‘‘चीन आणि पाकिस्तानपेक्षाही इथले सतत बदलणारे हवामान हाच भारतीय जवानांचा सर्वात मोठा शत्रू आहे. सियाचिन ही जगातील सर्वात उंचावरील युद्धभूमी असली तरी केवळ हवामान, आजार आणि हिमस्खलन यामुळे आजवर नऊशेपेक्षा जास्त जवानांना प्राण गमवावे लागले आहेत.’’ सियाचिन बेस कॅम्पवरील हुतात्मा स्मारक पाहताना उस्ताद राजेंद्रसिंह माहिती देत होते आणि आम्हा सर्वाना ते ऐकून शहारे येत होते. गेल्या १० महिन्यांत २१ जवान शहीद झाल्याची माहिती आम्हाला मिळाली. आजवर ५३ हेलिकॉप्टर दुर्घटना होऊन, कोटय़वधींचा खर्च करून आणि इतक्या जवानांच्या प्राणांचे मोल देऊनही आपण हा भूभाग का ताब्यात ठेवत आहोत, असा प्रश्न साहजिकच मला पडला होता. शहिदांना सलाम करून आम्ही निघालो खरे, पण या भुंग्याने डोक्यात पोखरायला सुरुवात केली होती.
भारत, पाकिस्तान आणि चीन या तीनही देशांच्या सीमांना स्पर्श करणाऱ्या सियाचिन हिमनदीचा भारतीय लष्कराने १९८४मध्ये ‘ऑपरेशन मेघदूत’द्वारे ताबा घेतला. तेव्हापासून या भागात भारतीय आणि पाकिस्तानी सन्यामध्ये अनेकदा चकमकी झालेल्या आहेत. अत्यंत दुर्गम तसेच संवेदनशील असल्याने या भागात सामान्य नागरिकांना प्रवेश नाही. मात्र या खडतर परिस्थितीत इथले सनिक कसे पाय रोवून उभे आहेत हे पाहण्याची संधी लष्करामुळे मला मिळाली. २००७ पासून लष्कराने ‘सिव्हिलिअन्स ट्रेक टू सियाचिन’ हा कार्यक्रम सुरू केला. त्याची माहिती ‘लोकसत्ता’च्या ‘ट्रेक इट’ या पुरवणीतून मिळाली आणि मी अर्ज केला. परंतु निवड झाल्याचे मला केवळ ट्रेकच्या २ दिवस आधी कळाले. तिथे जाण्याची ईष्र्या होतीच, पण जेमतेम एक दिवस हाताशी होता. विमानाची तिकिटे तत्काळ काढून जाणेही शक्य नव्हते. औरंगाबादचे खासदार आणि शिवसेना उपनेते चंद्रकांत खैरे यांना हे समजल्यावर त्यांनी लगेच आम्हाला औरंगाबाद-दिल्ली-लेह अशी विमानाची तिकिटे पाठवली. अशी संधी पुन:पुन्हा मिळत नसते. तुम्ही गेलेच पाहिजे, असा सल्लाही दिला. सकाळी काहीही ध्यानीमनी नसताना रात्री आम्ही दिल्लीत पोहोचलोदेखील. दुसऱ्या दिवशी लेह विमानतळावर दाखलही झालो. अत्यंत खडतर समजला जाणारा हा ट्रेक पूर्ण करण्यासाठी वैद्यकीय चाचण्या आणि प्रशिक्षण असा सुमारे तीन आठवडय़ांचा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला तरच ग्लेशियर ट्रेकवर जायला मिळणार होते.
