिसणाऱ्या शिखराने हूल दिली होती. मकालूचे स्वप्न यंदा पुरते तरी भंगले होते.
थरार निर्माण करणारी ही साहसकथा आहे ‘गिरिप्रेमी’ संस्थेची. २०१२ साली ‘एव्हरेस्ट’चे घवघवीत यश संपादन केल्यावर त्याचवर्षी संस्थेने एक नवा संकल्प जाहीर केला होता. जगात ८००० मीटरपेक्षा जास्त उंचीची १४ हिमशिखरे आहेत, ज्यांना गिर्यारोहणाच्या भाषेत ‘एट-थाऊजंडर्स’ असे म्हणतात. या सर्वच्या सर्व १४ शिखर माथ्यांना स्पर्श करणारे आज जगात हाताच्या बोटांवर मोजता येतील एवढेच गिर्यारोहक आहेत. भारतात तर आजमितीस असा एकही गिर्यारोहक नाही. या १४ शिखरांनाच साद घालण्याचा विडा ‘गिरिप्रेमी’ने उचलला आहे. या अंतर्गतच सर्वोच्च एव्हरेस्ट, नंतर गेल्यावर्षी जगातील सर्वोच्च अशा चार क्रमांकाचे ‘ल्होत्से’ आणि आता यावर्षी ‘माउंट मकालू’च्या दिशेने संस्थेने मोहीम उघडली होती.
मकालू जगातील पाच क्रमांकाचे सर्वोच्च शिखर आहे. ८४८१ मीटर उंची असलेले हे शिखर नेपाळ आणि चीन देशांच्या हद्दीत आहे. हिमालयाच्या महालंगूर भागात एव्हरेस्टपासून १९ किलोमीटर अंतरावर त्याचे स्थान आहे. चढाईसाठी अत्यंत अवघड श्रेणीतील असलेल्या या हिमशिखराच्या ‘वाटे’ला आजवर खूपच कमी गिर्यारोहक गेले आहेत. छातीवरची खडी चढाई, या चढाईसाठी प्रतिकूल अशी खडक आणि बर्फमिश्रित पर्वतभूमी, यंदाचे बराच काळ बिघडलेले वातावरण, प्रति तास ४० ते ५० किलोमीटर वेगाने वाहणारे अतीथंड वारे, सततची हिमवृष्टी आणि उणे ३५ ते ४० डिग्री सेल्सियस तापमान या साऱ्या आव्हानांचा मुकाबला करत ‘गिरिप्रेमी’ची यंदाची ही मोहीम पुढे सरकत होती.
उमेश झिरपे यांच्या नेतृत्वाखाली गेलेल्या या मोहिमेत आनंद माळी, आशिष माने चढाई करत होते, तर अजित ताटे १९००० फुटांवरचा तळ सांभाळत होते. एप्रिलच्या शेवटच्या आठवडय़ातच ‘गिरिप्रेमी’चा हा संघ मकालूच्या पायथ्याशी दाखल झाला होता. सराव, वातावरणाशी जुळवून घेणे या प्रक्रियेत सुरुवातीचे काही दिवस गेल्यावर गिर्यारोहकांना अंतिम चढाईचे वेध लागले. पण यंदा कधी नव्हे ते वातावरण सतत बिघडलेले राहिले. शिखर चढाईसाठी लागणारे स्वच्छ वातावरण (क्लिअर विंडो) मिळत नव्हते. अखेर भारतीय हवामान विभागाकडून १६ आणि १७ मे या दोन दिवसांसाठी ‘क्लिअर विंडो’चा निरोप आला आणि चढाई सुरू झाली. १४ मे रोजी तळ सोडला. अ‍ॅडव्हान्स बेस कॅम्प, कॅम्प १, कॅम्प २, मकालू खिंड, कॅम्प ३ असे टप्पे पार पाडत हे गिर्यारोहक १६ मे च्या संध्याकाळी ४ वाजेपर्यंत ‘समीट कॅम्प’ला पोहोचले. या ‘समीट कॅम्प’ची उंची होती ७८०० मीटर. आता केवळ उरलेली ६८१ मीटर चढाई बाकी होती. आता काही वेळातच ती अखेरची चढाई सुरू करायची आणि दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत मकालूचे शिखर गाठायचे असे त्यांचे नियोजन होते.
