18 December 2017

News Flash

गुजरात / हिमाचल प्रदेश निवडणूक निकाल २०१७

पूर्णगड

महाराष्ट्राला ७२० किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. या समुद्रकिनाऱ्याच्या अंगानेच आमच्याकडे इतिहासात जलदुर्ग संस्कृती

Updated: February 20, 2013 4:50 AM

महाराष्ट्राला ७२० किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. या समुद्रकिनाऱ्याच्या अंगानेच आमच्याकडे इतिहासात जलदुर्ग संस्कृती निर्माण झाली. महाराष्ट्राच्या किनारी असे शंभरएक जलदुर्ग आजही त्या समुद्राच्या लाटांशी गुजगोष्टी करत उभे आहेत. यातील काही ऐन समुद्रात, काही किनाऱ्यावर पाण्यात पाय बुडवून तर काही काठालगतच्या एखाद्या डोंगर-टेकडीवर ठाण मांडून बसले आहेत. या माळेतील एक छोटेखानी रत्न – पूर्णगड!
रत्नागिरीच्या पूर्व दिशेला समुद्रात समांतर अशी एक वाट गेलेली आहे. भाटय़ेची खाडी, पावस, गणपतीगुळे अशा या वाटेवरचा शेवटचा थांबा, पूर्णगड! या वाटेवरील पावसला अनेक पर्यटक-भाविक जात असतात. रत्नागिरी ते पावस अंतर २० किलोमीटर तर त्यापुढे १० किलोमीटरवर पूर्णगड! या पूर्णगडासाठी रत्नागिरी किंवा पावसहून बस, रिक्षा मिळतात. खरेतर रत्नागिरीहून स्वतंत्र रिक्षा करूनच निघाल्यास भाटय़ेचा किनारा, पावस, गणपतीगुळे आणि पूर्णगड अशी चारही स्थळे पाहता येतात.
पूर्णगड हे अगदी छोटेखानी गाव. गावाच्या पूर्वेला मुचकुंदी नदी आणि तिची पूर्णगड नावाची खाडी. रत्नागिरीहून निघालेली ही वाट या खाडीवरील पुलावरून पुढे राजापूर तालुक्यात शिरते. या मुचकुंदी नदीची एक गंमत! तिचा जन्म होतो विशाळगडाजवळ आणि ती समुद्राला मिळते पूर्णगडाशेजारी! एका गडाजवळ उगम पावत अन्य एका गडाजवळ समुद्रात अंतर्धान पावणारी ही एकमेव नदी असावी.
असो. तर पूर्वेला मुचकुंदी नदीची खाडी आणि दक्षिण -पश्चिम बाजूला अथांग पसरलेला सिंधुसागर! या दोन्हीच्या मधे एका छोटय़ा टेकडीवर वसलेला हा पूर्णगड! किंबहुना त्याच्या या भूगोलातच त्याच्या निर्मितीची रहस्ये! या खाडीतील हालचालींवर नजर ठेवण्यासाठीच या गडाची निर्मिती झाली. कुठल्याही गडाचा इतिहास शोधताना त्याचा असा भूगोलही विचारात घ्यावा लागतो.
पूर्णगड हे गाव अगदीच छोटीशी वस्ती! कोकणातील उतरत्या घरांची, आंबा, फणस, काजूच्या झाडांखाली विसावलेली. यातही फणसाची झाडे तर महामुबलक. प्रत्येकाच्या दारा-अंगणात हे फणस अगदी बुंध्यापर्यंत फळांनी लगडलेले. फणसाच्या अंगाखांद्यावरील त्याच्या या बाळांना स्पर्श करतच निघायचे.
या गावात शिरलो तरी हा पूर्णगड काही दिसत नसतो. तेव्हा कुठल्याही गावकऱ्याला या गडाबद्दल विचारावे तर एखाद्या घरामागे बोट दाखवत तो म्हणतो, ‘यो इथं मागू त्यों पूर्णगड!’ आणि तसेच होते. त्या छोटय़ा वाटेने निघालो, की अगदी दहा मिनिटांत गडाच्या प्रवेशदारात आपण हजर होतो.
या दरवाज्यात येण्यापूर्वीच डाव्या हाताला एक तळे, विहीर दिसते. अगदी दाराशी हनुमानाचे एक छोटेखानी मंदिरही आहे. शेंदूर लावून चकचकीत केलेल्या या हनुमानाचे दर्शन घ्यायचे आणि गडकर्ते व्हायचे.
