कळसूबाई! महाराष्ट्राचे ‘एव्हरेस्ट’! उंची १६४८ मीटर किंवा ५४३१ फूट. जातीच्या प्रत्येक भटक्यांना हे सर्वोच्च शिखर चढण्याची, त्याच्या माथ्याला स्पर्श करण्याची इच्छा असते. पण त्यातील आव्हानामुळे साऱ्यांनाच ही चढाई शक्य होत नाही. पण मग अशा या उत्तुंग शिखरावर जाण्याचा चंग जर अपंगांनी बांधला तर! ऐकून धक्का बसला ना! होय, अशी मोहीम काढली आणि जिद्दीच्या जोरावर आपल्या काही मावळय़ांनी ती यशस्वीही करून दाखवली.

‘प्रहार’ संस्थेच्या वतीने आयोजित या आगळय़ावेगळय़ा मोहिमेने नुकताच कळसूबाईच्या यशात मानाचा शिरपेच खोवला. या संस्थेच्या वतीने यंदा नववर्षांच्या पाश्र्वभूमीवर या मोहिमेचे आयोजन केले होते. शिवाजी गाडे (औरंगाबाद), श्रीकांत पुंडे (संगमनेर), गोपाळ शिंदे (घोटी), सचिन कडवे (इगतपुरी), मंगेश निफाडकर (निफाड), शेख कालू (औरंगाबाद), विठ्ठल गव्हाणे (पाचोड) हे मावळे या मोहिमेत सहभागी झाले होते. वर्षांअखेरीसच सर्व तयारीनिशी हे गिर्यारोहक कळसूबाईच्या पायथ्याशी बारी गावात जमा झाले. दुसऱ्या दिवशी सकाळीच या सर्वानी चढाईस सुरुवात केली. या प्रत्येकाच्या बरोबर जोडीला एक मदतनीस आणि काही गावकरी होते. हातातील काठी, काही ठिकाणी दोरी तर मदतनिसांचा आधार घेत हे मावळे हळूहळू वर चढू लागले. वाटेतील चढउतार चढले गेले, ऐन कडय़ावरील लोखंडी शिडय़ा पार केल्या आणि सूर्य डोक्यावर यायच्या आत या साऱ्या जिद्दीच्या मावळय़ांनी ते सर्वोच्च शिखर गाठले. वर पोहोचताच या साऱ्याजणांनी छत्रपती शिवरायांचा जयजयकार केला. भगवा फडकवला. या विजयोत्सवानंतर सर्वानी मिळून माथ्यावर साफसफाई करत आपले गिर्यारोहण संस्मरणीय केले.