रायगड जिल्ह्य़ातील रेवस ते कुंडलिका खाडीपर्यंतचा समुद्रकिनाऱ्यालगतचा, निसर्गसौंदर्याने नटलेला, सुजलाम् सुफलाम् भाग म्हणजे अष्टागर! आठ गावांच्या या माळेतील सर्वात दक्षिण-पूर्वेकडील कुंडलिका खाडीवरचे गाव रेवदंडा! अष्टागरमधील अन्य गावांप्रमाणे यालाही त्याची स्वत:ची अशी ओळख आहे. गावात येताक्षणीच भोवतीने दिसणारे किल्ल्याचे तट-बुरूज, गिरिजाघरे आणि अन्य ऐतिहासिक वास्तू यातून रेवदंडय़ाची ही ओळख स्पष्ट होत जाते आणि कधीकाळी इथे नांदून गेलेल्या पोर्तुगीज सत्तेची पाने हळूहळू मागे उलटू लागतात.
खरेतर याच्या अलीकडेच असलेल्या चौल गावासह या रेवदंडय़ाचा एकत्रित चौल-रेवदंडा असा उल्लेख केला जातो. चौल हे प्राचीन बंदर, त्यामुळे या भूमीचा प्राचीन इतिहासही या चौलशीच जोडला जातो. पण रेवदंडा म्हणून हा भाग चर्चेत आला तो पोर्तुगीज राजवटीत! साधारणपणे सोळाव्या शतकाच्या सुरुवातीस पोर्तुगिजांचे या भूमीवर आगमन झाले आणि मग सुरुवातीस व्यापार आणि नंतर साम्राज्यविस्तार या हेतूने त्यांनी त्यांची पाळेमुळे इथे रोवण्यास सुरुवात केली. मधली काही वर्षे सोडल्यास तब्बल अडीचशे वर्षे पोर्तुगीजांची रेवदंडय़ावर सत्ता होती. या प्रदीर्घ सत्तेतूनच इथे रेवदंडय़ाचा कोट, गिरिजाघरे (चर्च), वखार, कोठारे आणि अन्य इमारती उभ्या राहिल्या. वसई, गोव्याखालोखाल पोर्तुगीज रेवदंडय़ात जास्त रमले आणि वसले!
रेवदंडय़ाला येण्यासाठी अलिबागहून बस-रिक्षाची सोय आहे. पुण्या-मुंबईसह काही महत्त्वाच्या शहरातून इथे येण्यासाठी थेट बससेवाही आहे. कोकणचे निसर्गसौंदर्य आणि वाढते पर्यटन यामुळे इथे राहण्या-जेवणाची सोय अनेक घरांमधून तसेच हॉटेल्समधून होते.
रेवदंडा गावातील प्रवेशच मुळी त्याच्या त्या किल्ल्यातून होतो. रेवदंडा गावाभोवती तटबंदीचा फेर धरत बांधलेला हा कोट पश्चिमेला अरबी समुद्र आणि दक्षिणेला कुंडलिका नदीच्या खाडीपर्यंत विस्तारला आहे. त्याच्या उर्वरित उत्तर आणि पूर्व बाजूच्या तटाबाहेरही खंदक खोदल्याने हा एकप्रकारे पाणकोटच झाला आहे.
कुंडलिका खाडीच्या बाजूनेच म्हणजे दक्षिणेस या किल्ल्याचे महाद्वार आहे. एकात एक अशा दोन कमानी. यातील बाहय़ कमानीवर पोर्तुगीज सत्तेचे ते ‘पृथ्वी’ला व्यापल्याचा संदेश देणारे बोधचिन्हही आहे. या दोन कमानींच्या मध्ये पोर्तुगीज भाषेत एक शिलालेख आहे ज्यामध्ये हा दरवाजा कधी बांधला याचा उल्लेख येतो. या किल्ल्यात पोर्तुगिजांचे तब्बल अकरा शिलालेख होते. यातील काही आजही इथे दिसतात तर काही मुंबईच्या ‘बॉम्बे एशियाटिक सोसायटी’च्या संग्रहालयात ठेवण्यात आले आहेत. या दरवाजातून आत शिरताच एका बाजूला पडलेले दोन मोठे दगडी तोफगोळे कधीकाळीच्या त्या हातघाईचा थरार उभा करतात.
