इतिहास, संस्कृती, निसर्ग आणि साहसाला वाहिलेल्या ‘किल्ला’ नियतकालिकाच्या दुसऱ्या अंकाचे नुकतेच शिवराज्याभिषेकदिनी रायगडावर प्रकाशन झाले. वाचनीय मजकूर आणि देखणे सादरीकरण यातून संग्राहय़ अंक देण्याची परंपरा ‘किल्ला’ने या दुसऱ्या प्रवेशातही राखली आहे.
‘किल्ला इतिहासातला, मनातला आणि वास्तवातला’ असे बिरुद घेतलेल्या या अंकात शिवाजीमहाराजांची जन्मकुंडली ते शिवशिल्प आणि विदर्भातील गाविलगडापासून ते इंग्रजी दुर्गसाहित्यापर्यंत असे अनेक अभ्यासपूर्ण प्रदीर्घ लेख समाविष्ट आहेत. आर्ट पेपरवरील दोनशे पानांच्या या अंकात स्थापत्य, इतिहास, निसर्ग आणि साहसविश्वातील अनेक विषय चर्चेला आले आहेत. किल्ला आणि शिवाजीमहाराज यांचे महाराष्ट्रात अद्वैत असे नातेसंबंध आहे. याचाच संदर्भ घेत महाराजांची जन्मकुंडली, शिवजन्मोत्सवाचा वेध (प्रा. अविनाश कोल्हे), शिवाजी उत्सवावरील रवींद्रनाथ टागोर यांची कविता आणि सुहास बहुलकर यांनी विविध सर्जनशील कलाकारांनी घडवलेली शिवशिल्पं आदी विषयांवरील लेख आपल्याला इतिहास आणि संस्कृतीच्या जगातलीच मुशाफिरी घडवून आणतात. प्रत्यक्ष किल्ला विषयाला हात घालताना यामध्ये विजयदुर्गचे स्थापत्य (चंद्रशेखर बुरांडे), मुंबईची दुर्ग आभूषणे (सुहास सोनावणे), विदर्भातील गाविलगड (प्रदीप हिरूरकर), खान्देशातील अक्राणी महाल (रणजित राजपूत), गडकोटांवरील भ्रष्ट आचरण (पंकज घाटे) आणि रामधुरींची रायगडवारी (दत्तात्रय भालेकर) ही दुर्गाची नाना छटा दर्शवणारी प्रकरणे उलगडत जातात. दुर्गाच्या या विषय मांदियाळीत दुर्गावरील इंग्रजी साहित्य (अभिजित बेल्हेकर) आणि किल्ल्यांवरील औषधी वनस्पती (डॉ. वा. द. वर्तक) हे दोन विशेष लेख आहेत. माळढोकच्या शोधात (प्रल्हाद जाधव) आणि विविधरंगी लडाख हे लेख या गडांच्या जोडीने निसर्ग आणि साहसाची वाटही वाचकांसाठी उघडतात. एकूणच एखादे नियतकालिक म्हणण्यापेक्षा संग्राहय़ पुस्तक ठरावे असे या ‘किल्ला’चे रूप आणि अंतरंग आहे.
(किल्ला संपादक – रामनाथ आंबेरकर, संपर्क ९८९२५४१११२)