हिमालय, त्यातील उत्तुंग हिमाशिखरे. चार धाम यात्रा, खळाळणाऱ्या नद्यांचे प्रवाह, दूरवर पसरलेला विस्तृत प्रदेश. भटकंतीची आवड असणाऱ्या प्रत्येकाच्या मनात सतत रुंजी घालणाऱ्या या स्वर्गीय कल्पना. सागरमाथा उर्फ माऊंट एव्हरेस्ट हा पृथ्वीतलावरील सर्वोच्च बिंदू. ८८४८ मीटर उंची लाभलेल्या एव्हरेस्टवर पदार्पण करण्यासाठी देशोदेशीचे गिर्यारोहक, प्रचंड श्रम सातत्याने करीत असतात. एव्हरेस्ट पादाक्रांत करण्यासाठी पुण्यातील ‘गिरीप्रेमी’ संस्थेने २०११ जानेवारीत नागरी मोहिमेची घोषणा केली आणि असंख्य क्रीडाप्रेमींचे मन उंचबळून आले.
माझ्यासारख्या अनेकांनी मनांपासून मोहिमेला सक्रिय पाठिंबा दिला. बारा कसदार तयारीचे युवा पुणेकर, गिर्यारोहक, गिर्यारोहण या धाडसी खेळांत आघाडीवर होते. बारा मावळे शरीराने एव्हरेस्टवर यशस्वी पदार्पण करतील अशी वाटचाल सुरू झाली. त्या प्रत्येक गिर्यारोहकासमवेत माझ्यासारखे अनेकजण मनाने एव्हरेस्टच्या स्वप्नील परिसरात वावरू लागले. माहितीच्या ओघात, विमानांतून एव्हरेस्टच्या माथ्यावर जाऊन दर्शन घडविण्याची ‘फ्लाईट’ असते हे कळल्यावर घालमेल सुरू झाली.
पर्यटक म्हणून जायचे आणि एव्हरेस्टचे स्वर्गीय दर्शन ‘उंचावरून’ घ्यायचे अशी आखणी सुरू झाली. आशाआकांक्षांची सोबत निराशा करीत असतेच. काही जणांकडून माहिती कळली. काठमांडूहून सकाळी तीन चार ‘फ्लाईट्स’ उड्डाण करतात. पण लहरी हवामान दर्शन घडवेल याची ‘गॅरंटी’ नाही. दुपारी अकरा नंतर एव्हरेस्टवर धुके, ढगांचे आवरण हमखास असते. मे महिन्यांत दर्शन घडण्याची शक्यता भरपूर.
यावर उत्तम उपाय म्हणजे काठमांडूत तीन चार दिवस मुक्काम करायचा. ‘आज नही तो कल’ प्रकाराने संधी साधायचीच. आदल्या रात्री हॉटेलवर निरोप मिळाला, उद्या सकाळी हवामान स्वच्छ राहील. सात वाजेपर्यंत त्रिभुवन विमानतळावर हजर रहावे. ठरल्याप्रमाणे विमानतळ गाठले. ‘माऊंटन फ्लाईट’ घेणाऱ्यांची गर्दी उसळली होती. अग्नी, येती, बुद्धा आणि गुणा अशी सुबक नांवे असलेल्या विमान कंपन्यांच्या प्रत्येकी २० पर्यटक असणाऱ्या विमानांतून एका तासांत हिमशिखरांची मालिका दर्शन घडविते, असे बोर्ड वाचून उत्सुकता शिगेला पोहचली.
प्रत्येकी सहा हजार रुपयांची तिकिटे हातात मिळाली आणि आमच्या आनंदाला पारावार राहिला नाही. विमानाच्या दरवाज्याजवळ देखणा पायलट प्रत्येकाचे हसून स्वागत करीत होता. प्रत्येक पर्यटकाला उड्डाण झाल्यावर पायलटच्या केबीनमध्ये दोन तीन मिनिटे बोलावून वेगवेगळ्या शिखरांचे दर्शन घडवितो, ही प्रथा आधीच समजली होती. बिनधास्तपणे फ्लाईट कमांडर एस. कुनवारला सांगितले, मला फक्त ‘सगरमाथा’ दर्शन घेण्यात ‘इंटरेस्ट’ आहे. व्हाय ओन्ली एव्हरेस्ट या अपेक्षित प्रश्नावर सांगितले,‘ ‘माझ्या पुण्याचे आठ गिर्यारोहक १९ मे रोजी एकाच दिवशी ‘समिटर’ झाले आहेत. त्या प्रत्येकाला मी ओळखतो.’’ कुनवारला अत्यानंद झाला. माझ्याशी आपुलकीने हस्तांदोलन करीत म्हणाला, ‘यस्. यस्. मलाही त्या मुलांना भेटायला आवडेल..’