हे सारे पाहतानाच मग रेवदंडय़ाच्या इतिहासाचे उत्खनन सुरू होते. रेवदंडय़ाचा हा किल्ला पोर्तुगिजांनी १५२४ मध्ये बांधला. त्याला ‘आगरकोट’ असेही म्हटले जाते. सोळाव्या शतकाच्या अखेपर्यंत या किल्ल्यात पोर्तुगिजांनी अनेक इमारती उभ्या केल्या. इसवी सन १६३४ मध्ये इथे आलेल्या अँटॉनिओ बोकारोने या पोर्तुगीज व्यक्तीने या किल्ल्याचे वर्णन लिहून ठेवलेले आहे, ते असे, ‘या किल्ल्यात सेनापती आणि दोनशे पोर्तुगीज सैनिक राहतात. आतमध्ये या सैनिकांची घरे, शस्त्रागार, कॅथ्रेडल, चर्च, वखार आदी इमारती आहेत.’  या किल्ल्याच्या बुरुजांवरील तोफांची वर्णनेही त्याने केलेली आहेत. यामध्ये ‘कॅमल’ नामक तोफ आहे. सर्प, गरुडाच्या आकारांच्या तोफेचेही उल्लेख येतात. १४ ते ६५ पौंडी गोळय़ांचा मारा करणाऱ्या या तोफा पितळ वा पोलादाच्या असल्याचेही तो म्हणतो. पण आज यातील अनेक तोफा इथे दिसत नाहीत.
इसवी सन १७२८ मधील आंद्रे रिबेरो कुरिन्हाने या पोर्तुगीज व्यक्तीच्या अहवालातही या किल्ल्याचा तपशील येतो. तो म्हणतो, ‘या किल्ल्यास पंधरा बाजू आणि अकरा बुरूज आहेत. यावर तीन ते चाळीस पौंड वजनाचे गोळे फेकणाऱ्या ५८ तोफा आहेत. ६२ सैनिकांची एक याप्रमाणे तीन कंपन्या इथे तैनात आहेत.’
इतिहासातील ही अशी वर्णने त्या वेळीच्या या किल्ल्याची रचना, साधनसामग्री, शस्त्रसज्जता याविषयीची भरपूर माहिती पुरवतात. आजही या किल्ल्याची बहुतांश तटबंदी शाबूत आहे. त्याच्या भोवतीने असलेल्या खंदकातून काही ठिकाणी या तटात शिरण्यासाठी भुयारी मार्गही ठेवलेले आहेत. माती-गाळाने भरलेले हे मार्ग मुंबईच्या ‘केव्ह एक्सप्लोरर’ या संस्थेने काही वर्षांपूर्वी थोडेफार खुले केले होते. पण पुढे त्याची योग्य निगा न राखल्याने हे छुपे मार्ग आज पुन्हा गाळ आणि घाणीने बुजले गेले. आपले दुर्दैव एवढेच! आपल्याकडे दुर्गभक्तीने, प्रेमाने अनेक ठिकाणी दुर्गसंवर्धनाची कामे होताना दिसतात. पण या कामांची योग्य निगा न राखल्यास हे सारेच कष्ट पुढे पाण्यात जातात. स्थानिक प्रशासनाने या अशा कामात खरेतर पुढाकार घ्यायला हवा.
पोर्तुगीज शैलीतील बुरूज आणि त्यावरील बांधकामे या किल्ल्यात दिसतात. यामध्येच चौकोनी बुरूज, सातखणी बुरूज म्हणून दाखवली जाणारी काही विशेष बांधकामे आहेत. याशिवाय किल्ल्याच्या आतमध्ये पोर्तुगीजांची वखार, पडझड झालेली भव्य गिरिजाघरेही आहेत. यातील डोमिनिकन चर्च हे रेवदंडय़ातील एक भव्य चर्च आहे. इसवीसन १५४९ मध्ये बांधलेल्या या चर्चचे छत आज जरी कोसळलेले असले तरी त्याच्या भिंती, प्राकार, त्यावरील नक्षीकाम यातून त्याचे तत्कालीन महत्त्व आणि भव्यता लक्षात येते. याशिवाय सेंट झेवियर चर्चही पोर्तुगीजांच्या महत्त्वाच्या वास्तूंमधील एक दिसते. या चर्चच्या त्या सभामंडपातच त्याच्या बांधकामावरील तो शिलालेख उघडय़ावर पडलेला आहे. चौल आणि रेवदंडा परिसरात असे शिलालेख, तोफगोळे, प्राचीन शिल्पं आणि अन्य अवशेष मोठय़ा प्रमाणात अस्ताव्यस्त पडलेली दिसतात. खरेतर एखाद्या प्रदेशात मिळणारे हे अवशेष अन्यत्र मोठय़ा शहरातील संग्रहालयात हलविण्यापेक्षा ते तिथेच स्थानिक पातळीवर संग्रहालय उभारून तिथल्या इतिहास-संस्कृतीसह मांडल्यास सर्वच अर्थाने ते आदर्श ठरेल. यामुळे स्थानिक संदर्भ-महत्त्व तर टिकेलच आणि तेथील पर्यटनही दिशादर्शक होईल.
