News Flash

ऑफबिट कळसुबाई..

खरंतर कळसुबाईचा ट्रेक बहुतांशपणे बारी गावातून केला जातो. पण यावेळी ‘ऑफबिट सह्य़ाद्री’ या संस्थेने आपल्या नावाप्रमाणेच इंदुरे गावातून जाणाऱ्या, वापरात नसलेल्या वाटेची निवड केली होती

| June 11, 2014 09:00 am

अक्षरभ्रमंती
खरंतर कळसुबाईचा ट्रेक बहुतांशपणे बारी गावातून केला जातो. पण यावेळी ‘ऑफबिट सह्य़ाद्री’ या संस्थेने आपल्या नावाप्रमाणेच इंदुरे गावातून जाणाऱ्या, वापरात नसलेल्या वाटेची निवड केली होती. इंदुरे गावातून समोर पसरलेल्या महाकाय सह्याद्रीचे आव्हान स्वीकारत आम्ही चढाई सुरू केली. भरपूर चिखल असलेली सरळ वाट तुडवत हळूहळू सुरुवात झाली. हवेत छान गारवा होता, अधूनमधून पाऊस पण एखादं बटन चालू-बंद केल्यासारखा ये-जा करत होता, डोंगरानेही हिरवा शालू पांघरायला सुरुवात केलेली होती. काहीशी सुस्तीतच पुढची चढाई करत आम्ही एका मोकळ्या पठारावर पोहोचलो. 

इथं पोहोचलो आणि एका तुफानी वाऱ्याशी गाठ पडली. ‘रौद्र’, ‘तुफान’, ‘सोसाटय़ाचा’ अशा सर्व विशेषणांच्या पार होता तो. नीट उभंही राहू देत नव्हता आणि असे टोले लगावत होता की मला माझं वजन अचानक कमी झाल्यासारखं वाटायला लागलं होतं. आजवर अनेक ट्रेक केले पण इतका बेभान वारा मी यापूर्वी कधी अनुभवला नव्हता. वाऱ्याने हळूहळू इतका जोर पकडला की, आम्हाला एकमेकांचा आधार घेत थांबावं लागलं. त्या पठारावर मध्ये एक छोटसं तळं आहे व उघडय़ावरच मारुतीची एक मूर्ती आहे. क्षणभर वाटलं, आपल्या पुत्राला भेटायला साक्षात पवनदेव तर नाही ना आले..
काही वेळ त्या पठारावर घालवल्यावर हळूहळू स्वत:ला सावरत आम्ही पुढील पायपीट सुरू केली. आमच्या म्होरक्याला अजून किती वेळ लागेल असं विचारल्यावर ‘आलो तेवढच अंतर’ असे त्याचे उत्तर मन घाबरवणारं होतं. शेवटी पुन्हा तयारी केली आणि चढू लागलो. आता वाटेत एक अतिशय कठीण घळ लागली. उभ्या धारेवरची, खोबण्यांचा आधार घेत वर सरकणारी. कातळातील ती वाट पार केली आणि आम्ही कळसुबाईच्या खांद्यावर पोहोचलो. भोवतीने ढगांची दाटी झाली होती. ढगांच्या त्या पुंजक्यांतून ते सर्वोच्च शिखर दिसत होते. अद्याप ते दूर होते, पण एक नवी, ‘ऑफबिट’ वाट तुडवल्याचे समाधान आताच गवसले होते.
ही ब्लॉगपोस्ट संपूर्ण वाचण्यासाठी –
http://davbindu.wordpress.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 11, 2014 9:00 am

Web Title: offbeat sahyadri kalsubai
Next Stories
1 मदनगडाची बिकट वाट..
2 ट्रेक डायरी: कोथळीगडावर मोहीम
3 गडावरचे पाणी…
Just Now!
X