सीटवर स्थानापन्न झालो. दोन ओळीत वीस पर्यटक आरामात स्थिरावले. प्रत्येकाच्या बाजूला लंबगोलाकार मोठी खिडकी होती. खिडकीतून बाहेरचे बहारदार जग मन उल्हसित करीत होते. सिटबेल्टस्  बांधून झाले. हवाई सुंदरीने माहितीचे सोपस्कार उरकले आणि प्रत्येकाला शिखरांचा सुबक नकाशा दिला. तब्बल २० उत्तुंग शिखरांचे दर्शन तासाभरांत घडणार होते. ५९७० मीटर पासून ८८४८ मीटर उंचीच्या ‘एव्हरेस्ट’चे प्रत्यक्ष दर्शन अपेक्षित होते.
पाच मिनीटांच्या उड्डाणानंतर हिमशिखरांचा स्वर्गीय नजराणा डोळेभरून दिसू लागला. प्रत्येक जण त्या दृश्याचे छायाचित्रण करण्यासाठी धडपडू लागला. दूरवर पसरलेल्या हिमालयाच्या रांगा, अधूनमधून कापसाप्रमाणे मंदगतीने तरंगणारे ढगांचे पुंजके, बर्फाच्या विविध आकाराच्या टोप्या घातलेली शिखरे आणि अगदी रसरशीत काळ्याशार ओतीव रंगाच्या पर्वतांचा भक्कम पृष्ठभाग, खोलवरच्या दऱ्या. निसर्गाच्या भव्यतेची जाणीव क्षणोक्षणी घडत होती.
हवाई सुंदरी अव्याहतपणे प्रत्येक शिखराचे नांव आणि उंची सांगत होती. प्रत्येक पर्यटक आपल्या हक्काच्या खिडकीतून शिखरदर्शन घेत घेत भान हरपत होता. नंबरानुसार एकेक पर्यटकाला पायलटच्या सीटमागे नेऊन विशाल दर्शन घडविण्याचे काम अचूकपणे दुसरी हवाईसुंदरी करीत होती.
लांगतांग लिनूंग हे ७२३४ मीटर्सच्या उंचीच्या शिखराच्या दर्शनाने ‘शिखरदर्शन’ला सुरुवात झाली. शिशा पंगमा, दोर्जे लकपा, छोबे भाम्रा अशी नेपाळी नांवाची शिखरे संपल्यावर ‘गौरी शंकर’ ७१३४ मीटरचे देखणे शिखर दिसू लागले. दोन पर्वतरांगांच्या पलीकडचे गौरीशंकर त्रिकोणी आकारात फारच बहारदार दिसत होते. विमानाच्या इंजिनाची घरघर सोडल्यास प्रत्येक पर्यटक डोळे आणि मन भरभरून त्या अफलातून, अस्ताव्यस्त पसरलेल्या निरव, स्थितप्रज्ञ शांततेला, दृश्याला आत्मसात करीत होता. दोन तीन मिनिटात एकेक शिखर नजरेआड होत होते.
‘चो ओयू’ ८२०१ मीटर उंचीचे शिखर दूरवर एकदम उठून दिसत होते. पृथ्वीतलावरील सातव्या क्रमांकाचे उत्तुंग शिखर आणि त्याच्या डाव्या बाजूचे गौरीशंकर ७१३४ मिटर एकाच दृष्टीक्षेपात मावत होते. ‘चो ओयू’ ओलांडल्यानंतर नजरेत भरते ते ७१६१ मीटर उंचीचे ‘प्युमोरी’. त्या शिखराचे नांव, त्याचा सुबक गोंडस आकार मनाला नक्कीच स्पर्श करतो. काही खंद्या गिर्यारोहकांनी आपल्या मुलींची नांवे ‘प्युमोरी’ ठेवल्याचे आठवले.