सियाचिन ग्लेशियरमधल्या नसíगक परिस्थितीला तोंड देता यावे, यासाठी फिटनेस आणि प्रशिक्षणही तेवढेच महत्त्वाचे ठरते. त्यामुळे संपूर्ण भारतातून निवडल्या गेलेल्या २३ जणांना  आधी लेह येथील मिलिटरी हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय चाचणीला सामोरे जावे लागले. ११ हजार ५०० फुटांवरच्या जगातील सर्वात उंचावरील लष्करी ट्रान्झिट कॅम्पमध्ये आमची राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. इथे रक्तदाब, अतिउंचीवरच्या ठिकाणी वा कमी तापमानामध्ये उद्भवणारे आजार, आदी सर्वासाठीच्या चाचण्यांतून पार होत असतानाच परिसरातील हवामानाशी जुळवून घेण्यासाठी चालणे, धावणे आदींची तयारी करून घेण्यात आली. या चाचण्यांमधून काही जण गळाले. औरंगाबादहून माझ्यासोबत निवडला गेलेला माझा मित्र आदित्य वाघमारे यालाही रक्तदाब वाढल्यामुळे बाद व्हावे लागले.
लेहमधील चाचण्यांमधून निवडलेल्या २० उमेदवारांचे पुढील प्रशिक्षण सियाचिन बेसकॅम्पला येथे झाले. इथे लष्कराच्या आर्मी माऊंटेनिअिरग इन्स्टिटय़ूटचे तसेच सियाचिन बॅटलस्कूलचे प्रशिक्षक आमची वाटच पाहात होते. रॉक क्लाइम्बिंग, रॅपिलग, जुमािरग, आइस वॉल क्लाइिम्बग, ग्लेशियर मार्च, उंचीवरच्या भागातील औषधोपचार, या भागातील वनस्पती, प्राणी यांची माहिती असे प्रशिक्षण या सर्वाना देण्यात आले. आर्मी माऊंटेनिअिरग इन्स्टिटय़ूटचे लेफ्टनंट कर्नल समशेर सिंग आणि सियाचिन बॅटलस्कूलचे सीओ कर्नल आय. एस. थापा यांचे मार्गदर्शन मिळाले. या परिसरातील नुब्रा नदीच्या खोऱ्यामध्ये लष्कराचा मोठा तळ आहे. दोन किलोमीटर रुंदीच्या या नदीचे पात्र हिवाळा संपल्यानंतर बर्फ वितळू लागल्यावर अरुंद होत जाते आणि कोरडय़ा पात्रात रूक्ष मदान तयार होते. या ठिकाणी ८ दिवस कसून सराव केल्यानंतर आम्हाला नॉर्थ पुल्लू या १५ हजार फुटांहून अधिक उंचीच्या ठिकाणी नेऊन शरीराला एवढय़ा उंचीवरील वातावरणाशी जुळवून घेण्याचा सराव देण्यात आला. त्या वेळी झालेल्या वैद्यकीय चाचण्यांत पुन्हा काही जण गळाले. जे शिल्लक राहिले ते आम्ही १४ जण आठ दिवसांच्या ग्लेशिअर ट्रेकला निघालो. बेसकॅम्प पासून ६० किमी अंतरावरील कुमार पोस्ट हे आमचे टाग्रेट होते आणि पुन्हा ६० किमी परत असा मार्ग ठरला होता. सध्या नॉर्थ ग्लेशियरमध्ये तनात असलेल्या ७ कुमाऊ बटालियनचे  मेजर उमेश सती आमच्या सोबत होते.
वैद्यकीय चाचण्या आणि प्रशिक्षणाचे एवढे टप्पे पार केल्यानंतर हा आठ दिवसांचा प्रवास कस लावणारा होता. बर्फातून चढउतार, दोन दऱ्यांना जोडणारया शिडय़ांवरून मार्गक्रमण करताना आर्मी माऊंटेनिअिरग इन्स्टिटय़ूटचे ट्रेिनग पुरेपूर कामी आले. रोज साधारण बारा ते अठरा किमी अंतर कापून पुढच्या कॅम्पवर पोहोचायचे असा प्रवास करत या ट्रेकचे सर्वोच्च लक्ष्य असलेल्या कुमार पोस्टवर आमची टीम पोहोचली तेव्हा सुरुवातीच्या २३ जणांमधले फक्त १३ जण टिकले होते, बाकीच्यांना प्रकृतीच्या वा अन्य कारणांमुळे मागे परतावे लागले होते. मात्र सुरुवातीला आलेल्या चार महिला गिर्यारोहकांनी मात्र सगळे अडथळे पार करत ट्रेक पूर्ण केला ही बाब विशेष महत्त्वाची.
