गतवर्षी कर्नाळ्याच्या पायथ्याशी दुर्ग साहित्य संमेलन चालू असताना दुर्गप्रेमींच्या मंडपात संदेश आला, की कर्नाळ्यावर अपघात झालाय. मदतहवी आहे. ‘गिरिप्रेमी’ संस्थेचे टेकराज अधिकारी, आशिष माने तातडीने गडावर सुळक्यापाशी गेले. सुळक्यावरून पडलेल्या तरुणाला पोलिसांच्या मदतीने रुग्णवाहिकेमध्ये ठेवून पनवेलला पाठविले.
तोरण्याच्या पायथ्यास मोटार लावून दोन मित्र गड चढू लागले. ते गडावर पोहोचलेच नाहीत, परत आणले गेले त्यांचे ते मृतदेह. मात्र यासाठी तीन दिवस शोधमोहीम राबवावी लागली. ग्रामस्थ, पोलीस, श्रीपाद सपकाळांच्या नैतृत्त्वाखालची गिर्यारोहक तुकडी असे सर्वजण यासाठी काम करत होते. डोंगरातील टाकी, तळी, धबधबे हेही सापळेच बनलेत. का होतंय असं? हे टाळता येणार नाही? डोंगरात जाणे हा उपक्रम करण्यासाठी धडपडय़ा स्वभाव आवश्यक असतो. कधीतरी धडपडणे, मुका मार, खरचटणे हे होणारच किंबहुना ही गोष्ट गृहीतच आहे, पण डोंगरातील पायपीट, हाईक अथवा ट्रेक म्हणजे माऊटेनियरिंग किंवा गिर्यारोहण यासारखे धाडस आहे अशा थाटात मंडळी जेव्हा डोंगराकडे पावलं वळवतात तेव्हा गोची होऊ शकते.
गिरिभ्रमण हा गिर्यारोहण क्रीडेचा फक्त पाया आहे. ओळख आहे. निश्चित झालेल्या मार्गावरून पायी, स्वावलंबनाचा मंत्र जपत, गरजेपुरती सामग्री बाळगून डोंगराळ प्रदेशातून केलेली सहल म्हणजे डोंगरयात्रा अर्थात हाईक, ट्रेक! यात कष्ट पडणार म्हणजे दम आपसुकच लागणार, कधी वाट चुकणार, दिवाबत्ती नाहीच अशा स्थानी मुक्काम पडणार म्हणजे धाडसाची अनुभूती मिळणार पण हेही सहजपणे. त्यामुळे निसर्ग वैशिष्टय़ांचा उलगडा करून देणारा, शहरी गोंगाटापासून, आधुनिक राहणीमान नाकारून साध्या जीवनशैलीची चुणूक दाखविणारा निर्भेळ आनंद प्राप्त करून देणारा हा उपक्रमशील क्रीडाप्रकार आहे. वास्तविक पाहता यात अपघात व्हायचे कारणच नाही. अर्थात गांभीर्याने जाणीवपूर्वक काही अलिखित नियम पाळले तर!
यासाठी काय नियम असतात, असावेत! एकटय़ाने डोंगरात जाऊ नका. दोन-चार सहकारी असावेत. यातील एकजण तरी आधी त्या स्थळी गेलेला असावा. पूर्वानुभव नसल्यास स्थानिक गावकरी बरोबर घ्यावा. जाण्यापूर्वी नकाशा पाहा. पुस्तकांमधून माहिती शोधा, ‘ट्रेकइट’चे कात्रण ठेवले असल्यास तेच पाहा. यावरून अंतर, वेळ, अवघडपणा याचा अंदाज येईल.
सोबत खाण्याचे पदार्थ, प्रथमोपचार साहित्य, पाण्याची बाटली हे आवश्यकच. नियोजन केल्यावर परतीची वेळ कसोशीने पाळा. काहीजण परत निघण्याच्या वेळेस म्हणजे दुपारी दोन नंतर डोंगरचढाई सुरू करतात. अनोळखी ठिकाणी ऊन्हे उतरली, अंधारून आल्यावर वाट कशी सापडणार? आरंभस्थानी ग्रामस्थांशी संवाद  साधणे अत्यंत महत्त्वाचे. अडचणीच्या वेळी हेच लोक अधिक उपयोगाचे ठरतात. त्यांचा मोबाईल क्रमांक टिपून ठेवणे उत्तम ठरते.
