04 August 2020

News Flash

शिखराच्या पायथ्याशी!

‘माउंट एव्हरेस्ट’! हा शब्द उच्चारताच गिर्यारोहणाचे जग अवतरते.

शिखराच्या पायथ्याशी

‘माउंट एव्हरेस्ट’! हा शब्द उच्चारताच गिर्यारोहणाचे जग अवतरते. हे सर्वोच्च शिखर सर करणे ही सर्वच गिर्यारोहकांची सुप्त इच्छा असते. पण सगळय़ांनाच हे शक्य नसते. अशांसाठी या शिखराच्या पायथ्यापर्यंतची वाटही खुणावत असते. पायथ्यापर्यंतची उंची गाठावी आणि या सर्वोच्च शिखराचे दर्शन तरी घ्यावे या भावनेतूनच ‘एव्हरेस्ट बेस कँप’ या ट्रेकचा जन्म झाला. जगभरातील शेकडो गिर्यारोहक ही खडतर वाट तुडवत इथपर्यंत पोहोचतात. पुण्याच्या ‘गिरिप्रेमी’ संस्थेने याच एव्हरेस्ट आणि अन्नपूर्णा या आणखी एका उत्तुंग शिखराच्या पायथ्याच्या पदभ्रमण मोहिमांचे आयोजन केले आहे.
संस्थेतर्फे २०१२ सालापासून या दोन्ही ट्रेकचे आयोजन करण्यात येत आहे. २०१२ साली संस्थेने आयोजित केलेल्या एव्हरेस्ट मोहिमेला शुभेच्छा देण्यासाठी या ‘बेस कँप’ मोहिमेत तब्बल शंभर गिर्यारोहकांनी सहभाग नोंदवला होता. त्यानंतर गेली तीन वष्रे हीच परंपरा कायम ठेवत अनेकांनी या शिखराचे दर्शन घेतले आहे. तसेच यातून संस्थेच्या एव्हरेस्ट, ल्होत्से, मकालू मोहिमांना पाठिंबाही दिला आहे. ‘गाíडयन गिरिप्रेमी इन्स्टिटय़ूट ऑफ माउंटेनियिरग’तर्फे यंदाही यो दोन्ही मोहिमांचे आयोजन केले आहे. या पदभ्रमण मोहिमांमध्ये सहभाग घेऊन ‘गिरिप्रेमी’च्या आगामी ‘धौलागिरी-चोयो’ या ८ हजार मीटरवरील महत्त्वाकांक्षी मोहिमेला पाठिंबा देता येणार आहे. यातील एव्हरेस्ट बेस कँप ट्रेक हा २३ आणि ३० एप्रिल २०१६ तर अन्नपूर्णा बेस कँप ट्रेक हा २४ एप्रिल व १ मे २०१६ रोजी काठमांडूहून सुरू होणार आहे. या पदभ्रमण मोहिमांमध्ये सहभाग घेण्यासाठी ६६६.ॠ्र१्रस्र्१ी्रे.ूे अथवा ६६६.ॠॠ्रे.्रल्ल या संकेतस्थळांना भेट द्यावी अथवा ८३८००४४९०६, ९७६९३०२९३४ किंवा ९८२२३२३१४७ या क्रमांकावर संपर्क करावा.

एव्हरेस्ट बेस कँप
नेपाळची राजधानी काठमांडू येथून सुरुवात होणाऱ्या या मोहिमेत सुरुवातीला ‘लुक्ला’ या ९ हजार फुटांवरील गावापर्यंत छोटय़ा विमानाने पोहोचावे लागते. तेथून पुढे ९ दिवसांत तब्बल ७५ किलोमीटर चालत एव्हरेस्टचा बेस कँप गाठावा लागतो. हा संपूर्ण पदभ्रमण मार्ग दूधकोशी नदीच्या खोऱ्यातील फाकिदग, नामचे, टेंगबोचे, िडगबोचे या गावांमधून जात ‘थुकला पास’ इथे खुंबू नदीच्या खोऱ्यात प्रवेश करतो. इथून पुढचा प्रवास १५ हजार फुटांवर असल्याने तो अतिशय धिम्या गतीने पूर्ण करावा लागतो. लोबुचे येथे एक मुक्काम करून १७ हजार फूट उंचीवरील गोरक्षेप या अखेरच्या मुक्कामी पोचावे लागते. या अखेरच्या पडावावरच ‘गिरिप्रेमी’ने स्थापन केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळय़ाचे आणि सर्वोच्च शिखर ‘एव्हरेस्ट’चे दर्शन तर घडते. येथून काही वेळ चालल्यावर लगेचच आपण ‘एव्हरेस्ट बेस कँप’वर पोहोचतो. स्वच्छ वातावरण लाभल्यास व थोडेसे अधिक शारीरिक श्रम घेण्याची तयारी असल्यास गोरक्षेप येथून काला पत्थर या १८ हजार फुटांच्या शिखरावर देखील पोहोचता येथे. या शिखरावरून एव्हरेस्टचे विहंगम दर्शन घडते. परतीचा प्रवास ३-४ दिवसांत पूर्ण होतो.

अन्नपूर्णा बेस कँप
एव्हरेस्ट बेस कँप बरोबरच अन्नपूर्णा बेस कँपचा ट्रेक देखील प्रसिद्ध आहे. दरवर्षी जगभरातून अनेक गिर्यारोहक या ट्रेकच्या वाटेवर धावतात. या मोहिमेसाठी काठमांडू ते पोखरा हा प्रवास बस अथवा जीपने करावा लागतो. तेथून पुढे ८ ते ९ दिवसांचे पदभ्रमण करावे लागते. अन्नपूर्णा पर्वतरांगेतील अन्नपूर्णा १, २ आणि ३ तसेच माच्छेपुच्छे, लामजुंग या उत्तुंग पर्वतांचे नयनरम्य दर्शन घडते. या शिवाय या संपूर्ण मोहिमेत हिमालयातील निसर्गाचे खूप सुंदर दर्शन घडते. वाटेत हिल येथील गरम पाण्याचे झरे या ट्रेकमध्ये आणखी गंमत आणतात. या पदभ्रमण मोहिमेत एव्हरेस्ट व अन्नपूर्णा खोऱ्यातील शेरपा संस्कृती जवळून अनुभवता येते. तसेच उत्तुंग हिमालयाचे व निसर्गाचे नयनरम्य दर्शन प्रत्येक सहभागी डोंगरयात्रीसाठी एक संग्राह्य अनुभव ठरतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 10, 2015 2:53 am

Web Title: mount everest surfers information
टॅग Information
Next Stories
1 ट्रेक डायरी
2 रम्य सासवने
3 आंबोलीची ‘फुले’
Just Now!
X