शिवकाळात बांधल्या जाणाऱ्या गोमुखी पद्धतीचा हा दरवाजा. गडाचा मुख्य दरवाजा तट-बुरुजांच्या आत लपवत बांधण्याची ही पद्धत. जेणेकरून शत्रूला गडाचा दरवाजा कुठे आहे, हेच कळू नये. पूर्णगडाच्या या दरवाजावर मध्यभागी गणेश तर बाजूला चंद्र आणि सूर्य कोरले आहेत. यातील गणेश मांगल्याचे तर चंद्र-सूर्य हे स्थैर्याचे प्रतीक! या लोकी जोवर हे चंद्र-सूर्य आहेत, तोवर हे स्थापत्य आणि आतील सत्ता अबाधित राहील असाच या शिल्पांचा संकेत! आपल्याकडे अनेक ठिकाणी ऐतिहासिक वास्तूंचे प्रवेशद्वार, शिलालेखांवर अशी चंद्र-सूर्याची रचना केलेली दिसते, त्यामागे याच ‘अक्षय’ भावनेचा अर्थ!
दरवाज्याच्या आतील पहारेक ऱ्यांच्या देवडय़ांवरील चौकशीला सामोरे जात गडामध्ये दाखल व्हावे. आयताकृती असा आटोपशीर गडाचा घेर! आत शिरताच डाव्या हाताला एक वृंदावन दिसते. कुणातरी महत्त्वाच्या व्यक्तीचेच हे स्मारक असणार. पण साराच इतिहास वर्तमानापर्यंत पोहोचत नाही, यातलाच हाही एक प्रकार! यापुढे लगेचच सदरेच्या इमारतीचे जोते दिसते. याशिवाय गडाच्या आत किल्लेदाराचा वाडा, दारूगोळा, धान्य कोठाराच्या इमारतीचे अवशेष दिसतात. पण या साऱ्या इमारतींमध्ये पाण्यासाठी विहीर किंवा आड अशी कुठलीही सोय या किल्ल्यात दिसत नाही ही गोष्ट आश्चर्यकारक वाटते. कुठलाही किल्ला बांधताना त्याच्यात पाण्याची सोय ही प्राधान्याने केली जाते. पण पूर्णगड याला अपवाद कसा ठरतो असा प्रश्न पडतो.
असो. गडातील या वास्तू पाहात त्याच्या तटावर यावे. पूर्णगडाच्या तटावर वरखाली करण्यासाठी जागोजागी जिने ठेवलेले आहेत. यातील एका जिन्याने मुख्य दरवाजा शेजारच्या ढालकाठीच्या बुरुजावर चढावे आणि तटाबरोबरच भोवतालचा मुलूख हिंडू लागावे. असे म्हणतात, छत्रपती शिवरायांनी बांधलेला हा सर्वात शेवटचा किल्ला. त्यांनी हा किल्ला बांधला आणि दुर्गनिर्मितीत पूर्णविराम घेतला म्हणून या गडाला नाव मिळाले, पूर्णगड! तर काहींच्या मते याचा छोटेखानी आकार, जणू पूर्णविरामाच्या ठिपक्याएवढा म्हणूनही हा पूर्णगड! गडाचा फारसा इतिहास सापडत नाही त्यामुळे नेमका हा अर्थही लागत नाही. पण गडाच्या छोटय़ाशा आकाराचाच यामागे काहीतरी संबंध असणार.
गडाला केवळ सहा बुरुजांची तटबंदी. पण हे सर्व बुरूज आजही व्यवस्थित आहेत. सन १८६२ च्या एका पाहणीत या गडावर ७ तोफा आणि ७० तोफगोळे असल्याची नोंद आहे. पण सध्या गडावर एकही तोफ दिसत नाही. आमच्या गडकोटांवरच्या या तोफा कुठे गेल्या, कुणी पळवल्या, कुणी वितळवल्या..वर्तमानाला या इतिहासाचे काहीच ठाऊक नाही. सारेच भीषण आहे.
तटावरून फिरताना भवतालाकडेही लक्ष जाते. नारळी-पोफळीत झाकलेले पूर्णगड गाव, त्यापुढची मुचकुंदी नदीची पूर्णगड खाडी, तिच्यावरचा तो रत्नागिरी-राजापूरला जोडणारा पूल आणि पश्चिमेचा अरबी समुद्र असा मोठा प्रदेश नजरेत येतो. हे सारे पाहात गडाच्या पश्चिम दरवाज्यातून बाहेर दर्यावर उतरावे. त्या दरवाज्याच्या कमानीपासूनच तो विशाल जलाशय खुणावू लागतो. समुद्राचे दर्शन तसे कुठेही मोहकच पण त्याला असा सुंदर कोन मिळाला तर मग काय..! वाळूचा किनारा, त्याभोवतीची नारळी-पोफळीची झालर, सुरूचे बन, क्षितिजापर्यंत अथांग पसरलेला तो सिंधुसागर, त्यावर तरंगणाऱ्या छोटय़ा-मोठय़ा बोटी..आणि या साऱ्या चित्रात दूरहून सांगावा घेत येणाऱ्या पांढऱ्या शुभ्र-फेसाळ लाटा! किती वेळ, किती क्षण हे दृश्य साठवावे..! शांत, निर्मनुष्य अशा या गडावर या कमानीखालीच समाधी लावावी.
   – अभिजित बेल्हेकर
   abhijit.belhekar@expressindia.com

First Published on February 20, 2013 4:50 am

Web Title: purna fort