निसर्गवेध
डोंगरदऱ्यातील भटकंती करताना पक्षिगण नेहमीच लक्ष वेधून घेत असतात, यातच ‘ट्क ट्क’ आवाजाने लक्ष वेधून घेणारा हा तांबट ऊर्फ कॉपर स्मिथ बार्बेट पक्षी. चिमणीएवढय़ा आकाराचा हा पक्षी भारतभर सर्वत्र आढळतो. याच्या डोक्यावर आणि छातीवर लाल भडक रंगाचे ठिपके, पाठीवर गर्द हिरवा तर पांढरट पोटावर हिरव्या रेषा असतात. उंबर, वड, पिंपळ इत्यादी वृक्षांची फळे या तांबटचे मुख्य खाद्य. यापैकीच अजिंक्यतारा किल्ल्यावर वडाच्या फळांवर ताव मारत असलेला हा देखणा तांबट!
मिलिंद हळबे

प्रचितगडचा चकवा
गड-किल्ल्यांवर जाण्याअगोदर नियोजन करताना अनेकदा वृत्तपत्रांमधून येणाऱ्या माहितीचा बऱ्याच प्रमाणात उपयोग होतो. कोणत्या काळात जावं, कोणत्या मार्गाने जावं, काय बरोबर घ्यावं, तिथं काय पाहावं, कसं पाहावं..अशा अनेक गोष्टी भटकंती करणाऱ्यांना मार्गदर्शक ठरतात. तसेच खालील गावातील वाटाडेही आधार ठरतात. पण, हे दोन्ही आधार अर्धवट माहितीचे असतील तर कसा गोंधळ उडतो याचा अनुभव आम्ही नुकताच घेतला. एका वृत्तपत्रात आलेली माहिती वाचून आम्ही ९ मित्र प्रचितगडाच्या मोहिमेवर निघालो. कोकणातून संगमेश्वरजवळून शृंगारपूर येथून या गडावर वाट जाते. यासाठी आम्ही शंृगारपूर येथून एक वाटाडय़ाही घेतला. या वाटाडय़ाने आम्हाला नेहमीच्या वाटेने न नेता खडतर वाटेने नेले. उभी चढण, भुसभुशीत मुरुमाचा डोंगर, खोल दऱ्या..असा सगळा अनुभव घेत जीव मुठीत घेऊनच आम्ही उशिरा का होईना पण गडावर पोहोचलो. ही वाट आम्हाला जीव काढणारी वाटली असली, तरी गडावर गेल्यावर मिळालेल्या आनंदात ते सगळं विसरलो. परतीचा प्रवास मात्र आम्ही पुन्हा त्या वाटेने न करण्याचेच ठरवले. पण सतत तीन तास चालत राहिलो, तरी योग्य दिशा मिळत नव्हती. यामुळे आपण चुकल्याची जाणीव सर्वानाच झाली. सगळा प्रदेश अनोळखी. यात जंगलाचा. दाट जंगल, दऱ्याखोऱ्यांनी वेढलेल्या या प्रदेशात, बिबटय़ा, अस्वल, गवे..असे प्राणी असल्याने सगळय़ांच्याच चेहऱ्यावर चिंता साठू लागली. मोठय़ा विचित्र मन:स्थितीतच आम्ही चालत होतो. कोणाशी संपर्क साधावा तर मोबाइलला रेंज नाही, तर कोणाचे ‘चार्जिग’ उतरलेले. सुदैवाने एका ठिकाणी आमच्यातील एकाच्या मोबाइलला रेंज आली आणि आम्ही या भागातील वनाधिकाऱ्यांना चुकल्याचे सांगितले. मग त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह शोधमोहीम सुरू केली. पण, दाट झाडीमुळे त्यांना आमच्यापर्यंत पोहोचायला वेळ लागणार होता. त्यामुळे चांदोलीच्या त्या जंगलात जीव मुठीत घेऊनच आम्ही एक रात्र काढली. दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र राम नदीच्या परिसरात वनाधिकाऱ्यांना आमचा शोध लागला. वनाधिकाऱ्यांना पाहिल्यानंतर आमच्या जिवात जीव आला. त्यांनी आमच्यासाठी खाद्यपदार्थ आणि पाणी आणलं होतं. त्या क्षणी आम्हाला त्याची खूपच गरज होती. त्याचा आस्वाद घेतानाच आम्हाला समजलं की आम्ही जंगलाच्या मधोमध होतो. प्रचितगडापासून ते अंतर पस्तीस किलोमीटरचं आहे. आम्ही कोणते दिव्य पार करून आलो याची प्रचिती आम्हाला त्या क्षणी आली. नंतर वनाधिकाऱ्यांनी आम्हाला त्यांच्या गाडीतून जंगलाबाहेर आमच्या गाडीपर्यंत सोडलं आणि आम्ही सुटकेचा नि:श्वास सोडला. यापुढे केवळ अर्धवट माहिती किंवा बेभरवशाच्या वाटाडय़ावर विसंबून न राहता पूर्ण माहिती घेऊनच भटकंतीला निघायचं असा निश्चय या वेळी सर्वानी केल

प्रभाकर पंडित