जो रहेगा गंदा, वो रहेगा जिंदा
बेसकॅम्पवर गेल्यावर ग्लेशियरचा हा नवीन नियम आम्हाला समजला. अति थंडीमुळे अंघोळ नावाचा प्रकार तिथे नाही. पाण्याशी शक्यतो कमीतकमी संपर्क येईल, असे सर्वाचे जीवनमान आहे. आम्हीही आनंदाने या नव्या नियमाचे पालन करत असू. पण ट्रेक पूर्ण करून बेसकॅम्पला परत आल्यावर आम्ही २२ दिवसांच्या अंगावरील मळाचा गणपती करत न बसता घासूनपुसून चक्क अंघोळ केली.
कुमार पोस्ट सर्व बाजूंनी बर्फाच्या डोंगरांनी वेढलेल्या खोबणीत उभारलेली आहे. हिमालयाच्या काराकोरम आणि साल्तोरो या दोन पर्वतरांगांच्या मध्ये हे ७६ किमीचे ग्लेशियर पसरलेले असल्याने मार्गात आम्हाला या दोन्ही रांगांमधल्या प्रसिद्ध शिखरांचे दर्शन झाले. जगातील सर्वाधिक उंचीवरचा कडा असलेले ज्वालाशिखर, अप्सरा, रिमो यांसारखी शिखरे, वाटेवरची अनेक गोठलेली तळी पाहायला मिळाली. या प्रवासात कुठे साधी गवताची काडीही नव्हती. संपूर्ण जेवणाची रसद हेलिकॉप्टरने पुरवण्यात येत होती. परतीच्या मार्गावर भूकंपाचा आणि हिमस्खलनाचा अनुभवही घेतला. आम्ही तंबूबाहेर उभे होतो तेव्हाच भूकंप झाला. आमच्या समोरच्या बर्फाच्या तळय़ाला तडे जाताना आम्ही पाहिले. काही अंतरावरचा एक हिमकडा कोसळताना पाहिला. मात्र लष्कराच्या सुरक्षित हातांमध्ये असल्यामुळे भीतीची जाणीवही झाली नाही. या सगळय़ा अनुभवातून जाताना आपले सनिक किती किठीण परिस्थितीतही देशरक्षणासाठी सज्ज असतात, हे पाहायला मिळाले, हा वेगळाच अनुभव होता.
पाकिस्तान आणि चीन या दोन्ही देशांचा या भूभागावर पूर्वीपासूनच डोळा आहे. अक्साई चीन आणि पाकव्याप्त काश्मीर या दोन भूप्रदेशांना जोडणारा हा भाग आहे. शिवाय लडाखमध्ये थेट प्रवेश करता येईल असे हे मोक्याचे ठिकाण आहे. मात्र काराकोरम आणि साल्तोरो या दोन्ही पर्वतरांगांच्या मधोमध असणाऱ्या या चिंचोळय़ा पट्टय़ावर भारताचा ताबा असल्यामुळे दोघांचेही काही चालणे शक्य नाही. ग्लेशियर ताब्यात असल्यामुळे पाकव्याप्त काश्मिरातून तिबेटची राजधानी ल्हासाला जोडणारा जो महामार्ग चीनने बनवला आहे त्यावरही भारताची नजर राहू शकते आहे. सामरिकदृष्टय़ा अत्यंत महत्त्वाच्या या भागावर भारत इतका खर्च का करतो हे तिथे गेल्यावर आणि तेथील भूगोल समजून घेतल्यावर मला समजले. हिमालय प्रथमच पाहणारा मी गिर्यारोहणाचा कोणताही अनुभव नसताना केवळ तो भूगोल आणि सामरिक महत्त्व जाणून घेण्यासाठीच तर तिथे गेलो होतो. ते तर पाहिलेच, शिवाय इकडे लष्कराच्या भाकरी भाजत अनेक उद्योग करणाऱ्या मला जवानांचे जीवन अनुभवत महिनाभर लष्कराच्या भाकरीही खायला मिळाल्या.
संकेत कुलकर्णी, Sanket.abhinav@gmail.com