12 December 2017

News Flash

‘ल्होत्से’ ‘गिरिप्रेमी’चे नवे आव्हान!

‘गिरिप्रेमी’ संस्थेच्या सचिवानं २०१३ मध्ये एव्हरेस्टला जोडून ‘ल्होत्से’ चढाईचा मनोदय जाहीर केला आणि गिर्यारोहकांच्या

उष:प्रभा पागे | Updated: January 2, 2013 1:40 AM

‘गिरिप्रेमी’ संस्थेच्या सचिवानं २०१३ मध्ये एव्हरेस्टला जोडून ‘ल्होत्से’ चढाईचा मनोदय जाहीर केला आणि गिर्यारोहकांच्या मनात उत्कंठा, थरकाप, आव्हान, साशंकता अशा संमिश्र भावना दाटून आल्या. कारण ‘ल्होत्से’ या गिरिशिखराची चढाई अत्यंत कठीण आणि आव्हानात्मक आहे. ‘ल्होत्से’ शिखराचे असे एक खास व्यक्तिमत्त्व आहे. तो चटकन कोणाला आपल्याजवळ येऊ देत नाही. दारामधूनच त्याने अनेक मी मी म्हणणाऱ्या गिर्यारोहकांना परत पाठवलं आहे, तर काही गिर्यारोहकांची इहलोकीची यात्रा याच्याच मांडीवर संपुष्टात आली आहे.
ल्होत्सेच्या चढाईचा इतिहास अत्यंत रोमहर्षक आहे, थरारक आहे. उंचीमध्ये जगातील हे ४ थ्या क्रमांकाचे शिखर. उंची २७,९४० फूट. अंतीम २ कँप मृत्यूच्या प्रांतात करावे लागतात. या शिखराची २ उपशिखरं आहेत. ल्होत्से मधले ‘ल्होत्सेशार’ आणि ल्होत्सेचे मुख्य शिखर एव्हरेस्ट आणि ल्होत्से हे ‘दक्षिण कोल’नं एकमेकांशी संलग्न आहेत. साऊथकोलमधून  त्याचे सर्वोच्च शिखर फक्त ६१० मीटर उंच आहे, पण इकडून चढाई सर्वात कठीण आहे कारण या बाजूचा दक्षिण कडा अशक्य कठीण चढाईचा आहे.
‘ल्होत्से’वर चढाईचा प्रथम प्रयत्न झाला तो ‘नॉर्मन डायव्हेनफोर्थ’ च्या नेतृत्वाखाली. त्याची ही आंतरराष्ट्रीय मोहीम होती. पोर्टर्सचा प्रचंड लवाजमा यांच्याबरोबर होता. परंतु ‘ल्होत्सेशार’ ची म्हणजे दक्षिण अंगाची चढाई झेपणार नाही हे त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी आपला मार्ग बदलला वायव्हेकडून त्यांनी प्रयत्न केला. परंतु प्रचंड वारे आणि थंडी यामुळे ते माघारी वळले. पुढील वर्षी म्हणजे १९५६ च्या उन्हाळ्यांत ल्होत्से शिखर चढाईसाठी स्वीस टीम आली आणि त्यांच्या टीममधील राईस आणि लुशिंगर यांना ल्होत्से शिखरावर प्रथम चढण्याची संधी मिळाली (१८ मे १९५६). त्यानंतर १२ मे १९७० साली ऑस्ट्रियाची जोडगोळी ल्होत्सेशारवर चढून गेली. ल्होत्सेमधले शिखर चढण्यात यश मिळायला २००१ साल उजाडायला लागलं. रशियन गिर्यारोहकानं हा मान पटकावला. हिवाळी मोहीम अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत पार पाडण्याचा पराक्रम पोलंडच्या गिर्यारोहकांनी केला तो ३१ डिसेंबर १९८८ साली.
१९९० साली १६ ऑक्टोबर या दिवशी दक्षिण कडय़ाकडून शिखर चढाई करण्यात रशियन मोहिमेला यश मिळाले. ‘ल्होत्से’ शिखर कमीत कमी वेळात म्हणजे बेस कँपवरून समिटपर्यंत जाण्याचा विक्रम कालरेस कार्सोलिओ यानं केला. केवळ २३ तास ५० मिनिटांत त्यानं शिखर गाठलं.