नूडल्स आणि सूप सारखे पटकन तयार होणारे अन्न घेतले आणि रात्री ९ वाजता आनंद माळी, आशिष माने यांनी दोन शेर्पासोबत चढाईला सुरुवात केली. मकालू शिखराच्या या शेवटच्या टप्प्यातच एक भाग येतो ‘फ्रेंच कूलर’! आठ हजार मीटर उंचीवरची ही घळ म्हणजे कातळ आणि बर्फ यांचे मिश्रण असलेली भूमी आहे. यावरून करावयाची चढाई गिर्यारोहकांचा कस पाहणारी असते. पण हा टप्पाही या गिर्यारोहकांनी पार केला. गिर्यारोहक पुढे सरकले तोवर थंडगार वाऱ्याचा वेग प्रचंड वाढला. जोडीला हिमवृष्टीदेखील. त्या काळोखात आणि या बिघडलेल्या वातावरणाचा सामना करत मार्ग शोधणे, सुरक्षा दोर लावण्यात गिर्यारोहक आणि शेर्पाना मोठे अडथळे येऊ लागले. पण याही अवस्थेत त्यांनी त्यांची चढाई सुरू ठेवली. ठरावीक अंतरावर जात, स्वत: सुरक्षा दोर लावत कराव्या लागणाऱ्या या चढाईमुळे त्यांची चांगलीच दमछाक होत होती. या वाढत्या वेळेमुळे बरोबरचा कृत्रिम प्राणवायू देखील मोठय़ा प्रमाणात वापरला जात होता. १७ मे ची सकाळ झाली, उजाडले. ‘गिरिप्रेमी’च्या गिर्यारोहकांनी जवळजवळ शिखरमाथा गाठलेला होता. केवळ दीडएकशे मीटर अंतर शिल्लक होते. पण त्याचवेळी रात्रीच्या चढाईत ते नियोजित मार्गही काही ठिकाणी भरकटले होते. अंतराचे हे गणित चुकल्याने बरोबरचा दोर संपला होता. दुसरीकडे वेळेचे गणितही वाढल्याने संपत चाललेल्या कृत्रिम प्राणवायूने धोक्याचा इशारा दिला. पण याही अवस्थेत त्या चौघांनी एका उपलब्ध दोराच्या साहाय्याने ‘रोप-अप’ होत चढाई सुरू ठेवली. पण ही चढाई आता मकालूच्या उभ्या धारेवरून होती. दोन्ही अंगांना ८ ते १० हजार फूट खोल दरी. या बर्फावरून कुणा एकाचा पाय घसरला तर सगळेच..चढाई वेळखाऊ आणि धोक्याची ठरू लागली. त्यातच परतीच्या प्रवासासाठी कृत्रिम प्राणवायूचे गणित बिघडायला लागले. ..शेवटी निर्णय घ्यावा लागला.
जगातील सर्वोच्च अशा पाचव्या क्रमांकाच्या शिखरमाथ्यापासून केवळ दीडशे मीटर अंतरावर असताना हा निर्णय घ्यावा लागला. हा निर्णय घेणे त्या गिर्यारोहकांना जड जात होते. पण ती वेळ-स्थिती त्यांना हाच शहाणपणाचा सल्ला असल्याचे सांगत होती. शेवटी त्यांनी जड अंत:करणाने तिथूनच त्या शिखराला सलामी दिली आणि खाली परतू लागले.  
मकालूने यंदा त्यांना हूल दिली, पण या गिर्यारोहकांच्या मनात पुन्हा नव्या मोहिमेची आशा ठेवतच..!