तेवढय़ात मला पायलट कडून बोलावणे आले आणि नंतरची सहा सात मिनिटे अक्षरश: स्वर्गीय, अविस्मरणीय ठरली. दोन्ही  पायलटच्या समोरील अर्धवर्तुळाकृती काच फारच पारदर्शक स्वच्छ होती. स्पष्ट डोळ्याने ७८५५ मीटर उंचीचे ‘नुप्से’ दिसू लागले. थोडासा पसरट भाग नंतर शिखर आणि नजरेत एकदम नगाधिराज एव्हरेस्टचे उत्तुंग शिखर सामावू लागले. आजूबाजूला पसरलेला बर्फाचा गालिचा, खालच्या बाजूस रसरशीत काळ्यारंगाचा फत्तर, आणि वरच्या दिशेला चहूबाजूंनी उत्तुंग झालेले एव्हरेस्ट पाहून हरवून गेलो. २८ मे ची सकाळची ९-१५ ची ती वेळ होती. विमानाची उंची बरोबर एकतीस हजार फुटाची असल्याचे अल्टीमिटर दाखवित होता. एव्हरेस्टपासून सुमारे दीड कि.मी. अंतरावरून त्याच्या शिखरांसकट ते स्वर्गीय दृश्य मनात साठवित होतो. यासाठीच केला होता अट्टाहास हे जाणवत होते. एव्हरेस्ट जवळील हिलरी स्पर, वुइंडो हे अखेरच्या टप्प्यातील भाग पायलट सांगत होता. कोणी गिर्यारोहक त्या क्षणी एव्हरेस्टची चढाई करीत आहे का याचा शोधही डोळे घेत होते. अर्थात ती स्वप्नरंजकता होती. त्याच भागांत फक्त नऊ दिवसांपूर्वी आपले आठ मराठी गिर्यारोहक इतिहास घडवित होते, याची प्रकर्षांने आठवण झाली. एव्हरेस्टचे उंचावलेले शिखर आणि दूपर्यंत विस्तारलेला बर्फाळ, काळ्या फत्तराचा पट्टा असे ते ‘ब्लॅक अँड व्हाईट’ दर्शन निसर्गाची भव्यता, उदात्तता, विशालता, अथांगता, स्थितप्रज्ञता.. भावनांचा कल्लोळ उडाला होता. ८५१६ ‘मीटर उंचीचे ‘लोत्से’ दोन मिनिटांत पार झाले. एव्हरेस्टच्या दोहो बाजूकडील ‘नुप्से’ आणि ‘लोत्से’ एव्हरेस्टच्या उत्तुंगतेत चपखल भर घालतात. जणू ते एव्हरेस्टचे अंगरक्षकच!
विमानाने आता ‘यू टर्न’ घेण्याची वाटचाल सुरू केली होती. दूरवरील ८४६३ मिटरचे ‘मकालू’ एकटेच फुरंगटून, आपल्याच तंद्रीत असल्याचे जाणवले. दूरवर आहे पण दुर्लक्ष करू नका, असेच जणू तो बजावित होता. मकालूच्या बॅक साईडला कांचनजंगा रेंज सुरू होते. ‘नाऊ यूवर टाईम इज अप, जंटलमन टेक यूवर सीट’, या वाक्याने भानावर आलो.
थँक्स म्हणत सीटकडे वाटचाल सुरू झाली. एडमंड हिलरी, तेनसिंग, ते थेट आपले सुरेंद्र चव्हाण, केतकर, जोशी आदी यशस्वी पुणेकर गिर्यारोहकांची नांवे नजरेसमोर येऊ लागली. विमानाचा ‘यू टर्न’ पूर्ण झाला आणि मघाशी डाव्या बाजूने दिसणारी ‘माऊंटेन मालिका’ आता उजव्या बाजूने पाहाता आली. शब्द सुचत नव्हते, विचार थांबत नव्हते. पुन: पुन्हा डोळे आणि मन शिखरांकडे आकर्षित होत होते. खिडकीआड एकेक शिखर अंतर्धान पावत होते. लक्षावधी वर्षांपूर्वी पृथ्वीच्या गर्भातून उद्रेक होऊन एकेक शिखर आपले मस्तक वर काढीत असतांना या परिसरांतील दृश्य कसे असेल याचे चित्र मन:पटलावर चितारले जात होते.
पाच मिनिटांत ३४५० मीटर उंचीवरील एव्हरेस्ट मोहिमेतील अखेरचे मोठे गांव ‘नामचे बझार’ डोकावू लागले. झपाटय़ाने विमान उंची कमी करू लागले. काही मिनिटांपूर्वी विमानाच्या खालवर पसरलेल्या शुभ्र ढगांनी आता खूप उंची गाठली होती. शुभ्रधवल भिंत तयार झाली होती. शिखरांचा मागमूसही नव्हता. हिरवी शेते, रस्ते दिसू लागले. १३५० मीटर उंचीवरील काठमांडूचे विमानतळ आले. विमानाची घरघर थांबली. स्वर्गीय अनुभवातून आलो आपल्या मूळ स्थानावर. पायलट, हवाईसुंदरी ‘कम अगेन’ म्हणून निरोप देत होते. स्वप्नपूर्तीची भावना दाटून आली होती.