गिर्यारोहकांच्या विश्वात ‘स्टोक कांग्री’ शिखराला एक वेगळे महत्त्व आहे. लडाख भागातील या हिमशिखराची उंची २०१८२ फूट आहे. खडतर चढाई आणि प्रतिकूल हवामान ही या मोहिमेतील आव्हाने आहेत. या साऱ्यांवर मात करत पुण्यातील सारंग बेडेकर, सुधीर खोत आणि तनिष खोत या तीन गिर्यारोहकांनी एव्हरेस्टवीर टेकराज अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली हे शिखर सर केले. यातील तनिष खोत याने वयाच्या बाराव्या वर्षीच हे शिखर सर करत नवा पराक्रम रचला. या मोहिमेत प्रदीप चव्हाण, आकाश रायकवाड आणि आम्रपाली चव्हाण या अन्य गिर्यारोहकांनीही भाग घेतला होता. या सर्वानी हे शिखर सर करण्याचा प्रयत्न केला. पण खराब हवामानामुळे शेवटच्या टप्प्यात या साऱ्यांना माघार घ्यावी लागली. यामधील आम्रपाली चव्हाण ही गिर्यारोहक जर्मन बेकरी स्फोटातील जखमी आहे. या धक्क्यातून बरे होत तिने हे यश प्राप्त केले आहे. या सर्व गिर्यारोहकांना ‘थ्री पॉइंट अ‍ॅडव्हेंचर्स’ संस्थेचे टेकराज अधिकारी, चेतन केतकर आणि सुरेंद्र जालीहाळ यांनी मार्गदर्शन केले.