या किल्ल्याव्यतिरिक्त रेवदंडय़ात आल्यावर आणखी एक गोष्ट पाहायची ती म्हणजे अफनासी निकीतीनचा स्मृतिस्तंभ! रेवदंडा म्हणजे प्राचीन चौलचाच एक भाग, यामुळे प्राचीन काळापासून इथे देशोदेशीचे अनेक सत्ताधीश, व्यापारी, प्रवासी येत होते. या प्रवाशांनी त्यांची या भूमीबद्दलची वर्णनेही लिहून ठेवलेली आहेत. अफनासी निकीतीन हा रशियन प्रवासीही यातीलच एक! इसवी सन १४६६ ते ७२ या काळात हा अफनासी हिंदुस्थानात आला होता. त्याने त्याच्या या प्रवासाची सुरुवात या चौलच्या बंदरात पाय ठेवूनच केली होती. पुढे त्याने पाली, मुंब्रा, जुन्नर असा मोठा प्रवास केला. त्याने या देशाविषयी, विशेषत: महाराष्ट्राविषयी मोठे लेखन करून ठेवले आहे. त्याचे हे लेखन रशियातील चालू पिढीतील काही संशोधकांच्या हाती लागले. याचा पाठपुरावा करत मग रशियातील एक पत्रकार आणि इतिहासकार अलेक्सी गारेतोवस्की १९९१ मधील मार्च महिन्यात रेवदंडय़ाला आले आणि त्यांनी अफनासीच्या मार्गानेच हिंदुस्थानात प्रवास केला. या साऱ्याच प्रकाराने आमचे स्थानिक लोकही जागे झाले आणि मग अफनासी निकीतीनच्या स्मृतिप्रीत्यर्थ रेवदंडा येथील कोकण एज्युकेशन सोसायटीच्या सरदार रावबहादूर तेंडुलकर विद्यालयाच्या प्रांगणात एक स्मृतिस्तंभ उभा केला गेला. इतिहासाचा पराक्रम आमच्याकडे कितीही मोठा असला तरी त्याचा असा पाठपुरावा करण्याचे वेड मात्र परकियांकडेच दिसते.
असा हा रेवदंडा परकीयांच्या पाऊलखुणांच्या अनेक स्मृती जपून ठेवणारा आहे. ही स्मृतिस्थळे आज जरी परकीय वाटली तरी आपला, महाराष्ट्राचा, भारताचा इतिहास लिहिताना हा साराच टप्पा महत्त्वाचा ठरतो. कधीकाळीचा रेवदंडय़ाचा हा इतिहास आज नारळी-पोफळीच्या बागांमध्ये झाकला गेला आहे. अष्टागरमधील अलिबाग, नागाव, सासवनेला अनेक जण येतात. पण यातील फारच थोडय़ांची पावले पुढे या रेवदंडय़ाच्या इतिहासाकडे वळतात. पर्यटन हे निसर्ग, इतिहास, भूगोल, स्थानिक लोकसंस्कृती, चालीरीती, खाद्यजीवन, भाषा, वेश अशा सर्वच अंगांनी करायचे असते. अशी चौकस-चौफेर दृष्टी जोपासली की मग कुठलाही प्रवास हा खऱ्याअर्थाने ‘देशाटन’ होतो.
अष्टागरमधील हा रेवदंडा किल्ला आणि त्याच्या आतील गाव पाहून झाले की पुढे आल्या रस्त्याने तसेच दक्षिणेकडे बाहेर पडायचे. कुंडलिका नदी तिच्या पाण्याने भरलेल्या खाडीने आडवी येते. अलिबाग तालुक्याची ही हद्द! या खाडीवरील पूल ओलांडला की पलीकडे मुरूड तालुका सुरू होतो. खाडीच्या या पलीकडच्या अंगालाच आणखी एक जलदुर्ग आपली वाट पाहात उभा असतो, नाव कोर्लई! आता या कोर्लईच्या भेटीला पुढील वेळी जाऊयात!