तुकडी मोठी असली तर उपतुकडय़ा कराव्यात म्हणजे शिस्त राहते. नियंत्रण सोपे होते. खाण्याच्या वेळी एकत्र मिसळले तरी वाटचाल गटागटानेच असावी. अर्थात गटबाजी नाही. कारण इथे स्पर्धाच नाही. आनंद घ्या आणि वाटा. वाट चालताना पहिला व शेवटचा मावळा ही आदर्श पद्धत आहे. पाणी पाहिलं की मोह होणे स्वाभाविक आहे. डुबकी मारण्यात मजा आहेच, पण एकाने काठावर राहून सतत लक्ष ठेवावे आणि पाण्यात उतरल्यावर काठाकाठाने पोहणे अधिक शहाणपणाचे नाही काय. श्रम करून घामेजल्या अवस्थेत थंड पाण्यात पायात वळ येऊ शकतात. अशा वेळी पट्टीचा पोहोणाराही काठावर कसा येणार? धबधब्याचे दृश्य समोरून जास्त छान असते. माथ्याजवळ जलौघातून तो दिसत नाही शिवाय पाण्याचा वेग धबधब्याच्या दिशेने वाढता असल्यामुळे निसरडय़ा दगडांवर खोली नसलेल्या पाण्यातही तोल जातो. त्यामुळे सुरक्षित अंतरावर पाण्यात उतरावयास हवे. मजा त्यातही आहे. धरणाचे तलाव फसवे असतात. खोली-अंतर समजत नाही. लांब पल्ल्याचा सराव असेल त्यानेच ही हिंमत करावी.
सह्य़ाद्रीतील बहुतेक गडांना निश्चित वाटा आहेत. गवताने झाकल्या तरी पाऊलखुणा असतातच. अपवाद वगळता अस्पर्शित कातळकडा चढावा लागत नाही. कडा चढण्यासाठी विशिष्ट कौशल्य लागते आणि सरावही असायला हवा. मी राजगडचा बालेकिल्ला चढलो आहे किंवा १० वर्षांपूर्वी कातळारोहण (रॉक कलांबिंग) शिक्षण घेतले आहे हे पुरेसे नाही. कुठे वाट नाही सापडली तर पुन: कधीतरी असे म्हणून परत फिरण्यात कमीपणा वाटू देऊ नये. नियमित ट्रेकिंग करणाऱ्या तुकडीसोबत १० मीटर लांबीचा ‘क्लायबिंग रोप’ असायला हवा. प्रशिक्षित नेतृत्वही हवे. अशावेळी अनगड वाटांचा आनंद घेण्यात हरकत नाही किंवा त्या तुकडीने अनेकवेळा एकत्र गिरिभ्रमणाला गेले असावे म्हणजे समंजसपणे माघार घेणे जमू शकते. प्रसंगी अन्नपाण्याविनाही घाबरून न जाता उघडय़ावर रात्र काढता येते.
एकूणात टक्केवारी पाहिली तर, अननुभवी भटके, तुकडी अपघातग्रस्त होण्याची शक्यता अधिक असते. अशा लोकांनी एखाद्या संस्थेशी संलग्न व्हावे. ट्रेकमध्ये सामील होताना नेतृत्व कसे आहे याची माहिती घ्या. मुख्य म्हणजे त्यांच्या सूचना पाळा.
दुर्गसाहित्य संमेलन, गिरिमित्र संमेलनात जरूर सहभागी व्हा. त्यात मनाची मशागत चांगली होते. असे कार्यक्रम ठिकठिकाणी व्हावयास हवेत. यानंतर काय- पर्वतारोहणाचा आनंद, धाडस अनुभवा. ‘माऊंटेनियरिंग’ हा पुढचा टप्पा. यासाठी ध्यास हवा आणि अखंडित सरावाला पर्याय नाही.