नॉर्वे हा पर्यटकांच्या दृष्टीने अत्यंत विविधतापूर्ण असा उत्तर गोलार्धातील देश आहे. दक्षिणोत्तर पसरलेल्या या नॉर्वेची लांबी १७५२ किलोमीटरची असून त्याचा पश्चिम किनारा नॉर्वेजिअन सागराला भिडलेला आहे. पश्चिम किनाऱ्यावरील या असंख्य खाडय़ा जमिनीवर तब्बल पन्नास ते सव्वाशे किलोमीटपर्यंत आत घुसलेल्या आहेत. तर या खाडय़ांच्या दोन्ही काठांवर सरासरी १२०० मीटर उंचीचे डोंगर-कडे खडा पहारा करतात. या डोंगर माथ्यावर सहा सात महिने बर्फ साचतो. मे महिन्यात बर्फ वितळू लागले, की पुढील तीन-चार महिने या कडय़ावरून ठिकठिकाणी धबधबे उडय़ा घेत असतात. या डोंगर उतारावर ओक, स्प्रूस, पाईन वृक्षांच्या गर्द वृक्षराजीने हिरवा पडदाच अवतरतो. अशा या नयनरम्य शांत पाण्याच्या, सुरक्षित नैसर्गिक नजराण्याला ‘फिजॉर्ड’ संबोधले जाते. नॉर्वेतील ठिकठिकाणचे फिजॉर्ड पृथ्वीवरील नैसर्गिक आश्चर्यच आहेत. युनेस्कोने या ‘फिजॉर्ड’ ना आता ‘वर्ल्ड हेरिटेज’ मध्ये समाविष्ट केले आहे. या ‘फिजॉर्ड’मधील जलभ्रमंती निसर्गाच्या नवलाईत घेऊन जाते.
फिजॉर्डची ‘जॉय राईड’ पश्चिम किनाऱ्यावरील ब्रेरजेन बंदराच्या जवळील गुडव्हॅनजेन ते फ्लाम गावापर्यंतची साठ किलोमीटर लांबीची आहे. बोट सुरू होते तेव्हाच आपल्याला वेगळय़ा जगात निघाल्याचे जाणावते. दोन्ही बाजूंना उंचउंच कडे आणि त्यांना छेदत जाणारा तो पाण्याचा प्रवाह. निसर्गाच्या त्या भव्य आकृ तीपुढे आपले अस्तित्व अगदीच क्षुद्र होऊन जाते.
पाणी, भोवतीचे उंच कडे आणि यामधोमध वर दिसणारे निळेभोर आकाश या साऱ्यांतूनच आपला प्रवास सुरू असतो. निळय़ा अवकाशातील ढगांचे पुंजके वेगाने धावताना दिसतात. या ढगांचे पाण्यात पडणारे प्रतिबिंब खुणावू लागते. भोवतीने कोसळणारे पांढरे शुभ्र धबधबे लक्ष वेधू लागतात. या डोंगरावर एरवी बर्फाचे थर साचलेले असतात. पण तेच उन्हाळा सुरू झाला, की हे बर्फ वितळते आणि या बर्फाळ डोंगरांनाही विविध आकार प्राप्त होतात. या जलखिंडीतून प्रवास करताना या बर्फाळ कलाकृती गूढ वाटू लागतात.
या साऱ्या प्रवासात मध्येच कधी युरोपातील तो हलका पाऊस पडतो, कधी त्या बर्फाळ सान्निध्यात गोठवणारी थंडीही जाणवू लागते, तर कधी पुन्हा लख्ख प्रकाशाचे कवडसे पसरत, हवेत उबदारपणाही येतो.
