वाई ऊर्फ विराटनगरीला अनेक डोंगरांचा वेढा पडलेला आहे. डोंगरांच्या या वेढय़ात पांडवगड, वैराटगड, कमळगड, केंजळगड अशी काही दुर्गरत्नेही आहेत. वाई जवळ आले की, ही सारी दुर्गशिखरे त्यांच्या माना वर करत डोकावू लागतात. यातच त्याच्या विशिष्ट आकाराने अधिक उठून दिसतो तो पांडवगड!
या पांडवगडाकडे जाण्यासाठी दोन वाटा. एक वाईजवळच्या मेणवली गावातून, तर दुसरी धावडी गावच्या हद्दीतून. दोन्हीही वाटा अंगावर येणाऱ्या पण त्यातही धावडीकडची तुलनेने थोडी कमी श्रमाची!
वाई मांढरदेव मार्गावर धावडी हे गाव. वाईहून याचे अंतर सात किलोमीटरचे. खरेतर या गावात जायचेच नाही. या धावडी गावचा फाटा जिथे लागतो त्याला मागे टाकत तसेच पुढे मांढरदेवच्या दिशेने अर्धा एक किलोमीटर गेलो की, पांडवगडाला खेटून एक-दोन घरांची वस्ती लागते. कोंडके आडनाव बंधूंची ही घरे. या घराशेजारूनच एक वाट पांडवगडाकडे निघते.
पांडवगडाच्या अगदी पायाशी ही घरे. इथून हा गड आणि त्याचा कातळ एकदम अंगावर येतो. पायातले बूट, पाठीवरची सॅक घट्ट करायची आणि खंबीर पावलांनी गड चढू लागायचे.
पांडवगड, उंची ४१७० फूट किंवा मीटरच्या भाषेत१२७३! शिलाहार राजा भोज याने सातारा जिल्ह्य़ात जे काही दुर्ग निर्माण केले त्यापैकी हा एक! निसर्गाचे अभेद्यपण घेऊन जन्माला आलेला!
छातीवर येणारा चढ आणि भरपूर झाडी.. पांडवगडाचा हाच अनुभव सुरुवातीला येतो. मुळात इकडे फारसे कुणी येत नाही. स्थानिक चार गावक री-गुराख्यांनी वर्दळीखाली ठेवलेली ही वाट, पण पावसाळा उलटला की या गडावर बेसुमार गवत माजते आणि मग त्याखाली आहे ती वाट देखील झाकून जाते. हे गवतही अगदी राक्षसी! आकाशाकडे धावणारे, चांगले पुरुषभर उंचीचे. गवताच्या या दाटीतूनच मार्ग काढत, शोधत गडाकडे सरकावे लागते. साऱ्या अंगाला कुसळ, काटे टोचू लागतात. सरपटणाऱ्या जिवांचे भय ते निराळेच. खरेतर पावसाळय़ानंतरचा हंगाम भटकंतीसाठी सुगीचा पण पांडवगडाबाबतीत या गवतामुळे तो साफ चुकीचा म्हणावा लागेल. यामुळे इकडे आलात तरी सावधपणे फिरा, पायात बूट तर आवश्यकच!
पांडवगडावरच्या या गवत झाडीत कारवीची दाटीही मोठी आहे. २००८ साली ही कारवी फुलली होती. ती फुलली त्यावेळी या गडावर उमटलेल्या निळाईच्या लाटांची आपण केवळ मनोमन कल्पनाच करायची. सात वर्षांची तिची ही बहरवारी आता २०१५ साली पुन्हा फुलणार आहे, पण तरीही आमच्या भटकंतीत एक-दोन ठिकाणी फुललेली कारवी दिसली. सात वर्षांच्या या निसर्ग वेळापत्रकात वाट चुकलेली, शर्यतीत मागे-पुढे झालेली ही झुडपे. कारवीच्या जोडीनेच तेरडा, सोनकी, हळुंदा, लाजाळू कवळा, कोंबडतुरा, तालीमखाना अशा काही अन्य रानफुलांचेही चेहरे उमललेले होते.