‘टोमोकेसन’ हा अत्यंत धडाडीचा, निश्चयी कुशल गिर्यारोहक. त्याचा पराक्रम म्हणजे अत्यंत अवघड असा दक्षिण कडा सर्वप्रथम तो एकटय़ानं चढून गेला. यापूर्वी म्हणजे १९७३ ते १९८९ च्या दरम्यान डझनावारी मोहिमा आल्या आणि अपयशी ठरून परतल्या. पण १९९० साली अल्पाईन शैलीची (म्हणजे पोर्टर न घेता आणि कृत्रिम साधनांशिवाय) मोहीम टोमो केसननं अवघ्या ३ दिवसांत यशस्वी केली.
१९९६ साली ‘चंताल मोहित’ ल्होत्से शिखर चढून जाणारी पहिली महिला ठरली. ल्होत्से शिखरावर चढून जाणारी सर्वात लहान वयाची महिला ठरली २३ वर्षांची तमारा लुंगर. पुरुषांमध्ये सर्वात लहान वयाचा गिर्यारोहक आहे अर्जुन वाजपेयी. १८ वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच २० मे २०११ या दिवशी पोर्टरसह तो हे शिखर चढून गेला. अजूनतरी त्याचा हा विक्रम मोडल्याचं वाचनात आलं नाही. मे २०११ साली स्पॅनिश गिर्यारोहक कालरेस फोन्टान ७२ व्या वर्षी या शिखरावर चढला. याचवर्षी मायकेल हॉर्स्ट हा अमेरिकेचा मार्गदर्शक एव्हरेस्ट पाठोपाठ ल्होत्से चढून गेला. त्याच्या २ शिखरचढाईत केवळ २१ तासांच अंतर होतं.
१९९६ साली एव्हरेस्टवरील मोहिमांमध्ये एकाचवेळी ८ जणांचा मृत्यू झाला. त्या मोहिमेवर असलेला अनातोली बुकरिव्ह हा मार्गदर्शक या अपघातानं आणि त्यानिमित्तानं झालेल्या उलटसुलट आरोप-प्रत्यारोपामुळे व्यथित झाला आणि चिंतन, मनन करण्यासाठी एका आठवडय़ानेच त्होत्से शिखरावर गेला होता.
डिसेंबर २००८ साली गोळा झालेल्या आकडेवारीनुसार तोपर्यंत २० जणांचा मृत्यू या शिखरावर झाला.
१९८९ साली या शिखरावर एक बिनीचा मोहरा कामी आला. ‘जेर्झी कुकझ्का’ हा गिर्यारोहक ल्होत्से शिखर चढाईवर आला ते नेपाळच्या बाजारात विकायला आलेला वापरलेला जुना दोर घेऊन. आर्थिक हलाखीमुळे त्याला दुय्यम रोप वापरावा लागला आणि दुर्दैवानं अवघड दक्षिण कडा चढत असताना हा जुना दोर तुटला आणि जेर्झी कुकुझ्का कडय़ावरून कोसळून मरण पावला. ल्होत्से पर्वतशिखराचा आत्माही त्याच्या मृत्यूमुळे नक्की हळहळला असणार.
रिनॉल्ड मेसनर या सुप्रसिद्ध गिर्यारोहकाचा ८ हजार मीटरवरील उंचीची १४ शिखरे चढून जाण्याचा विक्रम पूर्ण झाला तो याच शिखरावर आणि याच शिखराच्या साक्षीनं. पोर्टर्सशिवाय आणि कृत्रिम ऑक्सिजनशिवाय हा विक्रम करणारा तो पहिला गिर्यारोहक ठरला.
तर असा हा ‘ल्होत्से’चा रोमहर्षक इतिहास. या पर्वताच्या इतिहासाच्या पानावर गिरिप्रेमींचे गिर्यारोहक आपली मुद्रा उठवतील येत्या मे २०१३ साली.

First Published on January 2, 2013 1:40 am

Web Title: new challenge from trackers in lohotse