‘गुडव्हॅनजेन फिजॉर्ड’ हा नालाकृती जवळजवळ तेराशे मीटर खोलीची आहे. स्वच्छ-नितळ अशा या पाण्यात अनेकठिकाणी त्याच्या या खोल खोलीचाही अंदाज येत असतो. या प्रवाहातही विविध रंगबिरंगी माशांसह नाना प्रकारची जलसृष्टी दिसते. ती पाहण्यातही जीव दंग होतो. तसे दुसरीकडे भोवतीने घिरटय़ा घालणारा सीगल्सचा थवा लक्ष वेधू लागतो. त्यांच्यासाठी काही खाद्यपदार्थ टाकले, तर ते हवेतल्या हवेतच झेप मारून मटकवतात. मग हे पदार्थ मिळवल्यावर विशिष्ट आवाज काढत पुन्हा वळसा घेत, आनंदाने साद देतात.  ‘फिजॉर्ड’च्या या ‘जॉय राईड’मधील ही सारी निसर्गदृश्ये बोटीवरच्या त्या दिमाखदार खुर्चीत बसत पाहायची. सुरक्षित ठिकाणाहून साहसाच्या त्या वाटेवरचा आनंद घ्यायचा.
गाईडने सांगितले, की या काठांवरच्या या परिसरात मे ते सप्टेंबर अखेपर्यंत काही ठिकाणी शेतकरी, धनिक हौशी मंडळी रहातात. ऑक्टोबर-नोव्हेंबर सुरू झाला, की हा सर्व परिसर बर्फाळ बनतो. तापमान शून्य अंशाखाली उतरते. मग हा सारा परिसर निर्मनुष्य होतो.
अध्र्या तासाने बोट थांबली. ते ठिकाण होते बाक्का. तेथे १८५९ मध्ये बांधलेले ‘बाक्का चर्च’ फारच टुमदार वाटले. त्या भागात पंधरा कुटुंबे राहतात. त्यांनी बक ऱ्या, घोडे पाळले आहेत. काही पर्यटक तेथे उतरून घोडय़ावरून स्टाईलहॅम येथील मोठय़ा धबधब्यापर्यंत रपेट करून येतात. त्यानंतर पंधरा मिनिटांनी ‘स्टायव्ही’ थांब्याशी बोट पुन्हा थांबली. तेथे एक पोस्ट ऑफिस आहे. बर्गेन ते ऑस्लो या राजमार्गावरील टपालाची देवाण घेवाण स्टायव्ही येथून होते असे सांगण्यात आले.
बायटेलन वस्ती जवळून बोटीने वळसा घेतला आणि पुन्हा दक्षिण दिशेने प्रवास सुरू झाला. या प्रवासात मध्येच एका डोंगराचा भव्य सुळका छातीत धडकी भरवतो. येथून पुढचा तासाभराचा प्रवास अरुंद खाडीतून होतो. त्यानंतरचा थांबा होता स्टीजेन! तेथील एक कडा तर या साऱ्या प्रवासातील खास आकर्षण! सुमारे तीनशे मीटर उंचीच्या या कडय़ास सपाट माथा आहे. त्याच्या या सपाटीवर रोज अनेक पर्यटक जमतात. उंचावरून फिजॉर्डच्या लांबीरुंदीचे सौंदर्य टिपतात. याचप्रमाणे ‘लीसेफजॉईन’ येथील सपाट भाग तर पर्यटकांचे फार आवडते ठिकाण आहे.
तीन तासांच्या ‘जॉय राईड’ची इतिश्री फ्लाम येथील काठावर होते. तेथे बोटीच्या आकाराचे मोठे हॉटेल आहे. काठावर अनेक रंगीत फुलांच्या कुंडय़ा स्वागत करतात.
खाली पाचूचे पाणी, वर निळे अवकाश, मधूनच भुरकटणारे पांढरे ढग, निरव शांतता आणि हिरवी शाल पांघरलेले दोन्ही बाजूचे डोंगर हे सारे-सारे चिरंतन आठवणींचा एक भाग बनतो. या आठवणींना घेतच आम्ही नॉर्वेचा निरोप घेतला.