गडाच्या अगदी माथ्याजवळ आलो की, काही पायऱ्यांचे अवशेष दिसतात. गडाचा पहिला धागा या पायऱ्यांमधूनच जुळतो. इथे माचीत शिरण्यापूर्वी एखादा दरवाजा असावा असे वाटते. पण सध्याच्या अवशेषांमुळे हा केवळ आपला अंदाज!
माचीत येताच गवताबरोबर काही मोठाले वृक्षही दिसतात. यातीलच एकाच्या खोडाला पाटी लावलेली होती, ‘प्रायव्हेट प्रॉपर्टी..परवानगीशिवाय प्रवेश करू नये’! एखादा गडावर अशी पाटी पाहून पहिल्यांदा उडायलाच होते. शेर वाडिया नावाच्या एका पारशी गृहस्थाने या माचीवरीलच जमिनीचा एक तुकडा विकत घेतला आहे. इथेच त्याने स्वत:साठी एक बंगली थाटली असून त्यात तो गेल्या वीस-पंचवीस वर्षांपासून राहात आहे. एखाद्या ऐतिहासिक गडावरची जागा कुणी विकत घेतल्याची सल मनात बाळगायची का कुणी या अनगड ठिकाणी इतकी वर्षे सन्याशाचे जीवन कसे जगतो याचे कौतुक करायचे हेच कळत नाही.
माचीवरून पुढे निघताच वाटेत दोन पाण्याच्या टाक्या लागतात. गडावर एकूण दहा ते पंधरा खोदीव टाक्या, एक-दोन मोठाली तळी देखील. पण या साऱ्यांतले पाणी आणि त्यांचे रंग मात्र पहिल्याहून निराळे.
पुढे निघताच बालेकिल्ल्यातील प्रवेशमार्ग येतो. एक खणखणीत बुरुज, त्याला लागून कडय़ाला समांतर प्रवेशद्वाराची कमान आणि त्यालगत काही अंतरापर्यंत चिरेबंदी तट! यातील दरवाजाची कमान तेवढी पडलेली, अन्य बांधकाम आजही ताजे. त्याच्याकडे पाहताच पांडवगडाचे दुर्गपण जागे होते. पांडवगडाला चहुबाजूंनी ताशीव खोल कडे यामुळे तटबंदीची आवश्यकता जिथे आहे तिथेच ती घातलेली.
तटबंदीच्या या माऱ्यातून एक वळण घेत आपण बालेकिल्ल्यावर येतो. वर येताच भोवतीचे गवत पुन्हा घट्ट होते. मग यातूनच एकेका अवशेषांची शोधाशोध सुरू करायची. गवताच्या दाटीतच सुरुवातीला मारुतीचे मंदिर येते. आतील मूर्ती पाहण्यासारखी, निराळी. वीर भावातील या बजरंगाच्या हातात चक्क कटय़ारीसारखे एक हत्यार दाखवले आहे.
मारुती मंदिराच्याच पुढे गडावरील चुन्याची घाणी येते. याच्या चरातील ते दगडी चाक आता गेल्या काही वर्षांपर्यंत व्यवस्थित होते. पण पांडवगडाच्या या आश्रयाला कुणी ‘कौरव’ आले आणि त्यांनी हे शिल्प तोडून टाकले. ऐतिहासिक वास्तूंची मोडतोड करण्यात आमच्या लोकांचा हात कुणी धरणार नाही. गल्लोगल्लीची रंगीबेरंगी बेढभ मंदिरे आणि चौका-चौकात धूळखात पडलेले पुतळे यांच्याबाबतीत नको इतकी ‘हळवी’ असलेली आमची मने या अशा राष्ट्रीय वारशांच्या मोडतोडीवेळीच कुठे जातात, कळत नाही.
यानंतर चार पावलांवरच गडदेवता पांडजाई देवीचे मंदिर! मूळ मंदिर पडून गेलेले, पण त्याचे जोते अद्याप शिल्लक. यावरच मागे कधी नव्याने बांधलेले मंदिरही आता पडू लागलेले. देवीच्या मूर्तीचीही झीज झालेली. मंदिरासमोर शिवलिंग, नंदी, पादुका, वीर पुरुषाची एक मूर्ती आदी शिल्प दिसतात. गडांवर दिसणारे पाण्यासाठीचे दगडी भांडेही इथे आहे. हे सारे पाहात असतानाच झाडीतल्या या मंदिरात जागोजागी मोठाल्या जाडजूड पाली नजरेस पडतात. त्यांचे रानटी रूप पाहून एकक्षण अंगावर काटा उमटतो.
या मंदिराशेजारीच गडावरील एका मोठय़ा घराचे जोते आहे. गडाच्या मध्यभागी अनेक ठिकाणी शिबंदीची घरे दिसतात. दारुगोळय़ाची कोठारे, दक्षिणेकडील तलाव, तटबंदी आदी पाहात आपण पुन्हा दरवाज्यापाशी येऊन पोहोचतो.
पांडवगडाचा इतिहास शोधायला लागलो की, स्थानिक लोक अगदी महाभारतात घेऊन जातात. मग त्यांना बाहेर काढत आपण खऱ्या इतिहासात घेऊन यायचे. पांडवगडही शिलाहार राजा भोजची निर्मिती. साधारणपणे इसवी सन ११७८ ते ९३ दरम्यान याला हे गडाचे रूप दिले गेले. पुढे आदिलशाही इथे आली. छत्रपती शिवरायांनी इसवी सन १६७३ मध्ये हा गड स्वराज्यात आणला. पुढे औरंगजेबाच्या वावटळीत १७०१ मध्ये तो मुघलांकडे गेला. यातून त्याची सुटका केली ती छत्रपती शाहूंनी. मराठय़ांकडील हा वारसा अखेर एप्रिल १८१८ मध्ये मेजर थॅचरने हिसकावून घेतला. त्यावेळी सुरू झालेली उपेक्षा जणू आजही सुरूच आहे.
पांडवगडाचा हा सारा प्रवास गवत-झाडीचे ते जंगल बाजूला सारत, वाट काढत सुरू असतो. यातून एका टोकाला यायचे आणि मग पुन्हा सारा मागचा गड आणि भोवतीच्या दऱ्याखोऱ्यांवर नजर फिरवायची. अगदी सुरुवातीला उत्तरेकडची मांढरदेवीची डोंगररांग आणि तिच्यावरचे चमचमते देवस्थान दिसते. पूर्व दिशेला खंबाटकी घाटाचा डोंगर, त्यापलीकडे नांदगिरी, चंदन-वंदन, वैराटगड रामराम करतात. दक्षिण अंगाला पाचगणी, महाबळेश्वरचे पठार कृष्णेची गाथा घेऊन पुढय़ात येते. त्याला जोडूनच पश्चिम अंगाचा कमळगड आणि त्याअलीकडचा केंजळगड येतो. या साऱ्यांच्या मधोमध चमचमते पात्र होऊन संथ वाहणारी ती कृष्णा येते. तिच्या काठावरची ती धोम, मेणवली आणि प्राचीन वाईनगरी..आणि जणू या साऱ्या देखाव्यावर लक्ष ठेवून असलेला हा पांडवगड! ..जोडला जाऊनही एका तटस्थ नजरेने या साऱ्यांकडे पाहणारा.

pune leopard marathi news, shirur leopard marathi news
कोंबड्यांच्या खुराड्यात बिबट्याची मादी कैद
Agreli
जपानच्या चलनाचा कच्चा माल पुरवतो हिमालयाच्या कुशीतला ‘हा’ देश!
tigress archi video marathi news, loksatta tiger video marathi news
VIDEO: आर्चीच्या बछड्यांची ‘मस्ती की पाठशाला’, टिपेश्वरच्या जंगलातील दंगामस्ती कॅमेऱ्यात कैद
Gadchiroli, Police, Foil, Naxal Plot, near chattisgarh border, Seized Arms, Materials, maharashtra, marathi news,
गडचिरोली : नक्षल्यांचा घातपाताचा डाव उधळला; छत्तीसगड सीमेवरील तळ उध्वस्त